३ ठकास महाठक २-२ (युवराज कथा)
( यातील सर्व पात्रे व कथा काल्पनिक आहेत. साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )
मनोज ,संदेश व युवराज यांनी ठरवलेला अॅक्शन प्लॅन पुढीलप्रमाणे होता .
संशोधन व विकास या खात्यांमध्ये एकूण पाच लोक काम करतात.त्या पाचही जणांवर ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर ते काय करतात कुठे जातात कुणाला भेटतात यावरती लक्ष ठेवून त्यातून काही धागा मिळतो का ते पाहणे .
ऑफिसमधील सर्वांना फोन कंपनीने दिलेले होते .त्या सर्वांचा सर्व्हिस प्रोव्हायडर एकच होता .संदेशच्या संबंधांचा उपयोग करून जर त्यांचे गेल्या महिन्यातील मोबाइलवरचे संभाषण उपलब्ध झाले तर ते व्यवस्थितपणे ऐकून त्यातून काही धागा मिळतो का ते पाहणे.
ऑफिस बंद झाल्यानंतर पुन्हा उघडेपर्यंत त्यावरती सतत लक्ष ठेवून कुणी बेकायदेशीररित्या आत जातो किंवा काय हे पाहणे.रखवालदाराला कोणत्या ना कोणत्या मार्गाने वश करून घेऊन बेकायदेशीररित्या आत जाऊन माहिती गोळा करता येणे सहज शक्य आहे .
हे सर्व करण्यासाठी बराच खर्च करावा लागेल असे संदेश म्हणाला .मनोजने पैशांची चिंता करू नका. हवा तेवढा खर्च होऊ दे.मला माझ्या कंपनीची गुपिते प्रतिस्पर्धी कंपनीला कशी मिळतात ते कळलेच पाहिजे.त्याशिवाय माझ्या कंपनीची होणारी घसरगुंडी थांबणार नाही .पुन्हा माझ्या कंपनीला चांगले दिवस येणार नाहीत .असे सांगून खर्चासाठी एका बड्या रकमेचा चेक संदेशकडे सुपूर्त केला .
मनोज गेल्यावर युवराजांनी संदेशला मनोजवरही लक्ष ठेवण्यास सांगितले .काही ठिकाणी काही वेळा कंपनीचा मालक आपली कंपनी निरनिराळ्या कारणांसाठी डुबवू पाहतो.निरनिराळया मार्गानी त्याने कंपनीतून अगोदरच पैसे काढलेले असतात .ते पैसे दुसऱ्या कुणाच्या तरी नावावर अगोदरच झालेले असतात .दिवाळे काढणे ही सुद्धा एक कला आहे .तेव्हा मनोजच आपली गुपिते प्रतिस्पर्धी कंपनीला विकत नसेलच असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. आपल्याकडे येणे आणि गुपिते चोरीला कशी जातात ते शोधून काढायला सांगणे, ही संचालक मंडळाला व कंट्रोलर ऑफ कंपनीला बनवण्याची एक चाल असू शकते .आपल्याला सर्वच दृष्टीने काळजी घेतली पाहिजे .सर्व दृष्टीकोनातून तपास केला पाहिजे .
सतत आठ दिवस डिपार्टमेंटमधील पाच जणांवर लक्ष ठेवल्यावर त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही .त्यांच्या वागण्यात काहीही संशयास्पद आढळले नाही .कुणाही संशयास्पद माणसाची त्यांनी भेट घेतली नाही
सर्व्हिस प्रोव्हायडरकडून गुप्त मार्गाने अॉफिसमधील लोकांच्या संभाषणाचे गेल्या महिन्याभराचे रेकॉर्डिंग मिळविण्यात आले. या सर्व संभाषणाची छाननी करणे, त्यातून काही धागा सापडतो का ते पाहणे, हे एक मोठे काम होते .मोबाइलमधील सर्व संभाषण ऐकून त्यातूनही काहीही धागा हाती लागला नाही .
कंपनीच्या ऑफिसच्या समोरील गच्चीवरून आठ दिवस सतत लक्ष ठेवल्यावर रात्री अॉफिसमध्ये कुणी येत जात नाही असे आढळून आले .रखवालदार प्रामाणिक होता . कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नाही .
मनोजच्या कल्पनेप्रमाणे सर्व स्टाफ प्रामाणिक होता असे सिद्ध झाले.परंतु एक सर्वस्वी वेगळीच गोष्ट सतत लक्ष ठेवणाऱ्या संदेशच्या माणसाच्या लक्षात आली.ऑफिसला लागून एक मोठे गोदाम होते. त्या गोदामात काही संशयास्पद हालचाली होताना संदेशच्या माणसाला आढळून आल्या. रात्री दहाच्या सुमाराला एक ट्रक तिथे येऊन उभा राहतो.ट्रकमधून काही माणसे खाली उतरतात .रखवालदार गोदामाचे दरवाजे उघडतो ती आत शिरतात व दरवाजे बंद केले जातात.पहाटे पाच वाजता पुन्हा तो ट्रक तिथे येतो व ती माणसे त्यात बसून निघून जातात. गोदामाबाहेर केव्हाही ट्रक येणे त्यातून माल उतरणे व माल चढविणे आपण समजू शकतो .परंतु रात्री ट्रक येतो माणसे उतरतात व पहाटे पुन्हा परत जातात .हे गौडबंगाल काय आहे ते कळत नाही. असा रिपोर्ट संदेशने युवराज व मनोज याना दिला .संदेशच्या माणसाने इन्फ्रारेड कॅमेराच्या साह्याने त्या माणसांची फिल्मही घेतली होती .ती फिल्म संदेश व युवराज या दोघांनीही लक्षपूर्वक पाहिली.ती माणसे गोदामात येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी दिसत नव्हती .त्यांचे पोशाख व हालचाल त्यांचे काहीतरी निराळेच काम असले पाहिजे असे स्पष्टपणे दर्शवीत होते .
ही फिल्म लक्षपूर्वक दोनदा पाहिल्यानंतर युवराजांच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना चमकून गेली.मनोजच्या कंपनीची गुपिते ही गोदामात येणारी माणसे चोरतात असे स्पष्टपणे युवराज संदेशजवळ म्हणाले.तुम्ही आत गेल्यावर तुम्हाला वेगळेच काहीतरी दृश्य दिसेल असेही युवराज म्हणाले. कोणत्या ना कोणत्या मार्गाने गोदामात जाऊन तिथे काय आहे ते पाहिले पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले .या विलक्षण फितुरीचे कुलूप उघडण्याची किल्ली आपल्याला गोदामात मिळेल याबद्दल युवराजांची मनोमन खात्री पटली.ही चोरी कशी होत असेल याबद्दलही त्यांनी कल्पना केली .त्यांनी आपली कल्पना संदेशजवळ बोलून दाखविली .
रात्री ती माणसे येत जात असल्यामुळे रात्री तिथे जाणे शक्य नव्हते.दिवसा ढवळ्या आपण जर तिथे गेलो आणि कुलूप उघडू लागलो तर तेथील रखवालदार आपल्याला प्रतिबंध करणार.रखवालदाराचे तोंड काही ना काही उपायांनी बंद केले पाहिजे.संदेशने ते काम पार पाडण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली.मी काय करायचे ते बघतो असे सांगितले.संदेशने रखवालदाराला पळवून आणले. त्याला आम्ही सीबीआयची माणसे आहोत तू आमच्याशी सहकार्य केले नाहीस तर गोत्यात येशील वगैरे सांगितले आणि त्याला भक्कम लाच दिली. त्याचे तोंड बंद राहील अशी व्यवस्था केली. त्याला चांगल्या पगारावर कायमची नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले .जर गोदामात शिरल्यावर कुणी चौकशीला आला तर काय करायचे ते त्या वेळेला पाहून घेऊ असे ठरविण्यात आले .दिवसा आपण आत शिरायचे रखवालदार बाहेरून कुलूप लावून घेईल .व आपण आतून खूण केल्यावर पुन्हा तो उघडील अशी व्यवस्था करण्यात आली.
दिवसा आत शिरल्यानंतर त्यांना जे काही आढळून आले त्यांनी संदेश व त्याची माणसे स्तिमित झाली.गोदामात काहीही माल नव्हता .भिंतीजवळ रांगेने चार पाच संगणक लावून ठेवलेले होते . आतील व्यवस्था पॉश होती.आरामासाठी सोफा, छोटे किचन, टॉयलेट इ. सर्व व्यवस्था होती.येथे संगणक ठेवून हे लोक रात्री काय करीत असले पाहिजेत ते लक्षात येत नव्हते.नीट निरीक्षण केल्यावर केबलचे जाळे कन्सील्ड आहे असे लक्षात आले.या भिंतीला लागूनच मनोजचे ऑफिस होते .या केबल्स अंतर्गत मनोजच्या केबलना जोडलेल्या तर नसतील ना? त्यामार्फत सर्व गुपिते चोरून ती प्रतिस्पर्धी कंपनीला भक्कम किंमत घेऊन पुरवली जात असतील . किंवा हा सर्व उपद्व्याप, खटाटोप ,प्रतिस्पर्धी कंपनीनेच गुपिते चोरण्यासाठी केला असेल अशी रास्त शंका संदेशला आली.अशीच शंका युवराजांनी ती फिल्म बघितल्यानंतर संदेशजवळ बोलून दाखविली होती.युवराजांनी अगोदरच ही शंका बोलून दाखवलेली असल्यामुळे संदेशने त्या दृष्टीने पाहणी केली होती.त्या दिवशी संदेशजवळ संगणकतज्ञ नव्हता.दुसऱ्या दिवशी दोन संगणकतज्ञाना घेऊन संदेश पुन्हा त्या गोदामात गेला .
त्या संगणकतज्ञानी तीन चार तासांमध्ये डाटा कसा चोरला जातो.ते शोधून काढले .मुद्दाम हे गोदाम भाड्याने घेऊन नंतर तिथे भिंत फोडून संगणक तज्ञांमार्फत मनोजच्या अंतर्गत केबल्सना या केबल्स जोडण्यात आल्या.हे सर्व जोडकाम व सतत केले जाणारे गुपितांचे चौर्यकर्म मनोजच्या माणसांना कोणतीही शंका येऊ नये अशा बेमालूमपणे करण्यात आले होते .संदेशनेही हे सर्व काम आपल्या संगणक तज्ञांमार्फत चौर्यकर्म करणाऱ्या कुणालाही काहीही शंका येऊ नये अशाप्रकारे बेमालूमपणे केले होते.
मनोजला नक्की गुपिते कशी चोरली जातात ते प्रात्यक्षिकांसह दाखविण्यात आले .त्या माणसांना पकडणे, त्यांच्यावर पोलिस केस करणे,त्यांचा बोलविता धनी कोण आहे ते शोधून काढणे , नंतर ती केस कोर्टात लढविणे.प्रत्यक्ष चोरी करणाऱ्याला व ही चोरी करायला लावणाऱ्या व्यक्तींना शिक्षा देणे,वेळ काढू व खर्चिक होते. या सर्व गोष्टी कराव्यात की करू नये याबद्दल मनोजशी सल्लामसलत करण्यात आली .
युवराजांनी प्रतिस्पर्धी कंपनीला अद्दल घडवण्यासाठी एक वेगळीच युक्ती सुचवली .काहीही अॅक्शन न घेता आपले कॉम्प्युटर्स तिथून काढून घ्यावेत .दुसऱ्या ठिकाणी संशोधन व विकास हा विभाग हलवावा.संगणकाचे व केबल्सचे जाळे तसेच राहू द्यावे.तिथे दुसरे संगणक बसवावेत . त्या संगणकांच्या मार्फत चुकीचे संदेश प्रतिस्पर्धी कंपनीला जातील असे पाहावे .त्या संदेशानुसार प्रतिस्पर्धी कंपनी आपले प्रकल्प राबवील.चुकीचे संदेश जाणीवपूर्वक दिल्यामुळे व त्याप्रमाणे त्या कंपनीने काम केल्यामुळे ती कंपनी गोत्यात येईल .आपल्याला फसवले जात आहे असे लक्षात येईपर्यंत त्या कंपनीचे बरेच नुकसान झालेले असेल.
पोलिस केस करून, कोर्टात जाऊन ,वेळ व पैसा खर्च करून प्रतिपक्षाला शिक्षा करण्यापेक्षा (कोर्ट कचेरीमध्ये पैसा खर्च करून स्पर्धा कंपनीला किती शिक्षा होईल हेही नक्की सांगता येणार नाही)ही शिक्षा बेमालूम ठरेल असे युवराज यांनी सुचविले .
मनोजला व संदेशला ही युवराजांची कल्पना अतिशय आवडली .हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर ताबडतोब संगणक मनोजने डिस्कनेक्ट केले होते.रंगकाम करायचे आहे असे सर्वाना सांगण्यात आले .प्रत्यक्ष रंगकामाचा देखावाही करण्यात आला. नंतर अंतर्गत सोयीसाठी हा विभाग दुसरीकडे हलविण्यात आला.या विभागातील तीन चार जणांना नक्की काय होत आहे याची कल्पना दिली होती.हे सर्व करताना अत्यंत गुप्तता पाळली जात होती .प्रतिस्पर्धी कंपनीला यातील कोणतीही गोष्ट न कळणे योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अत्यावश्यक होते . ऑफिसमधील इतर कुणालाही काय चालले आहे याची कल्पना येऊ दिली नाही .त्या खोलीत सर्वस्वी नवीन माणसे नेमण्यात आली .चुकीचे संदेश देणे हेच त्यांचे काम होते .
तीन चार महिन्यांमध्ये प्रतिस्पर्धी कंपनीला काय होत आहे त्याची कल्पना आली .प्रतिस्पर्धी कंपनीचे कितीतरी उत्पादन फुकट गेले.त्यामुळे बरेच नुकसान त्या कंपनीला सोसावे लागले .शेवटी प्रतिस्पर्धी कंपनीने आपले संगणक काढून घेतले .त्या गोदामाचा वापर गोदाम म्हणून करण्याला सुरुवात केली.
*युवराजानी अप्रत्यक्षरित्या मनोज मार्फत प्रतिस्पर्धी कंपनीला शिकवलेला धडा त्या कंपनीचे व्यवस्थापक दीर्घकाळ विसरणार नाहीत.*
(समाप्त )
१९/४/२०१९©प्रभाकर पटवर्धन