Get it on Google Play
Download on the App Store

०६ विधिलिखित १-२

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

रेल्वेने प्रवास केला तर माझे ऑफिस स्टेशनपासून बरेच लांब पडत असे.तसेच माझे घर स्टेशनपासून दूर होते.दोन्ही ठिकाणी मला बरेच चालावे लागे. घर व ऑफिस यांच्या जवळच बसस्टॉप होते.त्यामुळे मी नेहमी बसनेच ऑफिसला जात असे.रेल्वे पासाप्रमाणे बसचा पास मोठ्यांसाठी काढण्याची सोय नव्हती.मला रोज  तिकीट काढावे लागे.कंडक्टरजवळ बर्‍याच वेळा सुटे पैसे नसत.अशावेळी सुटे पैसे देता यावेत म्हणून मी सुटे पैसे बरोबर ठेवीत असे.पर्सच्या एका वेगळ्याच कप्प्यांत सुटे पैसे ठेवलेले असत.एका छोट्या पर्समध्ये मी पैसे ठेवीत असे.ती पर्स मोठय़ा पर्समध्ये ठेवत असे.अशी व्यवस्था सोयीची पडत असे.मोठय़ा पर्समध्ये पैसे ठेवले तर रुमाल, निरनिराळ्या वस्तू, पैसे, यांचा गोंधळ उडत असे.कोणत्या कप्प्यात काय आहे यासाठी एका मागून एक कप्पे उलगडत जावे लागे.पैसे व इतर वस्तू यांचे मिलन झालेले असे.

त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे बसमध्ये ऑफिसला जाण्यासाठी चढले.कंडक्टर चिमटा वाजवीत तिकीट तिकीट करीत जवळ येताच मी पर्स उघडली.मोठय़ा पर्समध्ये छोटी पैशांची पर्स नव्हती.मी निरनिराळे कप्पे उघडून खात्री करून घेतली.धोबी कपडे घेऊन आला होता.त्याला देण्यासाठी मी छोटी पर्स घेतली होती.तेवढ्यात कुणीतरी हाक मारल्यामुळे ती पर्स टेबलावर ठेवून मी गेले होते.नंतर छोटी पर्स मोठय़ा पर्समध्ये ठेवायला मी विसरले होते.हे सर्व मला आठवले.    छोटी पर्स चुकून बरोबर घेतली गेली नाही तरी आपल्याजवळ पैसे असावेत म्हणून मी मोठय़ा पर्सच्या एका छोट्या कप्प्यात कांही पैसे सुरक्षितता म्हणून ठेवीत असे.तेही केव्हांतरी वापरले गेले होते. एकूण माझ्याजवळ आता कंडक्टरला द्यायला पैसे नव्हते.सॉरी म्हणून बसमधून खाली उतरणे, घरी चालत जाणे, पुन्हा पैसे घेऊन परत येणे, वगैरे मला करणे अनिवार्य होते. अर्थात हे सर्व करण्यात कितीतरी वेळ गेला असता.मी वेळेवर ऑफिसमध्ये पोहचणे अशक्य होते.त्यापेक्षा फोन करून रजा घेणे अपरिहार्य होते.मी नुकतीच नोकरीला लागले होते.मला नोकरी मिळून जेमतेम दोन महिने झाले होते.माझा प्रोबेशनरी पिरीयड चालू होता.आमचा बॉस जरा खडूस होता.अकस्मात रजा घेण्यामुळे माझे इम्प्रेशन वाईट झाले असते.असे अनेक विचार क्षणात माझ्या मनात येऊन गेले. मी बसमध्ये नजर फिरवून पाहिले.कुणीतरी ओळखीचे असेल आणि आपण या प्रसंगातून सुटू अशी मला आशा होती.बसमध्ये कुणीही ओळखीचे नव्हते.रूटवरचा त्या वेळी बऱ्याच वेळा असणारा नेहमीचा कंडक्टर असता तर उद्या देते असे म्हणून कदाचित चालले असते.परंतु आज अनोळखी चेहरा होता.सॉरी पैसे घरी राहिले, मी उतरते, असे म्हणून मी उभी राहिले.  

एवढ्यात एका तरुणाने  तुम्ही खाली बसा,मी पैसे देतो,तुम्हाला कुठे जायचे असे विचारून,माझे तिकीट काढून माझ्या हातात दिले.माझी परिस्थिती,चेहऱ्यावरील भाव,माझी कुचंबणा बहुधा तो तरुण पाहत असावा.मला मदत करावी असे त्याला वाटले असावे.कदाचित माझ्याबद्दल त्याचे मत चांगले झाले असावे.माझ्या वेंधळेपणामुळे मी अगोदरच सगळ्यांसमोर कसनुशी झाले होते.या तरुणाने पैसे भरल्यामुळे आणखीच कानकोंडी झाले. एवढ्यात माझ्या शेजारचा एकजण उतरून गेला.त्या जागी अविनाश बसला.तोपर्यंत तो जागा न मिळाल्यामुळे उभा होता.मी त्या तरुणाला अविनाशला त्याचे नाव व तुम्हाला पैसे केव्हां कुठे कसे परत देऊ असे विचारले.उद्या तुम्ही याच बसला असाल का? त्यावेळी मी पैसे देईन असे पुढे म्हणाले.त्यावर अविनाश म्हणाला,आज चुकून मी या बसने जात आहे. मी नेहमी रेल्वेने प्रवास करतो.तुम्ही या पैशांचे मनाला अजिबात लावून घेऊ नका.एवढेसे पैसे ते काय, तुम्ही घेतले,मी दिले, हे विसरून जा. असे पुढे तो म्हणाला.या बोलण्यात सहजता होती.दुसरा मनमोकळा व्हावा. त्याला अवघडल्यासारखे वाटू नये असा त्याचा सूर होता.  

असे कसे मला तुमचे पैसे परत केलेच पाहिजेत.मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये. पैसे कसे परत करू ते सांगा.मी पुढे म्हणाले.मी त्याला त्याचा बँक नंबर विचारला.त्या नंबरवर लगेच जमा करते असेही म्हणाले.त्याने लगेच त्याचा बँक नंबर दिला.मी लगेच पैसे त्याच्या नावावर ट्रान्सफर केले. 

फोर्टपर्यंत शेजारी बसून आम्ही प्रवास केला.त्याचे बोलणे मृदु व गमतीशीर होते.खूप वर्षांची ओळख असल्यासारखा तो गप्पा मारीत होता.त्याच्याबद्दल माझे मत चांगले झाले.कुठे तरी तो माझ्या हृदयाला स्पर्श करून गेला.फोर्टमध्ये उतरल्यावर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या.ऐनवेळी केलेल्या मदतीची कशी ना कशी परतफेड करावी असे मला वाटत होते.त्याच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये जाऊन कॉफी प्यावी व आपण पैसे द्यावे असे मला वाटत होते.परंतु माझ्याजवळ एकही पैसा नव्हता.मी विचारात पडलेली पाहून तो मिश्किलपणे म्हणाला, ऑफिसमध्ये येतांचा प्रश्न सुटला परत कसे जाणार? अशा विचारात तुम्ही आहात का?मी तुम्हाला आणखी कांही पैसे देतो.बँक नंबर तुम्हाला माहीत आहेच.त्यावर मी एवढेच म्हटले मी ऑफिसमध्ये माझ्या मैत्रिणीकडून पैसे घेईन.

निरोप घेता घेता तो म्हणाला.मला तुम्हाला पुन्हा  भेटायला आवडले असते.त्यावर मीही मला नकळत हो मलाही आवडले असते असे म्हणाले.त्यावर तो म्हणाला आता तर प्रश्नच मिटला .      

येत्या रविवारी गांधी पार्कमध्ये बोटींग क्लबजवळ संध्याकाळी पांच वाजता आपण भेटू.माझ्या  होकाराची त्याने वाटही पाहिली नाही.मी येणारच असे गृहीत धरून तो आपल्या ऑफिसकडे निघून गेला.  

रविवारी गांधी पार्कमध्ये जावे की न जावे अशा द्वंद्वात मी सापडले होते.अविनाश मला आवडला होता.त्याला भेटावे असे आतून वाटत होते.हे संबंध पुढे नेऊ नये असेही एक मन सांगत होते.शेवटी हो ना हो ना करता करता        रविवारी संध्याकाळी पाच वाजता मी गांधी पार्कमध्ये  बोटिंग क्लबजवळ त्याने सांगितल्याप्रमाणे गेले.तेथे तो वेळेअगोदरच आला होता.मी गेले तेव्हां तो तिथे बाकावर माझी वाट पाहात बसलेला होता.दोन्ही बाजूला सारखीच आग लागली आहे असा एक गमतीशीर विचार माझ्या मनात येऊन गेला.त्या विचारासरशी माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटले. मी  त्याच्या शेजारी गप्पा मारीत बसले.बसच्या प्रवासात विशेष गप्पा झाल्या नव्हत्या. एकमेकांचे फोननंबर आम्ही अगोदरच घेतले होते.त्या दिवशी फोर्टमध्ये जाताना कोण कुठे नोकरी करतो तेही माहीत झाले होते.आता आम्ही इतर गप्पा मारीत होतो.

गप्पा सर्वसाधारण स्वरुपाच्या होत्या.त्यातून परस्परांची माहिती मिळत होती.मला अविनाशचा स्वभाव आवडला.त्याचे बोलणे मृदु व सौम्य होते.त्यात कुठेही मीपणा डोकावत नव्हता.खोटे कशाला बोलू मला अविनाश आवडला होता.त्याचे बोलणे ऐकत राहावे असे वाटत होते.आपण तसेच परत निघून येणे माझ्या जिवावर आले होते.त्याने ऐनवेळी माझे तिकीट काढून मला मदत केली होती.नाहीतर त्या दिवशी माझा ऑफिसमध्ये खाडा झाला असता.पुन्हा तिकीट काढताना त्याने  कोणताही आगाऊपणा केला नव्हता.केवळ मदत करण्याची प्रामाणिक इच्छा त्यामागे जाणवली होती.तरुण मुलगी, त्यात बर्‍यापैकी सुंदर,गळ्यात मंगळसूत्र नाही,बहुधा अविवाहित,म्हणून तिला मदत करावी, तिच्या पुढे पुढे करावे,तिच्या नजरेत भरावे, तिच्यावर आपली छाप पडावी असा कोणताही हेतू त्यामागे दिसला नव्हता.त्याने तशी मदत कुणालाही केली असती असे वाटत होते.माझ्या शेजारी बसलेला असतानाही त्याने मला उगीचच स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नव्हता.मुद्दाम स्पर्श व सहज स्पर्श यातील फरक स्त्रिया बरोबर ओळखतात. 

तेवढ्यात एक सातआठ वर्षांचा लहान मुलगा मामा मामा करीत त्याच्याजवळ आला.तो त्याच्या बहिणीचा मुलगा होता.तो समोरच असलेल्या मुलांच्या खेळण्यामध्ये घसरगुंडीवर खेळत होता.माझ्याशी बोलताना अविनाश अधूनमधून तिकडे पाहत होता.माझ्या ती गोष्ट लक्षात आली नव्हती.भाच्याचे नाव प्रणव होते.तो मामाला बोटिंगला जाऊया असे म्हणत होता.त्याने मलाही बोटिंगला यायची विनंती केली.एरवी तर मी कदाचित त्याच्याबरोबर बोटिंगला  गेले नसते.परंतु बरोबर प्रणव असल्यामुळे व मला अविनाशचा सहवास सोडवत नसल्यामुळे,मी नकळत संमती दिली .प्रणवने माझ्याबद्दल ही कोण म्हणून चौकशी केली.अविनाशने त्याला रंजनाताई असे सांगितले.तेव्हापासून तो मला ताई ताई म्हणत बिलगला होता.त्याच्या मामाप्रमाणेच तो मुलगा गोड होता.  

आम्ही तलावात थोडा वेळ बोटींग केले.नंतर मी अविनाशला कॉफी घेण्याची विनंती केली. त्याच्या त्यावेळच्या मदतीची कुठे ना कुठे परतफेड करावी असे मला वाटत होते.बोटिंगचेही पैसे त्यानेच दिले होते. जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो.तिथे तो पैसे देऊ लागला होता.त्याला कटाक्षाने मी बोलाविले आहे,मी पैसे देणार असे सांगितले.पैसे मीच दिले.त्यानेही मोकळेपणा ते मान्य केले.तुम्हाला त्या दिवशी केलेल्या अल्पस्वल्प तथाकथित मदतीची परतफेड तुम्ही पैसे देऊन करीत आहात का असाही एक खोचक प्रश्न त्याने विचारला.त्यावर मी कांहीच बोलले नाही  

दुसर्‍या दिवशी ऑफिसला जाताना माझ्या बसमध्ये अविनाश होता.तू नेहमी रेल्वेने जातो ना? ते तुला सोयीचे आहे असे तू म्हणत होतास.तुझे घर व ऑफिस रेल्वेजवळ आहे मग आता वाकडी वाट करून येथे कसा काय?त्यावर मोकळेपणाने हसून अविनाश म्हणाला,केवळ तुझा सहवास मिळावा म्हणून मी बसने जात आहे. त्याचा मोकळेपणा, सहज सत्य सांगण्याची,मान्य करण्याची हातोटी मला फारच भावली(आवडली मानवली).त्यामुळे तर मी त्याच्या आणखीच प्रेमात पडले. अविनाशचा मनमिळावू स्वभाव,दुसऱ्याला पूर्णतः समजून घेण्याची वृत्ती,कोणतीही गोष्ट दुसऱ्यावर न लादण्याचा स्वभाव,या सर्वांच्या प्रेमात मी  पडले होते.आमच्या भेटी वारंवार होऊ लागल्या.रोज येता जाताना बसमध्ये आम्ही भेटत तर होतोच.त्रास घेऊन वाकडी करून तो रोज माझ्याबरोबर बसने येत जात होता.ऑफिसमधून परत येताना आम्ही अधूनमधून रेस्टॉरंटमध्ये जात होतो.हळूहळू आमच्या इतरत्रही भेटी होऊ लागल्या.या सगळ्याची परिणिती कशात होईल त्याचा अंदाज येत होता.अजून मी त्याच्या घरी गेले नव्हते.तोही माझ्या घरी आला नव्हता.जरी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी संवादातून आम्ही परस्परांच्या कुटुंबांना ओळखू लागलो होतो.

*मी अविनाशच्या प्रेमात प्रथमदर्शनीच पडले होते.सहवासाने ते दृढ होत गेले होते.*

*त्याला सर्वकांही एकदा सांगून टाकावे असे मला वाटत होते.परंतु माझी जीभ रेटत नव्हती.*

*मी त्याला किंवा तो मला कां कोण जाणे परस्परांच्या घरी बोलावण्याला उत्सुक नव्हतो.*

*माझा साखरपुडा झाला होता.हे अविनाशला सांगून टाकावे असे मला अनेकदा वाटले होते.परंतु माझी जीभ रेटत नव्हती.*

(क्रमशः)

१९/१०/२०२१©प्रभाकर  पटवर्धन