मृत्युपत्र
सुमारे पांच ते सहाशे वर्षांपूर्वी चीनच्या एका प्रांतांत राजाचा एक प्रतिनिधि राहात असे. त्याचे नांव होतें 'निशा चिचेन.' त्याने धरें, शेते, रोकड पैसे मिळून खूपशी संपत्ति जमवून ठेविली होती. त्याला एका मुलाशिवाय कोणी नव्हते. त्याची बायको मुलगा लहान असतांनाच मरून गेली होती. काही दिवसांनी त्याने नोकरी सोडून दिली आणि शेतीवाडी पाहूं लागला.
त्याचा मुलगा शान ची नेहमी त्याला म्हणत असे, “बाबा तुम्ही आतां वृद्ध झालां आहात म्हणून तुम्ही पूर्ण विश्रांति घ्या."
"जो पर्यंत माझ्या जिवांत जीव आहे तो पर्यंत हे शक्य नाही. माझे काम मीच पाहाणार." चिचेन म्हणाला.
एकदां तो आपल्या एका खेम्यात गेला असा नदीच्या काठी त्याला एक सोळा वर्षाची मुलगी दिसली. ती आपल्या आजी बरोबर नदीवर आली होती. तिचे आई वडील लहानपणीच वारले होते. त्यामुळे आजीच तिचा सांभाळ करीत असे. त्या मुलीचे नांव 'मेय' असें होतें. मेयला पाहिल्यावर चिचेनला तिच्याशी लग्न करावेसे वाटले. त्याने मुलीच्या आजीला विचारले. ती कबूल झाली. मेयनें हि नकार दिला नाही. म्हणून चिचेन तिला लग्न करून घरी घेऊन आला. मेय लहान असली तरी फार हुशार होती. म्हाताऱ्याचे हे काम त्याच्या मुलाला व सुनेला मुळीच आवडले नाही. काही दिवसांनी मेयला मुलगा झाला. बापाने त्याचे नांव 'शान शू' असे ठेवलें.
शान चीला बापावर राग होताच. तो एवढयावरच थांबला नाही तर आपल्या सावत्र आईला कुलटा म्हणू लागला. आणि शान शू आपला भाऊ नाही म्हणून सांगू लागला. शान चीचा हा तऱ्हेवाईकपणा त्याच्या वडिलांच्या कानावर गेला. पण तो कांहीं बोलला नाही. कारण त्याच्या रागाचे कारण त्याला कळले होते. तेव्हा पासून त्याला थोडी काळजीच वाटत होती. शान शू पांच वर्षांचा झाला तेव्हां चिचेननें त्याला शाळेत घातले. ज्या शाळेत शान चीचा मुलगा जात होता, त्याच शाळेत शान शू जाऊ लागला. अर्थातच शान चीला ते रुचले नाही. त्याने आपल्या मुलाला त्या शाळेतून काढून दुसन्या शाळेत घातलें. हे ऐकून चिचेनला वाईट वाटले.
एकदा त्याला वाटले खूप रागवावे आपल्या मुलाला. पण पुन्हा विचार आला की त्याला रागवून तरी काय फायदा..! त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. म्हणून राग गिळून तो स्वस्थ राहिला.
काही दिवसांनी चिचेनला अर्धांगवाताचा झटका आला. ह्या आजारावर काहीच उपाय नाही, असे डॉक्टरने सांगितले. मरण येईपर्यंत पडून राहावयाचे. बापाला उठतां येत नाही असे पाहून शान चीने सर्व कारभार आपल्या हाती घेतला. सर्व ठिकाणी आपला अधिकार दाखवू लागला. आता त्याचे राज्य सुरु झाले. आपले आयुष्य आता मोजके दिवस राहिले आहे. असे वाटल्यावर एक दिवसा चिचेनने शान चीला आपल्याजवळ बोलावलें व एक चोपड़ी त्याला दिली. त्यांत त्याच्या सर्व संपत्तीचे सविस्तर वर्णन होते.
चोपडी देत तो म्हणाला, "शान ची, तुझा भाऊ फार लहान आहे. काही दिवस तरी त्याचे पालन पोषण तुझ्यावर टाकणे भाग आहे. बरें, त्याची आई सुद्धा सर्व कामें पाहावयाला अजून लहान आहे. म्हणून मी वांटे केलेले नाहीत. सर्व तुझ्याच नाव लिहिले आहे. शान शू मोठा झाला म्हणजे त्याचे लग्न करून दे आणि त्याला दहा एकर जमीन व एक बंगला राहावयास दे. म्हणजे त्यांना खाण्या पिण्याची राहाण्याची काळजी राहणार नाही. या सर्व गोष्टी मी यांत स्पष्टपणे लिहून ठेवल्या आहेत. त्या प्रमाणे कर. बरें, दुसरे म्हणजे शान शू ची आई जर दुसरें लग्न करणार असेल तर करूं दे आणि जर तिला तसेच आपल्या मुलाकडे राहावयाचे असेल तर तसे करूं दे. मी लिहिल्या प्रमाणे केलेंस म्हणजे माझ्या मनाला शांति मिळेल."
“बाबा, काही काळजी करू नका. आपल्या आज्ञेप्रमाणे सर्व काही करतो." असे सांगून शान ची चोपडी घेऊन शान ची आपल्या खोलीत निघुन गेला.
तो गेल्यावर मेय आपल्या नवऱ्याला म्हणाली, "हा काय तुमचा मुलगा नाही..?? सर्व काही मोठ्या मुलालाच देऊन टाकलेत मग आम्ही काय करावे?"
असे म्हणत असतां तिला रडू कोसळले.
"शान चीचा काय भरंवसा..! समजा, मी ही संपत्ति दोघांना वाटून दिली असती तर तो तुझ्या मुलाला मारून टाकायला सुद्धा. मागे पुढे पहावयाचा नाही. मत्सराला कारणच नको म्हणून मी सारी संपत्ति त्याच्या स्वाधीन केली आहे. त्याच बरोबर शान शूच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी मी त्याच्यावरच टाकली आहे. तूं अजून लहान आहेस. तुला हे सर्व खटलं संभाळतां येणार नाही. माझ्या मागून तूं, येथेच राहिलीस तर तुझे हाल होतील. म्हणून तूं येथें कष्ट सोशीत राहूच नकोस. कोणाशी तरी लग्न करून घे." चिचेनने मेयला सांगितले.
"असं भलतेच काय म्हणतां. कुळाला कलंक नाही का लागणार. सुख दुःख जें काय भोगावयाचे ते सर्व ह्या मुलाजवळ राहूनच भोगायचे.” मेय म्हणाली.
“असाच जर तुझा विचार असेल तर मी अशी व्यवस्था करतो की त्यामुळे तुम्हाला मुळीच त्रास होणार नाही." असे म्हणत त्याने एक पाकीट आपल्या अंथरुणाखालुन काढले.
ते मेयच्या हातांत देत म्हणाला, "यांत माझे चित्र आहे. हे आपल्याजवळ ठेव. कोणाला दाखवू नकोस. आणि शान शू मोठा झाल्यावर सुद्धा जर त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर या प्रांतांत जेव्हां चांगला न्यायाधीश येईल तेव्हा त्याला दाखब आणि शान चीवर फिर्याद कर. म्हणजे तो न्यायाधीश असा न्याय देईल की त्यामुळे तुम्ही दोघे सुखी व्हाल."
त्यानंतर काही दिवसांनी चिचेन मरण पावला. आतां सर्व राज्य शान चीचेच होते. वडिलांचे क्रिया कर्म झाल्यावर त्याने घराला रंग देण्याच्या निमित्ताने आपल्या सावत्र आईला अंगणांतील लहानशा झोपडी वजा घरांत जाऊन राहा म्हणून सांगितले. ती बिचारी तेथे राहू लागली. तिच्यासाठी लागणारे डाळ तांदूळ हा देत असे. पण बाकी भाजी पाला वगैरे साठी काही व्यवस्था नव्हती. मेय शिवणकाम करून पैसे मिळवून बाकी खर्चाची तोड मिळवणी करीत असे. तिनें जवळच्याच शाळेत आपल्या मुलाला घातले होते.
एक दिवस शान चीने आपल्या एका मित्राला आपल्या सावत्र आईकडे पाठविलें. आणि तिला पुन्हां लग्न करण्यासाठी समजाव म्हणून सांगितले. त्याच्याबरोबर तिच्याशी लग्न करण्यास तयार असलेल्या इसमास हि पाठविले. परंतु मेयने त्या सर्वाना परतून लावले. तिने दुसरे लग्न न करण्याचा निश्चयच केला होता. काही दिवस गेले. शान शू चौदा वर्षांचा झाला.
एक दिवस तो आपल्या आईला म्हणाला, "आई, मला रेशमी कपडे पाहिजे आहेत. सर्व मुले मला हंसतात. म्हणतात तुझे वडील राजप्रतिनिधि होते. त्यांनी पुष्कळ पैसे मिळवून ठेवले आहेत."
"तें खरं आहे. पण नाही रे बाळ माझ्याजवळ पैसे..!" आई म्हणाली.
"ते ग कां..? आम्ही दोघेच तर भाऊ. शान चीच्या जवळ पुष्कळ पैसे आहेत आणि मला मात्र काही नाही. तूं नाही दिलेस मला रेशमी कपडे तर मी त्याच्याजवळ जाऊन मागीन." शान शू म्हणाला.
त्याने तसेच धावत जात आपल्या भावाकडे जाऊन रेशमी कपडे मागितले.
“तुला काय पाहिजे असेल ते आपल्या आई जवळ माग..!!" शान ची म्हणाला.
“पण साऱ्या संपत्तीची देखरेख तूंच तर करतोस." शान शू म्हणाला.
“लबाड, कपटी. कपडयाच्या नावाखाली आपला वाटा मागण्यासाठी आलास होय...! चल जा...! ही सारी संपत्ती माझी आहे..! तूं कोण आला आहेस उपट सुंभ्या मध्येच...!" असे म्हणून शान चीने त्याच्या फाटदिशी मुसकुटात मारली.
कळवळून गेला तो त्या तडाख्याने. डोके धरून रडत रडत गेला आपल्या आईकडे.
"तरी मी तुला बजावले होते. तूं जाऊं नकोस भावाकडे म्हणून." मेय म्हणाली.
तिच्या डोळ्यांत अश्रूधारा येऊ लागल्या. तिने एका दासीला पाठवून मुलाला क्षमा करण्याची प्रार्थना केली. शान चीचे हृदय संपत्तीच्या मदाने दगडासारखें कठोर झाले होते. त्याने दुसरे दिवशी आपल्या इष्ट मित्रांना आणि नातेवाइकांना बोलाविले आणि मेयच्या समोर सर्वांना उद्देशून म्हणाला,
“आपल्याला असे वाटत असेल की मी शान शू व त्याच्या आईला खर्चासाठी पैसे अगर राहाण्यासाठी जागा देऊ इच्छित नाही. पण तसे काही नाही, पण काल शान शू माझ्याकडे आला आणि आपल्या वाट्या बाबत माझ्याशी भांडू लागला. मला वाटते हा आत्तांच एवढे करीत आहे. तर पुढे काय करील? म्हणून मी आपणा सर्वांसमक्ष वडिलांनी लिहून ठेविल्याप्रमाणे त्याचा हिस्सा त्याला देतो. त्याप्रमाणे हे पूर्वेकडील घर व एकोणतीस सेंट जमीन आजपासूत त्याची झाली. वड़िलांच्या मर्जी विरुद्ध मी एक कवड़ी देखील कमी केलेली नाही. हे पाहा मृत्युपत्र. आपण सर्व याला साक्षी आहात." असे म्हणत त्याने तेथे जमलेल्यांना ती चोपडी दाखविली.
शान चीचे सांगणे संपल्यावर सर्व आपापल्या घरी गेले. कोणी अन्यायाची आपापसांत कुजबुज करीत, तर कोणी मनातल्या मनांत ठेवून परतले, माय लेक आपले चंबूगबाळे घेऊन शान चीने दाखविलेल्या घरी राहावयास गेली.
तें घर पडके व जुने होते. त्यांतीलच एक दोन खोल्या साफ करून घेऊन ते राहू लागले. त्यांच्या वाट्यास जी जमीन आली ती ओसाड होती. त्यांत कांहींच पीक येत नसे. काही वर्षे अशाच हाल अपेष्टांत त्यांनी काढली. पुढे एकदां मेयला कळले की त्यांच्या गांवांत एक फार सज्जन आणि न्यायपरायण न्यायाधीश आला आहे. लोक त्याच्या हुशारीची आणि सज्जनपणाची वाहवा करीत होते.
त्याचे कारण असे की त्या गांवांत एका शिंप्याचा कोणी तरी खून केला. त्याच्या बायकोनें संशयावरून एका व्यक्तीचें नांव सांगितले आणि न्यायाधिशाने त्याला मृत्यूची शिक्षा फरमावली. पण ह्याच वेळी हा न्यायाधीश तेथे आला. त्याने रीतसर चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराला पकडून दिले व या निर्दोषी माणसाला सोडून दिले. तेव्हां पासून लोकांवर त्याची छाप बसली. ह्या न्यायाधिशाकडून आपल्याला योग्य न्याय मिळेल असे वाटून मेय आपल्या नवऱ्याचे चित्र घेऊन त्याच्याकडे गेली.
मेय म्हणाली, “शान चीने माझ्या पतीची सारी संपत्ति घेतली आहे, त्याने माझ्या मुलाला अर्धा हिस्सा दिला नाही, म्हणून मी न्याय मागण्यासाठी आपल्याकडे आले आहे. मृत्यू समयीं माझ्या पतीनी मला हे त्यांचे चित्र दिले व सांगितले की हे त्यांचे खरें मृत्युपत्र आहे. परंतु तें वाटेल त्याला न देता चांगल्या न्यायाधिशाकडेच घेऊन जा. कारण तोच यांतील गोष्टी नीट समजू शकेल. म्हणून मी हे आपल्याकडे घेऊन आले आहे. कृपा करून आपण न्याय करावा."
"बरं बघतो." म्हणून त्यानें मेयला पाठवून दिले.
नंतर तो बराच वेळ त्या चित्राकडे पाहात बसला. पण त्याला काही कळेना. शेवटी त्याने ते कापडावर चिकटविलेले चित्र बाजूला केले, तेव्हा त्याच्या खाली लिहिलेली अक्षरें त्याला दिसली. त्यांत असे लिहिले होते, मी म्हातारा झालो आहे. माझा दुसरा मुलगा शान शू. अगदी लहान आहे. माझा मोठा मुलगा दुष्ट आहे. तो आपल्या भावाला सहज फसवू शकेल. माझी जमीन व दोन घरें मी शान चीच्या नावावर लिहिली आहेत. आणि पूर्वेकडील घर शान शूच्या नांवावर आहे.
हे घर जुने पडके आहे. पण त्याच्या पूर्वेकडील भिंतीत पांच हंड्यांत मिळून बीस मण चांदी आणि सहा हंड्यांत मिळून चार मण सोनें पुरून ठेविले आहे. जमिनीबद्दल म्हणून मी हे शान शूला ठेविले आहे. एवढे लिहून म्हाताऱ्याने त्याच्यावर तारीख, वार वगैरे लिहिले होते. दुसऱ्या दिवशी न्यायाधिशाने शान चीला बोलाविले.
न्यायाधीश शान चिला म्हणाला, "तुझ्या सावत्र आईने तुझ्याविरुद्ध तक्रार आणली आहे. तूं तिला तिचा योग्य वाटा देत नाहीस, असे तिचे म्हणणे आहे."
"माझ्या वडिलांनी मरते वेळी जे लिहून ठेविलें आहे ते मी त्याला दिले आहे. तुम्ही हि ते वाचून पाहा पाहिजे तर." शान ची म्हणाला.
"ठीक आहे. उद्या सकाळी मी तुझ्या घरी येऊन ते वाचून तुमचा न्याय करीन." असे सांगून त्याने शान चीला पाठवून दिले.
नंतर त्यानें मेयला कळविले की तिनें उद्या शान चीच्या घरी सकाळी हजर राहावे. बरोबर आपल्या मुलाला हि घेऊन यावे.
शान चीने दुसऱ्या दिवशी न्यायाधीशाच्या स्वागताची खूप तयारी केली. आपल्या मित्रमडळींना बोलाविले. दिवाणखाना सजविला. न्यायाधिशासाठी एक खुर्ची सजवून ठेविली. त्यावर व्याघ्रचर्म अंथरलें. थोड्याच वेळांत पालखीत बसून आपल्या हुजऱ्याबरोबर न्यायाधीश शान चीच्या घरी आला. पालखीतून उतरून तो दरवाज्याशी आला. तेथे त्याने कोणाचे तरी अगदी वाकून स्वागत केले. नंतर मार्ग दाखविल्या प्रमाणे करून 'असे या.' 'येथे बसा' असें म्हणत त्या सजविलेल्या खुर्चीकड़े इशारा केला. आणि कोणाशी तरी बोलत बोलत आल्याप्रमाणे आंत आला.
व्याघ्रचर्माच्या खुर्चीवर त्याला बसावयास सांगून आपण दुसऱ्याच एका खुर्चीवर बसला. नंतर सुद्धा तो कोणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे बोलत होता.
“आपल्या बायकोने माझ्याकडे एक फिर्याद आणली आहे. त्या बाबतीत मी काय करूं...!! हं... हं... हं... असे आहे होय. पण आपल्या मुलाचे वागणे काही ठीक दिसत नाही. आपण आपल्या धाकट्या मुलाला काय देण्याचे ठरविले होते..! पूर्वेकडील घर...! तेवढ्यावर त्याचे कसें भागेल...! ओहो..! असं सांगा. बरें तर मी तसेंच करतो. मग हे सर्व काय धाकट्या मुलाचेच आहे...! ठीक जसे आपले म्हणणे आहे तसेंच मी करतो..."
न्यायाधीश भुताशी बोलत असलेले पाहून तेथे जमलेली सर्व मंडळी घाबरली. या बाबतीत न्यायाधिशाशी बोलण्यास कोणी तयार होईना. नंतर तोच उभा राहिला आणि जरा वाकून म्हणाला,
"मला जाण्याची आज्ञा असावी."
आणि मग ताठ उभा राहून चारी बाजूस पाहिले. व शान ची ला पाहून म्हणाला,
“तुझे वडीलच आतां माझ्याशी बोलत होते आणि आतां ते त्या बाजूला गेले आहेत. तूं ऐकलेच असशील आमचे बोलणे!"
"काही नाही ना?" शान ची म्हणाला.
“असं काय! चांगला उंच माणूस, गोल चेहऱ्याचा, गालाचे हाड जरा वर असलेला, भुरकट डोळे, लांब लांब भुवया, मोठेले कान, विखरलेली पांढरी दाढी, अधिकाऱ्याची टोपी होती डोक्याला. काळे बूट, लाल अंगरखा, कमरेला सोन्याचा पट्टा. बरोबर तेच राजप्रतिनिधि चिचेनच होते ना?" न्यायाधिशाने विचारलें.
"जिवंतपणी ते हुबेहूब असेच दिसत असत." तेथे जमलेल्या नातलगांनी व मित्रांनी सांगितले.
चिचेनच्या चित्रावरून त्याने हे वर्णन केले आहे असे कोणास हि वाटले नाही. म्हणून न्यायाधिशाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसला. त्यांना वाटले, खरोखरच चिचेन भूताच्या रूपाने न्यायाधिशाशी बोलला.
“तुमच्याजवळ दोन घरे आहेत ना??? आणि पूर्वेकडे आणखी एक घर आहे..! चला आणखी काही गोष्टी तेथे सांगेन." न्यायाधीश म्हणाला.
शान ची त्याला घेऊन पूर्वकडील घरांत गेला.
"हे घर आपल्या भावाला देण्यास तुमची काही हरकत आहे?"
"नाही काही नाही." शानची म्हणाला.
न्यायाधिशाने त्या घरांतल्या मधल्या खोलीत बसून शान चीची चोपडी पाहिली आणि म्हणाला,
"यात तर स्पष्टच लिहिले आहे. या घराशिवाय शान शूला काहीच दिलेले नाही." न्यायाधिशाचे बोलणे ऐकतांच मेय चिंतित झाली. तिला वाटले. आपल्या मुलाला बहुतेक न्याय मिळणार नाही.
"पण या घरांत चाळीस मण चांदी आणि चार मण सोनें पुरून ठेवले आहे. हे तुझ्या वडिलांनी मला आतां आत्तां सांगितले. अर्थातच ते शान शूच्या हिश्याचे आहे." न्यायाधीश म्हणाला.
यावर अविश्वास करून शान ची म्हणाला, "यांत कांही हि असू दे किती हि मण सोने चांदी असू दे मला त्यांतील काही नको."
"आणि जर तूं त्यावर अधिकार सांगू लागलास तर मला त्याचा विरोध करावा लागेल." असे सांगून न्यायाधिशाने त्या घराच्या पूर्वेकडील भिंतीजवळ खणविले.
तेथे पांच चांदीचे हंडे मिळाले, त्याच प्रमाणे पश्चिमेच्या बाजूला खणले तर तेथे आणखी चांदी भरलेले पांच हंडे मिळाले आणि एका लहान हंडयात सोने मिळाले. न्यायाधिशाने ते सर्व सोने चांदी शान शूला देवविले, या वेळी मात्र शान चीला वाटले की जर आपण वडिलांची संपत्ति नीटपणे अर्धी अर्धी वाटून घेतली असती तर यांतील अर्धे धन आपल्याला मिळाले असते.
पण आता त्याचा काय उपयोग...!!