Get it on Google Play
Download on the App Store

भाग २

नाजूक बांध्याच्या त्या तरुणीकडे बघून सदा कसाबसा हसला आणि तडक निघून गेला..सदाच्या पाठमोऱ्या आक्रूतीकडे ती एकटक पहात होती. अक्का म्हणाली ते खरचं होत.. हा काही वेगळाच होता.. तिच्या मनात त्यांची ती भेट नकळत घर करुन बसली होती.. 

"काय गुलाब? काय ईचार हाय मंग? हिथच फड उभा करायचा का काय..?" शेवंता त्या सुंदरीला म्हणाली.. 

ती तरुणी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून गुलाब होती.. शेवंताबाईच्या फडातली गाणारी अन् नाचणारी.. जसं देखणं रुप तसा सुरेल गळा दिला होता देवाने तिला आणि पायात तर मोरच होता.. 

'नाही गं अक्का.. तुझ आपलं कायतरीच" असं म्हणून गुलाब जीपमधे चढली. आणि बाकी लोक सुद्धा जीपमधे बसून निघून गेली. म्हातारी पण जरा कलंडली पारावर. पण पडल्या पडल्या तिच्यासमोर सदाचा भाबडा चेहरा येत होता..  

"काय ह्या लेकरानं जीव लावलाय काय कळना.. म्हादेवा म्हातारीला आपलं म्हणणारं.ह्या पोराला सुखी ठेवं र बाबा."

असचं काही दिवस गेले. शेवंताबाईचा फड गावात सुरु झालेला. गुलाबच्या आवाजाची तारीफ सारं गाव करत होतं.. पण गुलाबच्या आवाजाची खरी मोहिनी एका वेगळ्याच माणसावर पडत होती.. रोज रात्री तमाशा झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी न्हाऊन गुलाब महादेवाला यायची आणि आपल्या गोड आवाजात भजन म्हणायची.. आणि देवळाशेजारीच राहणाऱ्या सदाला आणि म्हातारीला तिचं गाण ऐकू यायचं. हळूहळू म्हातारी पण यायला लागली तिच्याजवळ बसायला. तिला आलेल बघून गुलाब गोड हसायची..

"नाव काय गं पोरी तुझं?" म्हातारीने विचारलं..

"जी .. वा.. नाही .. गुलाब.." अडखळत ती म्हणाली.. 

"कोन तू? कुठची? अन् ह्यात कशाला आलीस??" म्हातारी ने विचारलं..

"जी लहानपणी मी अक्काला सापडले आणि मग हिथच राहिले. आता आम्ही तमाशा करत फिरतो", गुलाब म्हणाली.. चला मावशी निघायला पाहिजे अक्का रागवेल.. असं म्हणून गुलाब उठली. 

म्हातारी पण तिच्यासोबत पाराकडे निघाली.. 

"अगं म्हातारे कवादरन थांबलोय म्या इथ। अन् तू काय म्हादेवाला सोडनास.." हसत सदा तिला म्हणाला.

"ही घे तुझी भाकर.. म्या जातो बाजाराला.. तू उगा उन्हाची फिरू नगसं..गपचिप खोपटात जाऊन झोप" सदा गुलाब कडे बघून ओळखीचं हसून निघून गेला..  

"व्हय रं बाबा. तू बी सावकाशीनं जा न् लवकर ये रं लेकरा.." म्हातारी पाठमोऱ्या सदाला म्हणाली.. 

"मावशी ह्यो लेक काय तुमचा?" गुलाबने न राहवून विचारले.

"तसा कोनं च नाही न् तस समदं ह्योचं.. पोरका हाय. मला लई जपतो.. कोन एवढा जीव लावतयं पन ह्याने लावला बग.. गुनाचा हाय.." म्हातारी समाधानाने म्हणाली.. 

"लगीन झालय का ह्यांच??" गुलाब अनवधानाने बोलून गेली.. तिची नजर अजून पाठमोऱ्या सदाकडे होती.. हळूहळू ती आक्रूती धूसर होत होती.. 

"का गं माय?" म्हातारीने आश्चर्याने विचारले..

भानावर येत गुलाब म्हणाली.."असच विचारलं.. येते मावशी.." 

ती काही न बोलता गेली तरी म्हातारीच्या लक्षात जे यायचे ते आले होते.. 

संध्याकाळ टळून गेली होती. म्हातारी पारावर बसून होती. सदाची वाट बघत होती. अजून सदा आला नव्हता. अन् अचानक तिथे गुलाब आली तिच्यासोबत अजून कोणतरी होतं.. पदरात कायतरी लपवून घेऊन आली होती. 

"मावशे ही घे तुझी भाकर..गरम हाय खाऊन घे." गुलाब तिच्यासमोर शिबडं ठेवत म्हणाली. 

म्हातारीने पाहिलं तीन भाकऱ्या, कोरड्यास चटणी, भाजी आणि भात होता. 

"बया, तू का घेऊन आली गं? अन् कुठून आनल?" म्हातारीने भरल्या डोळ्याने विचारलं.

"फडावर शिजवलेलं.. पन कुनाला बोलू नगस हा.. अन् असू दे खा तू.." गुलाब इकडे तिकडे बघत बोलली.. 

म्हातारीने आपली दोनी हाताची बोटं तिच्या गालावरुन फिरवून आपल्या कानशिला जवळ नेत कडाकडा मोडली. गुलाबचा अलाबला घेतला. तिला काय बोलावं तेच कळना.. 

"पन एवढ्या भाकऱ्या का ग?" म्हातारीने आश्चर्याने विचारले.

"ते आल्यावर त्यानला पन दे. आता कवा ते थापनार??" गुलाब नजर चोरत बोलली. 

तिच तिलाच कळत नव्हते की एवढी घालमेल का होत होती तिची.. 

"इथ कवा आमच्यासाठी एक घास तरी ठिवला हुता का कवा असा??" तिच्यासोबत आलेल्या सुंदराने हसत तिला चिडवलं. 

"तू गपं गं..उगा कायतर आपलं.." गुलाब चक्क लाजली.. 

"हा आता चला नायतर अक्का काय सोडत नसते आज आपल्याला", सुंदरा म्हणाली. 

दोघी जणी म्हातारीचा निरोप घेऊन फडावर गेल्या. 

रात्री सदा आल्यावर म्हातारीने त्याच्या हातात भाकरी ठेवली. आणि काय घडलं ते सांगितलं.. सदा काहीही बोलला नाही. पण त्याच्या काळजात कुठतरी खोलवर ही गोष्ट रुतून बसली. 

म्हातारी

सुप्रिया घोडगेरीकर
Chapters
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७