Get it on Google Play
Download on the App Store

०८ सुलू कुठे गेली १-३

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

अमरगावाच्या बरोबर मध्यभागातून काळनदी वाहात होती,असे म्हणण्यापेक्षा काळ नदीच्या दोन्ही बाजूला अमरगाव वसले होते असे बोलणे जास्त सयुक्तिक होईल.नदी बाराही महिने प्रवाही होती.पर्जन्यकाळी पर्जन्यमानानुसार नदीला कमी जास्त पूर येत असे.गावाला पाणीपुरवठा मुख्यत्वे या नदीतून होत असे.अर्थात जागोजागी विहिरी होत्या.त्यांच्याही पाण्याचा वापर केला जात असे.नदीवर धरण बांधावे म्हणजे आसपासच्या अनेक गावांना शेतीला पाणीपुरवठा होईल.हल्ली शेती केवळ पावसावर अवलंबून असते तसे होणार नाही.(अर्थात विहिरीतील पाणी शिंपून शेती करता येत होती परंतु ते फार खर्चिक होत असे.अश्या शेतीचे क्षेत्रफळही मर्यादित असे.)अशी आसपासच्या अनेक गावांतून मागणी होती.निवडून येणारे उमेदवार धरण बांधण्याची ग्वाही देत असत.माशी कुठे शिंकत असे माहीत नाही.अजून धरण झाले नाही ही वस्तुस्थिती होती.  

नदीचे पाणी बाराही महिने प्रवाही असले तरी मधूनमधून त्यामध्ये डोह होते.गावाजवळच्या परिसरात तीन डोह होते.नदीवर व डोहावर घाट बांधलेले होते.उन्हाळ्यात पाणी आटल्यानंतर नदीचा प्रवाह अाटत असे मग डोहावर गांवकरी जात असत.डोहावर कपडे धुणे, भांडी घासणे, अशा कामांना बंदी होती.पाणी प्रवाही नसताना डोहातील पाणी खराब होत असे.बंदीला बायका विशेष जुमानीत नसत.त्यांचा कपडे धुण्याचा,भांडी घासण्याचा, स्नान करण्याचा,कार्यक्रम चालूच राही.डोहात मासे होते. ते पाणी स्वच्छ करीत असत.अर्थातच मासे खात नसत अशी  घाण तळाला जमत असे.पावसाळ्यात पुरामध्ये ती वाहूनही जात असे.डोहांचा वापर मुले व तरुण मंडळी पोहण्यासाठीही करीत असत. डोहाना नावेही होती.हनुमान डोह, राम डोह आणि काळ डोह.

हनुमान डोहावर पुरूषांनी जावे. राम डोहावर बायकांनी जावे.असा रिवाज होता.  काळ डोहावर स्त्री पुरुष मुले सर्वच जात असत.हा डोह खूप खोल होता त्यामुळे तो धोक्याचा समजला जात असे. एके वर्षी पुराबरोबर एक  सुसर पाण्याबरोबर वहात आली.त्याची अर्थातच कुणाला कल्पना नव्हती.एक दिवस कांही बायका डोहावर गेल्या होत्या.परस्परांशी गप्पा मारता मारता  त्यांचे काम चालले होते.गप्पांमध्ये गुंग झालेल्या असताना त्यातील एका बाईला सुसरीने  खोल पाण्यात ओढून नेले.एकच हलकल्लोळ झाला.धुणी भांडी तशीच टाकून बायका गावाकडे पळत सुटल्या.

हा काळ डोह खूप खोल होता.त्याचा तळ सापडत नाही अशी आख्यायिका होती.पाणी खोल असल्यामुळे ते काळे दिसे.त्यामुळे डोहाला काळ डोह असे नाव बहुधा पडले असावे.नदीच्या उगमाकडे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला कि प्रचंड पूर येत असे.दोन्ही तीरावरील शेती वाहून जात असे.घरांनाही धोका पोहोचे.जिकडे तिकडे पाणीच पाणी होत असे.अशी परिस्थिती काळ नदी वाहात होती त्या भागात सर्वत्र होती.बहुधा त्यामुळेच नदीला काळ नदी असे नाव पडले असावे.जी जीवनदायिनी आहे परंतु रागावली कि गुरांचा शेळ्या मेंढ्यांचा माणसांचा घास घेते ती काळ नदी असे नाव बहुधा प्राचीन काळापासून पडले असावे.

काळ डोहावर सुसरीने वास केल्यापासून कर्फ्यू पुकारल्याप्रमाणे तिकडे कुणीही जात नाहीसे झाले.गावापासून दूर असल्यामुळे व फार खोल असल्यामुळे एकूण तिकडे जाणे कमीच असे.आता तर सुसरीच्या दहशतीमुळे जाणे बंद झाले.चुकून एखादी शेळी मेंढी गाय बैल म्हैस गेली तर सुसर त्याला ओढून नेत असे.सुसर किनाऱ्यावर घाटावर उन्हात अंग शेकत बऱ्याच वेळा बसलेली आढळून येत असे.काळ डोह हे नाव आता शोभून दिसू लागले. गुरामाणसांचा जो काळ घेतो म्हणजेच त्यांना खाऊन टाकतो ठार मारतो तो काळ डोह. या सुसरीला पकडून न्यावे आणि  दुसरीकडे संरक्षित जागी सोडावे,गावाला असलेला धोका दूर करावा,अशी सरकार दरबारी अनेकदा विनंती करून झाली होती.अजून तरी विनंती फळाला आली नव्हती.  

संध्याकाळचे पांच वाजले होते.शिशिर ऋतू होता.थंडीचे दिवस होते.दिवस लहान होते. नेहमीप्रमाणे काळ डोहावर सर्वत्र सामसूम होती.डोहापासून थोडी दूर एक मोटार उभी होती.डोहाच्या  कडेला एक तीन पायावर आधारित कॅमेरा स्टँड दिसत होता.त्यावर एक व्हिडिओ कॅमेराही होता.कॅमेऱ्याचा फोकस नदीचा,डोहाचा,किनारा होता.कुठेही कुणीही दिसत नव्हते.तो स्टँड व कॅमेरा तिथे कुणी ठेवला कांही कळत नव्हते.सुसरीचे शूटिंग करण्यासाठी किंवा काही अन्य शूटिंगसाठी कुणी आले असेल तर ते निदान आता तरी दिसत नव्हते.कदाचित गावात एखादा परका इसम आला असावा.त्याला डोह पाहून तेथील भागाचे शूटिंग करण्याचे मनात आले असावे.स्टँडवर कॅमेरा ठेवून त्याचे शूटिंग चालू असावे.त्याला सुसरीच्या अस्तित्वाबद्दलची कल्पना नसावी.सुसरीने अकस्मात येऊन त्याला पाण्यात ओढून नेले असावे.आता तो पाहुणा बहुधा  सुसरीच्या पोटात असावा.सूर्य मावळतीला गेला होता.डोहावर काळीभोर छाया दाटू लागली होती.अजूननही सर्वत्र सामसूम होते.व्हीडिओ शूटर कुठे होता कुणास माहीत? 

बाबासाहेब दशमाने गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होती. त्यांच्या शब्दाला मान होता.त्यांच्या नावाचा गावांत दबदबा होता.आसपासची बरीच शेती त्यांच्या नावावर होती.सधन शेतकर्‍यांत त्यांची गणना सहज करता आली असती.त्यांनी निवडणुकीला उभे राहावे म्हणून प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असे.अजून तरी कुणाच्या प्रयत्नाला यश आले नव्हते.बाबासाहेब ज्याला पाठिंबा देतील तो नक्की निवडून येणार ही काळय़ा दगडावरची रेघ होती.

त्यांच्या पत्नी सीताबाई यांच्या  येरझारा चालल्या होत्या. त्यांची मुलगी सुलभा शहरात शिक्षण घेत होती.कांही दिवसांपूर्वी ती गावाला आली होती.सकाळीच ती मी मैत्रिणीकडे जाते असे म्हणून गेली होती.दुपार झाली तरी ती परत आली नाही.सीताबाईनी मुलीला फोन केला.मी मैत्रिणीकडेच रहात आहे तिथेच जेवेन आणि संध्याकाळी परत येईन.तू काळजी करू नकोस असा निरोप तिने दिला.संध्याकाळ झाली तरी सुलू परत आली नाही.त्यांनी फोन लावला सुलभा फोन उचलत नव्हती.रिंग वाजत होती कुणीही प्रतिसाद देत नव्हते.कांही काळानंतर फोन स्विच ऑफ आहे असे उत्तर येऊ लागले.

सुलभाची लहानपणापासूनची मैत्रीण कमलाकडे जाते म्हणून सुलभा गेली होती.कमलाचे लग्न झाले होते.ती  कांही दिवसांसाठी नुकतीच माहेरी आली होती.सुलभा व कमला या दोघी लहानपणापासूनच्या जीवश्च कंठश्च मैत्रिणी होत्या.तिला भेटण्यासाठी सुलू गेली तिथे जेवायला राहिली त्यात वावगे कांहीच नव्हते.संध्याकाळ झाली. रात्र होऊ लागली तरीही सुलू परत आली नाही.तिचा फोनही स्विच ऑफ सांगत होता.सीताबाईनी सुलभाची मैत्रीण कमलाला फोन केला.कमलाने लगेच फोन घेतला.तिच्याजवळ सुलूची चौकशी करता तिने सुलू माझ्याकडे आलीच नाही.असे उत्तर दिले.सुलू तिची मोटार घेवून कमलाकडे गेली होती.  

आता मात्र सीताबाईंचा संयम सुटत चालला.त्यांच्या येरझारा त्यांची घालमेल आणखीच वाढली.यावेळी शहरातून आल्यापासून सुलभाचे चित्त थाऱ्यावर दिसत नव्हते.ती कसल्या तरी चिंतेत काळजीत असलेली दिसत होती.नेहमीप्रमाणे हसत खेळत नव्हती.गप्पाही मारत नव्हती.तिला फोटो काढण्याचे चलत् चित्रण करण्याचे वेड होते.अलीकडेच बाबासाहेबानी तिला उंची कॅमेरा घेऊन दिला होता.तरीही कॅमेरा घेऊन दीड वर्ष झाले होते.ती गावाला आली की कॅमेरा घेऊन गावभर भटकत असे.गावात,शेतावर, कारखान्यावर, रानात,नदीवर,डोहावर,ती कुठेही फिरत असे.तिचे फोटो घेणे आणि चलत् चित्र काढणे जोरात चालत असे.घरी आल्यावर ती मोठ्या पडद्यावर आईला केलेले चित्रण फोटो दाखवीत असे.अमर गाव इतका देखणा दिसतो, इतका सुंदर आहे, याची सीताबाईंना मुलीने केलेले चित्रण पाहिल्यावरच कल्पना येत असे.

आजही ती जाताना कॅमेरा त्रिकोणी स्टॅण्ड घेऊन गेली होती.मैत्रिणीकडे जाते तर स्टॅन्ड कशाला असे सीताबाईनी विचारले होते.त्यावर तिने अग मला कमीचे माझ्याबरोबर बरेच फोटो घ्यायचे आहेत.दोघांचेही व्हीडीओ चित्रण करायचे आहे.त्यासाठी स्टँड   पाहिजेच असे उत्तर दिले होते.

आजच नेमके बाबासाहेब  घरात नव्हते. त्यांची कारखान्यावर मिटींग होती.तिने एकदोनदा बाबासाहेबांना फोन करण्याचा प्रयत्न केला.फोन त्यांच्या सेक्रेटरीने घेतला.बाबासाहेब मीटिंगमध्ये आहेत. मिटिंग संपताच त्यांना मी तुमचा फोन आल्याचे सांगतो असे उत्तर सेक्रेटरीने दिले.कांही विशेष काम असल्यास मला सांगा असेही तो म्हणाला.त्यावर विशेष क़ही नाही बाबासाहेब मोकळे झाल्यावर त्यांना मला फोन करायला सांगा असे उत्तर त्यांनी दिले होते.सकाळी बाहेर गेलेली आपली मुलगी सुलभा अजून परत आली नाही हे सेक्रेटरीला सांगावे असे त्यांना वाटले नाही.

त्यांची अस्वस्थता क्षणोक्षणी  वाढत होती. सुलभा त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी होती.त्याना एक मुलगाही होता.तो अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता. तिथेच त्याला भक्कम पगाराची नोकरी लागली होती.तो तिथेच रमला होता.परदेशात स्थायिक व्हावे असे त्यांला वाटत होते.भारतात तो परत येईल असे वाटत नव्हते.

बाबासाहेबांची एवढी मोठी इस्टेट सांभाळायला त्यांच्यानंतर कुणीही नव्हते.सर्व इस्टेट त्यांच्या दूरच्या पुतण्याला मिळाली असती.एखाद्या समर्थ धाडसी हरहुन्नरी मुलाला आपले घरजावई करून घ्यावे म्हणजे तो व मुलगी घरातच राहतील आपला वृद्धपणी प्रतिपाळ करतील.सर्व इस्टेट सांभाळतील असा बाबासाहेबांचा विचार होता.त्याला अर्थातच सीताबाईंचा पूर्ण पाठिंबा होता.शिक्षणासाठी सुलभा शहरात गेली होती.तिथे ती हॉस्टेलला राहात होती.शहर जवळ असल्यामुळे ती वारंवार गावाला येत असे.बाबासाहेबांकडे तशा चार   निरनिराळय़ा मेकच्या मोटारी होत्या.एक बाबासाहेब वापरीत.दुसरी बाईसाहेबांना वापरता येई.तिसरी सुलभा वापरत असे.चौथी एखादी मोटार बिघडली तर उपयोगाला येत असे.आपल्या मैत्रिणींना घेवून सुलभा अनेकदा वाड्यावर येत असे.तिची स्वतंत्र मोटार असल्यामुळे येणे जाणे सोयीचे होत असे.

अजून सुलभा घरी परत आली नव्हती.तिच्या आणखी एक दोन मैत्रिणींकडे चौकशी करता ती त्यांच्याकडेही नव्हती.तिने दुपारी सहज बोलते अशा स्वरात कमळाकडे जेवायला रहात आहे असे सांगितले होते.प्रत्यक्षात ती कुठे गेली काहीच कल्पना नव्हती.तिचा फोन स्विच ऑफ येत होता.

यावेळी सुलभा अस्वस्थ दिसत होती.तुला बरे वाटत नाही का? तुला आणखी कांही समस्या आहे का?असे विचारल्यावर कसनुसे हसत तिने तसे कांही नाही मी ठीक आहे असे सांगितले होते.तरीही ती ठीक नाही हे आईच्या काळजाला  उमगत होते.

तिने पुन्हा एकदा बाबासाहेबाना फोन लावून पाहिला.बाबासाहेब अजुनही मिटींगमध्ये होते.त्यांना फोन देऊ का असे सेक्रेटरीने विचारले.त्यावर नको असे सीताबाईने उत्तर दिले.त्यांना असे मीटिंगमध्ये फोन केल्याचे आवडत नाही याची सीताबाईंच्या कल्पना होती.

*ड्रायव्हरला  मोटार काढायला सांगावे  आणि पोलिस स्टेशनला जावे.*

*मुलगी हरवल्याची तक्रार करावी असे त्यांना वाटत होते.*

*परंतु बाबासाहेबांना ते आवडले नसते. सीताबाई बाबासाहेबांची किंवा त्यांच्या फोनची वाट पाहात राहिल्या.*

*त्रिकोणी स्टॅन्डवर असलेला सुलभाचा कॅमेराही तिची वाट पाहत होता.*

*जवळच तिची मोटार उभी होती. तीही सुलूची वाट पाहात होती.*  

*काळ डोहावर सुलूचा कॅमेरा आहे,मोटार आहे आणि सुलू तिथे नाही  असे सीताबाईंना कळते तर त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला असता.*  

(क्रमशः)

१/९/२०२१©प्रभाकर  पटवर्धन