Get it on Google Play
Download on the App Store

०५ अद्भुत २-२

अद्भुत*२/२  (ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

आमच्या गावाची रचना मोठी मजेशीर आहे .आमच्या तीनही  बाजूला पाणी आहे .फक्त एक बाजू जमिनीला जोडलेली आहे .आमच्या गावाला नदी वळसा घेऊन समुद्राला मिळते .नदीचे पाणी खारे आहे .खारे पाणी  असेल त्या नदीला खाडी म्हणतात .तर दोन बाजूला खाडी व एका बाजूला समुद्र आहे .जमिनीला जोडलेल्या भागांमध्ये द्रोण डोंगर व इतर भूभाग आहे.खाडी खूप खोल असल्यामुळे मोठी मोठी गलबते आत येऊ शकतात .समुद्र काठाला व खाडी काठाला दर्यावर्दी लोकांची वस्ती प्रामुख्याने आहे.त्यामध्ये दालदी, भंडारी, कोळी, खारवी, अशा दर्यावर्दी लोकांची वस्ती आहे .दालदी वाडा ही मुसलमान वस्ती आहे .

द्रोण डोंगरावर  एका प्रेमी युगुलाचे रक्त सांडले आहे,असे सांगितले जाते. प्रेमिकांचे नवस पूर्ण होण्याचे कारणही ते आत्मे आहेत .

त्या प्रेमिकांचे आत्मे इथे वास करतात. 

फार फार वर्षांपूर्वीची दोन तीनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.तिला एका लोककथेचे स्वरूप आले आहे .

गावातील सर्वेसर्वा असलेल्या खोतांची मुलगी व एका कोळ्याचा मुलगा यांची  ही प्रेमकहाणी आहे .

पुढीलप्रमाणे कथा सांगितली जाते . कथा सुमारे दोन अडीचशे वर्षांपूर्वीची असावी .त्यावेळी गावाची वस्ती जेमतेम हजार बाराशे असावी .हा गाव इनाम गाव होता. युद्धात मर्दुमकी गाजवून शत्रूचा पराभव करण्याला मदत केल्याबद्दल गणपतराव देशपांडे यांना राजाने  पंधरा वीस गाव इनाम म्हणून दिले होते .ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी  गणपतरावांचे वंशज विश्वनाथ नावाचे इनामदार होते .त्यांना विसू इनामदार म्हणून सर्वजण ओळखत असत.काही जण त्यांना विसू खोत असेही म्हणत .

विसू खोतांना तीन मुले होती.दोन मुलगे व एक मुलगी .मुलीचे नाव होते मंदाकिनी मंदा दिसायला सुंदर होती .तिच्या बाबांची ती फार लाडकी होती.त्याकाळात , त्यावेळच्या प्रथेप्रमाणे लवकर लग्न होत असे.मंदाची आई, तिचे लग्न लवकर लावून द्या म्हणून तिच्या बाबांना सतत सांगत असे. विसू खोतांना जवळच्याच कुठच्या तरी गावातील मुलगा हवा होता. त्यांना आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर राहावी असे वाटत होते. त्या दृष्टीने ते प्रयत्नशील होते .परंतू त्यांच्या मनासारखा मुलगा मिळत नव्हता.

त्यावेळी द्रोण डोंगरावर चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी पायऱ्या नव्हत्या. द्रोणवर वडाचे झाड किंवा राधाकृष्ण मंदिरही नव्हते. केवळ एक पायवाट वरपर्यंत गेली होती . एक दिवस विसू खोतांना स्वप्नात साक्षात्कार झाला.द्रोण डोंगरावर मी आहे तरी मला शोधून माझे मंदिर बांध असे श्रीकृष्णाने त्यांना सांगितल्याचा भास झाला .विसू खोतानी डोंगर माथ्यावर शोध घेतला .त्याना संगमरवराची राधाकृष्णाची मूर्ती मिळाली.त्यानी तिथे एक मंदिर बांधले .पुढे वेळोवेळी  त्या मंदिराची डागडुजी व विस्तार होत गेला .

आत्तापर्यंत डोंगरावर केवळ गुरे व गुराखी जात असत. औषधी वनस्पती काढण्यासाठी केव्हातरी वैद्यही जात असत . मंदिर बांधल्यानंतर लोकांची येजा डोंगरावर सुरू झाली.अर्थात लोकही क्वचित येत जात असत.त्याकाळी लोकसंख्या फार कमी होती .दळणवळणाची साधनेही नव्हती .घोडा, बग्गी, बैलगाडी, किंवा पायी प्रवास करावा लागत असे .डोंगरावर जाण्यासाठी अजूनही कच्चा पायरस्ता होता.या स्थानाचे महात्म्य सर्वदूर पसरल्यानंतर ताशीव आखीव पायऱ्या पुढे केव्हातरी बांधण्यात आल्या . डोंगराच्या पलीकडच्या बाजूला तर रस्ताच नव्हता .डोंगराला वळसा मारून नंतर गावातून जाणाऱ्या पायवाटेने राधाकृष्ण मंदिरात जावे लागे.

मंदिर बांधल्यावर गोकुळाष्टमीच्या उत्सवाला जोरात सुरुवात झाली .या उत्सवात गावातील मंडळी मोठ्या संख्येने हजर राहात असत .तिथेच प्रथम मंदाने दिनकरला पाहिले.तो अत्यंत तन्मयतेने बासरी वाजवीत होता .त्याचे बासरी वाजवण्याचे कौशल्य वादातीत होते . त्याच्या बासरी वादनाने मंदा मंत्रमुग्ध झाली होती .

दिनकर हा कोळी जमातीतील  होता.तो होडी चालविण्यात,पोहण्यात, जसा वाकबगार होता तसाच कोणत्याही झाडावर चढण्यात तो कसबी होता . माडावर चढून नारळ पाडणे, 

पोफळीच्या झाडावर(सुपारीचे झाड ) चढून पोफळीचे शिपट (सुपारीचा घड)(पोफळ सोलल्यावर त्यातून सुपारी निघते जशी असोल्या नारळ सोलल्यावर त्यातून नारळ निघतो) काढण्यात तो पटाईत होता .एकदा तो पोफळीच्या झाडावर चढला कि दुसऱ्या पोफळीच्या झाडावर चढण्यासाठी तो खाली उतरत नसे. एका पोफळीवरील सर्व शिपटे काढून झाल्यावर तो वर असतानाच झाडाला एक हिसका देत असे.पोफळीची झाडे जवळजवळ असतात त्यातील अंतर विशेष नसते .पोफळीचे झाड लवचिक असते.झाडाचा शेंडा मागे पुढे हलू लागल्यावर तो एका पोफळीच्या झाडावरूनन दुसऱ्या पोफळीच्या झाडावर हवेतल्या हवेत उडी मारत असे.अशा तर्‍हेने तो एका वेळी शंभर शंभर पोफळीच्या झाडांची शिपटे काढीत असे.तो एकदा झाडावर चढला की दुपारी जेवायलाच खाली उतरत असे.

त्याचे घर समुद्र किनारी होते . त्याच्या वडिलांची माड(नारळीचे झाड)  व पोफळीची(सुपारीचे झाड ) मोठी बाग होती.शिवाय त्यांचे स्वतःच्या मालकीचे गलबतही होते.चार पाच होड्याही त्यांच्या मालकीच्या होत्या.त्या वेळी विशेष बाजारपेठ नसल्यामुळे स्वतःच्या गरजेपुरते व गावात कुणी सांगितले असल्यास तेवढेच मासे पकडले जात असत. दिनूच्या रक्तातच दर्यावर्दीपणा होता. दिनूचे वडिल जरी कोळी जातीतील असले तरी ते चांगलेच संपन्न होते.  दिनू उत्तमपैकी बासरी वाजवीत असे 

मंदा सागर किनारी आपल्या मैत्रिणीबरोबर फिरत असताना तिने दिनूला पाहिले .मंदिरात तल्लीनपणे बासरी वाजवणारा तो हाच हे तिने ओळखले .दिनू जरी सावळा असला, तरी त्याची शरीरयष्टी एखाद्या मल्लासारखी होती. दगडातून कोरून काढलेल्या शिल्पासारखा तो दिसत होता .त्यावेळी त्याचा  वेष पारंपरिक होता. या पारंपरिक वेषामध्ये एक मोठा रुमाल लंगोटी सारखा नेसून तो कमरेभोवती लुंगीसारखा गुंडाळला जाई.माझ्या लहानपणी असे लंगोटी  कम लुंगीधारी मी पाहिले आहेत.हा वेष सुटसुटीत व कोकणच्या हवामानाला मानवणारा आहे. या वेषात व्यक्तीचे शरीरसौष्ठव  उठून दिसते.

तो मासे पागण्यात(जाळ्याच्या साहाय्याने पकडण्यात ) मग्न होता.तो जातीने कोळी आहे हेही तिच्या लक्षात आले. त्याचे मंदाकडे लक्षही नव्हते.मंदाच्या सागरकिनारी चकरा सुरू झाल्या.तिला त्याचे नाव जाणून घ्यावे त्याच्याशी बोलावे असे वाटत होते .

सागर किनारी फिरत असताना तिला त्याचे सुपारीच्या झाडावर चढण्याचे कौशल्य व खाली न उतरता अनेक झाडांच्या  सुपाऱ्या काढण्याचे कौशल्य फारच भावले.एक मुलगी आपल्याला निरखत आहे हे दिनूच्या गावीही नव्हते.एक दिवस तिने त्याला समुद्र किनारी स्वत:मध्येच तल्लीन होऊन बासरी वाजवीत असताना पाहिले. एकदा ती होडीतून नदी ओलांडून पलीकडच्या गावी तिच्या मामाकडे जात होती.दिनू होडी वल्हवीत होता.अशा होडीला तर  (तरुन जाणारी) व खलाशाला तर्या  (तारुन नेणारा)म्हटले जाते .तर तर्या दिनू होता.त्याचे एक एक कौशल्य पाहून मंदा प्रभावित होत होती.तिने त्याला त्याचे नाव विचारले .तिला प्रथमच त्याचे नाव कळले .तशी ती त्याला गेले दोन महिने ओळखीत होती . 

एक दिवस तिने त्याच्याजवळ मासे विकत मागितले.विसू खोतांचे खानदान मत्स्याहारी होते .दिनूने तिला तसेच फुकट मासे दिले.हळूहळू दोघांच्या गाठी भेटी वाढू लागल्या .मंदा कुंदाकडे जाते असे सांगून बाहेर पडत असे .केव्हां कुंदाबरोबर किंवा केव्हा एकटीच दिनूला भेटायला जात असे .

नारळी पोफळीच्या बागेत, समुद्र किनारी, द्रोण डोंगरावर ,कधी राधाकृष्ण मंदिरात, दोघांच्या भेटी होत असत .दिनू बासरी वाजवीत असे आणि मंदा त्याच्याकडे तल्लीन होऊन पाहात राही.

लहान गावात अशा गोष्टी लपून राहत नाहीत .दिनू व मंदा दोघेही वारंवार भेटत असतात ही गोष्ट विसूखोतांच्या कानावर गेली.प्रथम त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले .आपली मुलगी आपले खानदान, उच्च जात विसरून, दिनूसारख्या कनिष्ठ जातीच्या मुलाच्या नादी लागेल असे त्यांना वाटत नव्हते.त्यांनी आपल्या एका मुलाला मंदा कुठे जाते त्यावर लक्ष  ठेवण्यास सांगितले .

अशा बातम्या खोट्या ठरत नसतात याची त्यांना प्रचिती आली .एक दिवस त्यांनी राधाकृष्ण मंदिरात दोघांनाही एकत्र पकडले . त्यांनी मुलीला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला .मुलगी ऐकायला तयार आहे असे दिसत नव्हते .त्यांनी मुलीचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला .दिनू व मंदा यांच्या प्रेमप्रकरणाचा बभ्रा पंचक्रोशीत झाला होता .मंदाचे स्थळ सर्वदृष्टीने आकर्षक असूनही तिचे लग्न जुळत नव्हते.

दिनू व मंदा एकमेकांसाठी पागल झाली होती.विसू खोतांच्या तोंडावर काहीही बोलण्याची जरी कोणाची हिंमत नव्हती तरी लोक त्यांना बघितल्यावर कुत्सित हसत असत . शेवटी दोघेही  ऐकत नाहीत असे पाहून त्यांनी या प्रकरणाचा कायमचा निकाल लावण्याचे ठरविले.

राधाकृष्ण मंदिराच्या मागे ती एकत्र असताना त्यांनी बंदुकीच्या गोळ्या घालून दोघांनाही ठार मारले .तिथेच त्या दोन प्रेमी जीवांना पुरण्यात आले.दोघेही पळून गेली अशी आवई उठविण्यात आली.गावातील लोकांना सर्व काही माहीत होते परंतु खोतांविरुद्ध बोलण्याची कुणाची हिम्मत नव्हती.त्या दोघांना जिथे पुरले होते  त्यावर त्यानी एक वडाचे झाड लावले.यानंतर फार दिवस विसू खोत जगले नाहीत.आपण केले ते बरोबर केले असे त्यांना एकदा वाटे तर दुसऱ्या वेळी आपण चूक केली असे त्यांना वाटे.या द्विधा  मन:स्थितीत असतानाच त्यांनी एके दिवशी त्यांनीच लावलेल्या वडाच्या झाडाजवळ स्वतःवर गोळी चालविली  व आपली जीवनयात्रा संपविली.

प्रेमिकांचे रक्त पिवून तो वड तरारला आहे.गेल्या दोन अडीचशे वर्षांत त्याचा केवढा तरी विस्तार झाला आहे.त्याचा बुंधाही तेवढाच सतेज तरुण ताजातवाना आहे.

येथे नवस बोलला घंटा बांधली की आपले प्रेम सफल होते अशी प्रेमिकांची खात्री आहे .

येथे नवस बोलला घंटा बांधली की आपले कार्य सिद्धीस जाईल अशी सर्वांची खात्री आहे .

येथे त्या प्रेमी युगुलांचे आत्मे वास करतात .प्रेमिकांना प्रेम सफलतेचा आशीर्वाद ते देतात अशी श्रद्धा आहे.

हा वड चिरतरुण आहे. हा वड अक्षय वड आहे .हा वड व राधाकृष्ण आपल्या इच्छा पुर्‍या करतात अशी समज आहे.

*मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हल्ली आमचा गांव चांगलाच प्रसिद्ध आहे.*

द्रोण डोंगराच्या दोन्ही बाजूना ताशीव पायऱ्या आहेत .

हमरस्ता डोंगराच्या पलीकडून गेल्यापासून आमच्या गावाला शहराशी  संलग्नता आहे.

*येथे अनेक कारखाने, विश्रामधाम, आरोग्यधाम, आल्यामुळे गावाची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारली आहे.*

स्वयंचलित होड्या बोटी गलबते आमच्या खाडीत येतात.

*अक्षय वड,राधाकृष्ण मंदिर, द्रोण डोंगर हे आमच्या गावाचे वैभव आहे.*

(समाप्त)

७/४/२०२०©प्रभाकर  पटवर्धन