०३ सौंदर्य १-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एका बाकावर गिरीश ट्रेनची वाट पाहत बसला होता.ट्रेन यायला बराच वेळ होता .वेळ जाण्यासाठी कुठले तरी पॉकेट बुक तो वाचत होता.प्लॅटफॉर्मवरील गर्दीकडे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे, त्याचे लक्ष नव्हते . येणाऱ्या जाणाऱ्या मुली त्याच्याकडे पाहात होत्या.ज्याच्याकडे वळून वळून पुन्हा पुन्हा पाहावे असा तो देखणा तरुण होता.जवळजवळ पावणे सहा फूट उंची,उजळ वर्ण ,मध्यम बांधा, उंच कपाळ,दाट काळे भोर केस,पाणीदार बुद्धिमत्ता निदर्शक तेजस्वी डोळे ,असे त्याचे थोडक्यात वर्णन करता आले असते. त्याच्या चेहऱ्यावरील बेफिकिरी कुणाला आवडली असती तर कुणाला तो उद्धट आहे असे वाटले असते.कुणाला काय वाटते याच्याशी त्याला काही देणे घेणे नव्हते . वाचनांत तो पूर्णपणे बुडून गेला होता.
एवढ्यात एकाएकी अरे ती मरेल मरेल तिला पकडा पकडा अशी आरडाओरड झाली.दचकून त्याने पुस्तकातून डोके वर करून पाहिले.
एक अडीच तीन वर्षांची गोंडस मुलगी पळतपळत प्लॅटफॉर्मच्या कडेला गेली होती .धावताधावता ती मुलगी कदाचित प्लॅटफॉर्मवरून खाली रुळावर पडली असती . त्या मुलीची आई तिच्या मागे धावत येत होती . मुलगी पळतपळत प्लॅटफॉर्मच्या कडेला जात आहे ही गोष्ट तिच्या आईच्या जरा उशिरा लक्षात आली असावी .आई व मुलगी यामध्ये अंतर जास्त होते .आरडाओरडा ऐकून दचकून मुलगी आणखी पुढे जावून प्लॅटफॉर्मवरून खाली पडण्याचा संभव होता .तेवढ्यात विजेच्या वेगाने एक तेवीस चौवीस वर्षांची तरुणी धावत आली आणि तिने मुलीला पडता पडता पकडले आणि त्या लहान मुलीला आईच्या स्वाधीन केले.या स्टेशनवर न थांबणारी एक गाडी तेवढ्यात धाडधाड करीत निघून गेली.जर वेळीच त्या तरुणीने मुलीला पकडले नसते तर ती लहान मुलगी धावत्या रेल्वे गाडीने उडविली गेली असती किंवा त्या रेल्वेगाडीखाली आली असती .ज्या तरुण मुलीने तिला वाचविले त्या मुलीने गाडी येताना पाहिली होती आणि जिवाच्या आकांताने त्या मुलीला वाचविण्यासाठी धाव घेतली होती .काही क्षणाचा फरक पडला असता तर ती वाचविणारी मुलगीही गाडीबरोबर फेकली गेली असती .स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलीने छोट्या मुलीला वाचविले होते .
जसे काही झालेच नाही अशा थाटात ती मुलगी पुन्हा आपल्या जागेवर बाकावर जावून बसली .तिलाही बहुधा कोणत्या तरी गाडीने जायचे असावे.सर्वजण त्या मुलीची प्रशंसा करीत होते . तिला पाठीमागून पाहणारे काही जण तिचे अभिनंदन करायला पुढे गेले.तिला पाहताच ते दचकत होते. काही जणांचा उत्साह तर तिला पाहिल्याबरोबर मावळत होता.
गिरिश त्या तरुणीकडे पहात होता.त्याने सुनंदाला बरोबर ओळखले होते .तिची भेट व्हावी,तिचे आभार मानावेत ,असे त्याला मनापासून वाटत होते .त्याने तिचा तपास करण्याचा खूप प्रयत्न केला होता .परंतु तिचा पत्ता त्याला मिळाला नव्हता .गिरीशच्या धाकट्या बहिणीला तिने मरता मरता स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले होते .ती वाचली होती परंतु तिच्या चेहऱ्याची वाट लागली होती.
त्या दिवशी त्याची बहीण ए वन मॉलमध्ये मैत्रिणींबरोबर काही खरेदी करण्यासाठी गेली होती .मॉलमध्ये एका कापड दुकानाला आग लागली .जवळच प्लास्टिकच्या वस्तूंचेही दुकान होते .हा हा म्हणता आग भडकली .लिफ्ट बंद झाले होते. बाहेर पडण्यासाठी एकच गर्दी झाली होती.काही लोक पायदळी तुडविले गेले .आगीमध्ये गिरीशची बहीण सापडली होती.या धावपळीत सुखरूप बाहेर पडलेली एक मुलगी पुन्हा धावत आत शिरली.तिने आगीत उडी घेऊन आगीतील दोन मुलींना ओढत फरफटत बाहेर आणले.बाहेर आणलेल्या मुलीना सुदैवाने आगीच्या ज्वाळांची धग लागली नव्हती.त्या फक्त शॉकमध्ये होत्या. त्या सुखरूप होत्या.परंतु ज्या मुलीने त्या दोघींना बाहेर आणले तिच्या कपड्यांनी पेट घेतला होता .बेशुद्ध होऊन ती मॉलच्या दरवाजाजवळ कोसळली.त्या सुखरूप बाहेर आलेल्या दोन मुलींमध्ये गिरीशची बहीण सुखदा होती . सुखदा केवळ त्या मुलीमुळे सुखरूप बाहेर आली होती .अन्यथा कदाचित ती गंभीर जखमी झाली असती किंवा कदाचित मृत्यूमुखीही पडली असती .ही गोष्ट त्याची बहीण सुखदाने त्याला सांगितली.
आपल्या बहिणीला मैत्रिणींबरोबर मॉलमध्ये सोडून गिरीश जवळच एका खाजगी कामासाठी गेला होता .आगीची बातमी ऐकताच तो मॉलकडे धावत आला .मॉलबाहेर त्याची बहीण त्याला भेटली .बहिणीने तिची सुटका कोणी केली कशी केली ते सांगितले .मॉलच्या दाराबाहेर बेशुद्ध पडलेल्या मुलीकडे बोट दाखविले. तो सुनंदाला( तिचे नाव त्याला नंतर कळले)हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी धावत पुढे झाला.फायर ब्रिगेडच्या गाड्या, अॅम्ब्युलन्स ,बाहेर पडणारे लोक आणि बघे यांची एकच गर्दी उसळली होती.
सुनंदापर्यंत गिरीश पोहोचणार तोच तिला एका स्ट्रेचरवर ठेवून अॅब्युलन्समधून हॉस्पिटमध्ये नेण्यात आले होते.हॉस्पिटलच्या नावाची चौकशी करून तो त्याच्या बहिणीला सुखदाला घेवून त्या हॉस्पिटलमध्ये गेला.आगीमध्ये सापडल्यामुळे अॅडमिट झालेल्या लोकांच्या वॉर्डमध्ये तो सुखदाबरोबर गेला. सुनंदा बेशुद्धावस्थेतच होती.सुखदाने सुनंदाला बरोबर ओळखले .तिचे नावही त्याला तिथेच कळले .तेवढ्यात सुनंदाचे आई वडीलही हॉस्पिटलमध्ये पोहोचले .गिरीश त्यानंतर घरी निघून आला. दुसऱ्या दिवशी तो हॉस्पिटलमध्ये पुन्हा जाणार होता .सुनंदा शुद्धीवर आली असल्यास, ती बोलण्याच्या मन:स्थितीत असल्यास, त्याला तिचे व तिच्या आई वडिलांचे आभार मानायचे होते .परंतु काही तातडीच्या कामासाठी त्याला दुसऱ्या दिवशी दिल्लीला जावे लागले .चार दिवसांनी परत आल्यावर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला .सुनंदाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे ती जास्त भाजल्यामुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते .त्याला त्या हॉस्पिटलचे नाव मिळाले नाही .सुनंदाशी त्याची चुकामुक झाली ती झालीच.
आता नुकतेच जिने त्या लहान मुलीला मरता मरता वाचविले होते ती सुनंदा असावी असे त्याला वाटत होते .जवळ जवळ त्याची खात्री पटली होती.त्याच्या डोळ्यासमोर त्या वॉर्डमध्ये बेशुद्ध अवस्थेत पहालेली सुनंदा आठवत होती .
बाकावर बसलेल्या मुलीची उंची मध्यम होती .तिच्या चेहऱ्यावर हातावर जबर भाजल्याच्या खुणा होत्या.भाजल्यामुळे तिचा चेहरा भाजलेल्या वांग्यासारखा दिसत होता .तिच्या डाव्या चेहऱ्यावर लांबलचक व खोल व्रण होता .त्या दिवशी मुलीना वाचविताना ती गंभीर भाजली होती.तिचा चेहरा त्यामुळे विचित्र कुरुप दिसत होता.तिचा चेहरा पाहणाऱ्यांच्या अंगावर कांटा उभा करीत होता. कांहीजणाना तिच्याकडे बघितल्यावर तिच्याबद्दल घृणा वाटत होती.येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर ती स्पष्टपणे दिसत होती .
गिरीशला तिची घृणा करणाऱ्या त्या मुलांचा जरा रागच आला.परंतु तो काहीही करू शकत नव्हता .त्या दिवशी तिच्या अंगावरील कपडे पेटले होते.तिचा चेहरा व हात पाहून तिच्या अंगावरही अशाच भाजल्याच्या खुणा असणार याचा अंदाज सहज करता येत होता.लोक आपल्याकडे कशा दृष्टीने पहातात याची तिला पूर्णपणे जाणीव असावी.त्यांच्या दृष्टीची तिला सवय झाली होती .तरीही तिचा कनवाळू आणि धाडसी स्वभाव संपला नव्हता .आपला जीव धोक्यात घालून तिने मघाशी दुडूदुडू धावणाऱ्या त्या लहान मुलीला वाचविले होते .
तिच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती सामान्य असावी .नाही तर त्यांनी तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी केली असती .
प्लॅटफॉर्मवर एक भिकारी हाताच्या जोरावर पुढे सरकत होता .त्याला दोन्ही पाय नव्हते .कदाचित रेल्वे अपघातांमध्ये गेले असावेत .सुनंदाच्या पुढ्यात तो भिकारी आला .त्याने हात पुढे करताच सुनंदाने पर्समधून पाकीट काढून त्याला पन्नास रुपये दिले .यामध्ये तिचा कनवाळूपणा दिसत होता .
नम्रता, कनवाळूपणा, स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला वाचविण्याची इच्छा व क्षमता ,हालचालीतील चपळपणा ,प्रसंगानुरूप चटकन निर्णय घेण्याची क्षमता , तिला पाहून झालेल्या लोकांच्या प्रतिक्रियांकडे सहजपणे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती , इत्यादी .तिचे अनेक गुण निरीक्षण करता करता त्याच्या लक्षात आले.
तिचे आभार मानण्यासाठी दुसरी संधी आपल्याला कदाचित उपलब्ध होणार नाही .आताच जाऊन तिला भेटावे .तीच सुनंदा आहे ना याची खात्री करून घ्यावी.तिचे मन:पूर्वक आभार मानावे असा विचार करून तो तिच्या दिशेने निघाला.
(क्रमशः)
१९/४/२०२०©प्रभाकर पटवर्धन