०४ लॉकेट १-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
कुसुम सोफ्यावर कितीतरी वेळ विचार करीत तशीच बसली होती .विद्याधरही शेजारीच सोफ्यावर बसला होता .आपली पत्नी कुसुम कसला विचार करीत असेल याची त्याला कल्पना होती.आपल्या विचारातून ती बाहेर येईल याची तो शांतपणे वाट पाहात होता .त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती.त्यांचा प्रेमविवाह होता .प्रणयाराधनेची एक दोन वर्षे व लग्नाची पाच वर्षे एवढा काळ तो कुसुमला ओळखत होता .
थोड्या वेळापूर्वी टीव्ही चॅनेलचे लोक तिचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते .एक यशस्वी उद्योजिका म्हणून ती सर्वत्र मशहूर होती.अक्षरश: शून्यातून तिने विश्व उभे केले होते.तिच्या व्यवसायाचा पसारा ,तिची उत्पादने ,तिच्या यशाचे रहस्य, तिच्या यशाची गुरुकिल्ली,याबद्दल अनेक प्रश्न मुलाखतकाराने विचारले होते.मुलाखत जवळजवळ दोन तास चालली होती.काटछाट करून ही मुलाखत अर्धा किंवा एक तास करण्यात येणार होती.एकाच वेळी किंवा दोन दिवस ती प्रक्षेपित होणार होती . ही मुलाखत तिच्यासाठी महत्त्वाची होती .टीव्ही चॅनेलचे हजारो प्रेक्षक ही मुलाखत पाहणार होते . त्यातील काही ग्राहक होते तर उरलेले संभाव्य ग्राहक होते. त्यामुळे तिच्या कंपनीच्या उत्पादनांचा खप वाढणार होता .जाहिरातीमुळे वाढणाऱ्या खपापेक्षा हे प्रक्षेपण तिला जास्त ग्राहक मिळवून देणार होते .फुकट जाहिरातीचाच हा एक भाग होता.यशस्वी स्त्रिया अशा नांवाची एक मालिका टीव्हीवर दाखविली जाणार होती .त्यातील एक किंवा दोन भाग तिच्यावर चित्रीत झाले होते .नामांकित चॅनेल असल्यामुळे भरपूर प्रेक्षक ती मालिका पाहणार हे निश्चित होते .
तिच्या हातात तिचे आवडते लॉकेट होते .लॉकेट चांदीचे होते .नेहमी ते लॉकेट तिच्या गळ्यात असे .तिची ऐपत अशी कित्येक सोन्याची लॉकेट्स करण्याची, वापरण्याची होती.तरीही ती तेच चांदीचे लॉकेट घालीत असे .लॉकेट ओल्ड फॅशन होते .तिच्यामुळे केवळ ही फॅशन पुन्हा येवू घातली होती.तिच्यामुळे सोन्याच्या लॉकेटऐवजी चांदीच्या लॉकेटची फॅशन पडू पाहत होती. ती सोन्याचे लॉकेट कां घालत नाही असा प्रश्न तिला अनेकजणानी विचारला होता.त्यावर ती नुसती हसत असे काहीच उत्तर देत नसे .तर काही जणाना हे लॉकेट मला लकी आहे एवढेच उत्तर देत असे. जवळच्या काही जणांना हे लॉकेट तिला तिच्या वडिलांनी दिलेले आहे हे माहित होते .वडिलांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी तिला दिलेली ती भेट होती.त्या लॉकेटेची सर्व कथा फारच थोड्या जणांना माहिती होती.त्यातील एक तिचा नवरा विद्याधर होता .
ते लॉकेट तिचा आधार होता.ते लॉकेट तिची प्रेरणा होती.तो तिच्या वडिलांचा आशीर्वाद होता .त्या लॉकेटकडे बघताना ती विचारात बुडालेली होती . लहानपणापासूनच्या सर्व घटना तिला आठवत होत्या.
कुसुम, तिची आई सुमन व तिचे वडील केशव,असे त्यांचे त्रिकोणी कुटुंब होते .ती एकुलती एक होती.केशवरावांनी दुसरे मूल होऊ दिले नव्हते किं त्यांना झाले नव्हते ते त्यांचे त्यांनाच माहीत.त्यांचे कुटुंब निम्न मध्यमवर्गीय आर्थिक स्तरातील होते .जगातील सर्व आईवडिलांप्रमाणे तिच्या आईवडिलांनाही ,कुसुमला सर्व सुखसोयी मिळाव्यात अशी इच्छा होती.प्रत्येक आई वडिलांना आपल्याला ज्या सुखसोयी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळाव्यात असे वाटते. दुसरे मूल असते तर दोन्ही मुलांवर मर्यादित उत्पन्नाचा परिणाम झाला असता.
केशवराव एका कारखान्यात साधे कामगार होते. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण जास्त होऊ शकले नव्हते. त्यांचे उत्पन्न बेतास बात होते. तिची आई सुमन गृहिणी होती .ती कुठेही नोकरी करीत नव्हती.ती स्वतः फार शिकलेलीही नव्हती. आपल्या मुलीला खूप खूप शिकवावे इतर मुलांना मिळणाऱ्या सर्व सुविधा तिला मिळाव्यात असे दोघांनाही वाटत असे .केशवरावांच्या तुटपुंज्या उत्पन्नात, जरी मनात खूप असले तरी ते शक्य नव्हते .तिची आई सुगरण होती. काही लोकांच्या हाताला चव असते असे आपण म्हणतो.साधे साधे नेहमीचे पदार्थ त्यांनी केले तरी ते जास्त चविष्ट लागतात.मोजक्या कोणत्या वस्तू वापराव्यात आणि त्याचे नेमके किती प्रमाण असावे याचे त्यांना उपजतच ज्ञान असते .
आपले उत्पन्न कसे वाढेल असा विचार करताना ,आपण खाद्य पदार्थ तयार करून ते विकू कां नयेत असा विचार त्यांच्या मनात आला. केशवरावांच्या तुटपुंज्या उत्पन्नाला हातभार लागेल.श्रीमंतांच्या मुलाना मिळणाऱ्या निदान कांही सुविधा आपल्याला कुसुमला देता येतील.असा विचार त्यामागे होता .त्यांनी लहान प्रमाणावर खारे गोडे शंकरपाळे, निरनिराळ्या प्रकारचा चिवडा,उपासाचे काही पदार्थ ,चिरोटे, गुलाब जामून इत्यादी,तयार करून शेजारी पाजारी विकायला सुरवात केली. सुरुवातीला कांही मोजके खारे तर काही मोजके गोडे खाद्य पदार्थ त्या बनवीत असत .त्यांचे पदार्थ खपू लागले. सर्वांना ते आवडत असत.त्यांच्या पदार्थ बनवण्याच्या कृती, रेसिपी, लोकांना आवडत असत.त्यांच्या पदार्थांना मागणी वाढू लागली .
सुरुवातीला त्या ऑर्डरप्रमाणे पदार्थ बनवून देत असत .पदार्थ खपतात असे पाहिल्यावर त्या ऑर्डरपेक्षा थोडे जास्त बनवू लागल्या .कुसुमच्या साह्याने त्यांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनविला .त्यावर लोकांना ऑर्डर देता येत असे .घरी येऊन लोक वस्तू घेऊन जात असत.काही लोकांना स्वतः येऊन पदार्थ नेणे शक्य नसे.असे लोक त्यांना तुम्ही पदार्थ पोचवू शकाल का? अशी विनंती करत.कामावरून आल्यावर केशवराव ऑर्डरप्रमाणे पदार्थ पोचवीत असत.कामावरून दमून भागून आल्यावर बाबांनी पुन्हा तयार पदार्थ पोचवण्यासाठी बाहेर जावे हे त्यांच्या मुलीला कुसुमला आवडत नसे. तिला पटत नसे.कुसुमने ती जबाबदारी स्वतःवर घेतली. पहिल्यापासूनच ती हुषार होती.शाळा अभ्यास झाल्यावर तिला बराच वेळ मिळत असे.
आई सतत चुलीजवळ काहीतरी करीत असते.तिला आपल्याकडे गॅस असावा असे वाटे.थोड्याच दिवसात तिच्याकडे गॅस आला .मिळणाऱ्या उत्पन्नातून सुमनताईंनी मायक्रोवेव्ह ओव्हन,इंडक्शन शेगडी घेतली.आई मेहनत घेत होती .हळूहळू बाबांच्या उत्पन्नापेक्षा आईला जास्त उत्पन्न मिळू लागले.तू काय बुवा बिझनेस वुमन बाबा आईला चिडवत असत .त्यावर काहीच न बोलता ती केवळ हास्य करीत असे .कुसुमला तिच्या लहानपणीचा आईबाबांचा संवाद आठवत होता.
कुसुमने जसा बाबांचा भार कमी करण्याचा प्रयत्न केला, तसाच तिने आईचा भारही कमी करण्याचा प्रयत्न केला .स्वयंपाकात तिची लुडबुड सुरू झाली.हळूहळू ती आईच्या हाताखाली अनेक पदार्थ करायला शिकली .आईप्रमाणे तिच्या हातालाही गोडी होती. तिखट मीठ मसाला फोडणी गूळ साखर खवा सर्व काही जिथल्या तिथे असे .आईच्या हाताखाली ती तयार होत होती.
दहावीला हे सर्व करूनही तिला उत्तम मार्क मिळाले.हल्ली सर्वत्र स्पर्धा असते .तिची जात आरक्षित प्रकारात नव्हती.ती ओपन कॅटेगरीमध्ये होती.चांगल्या ज्युनियर कॉलेजमध्ये तिला तिच्या उत्कृष्ट गुणामुळे सहज अॅडमिशन मिळाली.
ती बारावीला गेल्यावर तिचे आईबाबा तिला काही काम करू देत नसत . तिने अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करावे आणि उत्कृष्ट मार्क मिळवून बारावी उत्तीर्ण व्हावे अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती.त्याप्रमाणे तिने अभ्यास करून बारावीची परीक्षा दिली .तिला पेपर्स अतिशय चांगले गेले होते .आपल्याला ग्रुपमध्ये भरपूर मार्क मिळतील याची तिला खात्री होती .एमबीबीएसला ॲडमिशन मिळेल याची तिला खात्री होती.
आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे असे तिच्या बाबाना खूप वाटत असे .परंतु जीवनात आपल्या इच्छेप्रमाणे सर्व घडतेच असे नाही .मनसा चिंतितं एकम् दैवं अन्यत्र चिंतयेत, या म्हणीप्रमाणे तिच्या जीवनाला एक वेगळेच वळण लागणार होते .
तिच्या बाबांना कारखान्यात काम करताना अपघात झाला.कंपनीने त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. अपघात झाल्याचा घरी निरोप गेला.आई व मुलगी दोघीही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. बाबा बेशुद्धावस्थेत होते.त्यांना गंभीर दुखापत झाली होती.त्यांची एक दोन ऑपरेशनसही झाली.बाबा शुद्धीवर न येताच तीन दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालविली . दोघींवर अक्षरश:आभाळ कोसळले.
कारखान्यात कामावर असताना अपघात झाल्यामुळे कारखान्यांकडून नियमाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली.प्रॉव्हीडंट फंड इत्यादीचा काही पैसा मिळाला.पण त्याचबरोबर कारखान्याची क्वार्टरही सोडावी लागली.तिच्या आईला कारखान्यात नोकरी मिळाली असती.कारखान्याच्या क्वार्टरमध्ये राहता आले असते .परंतु आई तिला मिळणाऱ्या संभाव्य पगारापेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न तिच्या सुगरणपणावर मिळवीत होती.तोपर्यंत बारावीचा निकाल लागला होता.कुसुम चांगल्या मार्कानी पास झाली होती. तिच्या आईने ठरल्याप्रमाणे डॉक्टर हो असे सांगितले. मी केवळ माझ्या सुगरणपणावर तुला काहीही कमी पडू देणार नाही असे तिला आश्वस्तही केले.परंतु आईने ढोरमेहनत करावी आणि स्वतःची तब्येत बिघडवून घ्यावी असे तिला वाटत नव्हते. तिने सारासार विचार करून कॉलेजात न जाण्याचे ठरविले .
आईऐवजी तिने बाबांच्या कारखान्यात नोकरी करावी असाही एक विचार आला होता .कुसुम केवळ बारावी झाली होती .तिला तिच्या आईप्रमाणेच नगण्य पगार मिळाला असता .आपल्या मुलीने नोकरी करावी हे तिच्या आईला पसंत नव्हते .केवळ आपली राहण्याची जागा राहावी यासाठी अशी नोकरी करणे कुसुमलाही पसंत नव्हते.
शेवटी दोघींनीही विचार करून नोकरी करायची नाही असे ठरविले .मिळालेल्या काही लाख रुपयांमध्ये त्यानी दुसरीकडे जागा घेतली.क्वार्टर सोडून दिली. दोघीनीही खाद्य पदार्थ निर्मिती व विक्री यावर भर देण्याचे ठरविले.
*क्वार्टर सोडून नवीन जागेत येताना कुसुमला बाबांच्या सामानात एक नक्षीदार पेटी मिळाली .*
*त्या पेटीत आता तिच्या हातात असलेले चांदीचे लॉकेट व बाबांनी तिला लिहिलेले एक पत्र होते. *
*पत्र पुढील प्रमाणे होते .पत्रावर तारीख नव्हती .*
(क्रमशः)
२२/७/२०२०©प्रभाकर पटवर्धन