Get it on Google Play
Download on the App Store

०५ लॉकेट २-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

क्वार्टर सोडून नवीन जागेत येताना कुसुमला बाबांच्या सामानात एक नक्षीदार पेटी मिळाली .

त्या पेटीत आता तिच्या हातात असलेले चांदीचे लॉकेट व बाबांनी तिला लिहिलेले एक पत्र होते. 

पत्र पुढील प्रमाणे होते .पत्रावर तारीख नव्हती .

चिरंजीव कुसुम, 

हे पत्र वाचण्याची तुझ्यावर लवकर वेळ न येवो अशी माझी इच्छा आहे.कारण  हे पत्र माझ्या मृत्यूनंतरच तुझ्या हातात पडणार आहे.

जगामध्ये आणि आपल्या संकुचित मर्यादित जगामध्येही, आपल्या मनाप्रमाणे नेहमी गोष्टी घडतातच असे नाही.मनाविरुद्ध गोष्ट झाली तर स्वाभाविक आपल्याला दुःख होते .मनासारखी गोष्ट झाली तर आपल्याला आनंद होतो .या दोन्ही वेळी समत्व भाव ठेवावा असे मी म्हणत नाही.समत्व भाव ठेवावा असे म्हणून समत्व भाव येत नाही. आपल्या अपेक्षापूर्तीमुळे समाधान होते. अपेक्षाभंगामुळे वाईट वाटते.हे सर्व स्वाभाविक आहे.अशा वेळी त्या आनंद किंवा त्या दुःखात वाहून न जाता आपण सुख व दुःख  यांचे  साक्षित्व केले पाहिजे.किंबहुना मी असे म्हणेन की आपण वाहत जातो, त्याचेही साक्षित्व झाले पाहिजे.

*केले पाहिजे व झाले पाहिजे* यामध्ये फार फरक आहे.तू हुषार आहेस. तू सूज्ञ आहेस.मी काय म्हणतो ते तुला आज ना उद्या उमजेल .ही गोष्ट उमजणे हे जीवनातील फार मोठे यश आहे.किंबहुना जीवनाचे ते साध्य आहे . 

मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगण्यासाठी हे पत्र लिहित आहे .कारण ज्यावेळी तू समस्येमध्ये पडशील त्यावेळी तुला मार्गदर्शन करायला मी नसेन.हे पत्र वाचून किंवा स्मरून तुला ते मार्गदर्शन मिळू शकेल .

अडचणीना, समस्यांना, संकटांना, आपण धीरोदात्तपणे तोंड दिले पाहिजे.कोणत्याही प्रसंगात डगमगून जाता कामा नये .त्या त्या प्रसंगातून परिस्थितीप्रमाणे आपण मार्ग काढला पाहिजे.जीवन हे जगण्यासाठी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे .आयुष्यात अनेक प्रसंग असे येतात की त्या वेळी मृत्यू जवळ करावा असे वाटते. मृत्यू ही पळवाट आहे.मृत्यू म्हणजे जीवनापासून दूर जाणे होय .प्रयत्न केला तर मार्ग निघतोच .आपल्याला हवा असलेला मार्ग निघेल असे नाही .परंतु  मार्ग हा निघतोच .एक रस्ता बंद झाला तर दुसरा उघडतो.ही जीवनाची रीतच आहे .नाउमेद न होता परिस्थितीवशात् आपल्याला मिळालेल्या रस्त्याने आपण चालले पाहिजे.हे तू लक्षात ठेव .

यदाकदाचित सर्व मार्ग बंद झाले आहेत असे तुला वाटले. तू परिस्थितीपुढे पूर्ण निराश  झालीस.असे होणार नाही याची मला खात्री आहे .तू कोणत्याही प्रसंगात डगमगून जाणार नाही जाऊ  नये अशी माझी इच्छा व प्रार्थना आहे.माझ्या स्मरणाने या पत्र वाचनाने तुला तुझा धीर परत प्राप्त होईल.  तरीही तसा प्रसंग आल्यास या पत्रासोबत ठेवलेले लॉकेट उघड.

त्यात तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल .लॉकेट तुझ्यावरील प्रसंग दूर करील.लॉकेट तुला मार्ग दाखवील.

तू इतकी धीरोदात्त आहेस की तू कधीही लॉकेट उघडणार नाहीस याचा मला विश्वास आहे .

लॉकेट उघडण्याची तुझ्यावर वेळ न येवो अशी इच्छा करणारा.

माझे आशीर्वाद तुझ्या मागे सदैव आहेतच .

तुझा  

बाबा

इथे ते पत्र संपले होते .  

पत्राच्या आठवणीने, बाबांच्या आठवणीने, कुसुमचे डोळे भरून आले .तिच्या डोळ्यातील थेंब त्या लॉकेटवर पडले. 

तेव्हापासून ते लॉकेट सदैव तिच्या गळ्यात असे . तिच्या आयुष्यात ते लॉकेट उघडावे असे वाटण्याचे प्रसंग अनेक आले.प्रत्येक वेळी ती तिच्या लाडक्या बाबांचे स्मरण करीत असे .बाबांचे पत्र तिला पाठ होते .पत्रावरून,लॉकेटवरून, हात फिरविताना तिला आपले बाबा भेटले असे वाटे.

बाबांचे पत्र तिने जपून ठेवले  होते .त्याच्या प्रतीही काढून ठेवल्या होत्या .संकट प्रसंगी ती पत्र वाचत असे .तिचे धैर्य परत येत असे.  तिला मार्ग सुचत असे .

आज तिच्या जवळ सर्व काही होते.  ती व तिची आई क्वार्टर सोडून आपल्या जागेत राहायला आल्या तेव्हाचे दिवस, पूर्वीचे दिवस तिला आठवत होते.

दोघीही राबराब राबत होत्या.खाद्यपदार्थ बनवीत होत्या. मागणीप्रमाणे पुरवठा करीत होत्या. तिला धंद्याचा विस्तार करायचा होता.तिच्या डोक्यात असंख्य कल्पना होत्या .परंतू त्या कल्पना राबवायच्या तर त्यासाठी पैशाची गरज होती .प्रथम किचनसाठी मोठी  जागा हवी होती.काम करण्यासाठी जरी स्त्रिया  ठेवल्या तरी त्याना काम करायला जागा पाहिजे होती.आहे या जागेत जेमतेम  दोघी काम करू शकत होत्या.स्त्रियांना मूलतः  स्वयंपाक येतच असतो. स्त्रियांमध्ये चिकाटी मुळातच असते .स्वयंपाकात चिकाटी खूप लागते.थोड्या ट्रेनिंगमध्ये  त्या कुशल बनू शकतात.

प्रथम तिने हॉलचे रूपांतर किचनमध्ये  करायचे ठरवले.दोन मुली कामावर ठेवल्या .लांबलचक टेबल टाकून त्यावर दोन शेगड्या  ठेवल्या.कांही मोठी भांडी खरेदी केली .ब्लॉक घेऊन शिल्लक राहिलेल्या पैशांमध्ये हे सर्व होऊ शकले .इच्छा असली की मार्ग सापडतो हे बाबांचे वाक्य तिला आठवले.मुलीना शिक्षण सुरू झाले.आईने प्रत्यक्ष काम करण्याऐवजी लक्ष ठेवावे व्यवस्थित काम करून घ्यावे अशी योजना तिने ठरविली.थोड्याच दिवसात मुली खाद्यपदार्थ उकृष्ट बनवू लागल्या . उत्पादनात  वाढ झाली.उत्पन्न वाढले. नफा वाढला.

तिने निरनिराळे प्रयोग केले.संकेतस्थळावरून निरनिराळे पदार्थ शोधून काढले .काही पदार्थांची नावे बदलून त्याच पदार्थाना आकर्षक नावे दिली . विविधता व गुणात्मकता दोन्हीवर भर दिला.

तिच्या उत्पादनाचे "कुसुम फूड प्रॉडक्ट्स"हे नाव रजिस्टर केले .हे नाव लहान मोठ्या प्लास्टिक पिशव्यांवर छापून घेतले.खाद्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या  शहरातील अनेक दुकानदारांकडे आपली उत्पादने कमिशन बेसिसवर विक्रीसाठी ठेवली.माल उधारीवर दिला .ज्या मालाची विक्री होणार नाही तो माल मुदत संपल्यावर आम्ही परत नेऊ म्हणून सांगितले.खाद्यपदार्थांची जोरात विक्री होऊ लागली .

मालाचे पैसे नंतर न घेता ती हळूहळू आगाऊ घेऊ लागली .मालाची विक्री निश्चित होईल याची दुकानदारांना खात्री असल्यामुळे तेही रोख पैसे देऊन माल विकत घेऊ लागले .

तिने व्यवसायाचा आणखी विस्तार करण्याचे ठरविले .त्यासाठी तिला कर्ज पाहिजे होते .ती कर्जासाठी बँकेकडे गेली .तिच्या व्यवसाय क्षमतेबद्दल बँकेला अनुभव नव्हता .व्यवसायाचा  पसारा बघून बँकेची खात्री होत नव्हती .अशा वेळी विद्याधरची तिला मदत झाली.तोही बँकेत नुकताच  नोकरीला लागला होता.बँकेला समजेल अशा परिभाषेत अर्ज कसा करावा, हमी कशी द्यावी ,वगैरे  गोष्टीत त्याने बहुमोल मदत केली .तिने तारण म्हणून आपला ब्लॉक बँकेकडे गहाण ठेवला.

तिने कुसूम फूड प्रॉडक्ट्सच्या किचनसाठी मोठी प्रशस्त जागा घेतली .तिथे शास्त्रोक्त पद्धतीने  खाद्य पदार्थांचे उत्पादन, पॅकेजिंग,डिस्ट्रिब्युशन इत्यादी गोष्टी होऊ लागल्या.

तिने एजन्टमार्फत विक्री करण्याबरोबरच प्रत्यक्ष उपभोक्त्यांना विक्री करण्यासाठी शहरात अनेकठिकाणी दुकाने सुरू केली .उपभोक्त्यांच्या जवळ दुकान आल्यामुळे विक्री वाढली.

तिच्याबद्दल खात्री वाटू लागल्यामुळे बँकेकडून तिला जास्त जास्त कर्ज मिळू लागले . या सर्व प्रवासात विद्याधर तिच्याबरोबर होता.  

सुरुवातीला चाचपडत प्रवास करीत असताना विद्याधर तिला प्रोत्साहन देत होता .दोघांचे स्वभाव जुळले.दीड दोन वर्षांनी त्यांनी जन्माचे जोडीदार होण्याचे ठरवले.तिला दोन वर्षांचा एक मुलगाही होता .तिच्या आईची या विवाहाला संमती होतीच.तिला जावई म्हणून विद्याधर पसंत होता. विद्याधरही त्याच्या कर्तृत्वाने शाखाव्यवस्थापक पदापर्यंत पोचला होता. 

तिची आई  कारखान्यात तिला जमेल तेव्हा येऊन बसत असे.उत्पादन, व्यवस्थापन, विपणन,वित्त, सर्वत्र कुसुमचे लक्ष असे.

ती सर्व माध्यमांद्वारे तिच्या मालाची जाहिरात करीत असे.महाराष्ट्रात सर्वत्र तिचे खाद्य पदार्थ पोचले होते.इतर नामांकित कंपन्यांबरोबर ती यशस्वी स्पर्धा करू लागली होती .लोक बिनधास्तपणे ते विकत घेत असत .कुसुम  फूड प्रॉडक्ट्स हे लेबल म्हणजे सचोटी,प्रामाणिकपणा, शुद्धता,कमी किंमत, याची खात्री असे.

तिची प्रॉडक्ट्स फ्लिपकार्ट अॅमेझॉन अशासारख्या कंपन्यांमार्फत विकली जात असत .नामांकित चॅनेलने यशस्वी ललना यावर एक मालिका तयार करण्याचे ठरविले होते.मालिकेसाठी  निरनिराळ्या क्षेत्रातील स्त्रिया निवडल्या होत्या.त्यात तिचीही निवड केली होती.

मालिकेसाठी शूटिंग करून अाताच चॅनेलचे लोक गेले होते .

कुसुम तिचे आवडते लॉकेट हातात घेऊन बसली होती.या सर्व प्रवासात तिच्या आईप्रमाणेच तिला तिच्या वडिलांची अप्रत्यक्ष साथ होती .

जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येई त्या त्या वेळी ती पत्र वाचत असे. पत्राचे स्मरण करीत असे.लॉकेटवर  हात ठेवला तरी तिला नवीन बळ प्राप्त होत असे .लॉकेटवर प्रेमाने थोपटत तिने ते लॉकेट आपल्या गळ्यात घातले.

तिला तिच्या वडिलांनी लिहिल्याप्रमाणे प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये तिला मार्ग सापडला होता.

लॉकेट उघडण्याची वेळ आली नव्हती.कदाचित  कधीही येणार नव्हती. 

गेल्या आठ दहा वर्षांचा प्रवास ती मन:चक्षूने पाहात होती .

घडाळ्यात दहाचे टोल पडले.

ती तिच्या भावसमाधीतून जागी झाली.

*शेजारीच विद्याधर शांतपणे तिच्याकडे पाहात बसला होता. *

*तिने दहा वर्षांत खूप मोठा पल्ला मारला होता .*

*अजूनही तिला खूप वाटचाल करायची होती.*

*तिच्या मुख्य व्यवसायाला अनेक पूरक व्यवसाय तिला खुणावीत होते.*

(समाप्त)

२३/७/२०२०©प्रभाकर  पटवर्धन