Get it on Google Play
Download on the App Store

३ स्मृतिभ्रंश १-२

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

सकाळ झाली होती. नेहमीप्रमाणे अनंता उठला.उठल्या उठल्या थाळीमध्ये(थाळ:पाणी तापवण्यासाठी मोठी चूल)विस्तव तयार करून पाणी तापत टाकण्याचा त्याचा रोजचा परिपाठ होता.मशेरी लावून त्याने नेहमीप्रमाणे तोंड धुतले.त्याची पत्नी लक्ष्मी स्वयंपाकघरात चहा करीत होती.तो स्वयंपाकघरात येऊन पाटावर चहासाठी बसला .नेहमीप्रमाणे पत्नी चहाचा कप पुढ्यात आणून ठेवील अशी त्याची कल्पना होती.परंतु स्वयंपाकघरात सर्वत्र सामसूम दिसत होती.त्याची पत्नी लक्ष्मी एकामागून एक डबे उघडून पाहत होती.तू काय शोधतेस असे विचारता,ती चहाची पूड असे म्हणाली.नेहमीचा चहाचा   डबा तिला सापडत नव्हता.साखरेचा डबा तिला सापडत नव्हता.दोन्ही डबे तिच्या पुढ्यात मांडणीवर(शेल्फ ) होते.ते दोन डबे सोडून ती सगळे डबे एकामागून एक वेड्यासारखे उघडून बघत होती.   

शेवटी अनंताने उठून तिला चहा व साखरेचा डबा काढून तिच्या हातात दिला.रात्री तुझी झोप नीट झाली नाही का? असेही त्यांनी विचारले.झोप छान झाली परंतु आज मला डबे सापडत नाहीत, असे ती म्हणाली.आज तिच्या डोक्यात कांहीतरी गडबड उडाली होती.नेहमींच्या सरावाच्या वस्तू तिला सापडत नव्हत्या.तिने साखर टाकून दुधाचे दोन कप तयार केले.तिने संजय व मंगला म्हणून हांका मारल्या.तुम्हाला शाळेत जायचे नाही का? असेही विचारले.

तिचा हा गोंधळ पाहून अनंताचा जीव कासावीस झाला.लक्ष्मीचे वय साठ वर्षे होते.तर अनंताने पासष्टी गाठली होती.मंगलाचे लग्न होऊन दहा वर्षे लोटली होती.तिला दोन मुले होती.संजय उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीवर मुंबई येथे होता.या सर्व गोष्टी लक्ष्मी विसरून गेली होती.तिला आपली मुले अजून लहानच आहेत, शाळेत जात आहेत, असे वाटत होते.मुलांच्या लहानपणी जसे ती दुधाचे कप तयार करून त्यांना शाळेत जाण्यापूर्वी देत असे त्याप्रमाणे तिने दुधाचे कप तयार करून त्यांना हांक मारली होती.

स्वयंपाक करतानाही तिची गडबड उडत होती. पुढील कांही दिवस ती कालाच्या झोक्यावर बसून झोके घेत होती .कधी तिला आपले लग्न नुकतेच झाले असे वाटत होते .तर कधी ती तिच्या आतांच्या वयात येवून काम करत होती.तिच्या मनात मेंदूत काहीतरी प्रचंड उलथापालथ झाली होती.हे सर्व पाहून अनंता घाबरून गेला होता.फोन करुन  त्याने आपल्या मुलाना संजयला व मंगलाला बोलवून घेतले.

आईची स्थिती पाहून दोघेही चिंताक्रांत झाली होती.घराला कुलूप लावून तो दोघांनाही घेऊन मुंबईला आला.मंगला पुण्याला परत आली. मुंबईला डॉक्टरांना दाखवून आईच्या सर्व तपासण्या झाल्या.डॉक्टरांनी शेवटी संजय व अनंता यांना आपल्या केबिनमध्ये बोलावले.लक्ष्मीची प्राकृतिक (फिजिकल) तब्येत ठणठणीत आहे, असा दिलासा दिला.फक्त तिच्या मेंदूत गडबड उडाली आहे.हा स्मृतिभ्रंशाचा प्रकार आहे.वाढत्या वयामध्ये कांहीजणांना हा विकार होतो.यामध्ये मनुष्य कांही वेळा स्वत:ला संपूर्णपणे विसरतो.त्याला त्याचे नांव, घराचा पत्ता, कुटुंबीय मंडळी,कांहीही आठवत नाही.यावर अजून वैद्यकशास्त्रामध्ये तसा इलाज नाही.पेशंटला एकटे न सोडणे हाच त्यावर उपाय.पेशंट तरीही कुठे निघून जाईल हे सांगता येत नाही.एखाद्यावर चोवीस तास लक्ष ठेवणे कठीण आहे.पत्ता लिहिलेले लॉकेट गळ्यात ठेवणे उत्तम उपाय होय. त्या कुठे निघून गेल्या, हरवल्या, तर त्यांना पाहिल्यावर ,त्यांची परिस्थिती लक्षात आल्यावर,कुणीतरी त्यांना पोलिसांत घेऊन गेल्यावर,त्यांना घरी व्यवस्थित पोचवता येईल.ज्याला ती सापडेल तोही तिला व्यवस्थित घरी आणून सोडू शकेल.डॉक्टर्सनी सांगितलेली सर्व हकिगत ऐकून संजय व अनंता चिंताक्रांत झाले.   

तुम्ही आता येथेच राहा.गावात जाऊ नका असे संजयने आईवडिलांना सांगितले.येथे सर्व प्रकारची काळजी घेता येईल.असेही पुन्हा पुन्हा समजावून सांगितले.मंगलने तुम्ही पुण्याला माझ्याकडे येऊन राहा.पुण्याची हवा चांगली आहे. असेही सांगून बघितले. परंतु अनंताला शहरात लहान जागेत कोंडल्यासारखे वाटत होते.करमत नव्हते.घरी जाण्याचा त्याने ध्यास घेतला.महिन्याभरात त्याने परत घरी जाण्याचे ठरविले. त्यांची तळमळ बघून संजयनेही फार ताणून धरले नाही.  दोघेही घरी परत आली.संजय त्यांना सोडण्यासाठी आला होता.काळजी घ्या केव्हाही मला बोलवा असे सांगून तो परत मुंबईला निघून गेला.

अनंता व लक्ष्मी यांचा संसार पुन्हा सुरू झाला .अनंताने  लक्ष्मीची देखभाल करण्यासाठी घरात कायमची एक मुलगी ठेवली.ती लक्ष्मीला स्वयंपाक करण्यात मदत करीत असे. स्वत:ही स्वयंपाक करीत असे.लक्ष्मीची देखभाल चांगली ठेवत असे. 

लक्ष्मी आता पूर्वींची लक्ष्मी "घारू" राहिली नव्हती. ती सर्व भूतकाळ विसरून गेली होती.ती फक्त वर्तमानात जगत होती.ती तिच्या नवऱ्याला अनंतालाही ओळखत नसे.अधूनमधून कधी कधी ती भूतकाळात तात्पुरती डोकावत असे. तेवढ्यापुरती ती कधी सोळा वर्षांची घारू, कधी बावीस वर्षांची लक्ष्मी,कधी या घरातील सून ,तर कधी या घरातील सासू, मनात येईल त्याप्रमाणे पस्तीस चाळीस पन्नास वर्षांची, होत असे.त्या त्या वयानुसार तिचे वर्तन असे.  

अनंता दिवसेंदिवस थकत जात होता.लक्ष्मीच्या या कधी न पाहिलेल्या, न ऐकलेल्या, आजारामुळे तो खचून गेला होता.लक्ष्मी जिवंत असूनही नसल्यासारखी होती.पत्नी नेहमीच त्याच्या पतीच्या सुखदु:खात सामील होत असते.येथे त्याची पत्नी लक्ष्मी संपूर्णपणे हरवलेली होती.ती असून नसल्यासारखी होती. त्याला तिची जपणूक, तिची काळजी घेणे, याशिवाय दुसरा काहीही उद्योग राहिला नव्हता.तो सतत ताणाखाली असे. लक्ष्मीच्या काळजीमुळे, ताणामुळे त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, रेषा ठळकपणे दिसू लागल्या होत्या.लक्ष्मीला व्यवस्थित सांभाळणे एवढी एकच गोष्ट त्याच्या आयुष्यात राहिली होती.

निवांत बसलेला, पडलेला, झोपलेला, असताना त्याला पूर्वीचे दिवस आठवत असत.त्या काळात तो हरवून जात असे.त्याला घारू प्रथम भेटली तो दिवस, ती वेळ,आठवत असे.  

त्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्याला डाव्या डोंगराच्या बाजूने एक नदी समुद्राला मिळत होती.फक्त पावसाळ्यात, तेही पाऊस पडत असेल तेव्हा, त्या नदीला पाणी असे.एरवी नदीत दिसणारे पाणी खारे होते.समुद्राच्या बाजूला त्या नदीवर वाळूचा एक मोठा नैसर्गिक बांध निर्माण झाला होता.त्याची उंची कमी जास्त होत असे.तो बांध संपूर्णपणे तुटला, वाहून गेला, असे कधीही होत नव्हते. त्यामुळे नेहमीचे भरतीचे पाणी नदीच्या मुखातून आंत शिरत नसे.फक्त अमावस्या व पौर्णिमा याच्या आगेमागे तीन तीन दिवस समुद्राच्या भरतीचे पाणी त्या नदीत जात असे.ओहोटीच्या वेळी आत शिरलेले सर्व पाणी परत जाऊ शकत नसे.त्यामुळे खारे पाणी एखाद्या तलावासारखे तेथे साठून राही.या तलावाची खोली वेळोवेळी बदलत असे.या तलावाची लांबी रूंदीही भरपूर होती.कांही ठिकाणी तर पांच ते सात फुटांपर्यंत पाण्याची खोली राहत असे.भरतीच्या पाण्याबरोबर मासेही तेथे येत असत.ओहोटीच्या वेळी त्यातील बरेच परत जाऊ शकत नसत.लहान मुलांना, तरूणांनाही, तिथे मच्छीमारीची सोय होत असे.तलावाची लांबी रुंदी मोठी त्यामुळे मच्छीमारी होऊनही कांही मासे पुन्हा अमावस्या पौर्णिमेला पाणी भरे तोपर्यंत पकडले न जाता   जिवंत राहू शकत असत.

तर या तलावात लक्ष्मी व तिच्या कांही मैत्रिणी जाळी घेऊन   मासेमारीसाठी आल्या होत्या.गावांत लक्ष्मीला, लक्ष्मी या नावाने सहसा कुणी हाक मारीत नसे.तिचे डोळे घारे होते.त्यामुळे ए घारी,ए घारू,ए घार्‍ये, अशा नावाने तिला हांक मारीत असत.घारू मासेमारीसाठी मैत्रिणींबरोबर या नैसर्गिक तलावावर आली होती.ओहोटीची वेळ होती. अमावास्येचा दिवस होता.जाळे घेऊन  लक्ष्मी मासे पकडत होती.मासे पकडण्याच्या नादात ती जरा खोल पाण्यात गेली.ती गटांगळ्या खाऊ लागली.तिला पोहता येत नव्हते.तिच्या मैत्रिणीनी एकच कल्ला, आरडाओरड, केली.

तलावाच्या दुसर्‍या  बाजूला अनंताही मासे पकडत होता .

अनंताला कधीही कोणीही अनंता म्हणून हाक मारली नाही. 

सर्वजण त्याला अंत्या म्हणून हांक मारीत असत.

घारूला पोहता येत नव्हते.

अंत्या पट्टीचा पोहणारा होता.

घारू मासे पकडताना नकळत खोल पाण्यात गेली.ती बुडायला लागल्यावर तिच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केला.

*अनंता पलीकडच्या बाजूला मासे पागत होता.त्याने घारू बुडते असे पाहताच पलीकडून पाण्यात छलांग मारली.*

*कांही सेकंदातच तो घारू बुडाली तेथे आला.त्याने घारूचे केस धरून तिला पाण्याबाहेर काढली.*

*घारूच्या नाकातोंडात व पोटांत पाणी गेले होते.*

*ती अर्धवट शुद्धीत होती.ती भयंकर घाबरली होती.*

*तिने अर्धवट शुद्धीत अर्धवट बेशुद्धीत अंत्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारली.*

(क्रमशः)

१५/१२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन