साक्षीदार (प्रकरण १२)
साक्षीदार
प्रकरण १२
तिथून बाहेर पडल्यावर पाणिनी लगोलग हृषीकेश च्या घरी गेला आणि तिथे त्याच्या नोकराणीला भेटून आपली ओळख करून दिली.
“ तुम्ही कोणीही असा, मला फरक पडत नाही. साहेब इथे नाहीयेत आणि कुठे आहेत ते मला माहीत नाही.ते काल मध्यरात्री पर्यंत बाहेरच होते.ते आले आणि पुन्हा त्यांना एक फोन आला आणि ते पुन्हा बाहेर गेले. त्यानंतर पुन्हा ते घरी आलेले नाहीत,घरचा फोन मात्र सारखा वाजतोय दहा-दहा मिनिटाला.” ती म्हणाली.
“ मध्यरात्री तो परत आल्या नंतर किती वेळाने फोन आला?”पाणिनी ने विचारलं.
“ फार वेळाने नाही तसा लगेचच आला.”
“ त्याला तो फोन यायची अपेक्षा होती?”
“ ते मला कसं समजणार?, मला एवढंच माहिती आहे की ते आले ,मी दार उघडून दिले आणि परत झोपायला गेले.मग त्यांना फोन आला, तो आल्यावर ते त्यांच्या बेडरूम मधे गेले.मला वाटलं झोपायला गेले पण माझा अंदाज आहे की ते सुटकेस भरात होते,कारण ते पुन्हा बाहेर पडले आणि त्यांची ती सुटकेस सुध्दा दिसतं नाहीये घरी.”
“ ठीक आहे, आभारी आहे.” पाणिनी समाधानाने म्हणाला.आणि निघाला.तिथून निघताच त्याने सौम्या ला फोन लावला.
“ पाणिनी पटवर्धन आहेत का?” त्याने विचारलं
“ ते नाहीयेत. कोण बोलतंय?”-सौम्या
“ मी गंधार. गंधार जयकर. मला तातडीने भेटायचयं.” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही सांगता येणार ते कुठे आहेत अत्ता पण येतीलच एवढ्यात, कारण बरेच जण त्यांना भेटायला इच्छुक आहेत, त्यात कनक ओजस यांनी त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे.” सौम्या सूचक पणे बोलली.
“ ठीक आहे ठीक आहे.” पाणिनी उद्गारला ,सहजपणे. “ मी पुन्हा फोन करीन.”
“ पटवर्धन ना काही निरोप द्यायचाय का?” सौम्या ने विचारलं.
“ नाही, फक्त मी फोन करीन पुन्हा एवढंच सांग.” पाणिनी म्हणाला
पाठोपाठ पाणिनी ने कनक ओजस ला फोन लावला. “ तिकडून कोणी ऐकत असेल तर बोलू नको. मला भेटायला बरेच लोक मागे लागलेत पण अत्ता मला कोणाशीच बोलायचं नाहीये.” पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी, इकडून काही प्रॉब्लेम नाहीये मला बोलायला. तुला एक सांगायचं , त्या पंची बद्दल.”
“ कोण?”
“ मधुदीप माथूर . या माणसाला मध्यरात्री नंतर एक फोन आला.त्याने त्याच्या बायकोला सांगितलं की त्याला महत्वाच्या कामाला म्हणून बाहेर गावी जायला लागणार आहे.तो घाबरलेला दिसला. त्याने पटापट सुटकेस भरली.रात्री पाऊण च्या सुमारास एक गाडी आली आणि त्याला घेऊन गेली.जाताना त्याने बायकोला एवढंच सांगितलं की तो तिला फोन वरून उद्या कळवेल. आज सकाळी तिला निरोप आला की ‘मी ठीक आहे काळजी नको करू.’ तिला एवढंच माहित्ये पाणिनी. ”
“ फाईन !” पाणिनी म्हणाला.
“ या सर्वाचा अर्थ तुला कळतोय ना पाणिनी?”-कनक
“ मला समजायला लागलंय बरोबर सगळं.” पाणिनी म्हणाला. “ त्या लोकवाला बद्दल काही कळलं का?” पाणिनी ने विचारलं.
“ तुला उपयोग होईल अशी माहिती नाही मिळाली पण अजून काम चालू आहे आमचं त्यावर. बाय द वे पाणिनी,तुला त्या लोकवाला ची पोरगी माहित्ये ना, त्याच्या बरोबर हॉटेलात राहिलेली?”
“ तिचं काय कनक ?” पाणिनी ने विचारलं.
“ ती चेन्नई ची आहे ! ”कनक ने गौप्य स्फोट केला. पाणिनी ने आनंदाने शीळ वाजवली.
“ हे काहीच नाही, पुढे ऐक , दर पंधरा दिवसांनी तिला लोकवाला कडून चेक मिळतो!” कनक ओजस म्हणाला.
“ माय गॉड !” पाणिनी म्हणाला.
“ हे काहीच नाही, अजून पुढे ऐक, हा चेक लोकवाला च्या वैयक्तिक खात्यातून नाही पास होत, मिर्च मसाला च्या एका बँकेतल्या खात्यातून जातो ! ” ओजस ने आणखी एक बॉम्ब टाकला.
“तुला चेन्नई मधील तिचा ठाव ठिकाण शोधता येईल का? तिने कदाचित स्वतः चे नाव बदललेले नसावे.” पाणिनी म्हणाला.
“ मी त्याच आधारावर तिची माहिती काढतोय.मी माझी काही माणसं कामाला लावलेत.त्यांच्या कडून माहिती आली की ताबडतोब तुला देतो.”
“ लोकवाला ची काल रात्रीची माहिती मिळेल?” पाणिनी ने विचारलं.
“ प्रत्येक क्षणाची मिळू शकेल.त्यावर पाळत ठेवायला माझे लोकवाला आहेत.तुला सविस्तर अहवाल हवाय?” –कनक
“ हवाय, प्रेयसी हॉटेल मधे गंधार जयकर या नावाने पाकीट ठेवून दे.” पाणिनी म्हणाला.
“ करतो.माझ्या संपर्कात रहा पाणिनी, कदाचित ते आवश्यक असेल.”—कनक ओजस
“ ओके डन,” पाणिनी म्हणाला आणि फोन ठेवला. आपली इतरही कामे आटपून सुमारे तासाभराने तो प्रेयसी हॉटेल मधे पोचला. रिसेप्शनिस्ट कडे जाऊन त्याने आपल्या साठी म्हणजे गंधार जयकर नावाने काही पाकीट आलंय का याची चौकशी केली,पण तसं काही आलं नसल्याचं रिसेप्शनिस्ट ने सांगितलं.तो तसाच वर आपल्या खोलीत गेला. दार उघड होतं आणि आत ईशा अरोरा बसली होती, तिच्या बरोबर एक धिप्पाड माणूस बसला होता. तो बराच अस्वस्थ दिसतं होता.
“ बर झालं तुम्ही आलात.तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता ना ? म्हणून पुरावाच आणलंय मी इथे.”—ईशा
“ कशाचा पुरावा?” पाणिनी ने ईशा कडे आणि त्या जाड माणसाकडे पाहून विचारलं.
त्या माणसाने त्रासिक डोळ्याने पाणिनी कडे पाहिले.
“ मृत्यू पत्र खोटे असल्याचा , फोर्ज्ड असल्याचा पुरावा.यांचं नाव दुग्गल आहे. माझा नवरा दधिची अरोरा चे व्यवहार ज्या बँकेत होते त्या बँकेत हा कॅशियर आहे.हल्ली रिलेशनशिप मॅनेजर असतात तसं दधिची चे बहुतांशी व्यवहार हाच पहायचा. दधिची चं हस्ताक्षर याच्या चांगलं परिचित आहे.याचं म्हणणं आहे की हे मृत्युपत्र त्याच्या अक्षरातलं नाहीये.”-ईशा
“ तुम्ही पाणिनी पटवर्धन? अॅडव्होकेट ?” त्याने विचारलं. “ बर वाटलं भेटून ” तो म्हणाला पण पाणिनी शी हस्तांदोलन करायला त्याने हात पुढे नाही केले.
पाणिनी ने त्याच्या भिरभिरत्या डोळ्यात रोखून पाहिले.
“ मी कोण आहे ते सोडून द्या मिस्टर.” तो म्हणाला. “ या ईशा चा तुमच्यावर काहीतरी वचक दिसतोय.अन्यथा एवढया सकाळी तुम्ही इथे आला नसतात ,आणि तिने पढवलेले बोलला नसतात. मी सांगतो ते ऐका नीट, तुम्हाला ईशा ला खरंच मदत करायची असेल तर केवळ सत्य सांगूनच ती होईल.” - पाणिनी म्हणाला.
बँकर चा चेहेरा बदलला.त्या वरचा रंग फिक्कट झाला.
“ तुम्ही म्हणताय ते मृत्यू पत्र बद्दल?”
“ अर्थात.” पाणिनी म्हणाला.
“ ते मृत्यू पत्र मी अभ्यासलंय पटवर्धन.” दुग्गल म्हणाला. “ अगदी काळजी पूर्वक अभ्यासलंय, ती फोर्जरीच आहे. पण ती करणाऱ्याला अस्खलितपणे करता आलेली नाही.तुम्ही नीट पाहिलंत तर लक्षात येईल की अक्षराची शैली एक –दोन ठिकाणी बदलली गेल्ये.यावरून लक्षात येतंय की ज्या कोणी हे केलंय,त्याने ते घाई घाईत उरकल्या सारखं केलंय.”
“ मला बघू जरा हे मृत्युपत्र ” पाणिनी म्हणाला आणि त्याने ते हातात घेतलेआणि वाचायला लागला. “ माय गॉड ! ” पाणिनी उद्गारला. “ तुम्ही म्हणताय ते खरं आहे.”
“ प्रश्नचं नाही.” दुग्गल म्हणाला
“ साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन सांगायला तयार आहेस ना?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही नाही.अजिबात नाही. म्हणजे तशी गरज नाही. हा दस्त पुरेसा बोलका आहे.”
“ ठीक आहे, मला जे हवं आहे ते समजलं.” पाणिनी त्याला निरोप द्यायच्या दृष्टीने म्हणाला. दुग्गल ते ओळखून बाहेर पडला.
“ तू त्याला कसं बोलावलंस?” पाणिनी ने तिला विचारलं.
“ फोन केला मी चाणूर ला.”
“ तू त्याला त्याच्या नावाने हाक मारतेस ? तुमचे संबंध खूप चांगले दिसताहेत.” पाणिनी म्हणाला.
“ माझा आणि दधिची चा दोघांचाही तो मित्र आहे.”
पाणिनी फक्त हुंकारला. त्याने सौम्या ला फोन लावला. “ मिस्टर पटवर्धन आलेत का? मी गंधार जयकर ” पाणिनी ने विचारलं.
“ नाही आले अजून पटवर्धन. ते एका खुनाच्या खटल्यात गुंतलेत.आणि त्यामुळे खूप गडबडीत आहेत.त्यांना भेटायला बरेच पत्रकार सुध्दा जमलेत इथे.आणखी एक कोणीतरी आहे तो म्हणतोय पटवर्धन येई पर्यंत जाणारच नाही म्हणून.पोलीस असावा.तुमची भेट नाही होवू शकणार त्यामुळे मिस्टर गंधार जयकर.” सौम्या म्हणाली.
“ अरे ,अरे, फारच वाईट.मला पटवर्धन कडून काही पत्र तयार करून घ्यायची होती.आता कसं जमणार प्रश्नाचं आहे.” पाणिनी म्हणाला. “ तुम्ही सांगू शकाल का मला की मला ते पत्र शॉर्ट हँड मधे कोण करून देईल ते?”
“ मला वाटत मी काहीतरी मार्ग काढते.” सौम्या म्हणाली.
“ अरे वा ! मला आश्चर्याच वाटेल तुम्ही तुमच्या आसपास च्या लोकांना वाट्याला लावून माझं काम करून दिलंत तर ! ” पाणिनी सूचक पणे म्हणाला.
“ ते माझ्यावर सोडा तुम्ही.”—सौम्या
“ मी हॉटेल प्रेयसी मधे आहे.” पाणिनी म्हणाला.आणि फोन बंद केला
“दधिची च्या सगळ्या इस्टेटीवर तुला प्रशासक नेमावे अशी विनंती करणारा अर्ज कोर्टात सदर करणार आहे. विशेषतः मिर्च मसाला वर.” पाणिनी ईशा ला म्हणाला.
“ ओह! छानच.”
“ मी माझ्या सेक्रेटरी कडून अर्ज तयार करून घेणार आहे अत्ता.दरम्यान तू हे मृत्युपत्र घेऊन जा घरी आणि जिथून काढलंस तिथेच ठेव.पण कदाचित तिथे एखादा पोलीस ठेवला असेल त्यांनी.तो असला तर मृत्युपत्र घरातच दुसरी कडे ठेव.” पाणिनी म्हणाला.
“ मी ते सुध्दा करू शकते.म्हणजे ज्या तिजोरीतून काढले तिथे पुन्हा ठेऊ शकते.”
“ फार मोठा धोका स्वीकारत्येस तू, पोलीस असेल तर.” पाणिनी म्हणाला.
“ मी हा धोका स्वीकारायला तयार आहे.” ती म्हणाली. “ एकंदरित आयुष्यात तुम्ही धोका स्वीकारत नाही असं दिसतयं.”
“धोका स्वीकारत नाही !! तुझी केस घेतली तेव्हाच मी आयुष्यातला मोठा धोका विकत घेतलाय.तू म्हणजे जीवंत बॉम्ब आहेस. ” पाणिनी म्हणाला.
इंटरकॉम वाजला.पाणिनी ने फोन उचलला.रिसेप्शन मधून सांगण्यात आलं की त्याच्या नावाने एक पाकीट घेऊन कुरियर वाला आलाय.पाणिनी ने त्याला त्याच्या रूम वर पाठवायला त्याला सांगितलं.कुरियर वाला वर आला आणि त्याने एक पाकीट त्याला दिलं. कनक ओजस ने पाठवलेला सविस्तर रिपोर्ट होता तो.
“ काय आहे हे?” ईशा ने विचारलं.
पाणिनी ने नकारार्थी मान हलवली.त्याने पाकिटातून रिपोर्ट काढून वाचायला सुरुवात केली.तो लोकवाला च्या हालचालीचा इत्यंभूत अहवाल होता. त्याचा मतितार्थ एवढंच होता की रात्री दीड पर्यंत तो हॉटेलातच होता.
“ सांगा ना काय आहे हे?” ईशा चा संयम संपत आला होता.
“ माझ्या अशिला संबंधी आहे. तुझ्या शिवाय माझे इतरही अशील आहेत. त्या प्रत्येकाबद्दल तुला माहिती देत बसू की काय मी?” पाणिनी ने विचारलं.
“ भयानक वागताय तुम्ही.”-ईशा
पाणिनी काहीतरी बोलायला गेला तेवढ्यात दार वाजलं. पाणिनी ने दार उघडलं.सौम्या आत आली आणि ईशा ला पलंगावर पाहून एकदम दचकली.
“ असू दे सौम्या. आपल्याला काही कामे जलद उरकायला हवीत.” पाणिनी म्हणाला.आणि नंतर जवळ जवळ पाऊण तास तो सौम्या ला डिक्टेशन देत होता. “आता ऑफिसात जाऊन हे सर्व टाइप कर.” पाणिनी म्हणाला.
“ हो सर.त्या पूर्वी मला तुमच्याशी एकट्याशी बोलायचंय ” काम झाल्यावर सौम्या म्हणाली.
“ काळजी करू नको सौम्या, ईशा निघालीच आहे.” पाणिनी म्हणाला.
“ मी अजिबात जाणार नाहीये.” ईशा म्हणाली.
“ यस्! तू जाणारच आहेस. मी सौम्या ला डिक्टेशन देत असतांना काही माहिती तुझ्याकडून लागणार होती म्हणून तुला थांबवून घेतलं होत मी. आता तू घरी जा आणि ते मृत्युपत्र जागेवर नेऊन ठेवणार आहेस.त्या नंतर दुपारी तू माझ्या ऑफिस ला येऊन मी केलेल्या सगळ्या पेपर वर तुला सह्या करायच्या आहेत.”
ती मधेच काहीतरी बोलणार होती पण पाणिनी ने आपलं बोलणं चालूच ठेवलं,
“ हे सर्व झाल्यावर तुझ्या भोवती पत्रकारांचा गराडा पडेल, त्यांना सनसनाटी बातमी हवीच असते.ते तुला प्रश्न विचारतील,भंडावून सोडतील.तू त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरं द्यायची टाळून तुझ्या आकर्षक व्यक्तीमत्वाचा फायदा घ्यायचा आहेस, तुझ्यावर केवढा मोठा प्रसंग ओढवलाय आणि तू कशी खचून गेली आहेस हे तुला त्यांच्या मनात बिंबवावे लागेल.त्यासाठी तू मला ज्या प्रमाणे सतत रडून दाखवतेस आणि डोळ्यातून अश्रू आल्याचा अभिनय करतेस तसाच तुला त्यांच्या समोर करावं लागेल.पण माझ्या समोर तुझा अभिनय उघडा पडतो ,इथे मात्र तुला जरा बरा अभिनय जमवावा लागेल.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही अत्यंत निर्दयी आणि क्रूर आहात.” दारातून बाहेर पडताना ईशा म्हणाली.
“ मी परिणाम कारक आहे असं म्हण हवं तर.” पाणिनी ने तिला ऐकवलं.
ईशा बाहेर गेल्यावर सौम्या ने आपली पर्स मधून एक पाकीट काढून पाणिनी च्या हातात दिले.
“ काय आहे हे?” पाणिनी ने विचारलं.
“ पैसे !” –सौम्या.
“ कोणी आणून दिल ? ”
“ शिपाया तर्फे हृषीकेश बक्षी ने पाठवलं.” –सौम्या
पाणिनी ने ते उघडलं. आत मधे सही केलेले पण रक्कम न टाकलेले बेअरर चेक होते.पेई चे नाव पण लिहिलेले नव्हते. आत एक चिट्ठी होती.पाणिनी ने बाहेर काढून वाचली.
मला वाटतंय , मला काही दिवस या सर्वातून दूरच ठेवावं.त्यासाठी जे करायला लागेल ते करा.मला दूरच ठेवा.
चिट्ठी खाली हृ.ब. एवढीच अक्षर लिहिली होती.
ते सर्व चेक्स पाणिनी ने सौम्या च्या ताब्यात दिले. “बँकेत वटवताना काळजी घे” पाणिनी ने सूचना दिली.
“ मला सांगा सर, तिने तुम्हाला कशात गोवलय?” सौम्या ने विचारलं
“ मला तिने कशातच गोवले नाही सौम्या. असेलच तर भल्या मोठया फी मधे गोवलय”
“ म्हणजे ?”
“ म्हणजे तिच्या कडून आपण फी च्या रुपात खूप मोठी किंमत वसूल करणार आहोत.” पाणिनी म्हणाला.
“ सर,मी पत्रकारांना एकमेकात बोलताना ऐकलंय की पोलिसांना बोलावण्यापूर्वी तुम्हाला घरून बोलावून घेऊन , खुनाचा आळ तुमच्यावर यावा असा डाव तिने टाकलाय.दधिची शी शेवटच्या क्षणी बोलत असलेला माणूस म्हणजे तुम्ही होतात, तुमचा आवाज तिने ओळखलाय असं ती पोलिसांना सांगणार आहे.”-सौम्या
“ तो अंदाज मला आहेच.केव्हातरी ती ते करेलच.विशेषतः पोलीस तिच्यावर आरोप करतील तेव्हा.” पाणिनी म्हणाला.
“ तरी तुम्ही तिची वकीली करणार आहात?”- सौम्या
“ वकीली पेशात एक नैतिकता पाळायची असते सौम्या, एकदा अशील म्हणून एखाद्याला स्वीकारलं की वकिलाने मागे हटायचं नसतं.”
“ पण याचा अर्थ असा तर नाही ना की आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी आपल्या वकिलाचा बळी द्यावा.” सौम्या फणकारत म्हणाली.
“ तू आपल्या ऑफिसात बसणाऱ्या पत्रकारांना चकवून कशी काय येवू शकलीस?” पाणिनी ने विचारलं.
“ घरी जाते असं सांगून बाहेर पडले. वाटेत एका मॉल मधे शिरले.लेडीज रूम मधे शिरले आणि दुसऱ्या दाराने बाहेर पडून टॅक्सी केली.वाटेत एका वेगळ्याच ठिकाणी उतरून वेगळी टॅक्सी केली आणि इथे आले.”-सौम्या.
“ क्या बात है! दिवसेंदिवस हुशार व्हायला लागल्येस.” पाणिनी म्हणाला. “ सौम्या मी डिक्टेट केलेली सगळी कागदपत्र तयार ठेव.ईशा ऑफिसात आली की सह्या घे.सगळं एकदा तपासून घे. मला तुझ्या कडून ती पटकन काहीतरी क्लुप्ती करून ताब्यात घ्यायला लागतील. मी काही फार काळ लपून राहू शकणार नाही या पद्धतीने.”
सौम्या ने आत्मविश्वासाने होकार दिला. आणि बाहेर पडली.
पाणिनी ने एक मस्त सिगारेट शिलगावली आणि थोडया वेळाने तो ही बाहेर पडला.
( प्रकरण १२ समाप्त)