१२ विनिताचा सूड १-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
विनिताने अकरावीला प्रवेश घेतला.ज्युनिअर व सीनिअर कॉलेजमधील सर्व मुलांचे डोळे विस्फारले.विनिता दिसायलाच तशी होती.सौंदर्याच्या कसोट्या लावून पाहिल्या तर ती कदाचित सौंदर्यवती ठरली नसती.एखादी मुलगी किंवा मुलगा आकर्षक ठरण्यामध्ये सर्व इंद्रियांचे परस्परांशी असलेले सहचर्य, समतोल,सुसंवाद, महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाचे एक आत्मिक तेज असते.ते तेज अंगप्रत्यंगातून कळत नकळत सर्वत्र पसरत असते.तर विनिता अशी सुंदर व आकर्षक होती.
ती नुसतीच सुंदर आकर्षक होती असे नव्हे तर बुद्धिमानही होती.मैदानी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमात ती भाग घेत असे.ती कॉमर्सला होती बारावी होऊन ती सिनीअर कॉलेजात आली.
कॉलेजात राकेश नावाचा एक मुलगा शेवटच्या वर्षांला होता.तो गुंड प्रवृत्तीचा होता.त्याचे वडील नुसतेच श्रीमंत नव्हते तर राजकारणीही होते.आपल्याला वाटेल ते करायचा परवाना मिळाल्यासारखा तो वागत असे. कॉलेजच्या विश्वस्तांमधील ते एक होते.कसेही वागले तरी आपल्याला कुणीही कांहीही करू शकणार नाही याचा त्याला आत्मविश्वास होता.कोणत्याही मुलीच्या वाटेला जायचा आपल्याला परवाना आहे असे त्यांचे वर्तन असे.श्रीमंत असल्यामुळे बऱ्याच मुली त्याच्या मागेपुढे करीत असत.त्याच्या पैशांवर मजा मारायची.त्याच्याकडून उंची उंची गिफ्ट्स घ्यायच्या.त्याला आपल्या जवळ एका विशिष्ट मर्यादेपेक्षा येऊ द्यायचे नाही असे कांही करत असत.तर कांही जणींची तो जे कांही करीत असे त्याला हरकत नसे.
त्याच्याकडे अनेक ब्रॅण्डच्या उंची मोटारसायकली, स्कूटर्स, मोटारी, होत्या.आज एक तर उद्या दुसरेच अशी वाहने तो आणत असे.याप्रकारे तो आपला रुबाब दाखवीत असे.असतील शिते तर जमतील भुते या म्हणीप्रमाणे त्याला अनेक तथाकथित मित्र होते.त्याच्या पैशावर खावे प्यावे सिनेमा बघावा.त्याची हांजी हांजी करावी. त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवावे आणि आपली कामे करून घ्यावीत असे ते करीत असत.थोडक्यात कॉलेजात टिंगलटवाळी करणारी,उंडरणारी, दुसऱ्यांना धाकदपटशा दाखवून आपला जम बसविणारी जी कांही पोरे असतात त्यातील तो एक होता
विनिता बरोबर याच्या विरुध्द होती.तिची घरची आर्थिक परिस्थिती बेतास बात होती.तिचे वडील एका कारखान्यात सामान्य कामगार होते.राकेशच्या वडिलांच्या पुढे तिच्या वडिलांचा विचार करता ते नगण्य होते.विनिता आपण बरे की आपला अभ्यास बरा अशा वृत्तीची होती.तिलाही मैत्रिणी होत्या परंतु त्या तिच्या प्रवृत्तीच्या होत्या.बहुतेक जणी तिच्या आर्थिक स्तरातील होत्या.ती हुशार होती ती कठीण विषयांच्या छान नोटस् काढीत असे.तिच्या नोटस् वाचून कित्येक जणी सहज पास होत असत.त्यामुळे परीक्षेच्या हंगामात तिला मुलींमध्ये चांगलाच भाव असे.
विनिता राकेशच्या मनात भरली.हॉटेलात मित्रांबरोबर गप्पा मारताना त्याने ती गोष्ट बोलून दाखवली.त्याच्या मित्रांनी ही मुलगी त्यातील नाही ती तुला वश होणार नाही असे सांगितले. एरवी तर त्याने तिचा नाद सोडून दिला असता.तू नही तो और सही असे तो म्हणाला असता. बोलता बोलता मित्रांजवळ त्याने पैज मारली.वाटेल ते करून मी तिला मिळवीनच.बघता बघता तिला मिळविणे हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला.आता मागे फिरणे शक्य नव्हते.
तिच्या मैत्रिणीमार्फत त्याने तिच्याशी ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला.ती त्याच्याशी जेवढय़ास तेवढे बोलत असे.तिने त्याला उत्तेजन दिले नाही किंवा मुद्दाम टाळण्याचा प्रयत्नही केला नाही.त्याने बहिणीचे कारण देऊन तिच्याजवळ नोट्स मागितल्या.या कॉलेजात नाही दुसऱ्या कॉलेजात माझी बहीण आहे वगैरे गप्पा मारल्या.विनिताला त्याचा कावा कळला.विनिताने त्या बहिणीला मला भेटायला सांगा असे उत्तर दिले.एक दिवस त्याने तिला आपल्याबरोबर कॉफी हाऊसमध्ये बोलाविले.तिने त्याला नम्रपणे नकार दिला.विनिताला त्याचे वडील, त्यांची श्रीमंती, त्यांची तथाकथित प्रतिष्ठा,राजकारणातील त्यांची ऊठबस,राकेशची गुंडगिरी इत्यादी गोष्टी माहीत होत्या.याच्या नादाला लागण्यात अर्थ नाही हेही ती जाणून होती.त्याच्याशी ती जेवढ्यास तेवढे बोलत असे.
आपल्याला ही वश होत नाही. आपण सांगू तसे करणार नाही. हे त्याच्या थोड्याच दिवसात लक्षात आले.त्याने पांघरलेला सभ्यपणाचा बुरखा टाकून दिला.एक दिवस बसस्टॉपकडे जात असताना त्याने तिला अडविले.तुला माझ्याबरोबर आलेच पाहिजे वगैरे दमदाटी सुरू केली.तिने नम्रपणे मला जमणार नाही असे सुचविले.मोटारसायकलवरून उतरून त्याने तिचा हात धरला.वनिताने त्याला याचा परिणाम चांगला होणार नाही असे सांगितले.त्याने उद्दामपणे काय करशील असे विचारले.तिने तू तुझी मर्यादा ओलांडून बघ म्हणजे तुला कळेल असे सांगितले.
त्याने रागात तिचा हात जास्तच घट्ट दाबला,तिला जवळ ओढले,आलिंगन दिले आणि तिचे चुंबन घेतले.वर आणखी काय करायचे ते कर.मी कुणाला घाबरत नाही असे सांगितले.विनिता कराटे चॅम्पियन आहे ही गोष्ट त्याला माहीत नव्हती.ती वरवर शांत होती.आंतून ती क्षुब्ध झाली होती.तिने कराटेचा एक डाव टाकला आणि क्षणार्धात राकेशला अस्मान दाखविले.विद्यार्थी व विद्यार्थिनी समोर,सर्व कॉलेजसमोर त्याचा घोर अपमान झाला.कसाबसा हळूहळू उठत तो मोटारसायकल घेऊन निघून गेला. याचा बदला घेतल्याशिवाय रहाणार नाही अशी त्याने मनातल्या मनात प्रतिज्ञा केली.
या गोष्टीला दोन महिने झाले असावेत.मैत्रिणीकडून रात्री विनिता घरी जात होती.बसस्टॉपवर उतरल्यावर तिला तिच्या घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागे. रात्रीचे नऊ वाजले होते.रस्त्यावर विशेष वर्दळ नव्हती.अशा संधीची राकेश वाट पाहत होता.अनेक दिवस तो तिचा पाठलाग करीत होता.आज त्याला हवी असलेली संधी मिळाली होती.जवळपास पोलीस नाही. रस्त्यावर विशेष पादचारी नाहीत. वाहनेही तुरळक स्वरुपात यासारखी संधी त्याला पुन्हा मिळाली नसती. त्याने आपली मोटार भरधाव आणली आणि तिच्या अंगावर घातली.तिला चिरडून ठार मारण्याचा त्याचा उद्देश नव्हता.तिला लुळी पांगळी करावी. जखमी करावी. तिला अद्दल घडावी.असा त्याचा उद्देश होता.
मोटारीच्या आघाताने ती फेकली गेली.तिचे डोके रस्त्यावर आपटून फुटले.रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला.राकेश अर्थातच पळून गेला होता.लगेच गर्दी जमली.कुणीतरी गाडीचा नंबरही पाहिला होता.पोलीस आले.त्याने गाडीचा नंबर सांगितला.ही हिट ऍण्ड रन केस होती.पोलिसांनी गाडीचा शोध घेतला.कुणाची गाडी आहे हे लक्षात येताच त्यांनी आपला शोध थांबविला.पंचनामा झाला. अॅम्ब्युलन्स बोलावली.तिच्या घराचा पत्ताही तिच्या पर्समध्ये मिळाला होता.घर जवळच होते तिच्या वडिलांना बोलावण्यात आले.त्यांनी प्रेताची ओळख पटविली.तिच्या वडिलांना धायमोकलून रडताना लोकांनी पहिल्यांदाच पाहिले.अकाली असे कांही होईल याची कुणालाच कल्पना नव्हती.शवविच्छेदन झाल्यावरच प्रेत ताब्यात मिळणार होते.प्रेताचा उजवा हात गायब होता.मोटारीचा दणका बसला. ती रस्त्यावर आपटली त्यावेळी तुटून तो कुठेतरी पडला होता.आसपास बराच शोध घेण्यात आला.तिचा उजवा हात कुठेही मिळाला नाही.
शोधाशोध सुरू झाली तेव्हा उजवा हात रस्त्याच्या कडेला पडलेला होता.आपल्याला शोधत आहेत हे लक्षात आल्याबरोबर तो जवळच असलेल्या झाडावर भरभर चढला.वरती गर्द पानांमध्ये बसून तो खाली काय चालले आहे ते पाहत होता.विनिताला कुणी उडवले ते त्याला माहीत होते.विनिताचा प्रेतात्मा त्या हातात होता.तिला ज्याने उडविले,तिला ज्याने ठार मारले,तिला ज्याने तिच्या कुटुंबापासून कायमचे अलग केले,त्या राकेशचा सूड घेतल्याशिवाय तो हात स्वस्थ बसणार नव्हता.
अॅम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाली.पोलिसांची जीपही रवाना झाली.विनीताचा हात कुणालाही आपण सापडू नये म्हणून झाडावर लपून बसला होता.सर्वत्र सामसूम झाल्यावर तो झाडावरून हळूच खाली उतरला.हात जिथे तुटला तिथे रक्त साकाळले होते.रक्त गोठल्यामुळे गळायचे केव्हांच थांबले होते.
राकेशचे घर माहीत असल्यासारख्या तो हात टणाटण उडय़ा मारीत रस्त्याच्या कडेने चालला होता. तुटक्या हाताला उडय़ा मारीत जाताना जर कुणी बघितले असते तर तो जागच्या जागी कदाचित बेशुध्द होऊनच पडला असता.रात्रीचे बारा वाजल्यामुळे रस्त्यावर रहदारी नव्हती.एखादी मोटार किंवा स्कूटर रस्त्यावरून क्वचित जात होती.
राकेश गावाबाहेर अलिशान बंगल्यात राहात होता.त्याच्या वडिलांचा बंगला नवीन वसाहतीत गावापासून खूप दूर होता.जिथे अपघात झाला, जिथे विनिता राहात होती, तिथून अंतर जवळजवळ आठ किलोमीटर होते.हात कितीही भराभर टणाटण उडय़ा मारीत पळाला, तरी हे अंतर गाठण्यास बराच वेळ लागणार होता.थोड्याच वेळात ही गोष्ट हाताच्या लक्षात आली.
हाताने अकस्मात हवेत एखाद्या पक्ष्यासारखी भरारी घेतली.तो हात थेट राकेशच्या बंगल्याच्या गच्चीत उतरला.गच्चीचा दरवाजा बंद होता.एखाद्या पालीसारखा तो हात सरसर भिंतीवरून खाली उतरून बंगल्याभोवती भिंतीवरून फिरू लागला.प्रत्येक खिडकीतून तो हात डोकावून पाहत होता.त्याला राकेशची खोली शोधून काढायची होती.थोड्याच वेळात त्याला राकेशची खोली सापडली.राकेश सोफ्यामध्ये बसला होता.त्याला विनिताला जखमी करायचे होते.ठार मारायचे नव्हते.आपला अव्हेर केल्याबद्दल,ज्याला तो त्याचा अपमान समजत होता,तिला शिक्षा करायची होती.तिला जन्माची आठवण राहील अशी शिक्षा करायची होती.
प्रत्यक्षात त्याच्या हातून खून झाला होता.खुनी इसम कितीही हुशार असला,त्याने लपण्याचा कितीही प्रयत्न केला,आपण खून केलाच नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला,खरे पुरावे लपविले नवीन तयार केले,तरी पोलिसांचे हात लांब असतात, कायद्याचे हात लांब असतात,आज ना उद्या खुनी केव्हातरी सापडतोच ही गोष्ट तो ऐकून होता.अशा खऱ्या खोट्या कहाण्या त्याने वाचलेल्या होत्या. पडद्यावर पाहिल्या होत्या.
दोन्ही बाजूंनी तो हादरून गेला होता.विनिताचा आपल्या हातून खून झाला आणि त्याचबरोबर पोलिस आपल्याला पकडतील या दोन्ही गोष्टींनी तो हादरून गेला होता.
*जर तिचा हात अपघातात तुटला आहे,*
*तो हात आता प्रेतात्म्याने भारित आहे,*
*तो आपल्याला शोधीत होता,*
*अाता त्याने आपल्याला शोधून काढले आहे,*
*तो खिडकीतून आपल्याला न्याहाळत आहे,*
*तो खोलीत येण्याची खटपट करीत आहे,*
*या गोष्टी त्याला कळल्या असत्या तर कदाचित तिथेच त्याचा हार्ट फेल झाला असता.*
(क्रमशः)
५/१२/२०२१ ©प्रभाकर पटवर्धन