Get it on Google Play
Download on the App Store

गोष्टी सिनेमाच्या - गुडबाय मिस्टर चिप्स

लहानपणी शांता शेळके ह्यांची चित्रपट विषयक काही पुस्तके मला कुणी वाचायला दिली होती. त्यांत माझ्या आठवणी प्रमाणे काही इंग्रजी चित्रपटांचा सारांश दिला होता. हे अनेक चित्रपट जुने होते आणि ग्रामीण भागांत (आणि शहरांत सुद्धा अनेक ठिकाणी) कुठे केबल आणि इंटरनेट नसल्याने त्या काळी मला बघता आले नाहीत. पण तरुणपणी ते सर्व चित्रपट मी आवर्जून पाहिले. शांता शेळके ह्यांनी मला इंग्रजी चित्रपट न पाहता सुद्धा चित्रपटांची आवड लावली असे म्हणू शकते. त्या काळी हॉलिवूड चित्रपटांची एक डिक्शनरी यायची त्यांत शेकडो चित्रपटांची माहिती येत असे, म्हणजे ३-४ वाक्यांत चित्रपटाची कथा आणि एक रेटिंग. मग वर्तमान पत्रांत HBO वर वगैरे काय चित्रपट येत आहेत ते पाहायचे आणि मग ह्या पुस्तकांत त्या चित्रपटाच्या बद्दल जास्त माहिती घ्यायची आणि कथानक आवडले तर तो चित्रपट पाहायचा असेच मी करत असे. नंतर टॉरेन्टस वगैरे उपलब्ध झाल्याने कुठलाही चित्रपट अगदी ८-१० तासांत डाऊनलोड होत असे.

ह्या लेखमालिकेत आम्ही काही विशेष इंग्रजी चित्रपटांचा वेध घेणार आहोत. ह्यात तुम्हाला सर्वसाधारण पणे ठाऊक असणारे चित्रपट मिळणार नाहीत पण हे चित्रपट १००% पाहण्यासारखे आहेत हे मी पैज मारून सांगू शकते. तुम्ही रसिक असाल तर वेळ वाया जाणार नाही.

गुडबाय मिस्टर चिप्स

ह्या चित्रपटाचे अनेक रिमेक झाले पण मूळ चित्रपटाची सर कुणालाच नाही. मूळ चित्रपट आला १९३९ साली. मुलांसाठी झटणारा मास्तर हि भारतीय कल्पना वाटली तरी इंग्रजी साहित्यात सुद्धा अशी पात्रें अनेक आहेत.

मिस्टर चिपपिंग्स ह्यांनी ५८ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत कधीही शाळा चुकवली नाही पण आज एक दिवस त्यांना सर्दी झाल्याने शाळा चुकवावी लागतेच. त्यावेळी ते आपल्या आराम खुर्चीत बसून फ्लॅशबॅक मध्ये जातात आणि चित्रपट उलगडत जातो.

एक तरुण शिक्षक ब्रूक्सफिल्ड ह्या मोठ्या मुलांच्या शाळेंत लॅटिन शिकवण्यासाठी १८७० मध्ये येतो. मुले त्यांच्यावर विनोद करतात पण काहीच कालावधीत हा शिक्षक आपल्या स्वभावाने सर्वाना जिंकतो. म्हणजे तो शिस्तप्रिय असल्याने त्यांचे भय पण कामावरील त्यांची निष्ठा ह्यांच्यामुळे आदर दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम करतात.

त्यांना नोकरीत बढती हवी असते पण ती नाही मिळाल्याने ते थोडे खिन्न होतात पण त्याच नादात व्हिएन्ना ला जातात तेथे त्यांची भेट एका मुलीशी होते (कॅथरीन) आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात होते. चित्रपटाचे साल १९३९ असल्याने (अजून द्वितीय महायुध्दास सुद्धा तोंड फुटले नव्हते त्या काळच्या चित्रपटांत रोमान्स आणि स्त्रियांची भूमिका वेगळ्या धाटणीची होती, फेमिनिझम वगैरे गोष्टी आल्या नव्हत्या). कॅथी आणि चिप्स ह्यांचे लग्न होते. कॅथी अत्यंत मनमिळावू तर असतेच पण ती चिप्स चा कठोर स्वभाव सुद्धा बदलते. चिप्स लॅटिन मधील द्विअर्थी (puns) शब्दांचे विविध प्रयोग करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करतो. हळू हळू कॅथी आणि चिप्स हे शाळेंतील सर्वांचे अत्यंत प्रेमळ जोडपे बनते. चिप्स चे कठोर व्यक्तमत्त्व मनमिळावू आणि प्रेमळ बनते पण त्याची शिस्तप्रियता कमी होत नाही.

सर्व काही आलबेल वाटले तरी कॅथी गर्भवती होते आणि त्याकाळी होत असे त्या प्रमाणे प्रसूतीच्या दरम्यान ती आणि त्यांचे अर्भक दोन्ही मृत्यू पावतात. चिप्स पूर्णपणे कोलमडतो पण आपल्या शिक्षकी पेशांत तो झोकून देऊन दुःख विसरतो. एका पिढी मागे दुसऱ्या पिढीला आणि तिसऱ्या पिढीला शिकवतो. दरम्यान एक नवीन मुख्याध्यापक चिप्स ला ओल्ड फेशन मानून काढू पाहतात पण चिप्स ह्यांची लोकप्रियता इतकी असते कि विद्यार्थी आणि माजी वियार्थी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतात आणि चिप्स त्यांना पाहिजे तेंव्हा निवृत्त होऊ शकतात असा नियम बनवतात.

शेवटी वयाच्या ७०व्य वर्षी चिप्स निवृत्त होतात पण प्रथम महायुद्धाला तोंड फुटते. तरुण मंडळी युद्धावर जातात आणि चिप्स ना शिक्षकी पेशा पुन्हा बोलावून आणतो.ह्यावेळी ते चक्क हेडमास्तर बनतात. खरे तर त्यांना हा पोस्ट नेहमीच हवा होता आणि नियती त्यांना तो विचित्र पद्धतीने देते सुद्धा. जर्मन झिपलीन (म्हणजे मोठे बलून्स) त्यांच्या शाळेवर सुद्धा बॉम्ब फेकतात पण चिप्स शाळा बंद करत नाहीत, ज्युलियस सीझर चे जर्मनीक टोळ्यासोबत जे युद्ध होते त्याची कथा ते आपल्या विद्यार्थ्यांना भाषांतर करण्यासाठी देतात. एका बाजूने जर्मन बॉम्ब फेकत आहेत आणि दुसऱ्या बाजूने चिप्स मोठ्या तावाने सीझर च्या शौर्याची गाथा सांगत आहेत असा हा मजेशीर पण प्रभावशाली सिन आहे.

(लक्षांत घ्या कि हा चित्रपट आला तेंव्हा नुकतेच द्वितीय महायुद्धाला तोंड फुटणार होते. पण चित्रपटाची पार्शवभूमी हि प्रथम महायुद्धाची होती. प्रेक्षकातील अनेक लोकांनी हे युद्ध स्वतः पहिले असेल. आमच्या साठी प्रथम महायुद्ध हे जुनाट इतिहास असले तरी निर्मात्यांसाठी त्याच्या आठवणी अत्यंत ताज्या होत्या)

कॉलिन्स ह्या परिवारातील आजोबा, पिता आणि नातू ह्या सर्वाना त्यांनी शिकवले आहे. पिता युद्धावर आहे तेंव्हा नातूला आणि त्याच्या आईला ते धीर देतात.

"Oh, there's every hope, Helen, hope of peace. Beats me, Helen, if I could last so long with a Colley in it."

दररोज प्रार्थनेच्या वेळी चिप्स आपल्या अश्या माजी विद्यार्थ्यांचे नाव घेतात (honor call ) ज्यांना युद्धांत मृत्यू आला आहे. असंख्य त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचा युद्धांत मृत्यू होतो आणि ते अतिशय भावनाविवश होऊन भाषण देतात.

But there is "cruel news to bear" - in a school service, he announces Brookfield's war losses, including the tragic, heroic death of Lieutenant Peter Colley on the night of November 6th when "peace is so close at hand," and the fall of Max Staefel, fighting for the German side when "advancing with the Saxon regiment on the 18th of October last."

युद्ध संपते आणि चिप्स शेवटी खरोखरीचे निवृत्त होतात. कॉलिन्स परिवारातील चौथी पिढीतील एक मुलगा त्यांना भेटायला येतो. ब्रिटिश परंपरे प्रमाणे त्याला ते चहा आणि केक देऊन त्याचे स्वागत करतात आणि त्याला त्याचे वडील, आजोबा आणि पणजोबाच्या कथा सांगतात. तो लहान मुलगा त्यांना सांगतो कि एवढी मोठी शाळा पाहून त्याला भीती वाटते. चिप्स सुद्धा त्याला सांगतात कि ६० वर्षे आधी जेंव्हा त्यांनी सर्वप्रथम हि शाळा पहिली तेंव्हा ते सुद्धा असेच घाबरले होते पण हळू हळू शाळेची सवय होते. त्या लहान मुलाचा आत्मविश्वास वाढतो. जाताना तो लहान मुलगा त्यांना म्हणतो "गुड बाय मिस्टर चिप्स". वयोवृद्ध चिप्स त्या शब्दांनी पुन्हा आठवणीत हरवून जातात.

मध्यंतरी एक सिन आहे जिथे एक विद्यार्थ्याला शाळेतील शिस्तीची भयंकर चिढ येते. तो म्हणतो कि शाळेतील शिक्षक हे निरुपयोगी म्हातारे किंवा घाबरत आहेत म्हणून त्यांना युद्धावर पाठवले गेले नाही आणि विनाकारण हे दुर्बल शिक्षक आमच्यावर हुकुमत गाजवत आहेत. चिप्स ह्या विद्यार्थ्यांच्या ढुंगणावर छड्या मारून त्याला धडा देतात.

It didn't amuse me to do that, Burton. Very soon now, you'll be an officer in France. You'll need discipline from your men and to get that you must know what discipline means. Now you despise the masters here because they're not young enough or strong enough to fight. You might like to know that every one of them has done his best to join the army. We take no man unless he has done that. I'm headmaster now simply because every man fit to be headmaster is fighting in France. I'm a war-time fluke - a temporary officer risen from the ranks. But I'm going to keep Brookfield together til the war's over.

पण ह्या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट बिंदू हा त्याचा शेवट आहे. चिप्स मरण शय्येवर आहेत, डोळे जवळ जवळ मिटले आहेत आणि त्यांच्या कानावर इतर शिक्षकांचे संभाषण पडते.

"किती एकाकी आयुष्य होते बिचार्यांचे ?"
"पण एके काळी ते विवाहित होते"
"हो का ? मला नव्हते ठाऊक. बिचार्यांना मुले नव्हती, दया वाटते त्यांची"

चिप्स आपल्या मरणशय्येवरून हे ऐकतात.

"तुम्ही काही बोलत होता माझ्या बद्दल ? मी ऐकलं"

"अहो नाही हो, आम्ही फक्त म्हणत होतो कि तुम्ही केंव्हा तुमच्या साखरझोपेतून उठाल. आणखीन काहीही विशेष नाही" .

"नाही मी ऐकलं, मला वाटलं तुम्हाला माझी दया येते कि मला मुले नव्हती.. पण ते सत्य नाही... मला मुले होती... हजारो .. आणि सर्व boys .. "

असे म्हणून त्यांचे डोळे बंद होतात आणि ते सदगतीला पोचतात. मरता मरता त्यांच्या समोरून प्रत्येक विद्यार्थ्यांचा चेहेरा जातो .. आणि शेवटी पीटर कॉलिन्स चा चेहेरा येतो आणि तो म्हणतो " Goodbye mr chips ".

जुना काळ, त्या काळच्या चालीरीती, एक वेगळा ब्रिटन, फक्त मुलांची शाळा, युद्धाची पार्शवभूमी आणि एक वेगळ्याच धाटणीचे इंग्रजी पण शिक्षण ह्या विषयाबद्दल आत्मीयता वाटणार्या लोकांना आणि एकाकी पण आपल्या प्रेमाच्या लोकांच्या आजूबाजूला जगणाऱ्या लोकांना ज्यांनी आपल्या हयातीत पैसे जोडले नाहीत तरी माणसे जोडली असतील अश्या लोकांना हा चित्रपट अत्यंत भावना विवश केल्याशिवाय राहणार नाही. आजच्या काळांत आम्ही ध्वनी, कॅमेरा वर्क, lighting, सेट्स, VFX ह्या गोष्टी अत्यंत गृहीत धरतो पण १९३९ ह्या क्षेत्रातील तंत्रज्ञान आजच्या तुलनेने अत्यंत मागासलेले होते. पण तरी सुद्धा हा चित्रपट तुम्हाला व्यवस्थित गुंतवून ठेवतो. चिप्स ह्यांचे वयोवृद्ध होणे, वयाबरोबर त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त होत जाणे, फ्लॅशबॅक चे स्पेशल इफेक्ट इत्यादी वाखाणण्यासारखे आहेत. ह्यांत कलाकारांचा अभिनय हि फार मोठी जमेची बाजू असली तरी ज्यांना आवड आहे त्यांना इतर गोष्टी सुद्धा नजरेत गेल्याशिवाय राहणार नाहीत.