१ त्रयाणाम् धूर्तानाम्(युवराज कथा) (तीन ठग)
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे .वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा )
भाग पहिला
( १)
संदेश त्याला सांगितलेल्या कामाचा अहवाल देण्यासाठी युवराजांकडे आला होता .तो बोलत असताना त्याच्या मोबाइलची रिंग वाजली .फोनवर तो बोलत असताना युवराज त्याचे एका बाजून होणारे बोलणे ऐकत होते .ते बोलणे ऐकून त्यांना कुतूहल निर्माण झाले .संदेशचे बोलणे संपल्यावर त्यांनी अरे काय गडबड आहे म्हणून त्याला विचारले .संदेशने त्यांना आलेल्या फोनच्या संदर्भात माहिती सांगितली.
रंजन नावाचा त्याचा एक मित्र आहे.त्याला पैशाची गरज पडल्यामुळे तो सावकाराकडे दागिने गहाण ठेवून कर्जावू पैसे घेण्यासाठी गेला होता.हा सावकार अनियमित व्यवहारांसाठी प्रसिद्ध आहे .त्याचा व्याजाचा दर जास्त असतो परंतु आपली गरज भागते.त्या ठिकाणी त्याने काही चारचाकी निरनिराळ्या मेकच्या पाहिल्या.हा सावकार सोने नाणे याप्रमाणेच जमीन दोनचाकी चारचाकी तारण म्हणून घेऊन पैसे देतो . चारचाकी बघून त्याला नवल वाटले नाही परंतु त्यातील एक गाडी त्याच्या मित्राची होती.त्याच्या मित्राने हौस म्हणून दोन गाड्या घेतल्या.त्या गाड्या बँकेकडून कर्ज काढून घेतल्या होत्या. यातील एक गाडी त्याने पत्नीसाठी म्हणून घेतली होती. त्याची बायको त्या गाडीचा विशेष वापर करीत नव्हती.एक दिवस त्यांने वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली. आम्ही आपली गाडी चांगल्या उत्पनावर भाड्याने लावून देऊ अशा स्वरूपाची ती जाहिरात होती .दिलेल्या नंबरवर फोन करून त्याचा मित्र ऑफिसवर गेला .त्याच्याबरोबर सहज म्हणून रंजन गेला होता.
ऑफिस छोटेसे पण इम्प्रेसिव्ह होते. तेथे दोन लँडलाइन होत्या शिवाय मोबाइलही होता त्यावर अधून मधून फोन येत होते .त्याचा बिझनेस दणक्यात चालला होता असे वाटत होते .त्याचा मुख्य बिझनेस गरजूंच्या गाड्या भाड्याने लावून देणे हा होता .तो कायदेशीर करार करीत असे .गाडीप्रमाणे तो पाचशे ते हजार रुपये दर दिवसाला भाडे म्हणून मालकाला देत असे .तीच गाडी तो गरजूंना भाड्याने देत असे .दोन्ही बाजूनी तो मध्यस्थ म्हणून पाच टक्के कमिशन घेत असे .महिन्याचे भाडे तो मालकाला महिन्याच्या सुरुवातीला देवून टाकीत असे . मालकाने बँक अकाऊंट नंबर दिला तर पुढच्या महिन्यापासून पैसे दर महिन्याच्या एक तारखेला अकाऊंटला जमा होत.मालक प्रत्यक्ष येऊन रोख रक्कमहि घेऊ शकत असे.दर महिन्याला येणे अडचणीचे असल्यामुळे अकाउंट नंबरला पैसे जमा होणे सोयीचे पडे.सर्व व्यवहार व्यवस्थित व कायदेशीर वाटत होता .
या माझ्या मित्राच्या (रंजनच्या) मित्राची गाडी सहाशे रुपये रोज याप्रमाणे भाड्याने देण्यात आली.ड्रावरमधून सतरा हजार एकशे रुपये कॅश काढून त्या एजंटने रंजनच्या मित्राला दिले.नंतर पुढे काय झाले ते माहीत नाही.रंजन ती गोष्ट नंतर विसरूनही गेला होता .सावकारांच्या तिथे ती गाडी पाहून त्याला नवल वाटले.सावकाराशी त्याची ओळख असल्यामुळे त्याने सहज चौकशी केली.तेव्हा सावकाराने या गाडीच्या मालकाने गाडी तारण ठेवून पाच लाख रुपये नेले आहेत असे सांगितले.रंजनच्या मित्राला एवढी पैशाची गरज का पडली असावी म्हणून रंजनने त्याला फोन केला .त्याच्या मित्राने गाडी गहाण ठेवलेली नाही तर भाड्याने लावली तिथेच आहे म्हणून सांगितले.रंजनने मित्राला त्याची गाडी सावकारांकडे पहिली वगैरे सर्व हकीगत सांगितली .त्याचा मित्र लाल पिवळा होऊन लगेच ज्या एजंटच्या मार्फत गाडी भाड्याने लावली त्याच्याकडे जाणार होता परंतु मला सर्वच व्यवहार संशयास्पद वाटल्यामुळे अगोदर कुणाचा तरी सल्ला घ्यावा आणि नंतर त्याप्रमाणे वागावे असे मी त्याला सुचविले .या बाबतीत कुणाचा सल्ला घ्यावा असे तो मला विचारीत होता .मी त्याला तुमचे नाव सुचविले आहे .तुमचा फोन नंबरही दिला आहे .अपॉइंटमेंटसाठी त्याचा फोन बाहेर विजयाला येऊनही गेला असेल .एवढी सर्व हकिगत सांगून संदेश बोलण्याचे थांबला .
युवराजांनी संदेशला रंजनच्या मित्राचे नाव विचारले. इंटरकॉमवर विजयाला एवढ्यात रंजन किंवा कुणाल अशा कुणी अपॉइंटमेंटसाठी फोन केला होता का असे विचारले. विजयाने होय रंजन नावाच्या माणसाने फोन केला होता त्याला मी उद्या सकाळी अकराची वेळ दिली आहे असे सांगितले.त्यावर ठीक असे म्हणून युवराजांनी इंटरकॉम बंद केला .आणि संदेशला उद्या अकरा वाजता तूही हजर रहा म्हणून सांगितले.
(२)
अकराला दहा मिनिटे कमी असतानाच दुसऱ्या दिवशी रंजन व त्याचा मित्र कुणाल ऑफिसमध्ये आले.युवराज नेहमीप्रमाणे दहा वाजता ऑफिसमध्ये आले होते . एवढ्यात संदेश आला आणि तो सरळ युवराजांच्या केबिनमध्ये गेला .त्याला पाहताच युवराजांनी इंटरकॉमवर विजयाला पाहुण्याना आत पाठविण्यास सांगितले .रंजन व कुणाल दोघेही दबकत दबकतच आत आले. युवराजांचा दबदबाच तसा होता .त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दोघांवर दडपण आल्यासारखे वाटत होते.युवराजांनी कडक कॉफी सांगितली आणि दोघांना बोला म्हणून सांगितले .
कुणालने रंजनने संदेशला सांगितलेली सर्व कहाणी सांगितली.आणि अाता मी काय करू असे विचारले . युवराजांनी रंजनला विचारले की त्या सावकाराकडे जी गाडी तू बघितली ती कुणालची होती याची तुला शंभर टक्के खात्री आहे का ?त्यावर रंजनने होय म्हणून सांगितले .काल संदेशकडून सर्व हकिगत ऐकल्यावर युवराजांनी मनात काही आडाखे तर्क बांधले होते .त्यांनी काल संदेशला त्या सावकाराकडे व असे व्यवहार करणाऱ्या इतर सावकारांकडे असलेल्या गाड्यांची सर्वदृष्टीने तपासणी करण्यास सांगितले होते .
युवराजांनी बांधलेला तर्क व संदेशने पुरविलेली माहिती यांच्या आधारे युवराज बोलू लागले.मला ही तीन किंवा चार माणसाची रॅकेट वाटते .यांनी कुणाला तरी लुबाडून किंवाआणखी कुठल्या मार्गाने बराच पैसा गोळा केला आहे .त्यातील एक "संजय आणि कंपनी"च्या नावाने दुकान थाटून बसला आहे .भाड्याने लावतो म्हणून गाड्या घेतल्या जातात .आकर्षक मोबदला दर महिन्याला आगाऊ मिळत असल्यामुळे व तो मोबदला दर महिन्याला खात्यावर जमा होत असल्यामुळे गाड्या भाड्याने दिल्या जातात .थाटलेले पॉश ऑफिस, त्यात नोकरीला ठेवलेल्या चटपटीत मुली ,त्या संजयचे गोड, छाप पाडणारे,मधुर बोलणे मधून मधून येणारे फेक फोन यामुळे आलेला माणूस कंपनी विश्वासू आहे,मोठी आहे ,उलाढाल चांगली आहे ,आपली गाडी सेफ आहे, असे समजतो व निश्चिंतपणे आपली गाडी त्याच्याकडे सोपवितो.त्या गाडीची विल्हेवाट दोन तीन प्रकारे लावली जात असावी .एक : सावकाराकडे तारण म्हणून ठेवून त्यावर कर्ज घेतले जाते.दोन :गाडीचा संपूर्ण मेकओव्हर करून खोट्या नावाने खोट्या नंबरवर ती परराज्यात विकली जाते.तीन :: गाडी संपूर्णपणे डिस्मेंटल करून तिचे सुटे भाग बाजारात विकले जातात.
आपला धंदा व्यवस्थित वाटावा म्हणून काही गाड्या ड्रायव्हर ठेवून भाड्यानेही दिल्या जात असाव्यात ज्यावेळी गाडी सावकाराकडे तारण ठेवून कर्ज घेतले जाते त्यावेळी संजय जात नसावा.संजयचा पार्टनर जात असावा.जर गफलत लक्षात आलीच तर संजय गाडी चोरीला गेली आणि नंतर त्या चोरांनी ती सावकारांकडे ठेवली असे म्हणून नामानिराळा होत असावा.ज्याच्याकडे गाडी भाड्याने लावली तो,ज्याने सावकाराकडे गाडी तारण ठेवली तो,ज्याने परराज्यात गाडी विकली तो ,हे सर्व एखादा पकडला गेल्यास,एकमेकांशी आपला संबंध नाही असे म्हणून नामानिराळे होत असावेत.ज्यावेळी एखादा, "संजय आणि कंपनी"च्या ऑफिसमध्ये येतो त्यावेळी कुणीतरी त्याला खोटे फोन करतो आणि संजय फोनवर मोठमोठ्या बाता मारून आलेल्या माणसांवर छाप पाडतो.जाहिरात पाहून चौकशी करण्यासाठी आलेला मनुष्य या सर्व रुबाबाने संमोहित होतो आणि आपली गाडी त्यांच्या हाती सोपवतो .
हे भामटे आकाशातून पडले नाहीत .इथेच लहान मोठ्या चोर्या करून लोकांकडून त्यांनी पैसा गोळा केला असला पाहिजे.व आता हा व्यवसाय सुरू केला असला पाहिजे . असे चोर भामटे एकच प्रकारे सतत फसवणूक करीत नाहीत .कारण ती उघडकीला येण्याचा संभव असतो . हे भामटे थोड्याच दिवसात धंदा गुंडाळून गायब होतील .नवीन नावाने नवीन शहरात राज्यात पुन्हा आपले बस्तान बसवतील. त्यामुळे तक्रारी आल्यावरही त्यांना शोधून काढणे पोलिसांना कठीण जाते.
जर कुणाल लगेच "संजय आणि कंपनी"कडे गाडीची चौकशी करण्यासाठी गेला .किंवा पोलिसांत तक्रार करून पोलीस चौकशीसाठी गेले तर ती मंडळी सावध होतील .आणि पटकन सर्व धंदा गुंडाळून गुप्त होतील .त्यांना पोलिसांमार्फत आत्ताच पकडले तर त्यांच्यावर गुन्हा शाबीत करणे कदाचित कठीण जाईल .हे भामटे अगोदर कुठे होते काय करीत होते त्यांनी या धंद्यात किती लोकांना आत्तापर्यंत गंडविले ती सर्व माहिती पुराव्यासहीत गोळा केली पाहिजे . आणि मगच त्यांना पकडले पाहिजे त्यांना पकडणे महत्त्वाचे नाही तर शिक्षा होणे महत्त्वाचे आहे .
कुणाल तुम्ही जाऊन पोलिसांकडे एफआयआर लिहा. पोलिस इन्स्पेक्टर शामराव माझ्या ओळखीचे आहेत .त्यांना सांगून मी या लोकांवर लक्ष ठेवण्यास सांगतो .त्यांना संशय येऊन ते पळून जाऊ लागले तर लगेच अटक होईल असे पाहातो .काही दिवसात संदेश या लोकांबद्दल पूर्वीची सर्व माहिती खणून काढील.मी म्हटले त्याप्रमाणेच सर्व व्यवहार आहेत की त्यात फरक आहे ते कळेल .सर्व चित्र स्पष्ट झाल्यावर नंतर अापण काय करायचे ते ठरवू .तोपर्यंत तुम्ही सावकार किंवा संजय यांच्याकडे जाऊ नका असे म्हणून युवराज बोलण्याचे थांबले .
भाग दुसरा
(त्रयाणाम् धूर्तानाम्) तीन ठग
(युवराज कथा)
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे .वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा )
(१)
कुणाल व रंजन गेल्यानंतर युवराजांनी शामरावांना फोन लावला.या टोळीबद्दल सविस्तर माहिती दिली .पोलिसांमार्फत संजयवर कडक नजर ठेवण्यास सांगितले .विशेषतः त्यांच्याकडे आलेली गाडी सावकाराकडे कोण घेऊन जातो किंवा आणखी कुठे नेतो ते माहीत करून घेणे आवश्यक होते .केवळ संजय नव्हे तर संपूर्ण टोळी हाती लागणे गरजेचे होते.कुणाल देशमुख नावाची व्यक्ती एफआयआर नोंदविण्यास येईल तो नोंदवून घ्या म्हणून बोरिवली पोलिस स्टेशनला सांगा. परंतु रुटीन चौकशीसाठी पोलिस संजयकडे जाता कामा नये हेही त्यांनी कटाक्षाने सांगितले.
संदेशला त्यांनी संजयवर चौवीस तास वॉच ठेवण्यास सांगितले होते.त्याचप्रमाणे असे व्यवहार करणाऱ्या परिसरातील तीन चार सावकारांवरही नजर ठेवण्यास सांगितले होते .विशेषत: सावकारांकडे गाडी तारण ठेवण्यासाठी कोण येतो.तो कुठे राहतो.त्या सर्वांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते .त्याचप्रमाणे संजय व त्याच्या टोळीतील संभाव्य लोक यांचे पूर्व चरित्रही शक्य झाल्यास खणून काढण्यास सांगितले होते .संदेशचे अशा काळ्या धंद्यांत गुंतलेल्या लोकांमध्ये खबरे होते.त्यांची मदत तो घेईल याची युवराजाना खात्री होती.ज्यांच्या ज्यांच्या गाड्या चोरीला गेल्या होत्या व त्याचा तपास लागत नव्हता अशा लोकांची एक यादी बनविण्यास सांगितली होती . त्याचप्रमाणे वर्तमानपत्र ऑफिसमध्ये जाऊन जाहिरात कोण देतो त्याचीही चौकशी करण्यास सांगितले होते .अशा प्रकारे संदेश,पोलिस व खबरे यांच्या जाळ्यांमध्ये हे नक्की सापडणार याची युवराजांना खात्री होती.
आठ दिवसांमध्ये संदेशने सर्व चौकशी करून पुढील प्रमाणे युवराजाना रिपोर्ट दिला.
(२)
संजय सिंग भानू सिंग करण सिंग असे तीन मित्र बिहारमधून सहा वर्षांपूर्वी मुंबईत आले .तिघेही सहकार्याने काम करीत असतात.
संजय खिसे कापण्यात कुशल होता .त्याने पाकीट मारल्यानंतर ते कुशलतेने तो भानूकडे देत असे.त्यामुळे जरी तो पकडला गेला तरी त्याच्या जवळ काहीच मुद्देमाल सापडत नसे.
करण दूरवरून या दोघांवर लक्ष ठेवून असे .पोलीस आल्यास तो त्यांना सूचना देत असे. काही गडबड उडाल्यास तो गोंधळ घालून सर्वांचे लक्ष तिकडे वेधीत असे.
भानू सोनसाखळी चोर होता .स्त्रियांच्या गळ्यातील मंगळसूत्र सोनसाखळी त्याचप्रमाणे हातातील पर्स उडविण्यात तो कुशल होता .ज्यावेळी भानू हातचलाखी करीत असे त्या वेळी संजय व करण त्याला साहाय्य करीत असत .
ते कधी मध्य रेल्वेवर कधी पश्चिम रेल्वेवर तर कधी हार्बर लाइनवर निरनिराळ्या वेळी जात असत .गर्दीच्या वेळा ते साधत असत.तिघांजवळही तीनही लाईनवरील फर्स्टक्लासचा पास असे. पोशाख एखादा अॉफिसर व्यावसायिक यांच्यासारखा असे. त्यामुळे त्यांचा पटकन संशय येत नसे .वेषांतर करण्यातही ते कुशल होते.
काही महिन्यांत त्यांनी बऱ्यापैकी पैसा गोळा केला . झोपडपट्टीऐवजी आता ते ब्लॉक घेऊन राहू लागले.त्यातच त्यांची गाडी चोरणार्या टोळीशी ओळख झाली.गाडी चोरणे,तिचा कायापालट करणे,खोटे कागदपत्र तयार करणे, गाडी परराज्यात नेऊन विकणे ,यामध्ये ते कुशल झाले त्याचप्रमाणे यातील अनेक घटकांशी त्यांची मैत्रीही झाली . गाडी चोरल्यानंतर काही तासामध्ये तिचे सुटे भाग करून ते चोरबाजारात विकणे या धंद्यातील लोकांशी त्यांची ओळख झाली .
थोडक्यात ते अनेक गोष्टींमध्ये कुशल झाले.मध्यंतरी त्यांनी बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी येणाऱ्या व पैसे काढून जाणाऱ्या लोकांनाही बऱ्यापैकी टोपी घातली .थोडक्यात ते ऑल राउंडर झाले .यामध्ये ते तिघेही केव्हाना केव्हा पोलिसांकडून पकडले गेले.प्रत्येक जण दोन चार महिने तुरुंगाची हवा व पोलिसांचे रट्टे खाऊन आला .
आता त्यांना अनेक धंद्यांची ओळख झाली होती.त्याचप्रमाणे धंद्यातील लोकांशीही त्यांची चांगलीच ओळख झाली होती.त्यांनी जागा बदलण्याचे ठरविले .त्यानी बोरिवली आपले कार्यक्षेत्र म्हणून निश्चित केले.येथे येऊन त्यांनी चांगल्या वस्तीत एक फ्लॅट भाड्याने घेतला .एक छानपैकी ऑफिस थाटले .निरनिराळ्या सावकारांशी ओळखी करून घेतल्या.आपला धंदा येथे तेजीत सुरू केला .करमणूक म्हणून, हाताला लागलेली सवय म्हणून,आपली कला विसरू नये म्हणून,ते पाकीटमारी, सोनसाखळी मंगळसूत्र चोरणे,बँकेतील ग्राहकांना गंडा घालणे,वगेरे गोष्टी कधीतरी करतात परंतु त्यांचा आता मुख्य व्यवसाय वेगळा आहे .
त्यांची सर्व माहिती माझ्या माणसांनी पोलिसांकडून गोळा करून आणली आहे .कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामध्ये ते मुंबई पोलिसांनाही हवे आहेत
बोरिवलीमध्येही त्यांनी मुंबईचाच व्यवसाय थोडा वेगळ्या स्वरूपात चालू ठेवला आहे.असे म्हणून संदेशने मुंबईतील गुन्ह्यांचे सर्व कागदपत्र पश्चिम उपनगरातील सावकारांची यादी, त्यांचेकडे तारण म्हणून ठेवलेल्या गाडय़ा, त्या लोकांची नावे,चोरीला गेलेल्या गाड्या ,इत्यादी सर्व माहिती युवराजांपुढे कागदपत्रांच्या स्वरुपात ठेवली.यातील काही माहिती त्याने शामरावांच्या सहकार्याने मिळविलेली होती.
(३)
युवराजांनी फोन करून शामरावाना ऑफिसवर बोलवून घेतले.शामराव आल्यावर त्यांना संदेशने सर्व माहिती दिली.त्यातील बरीचशी माहिती शामरावानी त्यांच्या यंत्रणेमार्फत अगोदरच गोळा केली होती. बोरिवलीमध्ये या टोळीने पूर्व विभागात एक मोठा फ्लॅट भाड्याने घेतला होता . पश्चिम विभागात पॉश ऑफिस थाटले होते. संजयकडे कुणी ग्राहक आल्यानंतर संजय मिसकॉल देत असे.त्यानंतर भानू त्याला फोन करीत असे. बोलण्यातून ग्राहकांवर छाप टाकली जात असे . तिघांनी इथेही गाड्या चोरणे, मोकळ्या करून सुटे भाग विकणे, गाड्या परराज्यात विकणे, इत्यादी उद्योगांमध्ये सावकाराकडे गाड्या गहाण टाकून पैसे उचलणे,हा नवीन उद्योग सुरू केला होता.तिघांनाही एकाच वेळी पकडून त्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करणे आवश्यक होते .ज्यांच्या साह्याने ते हा उद्योग करीत असत त्यांनाही पकडणे आवश्यक होते .एकाच वेळी हे तिघे, त्याचप्रमाणे गाड्यांचे सुटे भाग करणारे मेकॅनिक ,ते विकत घेणारे चोरबाजारातील व्यावसायिक,परराज्यातील एजंट , खोटे दस्तऐवज तयार करण्यात निष्णात असलेले,या सर्वांना एकाचवेळी पकडून पुरावे गोळा करून,साक्षी पुराव्यासहित त्यांचे गुन्हे कोर्टात शाबित होऊन त्यांना शिक्षा होणे व संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त होणे हे एक मोठे अभियान होते शामरावासाठी एक मोठे आव्हान होते त्यासाठी मोठी तयारी आवश्यक होती .
शामराव हे सर्व करण्यात निष्णात होते .हे सर्व करीत असताना राजकीय दबाव येणे अपरिहार्य होते .त्याचप्रमाणे ज्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले होते त्यांच्याही दबावाला तोंड द्यावे लागले असते .हे सर्व टाळण्यासाठी शामरावांची कदाचित बदलीही झाली असती .
शामरावांनी मोठा सापळा रचून, एअरटाइट साक्षी पुरावे गोळा करून ,कोर्टात केस उभी केली.कमी जास्त प्रमाणात संबंधितांना शिक्षाही झाल्या .एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त केल्याचे शामरावांना व युवराजाना समाधान मिळाले.युवराज व शामराव यांच्या खात्यावर जमा असलेल्या अनेक केसेसमध्ये आणखी एकाची भर पडली .
२३/३/२०१९©प्रभाकर पटवर्धन