Get it on Google Play
Download on the App Store

भाग १

"दे ग माय म्हातारीला कायतर दे.. पोटाला कायतरं शिळपाकं वाढ गं माय वाढ...", पाटलाच्या वाड्याबाहेर उभी राहून म्हातारी भिक मागत होती. ही म्हातारी कोण?कुठची? कुणालाच माहित नव्हतं.. एका महाशिवरात्रीला म्हातारी सोनगावात आली होती आणि तिथेचं राहिली होती. सोनगावात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरायची त्याच जत्रेत ती आली आणि गावातच राहीली.. गावात चार घरं फिरुन अन्न मागून खायची.. महादेवाच्या पारावर बसून रहायची. तिथेच झोपायची.. गावातल्या कुंभाराच्या सदाने तिला एक जुनं कांबळ आणून दिलं होतं.. त्यावरचं ती झोपायची.. 

ऐन उन्हाळ्याचे दिवस होते ते. म्हातारीने मिळालेलं अन्न घेतल आणि पारावर गेली. ऐन उन्हात जीव कासावीस झालेला तिचा. तिथे सदा आला आणि तिच्यासमोर त्याने मातीच भांड ठेवलं पाण्याने भरलेलं. म्हातारी हसली.. अख्ख्या गावात ती फक्त सदाशीचं बोलायची. सदा तिला कधी कधी भाकरी द्यायचा. सदा सुद्धा एकटाच होता. लहानपणीच आई बाप गेलेले. बापासोबत जुजबी कुंभारकाम शिकलेला आणि तेच काम करत मोठा झाला.

"म्हातारे, कशाला उनाचं फिरतीस?म्या काय देत न्हाय व्हय भाकरी तुला? उगा कुठं पडलीस तर काय करायचं?"सदा कळकळीने बोलला.. 

"अरं लेकरा, काय म्हातारीचं घेऊन बसलास? काय होत नसतयं बग मी पडले तरी. अरं ना कोन माझ्या नात्याचं ना गोत्याचं काय हुनार हाय तवा?" म्हातारी बोलली.. 

"अगं अस का बोलतीस ग म्हातारे? मी हाय की गं तुला. तुला कवादरनं म्हनतोय चल माझ्या खोपटात येछन रहा. तू काय ऐकत नाहीस. मला माय असती तर तिला राहू दिली असती का म्या असं?" सदाच्या डोळ्यात पाणी आलं. 

पोरक्या सदाने खरचं तिला माया लावलेली. उनातानात तिला पाणी द्यायचा. भाकर पण द्यायचा. सदा पण तसा गरीबच होता.. मागच्या दिवाळीत तिला लुगडं दिलं होतं त्याने. म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलेलं तेव्हा. लेकरा म्हणून सदाला बिलगून ती लई रडलेली.. फक्त एक ती सदाचं ऐकत नव्हती ते म्हणजे त्याच्या घरी रहायला जाणं. तो खूप सांगायचा पण म्हातारी ऐकत नव्हती.. 

म्हातारी भाकर खात होती अन् सदा तिला गावचं सांगत होता. उभ्या गावात त्यांना कोण नव्हतं पण तेच एकमेकांना होते.. 

"सदा तुझं वय काय रं लेकरा?" म्हातारीने अचानक विचारलं.

"विसावर दोन तीन असलं की.. का ग?" सदाने आश्चर्याने विचारलं.

"अरं, लगीन कवा करणार तू?" 

म्हातारीच्या ह्या प्रश्नावर सदा खळखळून हसला आणि म्हणाला "अग माझी माय, मला कोन पोरगी दिल? माझं ना घर ना दार.. ना आई ना बाप.. असल्याला कोन पोरगी देतय व्हय?"

ह्या वर म्हातारी पन गप बसली.. 

ह्यांच बोलण चालू असताना समोर एक जीप येऊन थांबली. जीपमधून एक ऐटबाज गडी उतरला. अंगात कोट आणि धोतर, पायात कोल्हापूरी वहाणा आणि डोक्याला फेटा.. मिशीला पीळ देत गडी सदाकडे आला.

"पाटीलवाडा कुठं आला म्हणायचा?" तोऱ्यात त्याने विचारले. 

"हे देवळाकडून डाव्या हाताला जावा अन् सरळ गेलासा की उजव्या हाताला एक शेत लागतयं त्या शेताच्या मधे पाटलाचं.घर हाय.." सदा म्हणाला..

"तुमी पावण का काय त्यांच"?.सदाने विचारलं

"आमास्नी कोनं पावणं करुन घिल?" त्या फेटेवाल्या मागून एक नाजूक आवाज आला.. 

गाडीतून एक बाई उतरली. तिशीची, जरा उठावदार बांध्याची, ठेंगणी अशी ती. 

"राम राम पाव्हणं, मी शेवंता. शेवंता कोल्हापूरकर. तमासाचा फड घेऊन गावात आलोय. पाटलांनी बोलिवलयं आम्हाला.." तमासगिरीण सदाला बोलली.

सदा पुरता गांगरून गेला. सदा कधीच कुठल्याच बाईसोबत फारसं बोलत नसे. अन् त्यात तमासगिरीण तर तो पहिल्यानेच बघत होता.

त्यावर शेवंताबाई हसली आणि म्हणाली "असलं बी मर्द गडी हायेत होय.. आतापतुर तर बाई कडं टकामका बघणारेच लई होते.. तुमी कसं ओ असं?" 

सदा आता पुरता वरमला.. बाईकडे न बघताच तो 

"म्हातारे येतो गं" म्हणून निघून गेला..

गाडीच्या मागच्या बाजूला तो घाईघाईत आला आणि त्याच्या हातून कांबळ पडलं.

"ओ पावणं कुठ ध्यान हाय तुमचं.. पडलन की तुमच कांबळं.." हसत मागून शेवंताने त्याला चिडवलं..

तो खाली वाकणार तेवढ्यात दोन नाजूक हातांनी ते कांबळं उचलल अन् त्याच्या हातात दिलं..

तो काही बोलायच्या आत ती म्हणाली, "अक्कांच मनाला लावून घेऊ नगा जी. अस वागावच लागतया आमच्या सारख्यांना.. माफी करा जी.." 

चमकून त्याने तिच्यावर नजर टाकली.. 

एक नाजूक चणीची, गोरीपान , नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली एक तरुणी उभी होती. निरागस चेहरा, काळेभोर डोळे पण डोळ्यात तेज.. पाहताक्षणीच बघणाऱ्याच्या काळजात रुतावी अशी ती....

©सुप्रिया घोडगेरीकर

म्हातारी

सुप्रिया घोडगेरीकर
Chapters
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७