४ स्मृतिभ्रंश २-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
तलावाच्या दुसर्या बाजूला अनंताही मासे पकडत होता .
अनंताला कधीही कोणीही अनंता म्हणून हाक मारली नाही.
सर्वजण त्याला अंत्या म्हणून हांक मारीत असत.
घारूला पोहता येत नव्हते.
अंत्या पट्टीचा पोहणारा होता.
घारू मासे पकडताना नकळत खोल पाण्यात गेली.ती बुडायला लागल्यावर तिच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केला.
अनंता पलीकडच्या बाजूला मासे पागत होता.त्याने घारू बुडते असे पाहताच पलीकडून पाण्यात छलांग मारली.
कांही सेकंदातच तो घारू बुडाली तेथे आला.त्याने घारूचे केस धरून तिला पाण्याबाहेर काढली.
घारूच्या नाकातोंडात व पोटांत पाणी गेले होते.
ती अर्धवट शुद्धीत होती.ती भयंकर घाबरली होती.
तिने अर्धवट शुद्धीत अर्धवट बेशुद्धीत अंत्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारली.
घारूची एक मैत्रीण घारू बुडाली, घारू मेली, असा कालवा करीत गावात गेली.गांवातील कांही लोक कामावर गेले होते.जे घरात होते त्यांनी तलावाकडे धाव मारली.अंत्याच्या गळ्याला मिठी मारल्यावर घारू बेशुध्द झाली होती.तिची मिठी कशीबशी सोडवून अंत्याने तिला जमिनीवर उपडी निजवीली होती.तिच्या छातीपोटावर दाब देऊन तो पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होता.एवढ्यात गावातील काही लोक तिथे गोळा झाले.घारूही हळूहळू शुद्धीवर येत होती.अंत्या काय करीत आहे ते पाहून ती लाजेने चूर झाली होती.
तिच्या मैत्रिणीनी तिला हळूहळू चालवत तिच्या घरी नेले.तेव्हापासून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली.समुद्रावर, समुद्राजवळच्या डोंगरांवर, डोंगरापलीकडच्या खडकांत, रानावनात,शेतात, दोघे ठरवून कुठेही भेटत असत.ही गोष्ट गावात सगळ्यांनाच माहीत झाली.घारूचे लग्न दुसरीकडे जमणे अशक्य झाले.
अनंताचे स्थळही वाईट नव्हते.अनंताचे वडील बऱ्यापैकी सधन होते.पंचवीस तीस कलमे, भातशेती,पाच पन्नास माड,शंभरेक पोफळी,घर एका सलग पट्ट्यांमध्ये होते.शेवटी घारूचे वडील अनंताच्या वडिलांकडे रीतसर मुलगी सांगून आले.अशाप्रकारे अंत्या व घारू यांचे लग्न संपन्न झाले.
प्रेमविवाह परंतु रीतसर चारचौघांसारखे ठरवून लग्न असा मामला होता.चारचौघांसारखा त्यांचा संसार सुरू झाला.त्यांना दोन मुले झाली.गावात दहावीपर्यंत शाळा झाली.मुलांना अनंताने व्यवस्थित शिकविले.मुलेही हुषार होती.मुलगा चांगल्या पगारावर सरकारी खात्यात मुंबईला नोकरीला होता.त्याचे लग्न झाले होते. त्याला दोन मुलेही होती. मुलीचे लग्न होऊन तीही सुस्थळी पडली होती.ती पुण्याला असे. तिला एक मुलगा होता.सून जावई नातवंडे आज्ञाधारक प्रेमळ मुलगा असा त्याचा हराभरा संसार होता.
बाबा तुम्ही इथे कशाला राहता? माझ्याकडे मोठी जागा आहे. मुंबईला चला असे त्यांचा मुलगा त्यांना अधूनमधून म्हणत असे.अनंताला मुंबईची गर्दी, अशुद्ध हवा ,कोकणातील घराच्या मानाने लहान जागा,कांहीच पसंत नसे.आपले घर, आपले आगर, माड, पोफळी,कलमे, भातशेती,सर्व काही त्याला अतिशय प्रिय होती.आमचे हातपाय चालत आहेत तोपर्यंत आम्ही येथे राहू नंतर तुझ्याकडे यायचेच आहे असे ती दोघे मुलाला म्हणत.मुलगी व जावईही त्यांना आग्रहाने पुण्याला बोलावीत असत.
घरचा बारदाना सांभाळून दोन चार महिने ती दोघे मुलाकडे किंवा मुलीकडे अधूनमधून जात असत.एकंदरीत त्यांना कोकणात आपल्या घरी राहणेच पसंत पडत असे.
भूतकाळात हरवलेला असताना कुणीतरी अनंताला हाक मारी.तो पुन्हा भानावर येत असे.जुन्या स्मृतीतून त्याला वर्तमानकाळात खेचून आणला जात असे.आनंदात घरी राहात असताना लक्ष्मीला या विचित्र विलक्षण रोगाने ग्रासले होते.
दिवसेंदिवस लक्ष्मीचे स्मृतिभ्रंशाचे प्रकरण वाढतच जात होते.मधूनच ती अकस्मात भूतकाळात जात असे.तिला वर्तमानाचा पूर्णपणे विसर पडे.ती सोळा, पंचवीस,पंचेचाळीस, पन्नास, वर्षांची होत असे.
अशावेळी ती कधी समुद्रावर जाई .कधी डोंगरावर जात असे. तर कधी तिच्या माहेरी पोहोचत असे.अशावेळी तिला तिच्या वयाचे भान राहत नसे.साठ वर्षांची एखादी म्हातारी जर एखाद्या पंधरा वीस वर्षांच्या मुलीप्रमाणे डोंगर चढू लागली तर तिचे काय होणार ?ती धडपडणार ,दमणार, पडणार, लक्ष्मीचेही बरोबर तसेच होत असे .तिच्यावर चोवीस तास लक्ष ठेवावे लागत असे.ती केव्हां उठेल आणि कुठे चालू लागेल आणि काय करील त्याचा भरवसा नसे.
ती अशी जाई त्या वेळी तिला तिच्या वयाचे, तिच्या प्रकृतीचे,तिच्या ताकदीचे,भान नसे.ती स्वतःला त्या त्या वयाची समजून त्याप्रमाणे वर्तन करीत असे.
आणि तो दिवस उजाडला.थंडीचे दिवस होते.सकाळचे सात वाजले होते.नजर चुकवून लक्ष्मी घराबाहेर पडली.तिला बाळगण्यासाठी जी मुलगी ठेवली होती ती घरकामात स्वयंपाकात मग्न होती.सकाळचा नाश्ता बनवण्यासाठी ती स्वयंपाकघरात होती. माडावरील नारळ काढण्यासाठी गडी आले होते. अनंता गड्यांबरोबर आगरात गेला होता.
लक्ष्मी आज सोळा वर्षांची घारू झाली होती.मासे पागण्यासाठी वर्तुळाकृती जाळे घेऊन ती नदीच्या,समुद्राच्या भरती ओहोटीमुळे नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या,त्या नैसर्गिक तलावाकडे गेली.ती तलावात उतरली.तिने मासे पकडायला सुरूवात केली.ती नकळत खोल खोल पाण्यात जात होती.कमरभर पाण्यातच तिच्या पायात वांब,पेटके, आले.तिला चक्कर आली.ती पाण्यात पडली.नंतर बुडाली.तिला आता वाचवायला अनंता तिथे नव्हता.असता तरी वयोमानानुसार हालचाल करून त्याला तिला कितपत वाचविता आले असते त्याची शंकाच आहे.कदाचित तोही मृत्यूमुखी पडला असता. थोड्याच वेळात तिचे प्रेत पाण्यावर तरंगू लागले.
तिची देखभाल करण्यासाठी ठेवलेली मुलगी राधा, आजी कुठे दिसत नाही याबाबत सतर्क झाली.घरात भिरभिर फिरली.ती आजीला शोधत होती. घराभोवती तिने चक्कर मारली.आजी कुठेही दिसत नव्हती.तशीच धावत धावत ती आगरात गेली.धावत धावत आलेल्या राधाला अनंताने काय झाले? म्हणून विचारले.घाबरत घाबरत, चाचरत चाचरत, आजी कुठे दिसत नसल्याबद्दलची बातमी तिने आजोबांना सांगितली.
एकच हलकल्लोळ उडाला.गडी माडावरून खाली उतरले.नातेवाईकांकडे, गावातील ओळखीच्या लोकांकडे, भराभर फोन करण्यात आले.लक्ष्मी नाहीशी झाल्याची बातमी वार्याप्रमाणे गावात पसरली .सर्वत्र तिची शोधाशोध सुरू झाली.घराजवळील विहिरीतही पाहण्यात आले.शेवटी कुणाला तरी ती तलावात सापडली.बातमी कळल्याबरोबर अनंता बेशुद्ध झाला.
मुंबई पुण्याला फोन झाले.मुलगा व मुलगी तातडीने गावात आले. लक्ष्मीचे दिवसवार व्यवस्थित पार पडले.अनंता मी इथेच राहतो,राधा माझ्या सोबतीला आहे, वाटले तर अजून एक गडी ठेवतो, असे म्हणत होता.त्याचे कुणीही कांहीही ऐकले नाही.त्याला मुंबईला जबरदस्तीने नेण्यात आले.तेथे त्याला अजिबात करमत नव्हते.घरी जाणार घरी जाणार,असा त्याने सारखा ध्यास घेतला.जिथे मी व घारू राहिलो तिथे मी जाणार, माझी हाडे तिथेच स्मशानात पडली पाहिजेत, असे तो सारखा म्हणत असे. लक्ष्मीच्या मृत्यूनंतर दोन तीन वर्षांत झपाट्याने त्याची प्रकृती खालावली होती.शेवटी मुलांनी त्याच्या हट्टासाठी त्याला घरी पाठविला.त्याच्या जेवणाखाण्याची सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे होईल अशी व्यवस्था केली.
अशीच आणखी दोन तीन वर्षे गेली.
अनंता आता सत्तर वर्षांचा झाला होता.
लक्ष्मीच्या मृत्यूने त्याला आणखी पाच वर्षे वृध्द केले होते.
एके दिवशी तो सहज फिरत फिरत काठी टेकत टेकत समुद्रावर गेला.त्याच्याबरोबर त्याचा गडी होता.अनंतावर नजर ठेवण्यासाठी,त्याला मदतनीस म्हणून,दोन गड्यांची नेमणूक केलेली होती. आलटून पालटून त्यातील एक गडी त्याच्याबरोबर असे.
हळूहळू अनंता त्या तलावाच्या काठी पोचला.
तो एकटक नजरेनं तलावाकडे पहात होता.
*तिथे त्याला सोळा वर्षांची पाण्यात बुडत असलेली लक्ष्मी दिसत होती.*
*तिला वाचविण्यासाठी त्याने धाव घेतली.*
*तो तिथेच कोलमडला.*
*त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.*
*लक्ष्मीच्या भेटीला अनंता अनंतात विलीन झाला होता.*
(समाप्त)
१५/१२/२०२०©प्रभाकर पटवर्धन