साक्षीदार (प्रकरण ४)
साक्षीदार
प्रकरण ४
पाणिनी पटवर्धन पोलीस मुख्यालयातल्या गुप्तहेर विभागात आला.
“इथे प्रेरक पांडे आहे ?”- त्याने विचारलं
त्यांने ज्या माणसाला हे विचारलं, त्याने प्रेरक पांडेला हाक मारली. “तुझ्याकडे आलंय कोणीतरी ”- तो म्हणाला.
दार उघडलं गेलं आणि प्रेरक पांडे बाहेर आला. त्याने पाणिनी पटवर्धन कडे बघितलं आणि हसला. तो उंच आणि सडपातळ देहयष्टीची असलेला माणूस होता. पाणिनी पटवर्धन ने त्याच्याकडे बघून हात केला.
“ प्रेरक मला वाटते तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे.” पाणिनी त्याला म्हणाला
“ छान. येतो मी तुझ्या बरोबर बाहेर.” तो म्हणाला
ते दोघे दारातून बाहेर पडले.
“ माझ्याकडे आलेल्या एका प्रकरणात मी एका साक्षीदाराच्या मागावर आहे आता ते सगळं प्रकरण कुठपर्यंत जाणार आहे मला आत्ता सांगता येणार नाही पण मला एका लँड लाईन टेलीफोन नंबर बद्दल चौकशी करायची आहे.” पाणिनी पटवर्धन त्याला म्हणाला.
“काय नंबर आहे ?” प्रेरक ने त्याला विचारलं. पाणिनी ने नंबर सांगितला.
“ मला ज्या माणसाचा हा नंबर असावा असं वाटतंय, त्याचाच तो नंबर असेल तर हा माणूस अत्यंत सावध आणि चतुर असा माणूस असणार. त्यामुळे त्याला फोन करून ‘.सॉरी अरे चुकीचा नंबर लागला’ वगैरे सबबी आपण त्याला देऊ शकणार नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे हा नंबर टेलिफोन डिरेक्टरी मधे मिळणार नाही त्यामुळे तुला हा नंबर जरा आतल्या गोटातून टेलिफोन एक्स्चेंज च्या अधिकार्यांशी संपर्क करूनच मिळवायला लागेल.” पाणिनी पटवर्धन पांडेला म्हणाला
“अरे बाबा हे असं करणं म्हणजे एकदम जिकिरीचं काम आहे” पांडे म्हणाला.
“ मला वाटलं हजार रुपये साठी ते तू सहज करशील”. पाणिनी त्याला म्हणाला.
आता पांडेचे डोळे चमकले.
“अरे मग हे आधी का नाही सांगितलंस मला?” तो पाणिनी ला म्हणाला
“ चल लगेच बाहेर पडू. तुला हवी ती माहिती मी देतो. तुझी गाडी घ्यायची का माझी?” त्याने पाणिनीला विचारलं
“ मला वाटतं आपण दोघांनी आपापल्या गाड्या घेऊन जाऊ कारण मी पुन्हा तिकडे तुझ्याकडे येणार नाही तुझं काम झालं की तू तिथूनच निघून जा.”
“ ठीक आहे ” गुप्तहेर म्हणाला. आणि बाहेर पडून गाडीत बसला आणि त्या टेलिफोनच्या कार्यालयासमोर त्याने गाडी उभी केली . पाणिनी त्याच्या मागोमाग तिथे आला.
“तू माझ्या बरोबर वर येऊ नको माझ्या दृष्टीने ते चांगलं नाही म्हणजे मी पोलिस असून वैयक्तिक तुझ्यासाठी काम करतोय असा टेलिफोन कार्यालयातल्या लोकांचा समज नको व्हायला” पांडे पाणिनी ला म्हणाला
तो थोडा वेळ वर च्या मजल्यावर जाऊन आवश्यक ती माहिती घेऊन खाली आला.
“ बोल काय मिळाले तुला?” पाणिनी ने त्याला विचारलं
“दधिची अरोरा नावाच्या माणसाचा हा नंबर आहे. पत्ता आहे ५५६ गभस्ती सोसायटी , विरिंची अपार्टमेंटस आणि तुझा अंदाज बरोबर ठरला पाणिनी. तो नंबर टेलिफोन डिरेक्टरी तला नाहीये म्हणजे अनलिस्टेड नंबर होता तो. पाणिनी एक लक्षात ठेव टेलीफोन डिरेक्टरी जे नंबर नसतात त्याबद्दलची माहिती पत्ता असे सहजगत्या मिळत नसतं. मी ते माझ्या वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करून मिळवलाय यामुळे ही माहिती मी तुला दिली हे विसरून जा.” पांडे त्याला म्हणाला .
“बिलकुल काळजी करू नको.” पाणिनी पटवर्धन म्हणाला. पाणिनीने आपल्या खिशातून काही नोटा काढल्या आणि पांडेच्या खिशात टाकल्या.
“माझ्या अशीलाचे काम माझ्याकडे आणखीन काही दिवस राहणार आहे. पर्यायाने तुलाही वेळोवेळी असे पैसे मिळतील.” पाणिनी त्याला म्हणाला.
“छान मी वाट बघतोय.” पांडे त्याला म्हणाला.पाणिनी आपल्या गाडीत बसला त्याच्या चेहर्यावर हास्य होतं आपली गाडी त्याने रस्त्यावर घेतली आणि गभस्ती कडे जायला निघाला. गभस्ती ही एक अत्यंत श्रीमंत लोकांची कॉलनी होती. म्हणजे सर्व महागडी रो हाऊसेस आणि बंगले यांची ती सोसायटी होती. पाणिनीने आपली गाडी पांडेने दिलेल्या बंगल्यापासून थोडी दूर उभी केली. बंगल्याच्या पोर्चमध्ये लाईट होता. संध्याकाळ झाली असल्यामुळे त्या दिव्याभोवती बारीक पाखरे आणि किडे उडत होते. पाणिनीने दरवाज्या जवळची बेल वाजवली.. थोडा वेळ वाट पाहिली काहीच प्रतिसाद आतून आला नाही. दुसऱ्यांदा बेलचे बटन दाबायला पाणिनीने हात वर केला तेवढ्यात आतल्या नोकराने दार उघडलं. पाणिनीने आपल्या खिशातून व्हिजिटिंग कार्ड काढून त्याला दिलं.
“ मला मिस्टर अरोरा यांना भेटायचंय. मी येणार आहे हे त्यांना माहित नाहीये पण ते मला भेटतील. नक्की भेटतील.” पाणिनी पटवर्धन त्या नोकराला म्हणाला. त्या नोकराने व्हिजिटिंग कार्ड बघितलं आणि एका बाजूला उभा राहिला.
“ ठीक आहे सर. आत या.” तो त्याला म्हणाला. पाणिनी पटवर्धन आत गेला. ती एक रिसेप्शन रूम होती. नोकराने त्याला एका खुर्चीत बसायला सांगितलं आणि तो जिने जोडून वरच्या मजल्यावर गेला. पाणिनी ला वरच्या मजल्यावरून आवाज ऐकू आले थोड्यावेळाने तो नोकर जिना उतरून खाली आला.
“ सॉरी मिस्टर पटवर्धन, पण अरोरा तुम्हाला ओळखतात असं वाटत नाही. तुम्ही मला सांगाल का नक्की तुमचं काय काम आहे?”
पाणिनी ने त्या नोकराच्या डोळ्यात बघून एवढंच म्हटलं "नाही"
नोकर त्याच्याकडे तो अजून काही पुढे बोलेल या अपेक्षेने बघत राहिला पण पाणिनी पटवर्धन ने काहीच उत्तर दिलं नाही नाईलाजाने तो पुन्हा जिना चढून वर गेला या वेळेला तो जवळजवळ चार पाच मिनिट वर होता. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते एखाद्या ठोकळा सारखा चेहऱ्याने तो खाली आला.
“ वर या मिस्टर पटवर्धन. अरोरा भेटतील तुम्हाला.” तो म्हणाला.
पाणिनी जिना चढून वर गेला. वर एक मोठी खोली होती. अत्यंत अद्ययावत असं फर्निचर त्या खोलीत होतं
महागड्या खुर्च्या, टेबलं,, तावदान सगळं उच्च अभिरुची दाखवणारं होतं. आतल्या खोलीत ला एक दरवाजा खाडकन उघडला गेला आणि सुटा बुटातला एक माणूस उंबऱ्यात उभा असलेला पाणिनीचा दृष्टीस पडला.
पाणिनी ने त्या माणसाकडे आणि त्या माणसाच्या पलीकडे दिसणाऱ्या खोलीकडे ही नजर टाकली. ती एक लायब्ररीची खोली होती आणि त्याच्या शेजारीच एक बाथरूम होती तो आडदांड माणूस पुढे चालत आला.. आणि आपल्या मागचं दार त्याने बंद केलं शरीराप्रमाणे त्याचा चेहरा सुद्धा एकदम जाडजूड आणि गोबरा होता. डोळ्याखाली जाड जाड मास लोंबत होते. छाती एकदम भरदार आणि खांदे रुंद होते. त्याच्या डोळ्यात एक विशिष्ट जरब होती. अत्यंत थंड आणि कणखर असे डोळे होते. तो हळूहळू चालत पुढे आला. अंदाज केला की तो साधारण चाळीस-बेचाळीस च्या आसपास वय असलेला असावा. त्याच्याकडे बघताच क्षणी असे जाणवत होत की तो एक अत्यंत क्रूर आणि व्यवहार करण्याच्या दृष्टीने अडचणीचा ठरणारा माणूस होता. स्वतः पाणिनी पटवर्धन बर्यापैकी उंच होता पण समोरचा माणूस त्याच्यापेक्षाही तीन ते चार इंच जास्तच उंच होता.
“ मिस्टर अरोरा?” पाणिनी म्हणाला.
त्या माणसाने आपली मुंडी हलवली आणि पाणिनी पटवर्धन कडे ठाम नजरेने बघितलं
“काय हव होतं तुला?”त्याने पाणिनीला विचारलं.
“ सॉरी, मी घरी त्रास देतोय तुम्हाला, पण मला तातडीने एक विषय बोलायचं होता.” पाणिनी म्हणाला
“ तुमच्या धंद्यात मला रस नाही.”
“ तुमच्या धंद्यात आहे ना? ” पाणिनी म्हणाला.
“ ” – अरोरा
“ मिर्च मसाला ही प्रकाशन संस्था एक बातमी छापण्याची धमकी देते आहे.मला ती छापून यायला नको आहे.” पाणिनी म्हणाला
त्याचे थंड ,घारे डोळे,पाणिनी वर रोखले गेले. “”त्यासाठी तुम्ही मिर्च मसाला कडे जा.” त्याने फटकारले.
“ मला वाटतंय की तुम्ही योग्य माणूस आहात.” पाणिनी म्हणाला
“ माझा काहीही संबंध नाही. “ मला विचारलं तर मी कधीच तो पेपर वाचला नाही.” अरोरा म्हणाला. “ती एक घाणेरडी आणि ब्लॅक मेल करणारी प्रकाशन कंपनी आहे.”
“तुम्ही त्याच्या शी संबंधित आहात.” पाणिनी म्हणाला
“ मी नाहीये.”
“ आहात तुम्ही.” पाणिनी म्हणाला.
“ पुन्हा पुन्हा विचारू नका.” अरोरा म्हणाला.
“ मी विचारत नाहीये.तुम्हाला सांगतोय.” पाणिनी म्हणाला
“ काय सांगताय?”
“ मी वकील आहे आणि माझ्या अशिलाला मिर्चमसाला ब्लॅक मेल करायला निघालंय.मी हे निक्षून सांगतोय की मला मागणी करण्यात आलेली रक्कम मला मान्य नाही.एवढेच नाही तर मी या साठी एक दमडा सुद्धा मिर्चमसाला ला देणार नाहीये. ही रक्कम तुमची मिर्चमसाला ही कंपनी मला जाहिरातीच्या स्वरुपात मागते आहे.मी असलं काहीही तुम्हाला देणार नाही. नीट ऐका .” पाणिनी म्हणाला
“ मला आता तुझी नियत बरोब्बर कळली पटवर्धन ! आपल्या अशिलाला नुकसान भरपाई मिळवून देणारे फालतू वकील असतात ना त्या लायकीचा तू वकील आहेस ”अरोरा एकेरीवर येत म्हणाला. “ मी सुरवातीलाच तुला नोकरा करवी धक्का मारून हाकलून द्यायला हवं होतं. एक तर तू पिऊन आला आहेस किंवा वेडा तरी आहेस.मला तर वाटत तू दोन्ही आहेस. आता तू स्वत:हून बाहेर जातोस घराच्या की मी पोलिसांना बोलावू? ”
“ मला जे बोलायचं आहे ते पूर्ण करूनच मी जाणार आहे.” पाणिनी म्हणाला.
“ मिर्च मसाला चा सर्वे सर्वा तूच आहेस.फक्त तू लोकांसमोर येत नाहीस. फिरोज लोकवाला ला समोर करून तू तुझं ब्लॅक मेल चं जाळं असहाय्य माणसांवर टाकून लुटायचं काम करतो आहेस. काही गडबड झाली तर सगळी जबाबदारी फिरोज लोकवाला वर टाकतोस.”
अरोरा काही न बोलता पाणिनी चं बोलणं ऐकत राहिला.
“ मी कोण आहे आणि मला काय हवं याची तुला कल्पना आहे की नाही मला नाही माहिती पण तू लोकवाला ला विचारून घे माझ्या बद्दल.पण माझ्या अशीलाबद्दल जर मिर्च मसाला ने काही छापलं तर त्याच्या मालकाच्या चेहेऱ्यावरचा बुरखा मी फाडून काढीन हे नक्की.” पाणिनी म्हणाला.
“ हिक आहे मला धमकी द्यायचं काम तू केलं आहेस आता मला बोलू दे. तू कोण आहेस मला माहिती नाही आणि मला त्याचा फरक ही पडत नाही.तुझी पत कदाचित स्वच्छ असेल त्यामुळे तू असा दमात घेत फिरत असशील सगळ्यांना.कदाचित तू धुतल्या तांदुळा सारखा नसशील ही.पण लक्षात ठेव दुसऱ्यावर शिंतोडे उडवताना तुझ्या अंगावर ही तो पडणार नाही ना बघ. ”
“ मला अपेक्षा आहेच तुझ्या कडून दमदाटीची.” पाणिनी म्हणाला
“ ती असेल तर मी तुला निराश करणार नाही. आता चालता हो इथून मी तुला धक्के मारून हाकलावण्यापूर्वी. मी तुला दम देतोय याचा.अर्थ असा काढू नको की माझा आणि मिर्चमसाला चा संबंध आहे. नीघ आता.”
पाणिनी जायला निघाला तेवढ्यात त्याला आत घेऊन येणारा नोकर अरोरा ला म्हणाला “ मिसेस अरोराला तुम्हाला भेटायचं आहे.लगेच, त्या बाहेर निघाल्या आहेत .त्यापूर्वीच त्यांना बोलायचं आहे.”
“ ठीक आहे .तू या माणसाकडे लक्ष दे नीट.तो परत आपल्या घरा च्या आसपास दिसला तरी त्याला फेकून दे लांब.लागलं तर पोलिसांना पण बोलाव. ” अरोरा म्हणाला.
“ एक नाही दोन पोलीस लागतील तुम्हा दोघांना ” पाणिनी म्हणाला आणि जिना उतरायला लागला.त्याच्या लक्षात आलं की ते दोघे त्याच्या मागोमाग खाली येण्यासाठी जिना उतरत होते.पाणिनी खालच्या रिसेप्शन रूम पर्यंत आला तेव्हा त्याच्या लगतच्या खोलीचा दरवाजा उघडला.
“ दधिची, तुला मधेच त्रास देते आहे मी , पण...” दारातून बाहेर येताना एका स्त्री चा आवाज आला आणि पाणिनी पटवर्धन दृष्टीस पडताच मधेच ती थांबली.पाणिनी आणि तिची नजरा नजर झाली.
ती बाई म्हणजे त्याच्या ऑफिस मध्ये आलेली ईशा गरवारे होती ! पाणिनी पटवर्धन ला बघताच तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला डोळे एकदम निस्तेज झाले ती प्रचंड घाबरली. मोठ्या मुश्किलीने तिने आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवलं आणि प्रयत्नपुर्क चेहेऱ्यावर वर निष्पाप भाव आणून त्याच्या नजरेला नजर द्यायचा प्रयत्न केला
“काय हवं होतं तुला?” अरोरा तिला उद्देशून म्हणाला.
“नाही, काही नाही ती एकदम बारिक आवाजात म्हणाली. मला माहित नव्हतं की तुम्ही बिझी आहात माफ करा. मी तुम्हाला त्रास दिला” नवर्याशी बोलताना ती एखाद्या त्रयस्त माणसाशी बोलावं तसंच बोलत होती.
“ठीक आहे. हा एक फालतू वकील आला होता.त्याच्या अशिलाच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यासाठी. त्याला मी हाकलवून देतोय ”. अरोरा तिला म्हणाला.
पाणिनी पटवर्धन आपल्या पावलावर गर्रकन वळला. “ऐकून घे मिस्टर अरोरा, मी तुला जाणीव करून देतो आहे.....” अरोरा च्या नोकराचा जाडजूड हात पाणिनी मेसेन च्या खांद्यावर पडला..
“ बाहेर जायचं दार ते आहे मिस्टर पटवर्धन ” तो त्याला म्हणाला. पाणिनी ने त्याच्या हाताला हिसडा मारला त्याबरोबर तो नोकर जोराने भिंतीवर जाऊन धडपडला. पाणिनीने त्याच्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही आणि तो अरोरा च्या जवळ जाऊन म्हणाला,
“ मी तुला एक संधी द्यायचा प्रयत्न केला, आता मात्र मी माझा विचार बदलला आहे माझ्या अशिला बद्दल एक शब्द जरी तू छापून आपलास तरी मी तुला पुढची वीस वर्ष तुरुंगात खडी फोडायला पाठवीन समजलं?” दधिची अरोरा चे करडे डोळे पाणिनी पटवर्धनच्या नजरेला भिडले एखादा साप आपल्या भक्ष्या कडे जसा बघतो तसं तो पाणिनी पटवर्धन कडे बघत होता. त्याचा उजवा हात त्याच्या कोटाच्या खिशात होता कदाचित त्याच्या हाताच्या मुठीत त्याने पिस्तूल धरलेल असावं.
“ हाच हात माझ्यावर उगारला असतास तर तो मी मुळासकट उपटून काढला असता आणि तुला गोळी घातली असती. हे मी स्व संरक्षणार्थ केलं असे सांगणारे साक्षीदार इथेच हजर आहेत. ” अरोरा म्हणाला.
“ तसं करायचा प्रयत्न नको करू.मला जी माहिती आहे ती इतर काही लोकांना पण आहे.मी आत्ता कुठे आहे आणि का आलोय हे पण त्यांना माहिती आहे.त्यामुळे माझ्यावर हल्ला करून तू सुटू शकणार नाहीस.” पाणिनी म्हणाला
अरोरा म्हणाला, “तुझा प्रॉब्लेम असा आहे पटवर्धन, की तू तेच तेच बोलत राहतोस.”.
पाणिनी ने बाहेर जायला दरवाजा उघडताच दधिची अरोराची व्यंगात्मक टिप्पणी त्याच्या कानापर्यंत पोहोचली.
“किमान दोनदा,” अरोरा म्हणाला. "त्यापैकी काही तू तीन वेळा सांगितलस.."
( प्रकरण ४ समाप्त)