Get it on Google Play
Download on the App Store

११ ग्यानबाचा सूड २-२

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

ग्यानबाने ती जमीन सदू खोताकडे गहाण टाकून कर्ज घेतले होते.असे खोटे कागदपत्र तयार करण्यात आले.कर्ज न फेडल्यामुळे गहाण जमीन सदू खोताच्या नावाने कागदोपत्री केली गेली.

ग्यानबा माळकरी होता.तरीही प्रत्येकाच्या सहनशक्तीला मर्यादा असते.

काय झाले,कोणी केले ते सर्व चित्र ग्यानबाच्या डोळ्यांसमोर होते.त्याला गती मिळाली नाही.

सूडाने पेटलेला त्याचा आत्मा अधांतरी तरंगत होता.

सदू खोताचे पूर्ण वाटोळे केल्याशिवाय त्याला गती मिळणार नव्हती.

ग्यानबाचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. ग्यानबाला पाण्यात बुडवून ठार मांडण्यात आले.त्याला पुढे गती मिळाली नाही.त्याचे भूत झाले.सूड घ्यावा ही त्याची इच्छा होती. सामान्य मनुष्य जसा सूडाने पेटतो तसा ज्ञानबा पेटलेला नव्हता. शेवटी तो एक माळकरी होता.त्याच्या मनात द्वंद्व चालू होते.एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारू नये.सदू खोताने पाप केले म्हणून आपण बदला घेणे कितपत योग्य आहे असे त्याच्या भुताला वाटत होते.एक वाईट वागला तरी आपण आपला अंगभूत चांगुलपणा सोडू नये असे एकदा त्याला वाटत असे. तर दुसऱ्या वेळी सदू खोतने आतापर्यंत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली आणि पुढेही सदुभाऊ अशाप्रकारे अनेक जणांची कुटुंबे उद्ध्वस्त करील.तेव्हां त्याला शिक्षा करणे हा न्याय आहे. सदू खोताला शिक्षा केली पाहिजे असे त्याला वाटत असे.या द्वंद्वात तो निर्णय घेऊ शकत नव्हता.यातच त्याचे काही दिवस गेले.

ग्यानबाचे भूत उलट सुलट विचार करून शेवटी निर्णयावर आले.कटू असले कठोर असले तरी न्याय केला पाहिजे.शेवटी त्याने सदू खोताला जास्तीत जास्त कठोर  शिक्षा करण्याचा निर्णय घेतला.

सदू खोताला ठार मारणे  ग्यानबाच्या भुताला सहज शक्य होते.परंतु त्याला असे वाटत होते कि सदू खोत केलेल्या वाईट, निर्घृण,कामाबद्दल सतत पश्चात्तापात जळत राहिला पाहिजे.आपण नीच कर्म केले याबद्दल त्याला पश्चात्ताप झाला पाहिजे.पश्चातापाच्या आगीत जळून त्याचा आत्मा शुद्ध होईल.यासाठी अशी कांही योजना केली पाहिजे की तो पश्चात्तापदग्ध होईल.त्यासाठी एकच उपाय होता.त्याचे सर्व कुटुंबीय स्वकीय मृत्यू पावले पाहिजेत.फक्त तो जिवंत राहिला पाहिजे.आपण आत्तापर्यंत केलेल्या वाईट कर्माची ही फळे आहेत हे त्याला कळले पाहिजे.त्याची त्याला जाणीव झाली पाहिजे.

एकाच वेळी त्याने केलेल्या पापाबद्दल शिक्षा आणि त्याचवेळी त्याचा आत्मा शुध्द होणे या दोन गोष्टी ग्यानबाला साध्य करायच्या होत्या.

सदू खोताला दोन मुलगे होते.दोन्ही मुलांची लग्ने झाली होती.मुलगे केवळ बापासारखे आपमतलबी स्वार्थी क्रूर होते एवढेच नव्हे तर  वाह्यातही होते.त्यांची नजर चांगली नव्हती.एखादी चांगली बाई गावात दिसली की तिला नासवण्याकडे त्यांचे लक्ष असे.खोताच्या सुनांना शिक्षा होणे योग्य नव्हते.त्यांच्या पतीचा मृत्यू म्हणजे म्हटले तर एकप्रकारे त्यांना शिक्षा होती किंवा दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यांची सुटका होती.सदू खोताची बायको अजून जिवंत होती.ती साध्वी स्त्री होती.

असे असले तरी सुक्याबरोबर ओले जळते. ग्यानबाच्या भुताचा त्याला इलाज नव्हता.एक दिवस ज्ञानबा म्हणजे ग्यानबाचे भूत सदू खोताच्या अंगात शिरले.सदू खोत म्हणजे त्याचे शरीर व त्याचा आत्मा आता संपूर्णपणे ग्यानबाच्या कह्यात होता.एक दिवस सदू खोताने म्हणजे भुताने आपल्या थोरल्या मुलाचा धारदार तलवारीने शिरच्छेद केला.हा शिरच्छेद त्याने अरण्यात केला. त्यांच्या मालकीचे जंगल होते.त्या जंगलात आपल्याला काय केल्यावर जास्त उत्पन्न मिळेल हे दाखवण्याच्या मिषाने थोरल्या मुलाला सदू खोताने जंगलात नेले.तेथे गेल्यावर त्याने मुलासमोर मुलाने केलेल्या पापांचा पाढा वाचला.आपल्या वडिलांना आज हे काय झाले असे मुलाला वाटत होते.

सदू खोतांनी अगोदरच तलवार एका झाडाच्या ढोलीमध्ये ठेवली होती.ती काढून त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचा शिरच्छेद केला.दु:खित मुद्रेने ते घरी आले मुलाचा शिरच्छेद दरोडेखोरांनी केला असे त्यांनी घरी सांगितले.मुलाचे दुःखी मुद्रेने ओर्ध्वदेहिकही केले.शिरच्छेद केल्यावर खोतांच्या शरीरातून ज्ञानबा बाहेर पडला होता.मुलाच्या मृत्यूने खोत खरोखरच कळवळून रडत होते.आपण हे असे कसे केले तेच त्यांना समजत नव्हते.

खोत आपल्या खोलीत दुःखी अंतःकरणाने बसलेले असताना ग्यानबाचे भूत त्यांच्यासमोर प्रगट झाले.खोतांनी केलेल्या पापांचा पाढा त्याने वाचला.त्यांचा मुलगाही कसा लंपट होता गावातील किती स्त्रिया त्याने नासवल्या तेही त्या भुताने सांगितले.तूच तुझ्या मुलाचा अंत केला असेही सांगितले.त्यावेळी मी तुझ्या शरीरात होतो हे सांगितले. माझा कांहीही अपराध नसताना तू माझे वाटोळे केले. तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी राहणार नाही याची जाणीव करून दिली.आणि ते भूत अदृश्य झाले. 

त्यांचा दुसरा मुलगा स्नानासाठी धरणावर गेला होता.ग्यानबाचे भूत पुन्हा खोताच्या अंगात शिरले.खोत धरणावर गेले.खोताने आपल्याच मुलाचा पाण्यात बुडवून घात केला.धाकट्या मुलाचा मृत्यू झाल्याबरोबर भूत खोताच्या शरीरातून बाहेर पडले.धरणातील पाण्यावर आपल्या मुलाचे प्रेत तरंगताना पाहून खोत ढसाढसा रडू लागला.तेवढ्यात त्याच्यासमोर ग्यानबा प्रगटला.मुलगा बुडून मेला नाही. तू त्याला बुडवून ठार मारलेस जसे तू मला ठार मारले होते असे त्याने सांगितले.तुझ्या कर्माची ही शिक्षा आहे असे बजावले.

सदू खोत ग्यानबासमोर ढसाढसा रडू लागला.मी चुकलो मी तुझ्या मुलाला सुनेला पत्नीला जाळून ठार मारायला नको होते.तुला पाण्यात बुडवून मारले ही माझी मोठी चूक झाली.तू माळकरी.मला क्षमा कर. आणखी माझा घात करु नको. असे  विनवून तो ग्यानबाला सांगू लागला. तू मला ठार मार असेही विनवू लागला.भुताने कठोरपणे खोताला सांगितले.तुझ्या अपराधाला तुझ्या चुकीला क्षमा नाही.तुझ्याजवळ भरपूर धनदौलत असताना तू आणखीचा हव्यास केलास.योग्य मार्गाने धनदौलत न मिळवता तू दुसर्‍यांच्या माना पिरगळून धनदौलत मिळवलीस.त्यासाठी खून करण्यालाही तू अनमान केले नाहीस.तुला तुझ्या मृत्यूनंतर भगवान तर शिक्षा करीलच.परंतु इथेच मी तुला शिक्षा करणार आहे.

खोताची पत्नी व सुना यांनाही ठार मारण्याचे ग्यानबाने ठरविले होते.परंतु शेवटी भुताला दया आली.त्याने खोताचे आर्थिक नुकसान करण्याचे ठरविले.खोताची शंभर कलमांची बाग होती.त्यांचे लक्षावधी रुपये उत्पन्न दरवर्षी मिळत असे.एक दिवस एकाएकी त्या बागेला आग लागली.कलमे पूर्ण किंवा अर्धवट जळून गेली.नुकसानीची परिसीमा झाली.मळ्यातील उभे पीक आडवे झाले.बाकीच्या पट्ट्यातील पीक जसेच्या तसे होते.फक्त खोताचे पीक कुसून गेले.त्याच्या घराला आग लागली.सर्व चीजवस्तू जळून नष्ट झाली.विधवा सुना त्यांच्या माहेरी निघून गेल्या.पत्नी व तो जळक्या घरात कांही वाचले आहे का ते शोधीत राहिले.

.                  एका मुलाला तलवारीने मारताना व दुसर्‍या  मुलाला पाण्यात बुडवून मारताना गावातील कांही लोकांनी  खोताला पाहिले होते.कुणीतरी खोताविरुध्द तक्रार केली.नाहीतरी खोतांच्या कर्मामुळे गाव खोताविरूध्द होताच.  सरकारी चक्रे फिरली.खोताला पकडण्यात आले.साक्षी पुरावे झाले.त्याला खुनाच्या आरोपावरून आजन्म कारावासाची, सक्तमजुरीची शिक्षा झाली.खोताचे सर्वस्व गेले.होत्याचे नव्हते झाले.

खोताचे खूप नुकसान झाले तरीही त्याच्याजवळ कांही जमीन व घराचा कांही भाग उरला होता.त्यावर त्याच्या पत्नीची गुजराण होते.    

तुरुंगात एकदा ग्यानबा खोतासमोर प्रगट झाला.तुझ्या पापाची, तुझ्या कर्माची फळे तू भोगत आहेस.तू पूर्ण देशोधडीला लागला आहेस.असे त्यांनी बजावले.

*खोत पश्चात्तापदग्ध अंत:करणाने देवाची करुणा भागत तुरुंगात आपली शिक्षा भोगत आहे.*

*त्यानंतर ग्यानबा खोताला कधी भेटला नाही.*

*खोताचा सूड घेतल्यानंतर तो पुढच्या गतीला गेला असावा.*

(समाप्त)

२७/१०/२०२१©प्रभाकर  पटवर्धन