Get it on Google Play
Download on the App Store

२ वादळ २-२

संध्याकाळचे चार वाजलेले असताना  एक पर्वतप्राय लाट आली. त्या लाटेने जहाजाला खेळण्यासारखे उंच उचलले आणि अलगद एका मोठ्या वाळूच्या राशीवर नेऊन ठेविले.

*त्या सुप्रसिद्ध वाळूच्या पट्ट्यामध्ये जहाज फसले होते.*

वादळ शमेपर्यंत सुटकेसाठी  काहीही करणे शक्य नव्हते .सोसाट्याचा वारा,धुँवाधार पाऊस, यामध्ये फडकणारा लाल बावटा किंवा आकाशात फायर करून निर्माण केलेला लाल धूर कुणाच्याही लक्षात येणे शक्य नव्हते  

तीन दिवस वादळ चालले होते .त्यानंतर वादळाचा जोर ओसरला .तोपर्यंत सुटकेसाठी प्रयत्न करण्यांत काही अर्थ नव्हता 

नंतर सुटकेसाठी  प्रयत्नांना सुरुवात झाली .

एखादे जहाज सहज जवळून जाईल आणि आपण त्याला बावटा दाखवून संकटग्रस्त आहे असे लक्षात आणून देऊन मदत मागू, अशी शक्यता जवळजवळ नव्हती .या सरकत्या वाळूच्या पट्ट्याला घाबरून सर्व जहाजे लांब अंतरावरून जात असत .आमच्या फसलेल्या जहाजाच्या  दिशेने एखादा दुर्बिणीतून पाहात असेल तरच त्याला आमचे फसलेले जहाज लक्षात येणे शक्य होते.किंवा कदाचित एखादा माहितगार नसलेला जवळून जात असल्यास त्याला संदेश देणे शक्य होते . कांही खलाशी  आलटून पालटून समुद्राच्या बाजूला दुर्बीण लावून बसले होते.यदा कदाचित एखादे जहाज दिसल्यास त्याला लाल बावटा दाखवून व आकाशात फायर करून  संकटग्रस्ततेची सूचना ते देणार होते.

रेडिओ ऑपरेटर बंद पडलेली संदेश यंत्रणा दुरुस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न,यंत्रणा बंद पडल्यापासूनच करीत होता .मरीन इंजिनिअर त्याला मदत करीत होता .ती यंत्रणा दुरुस्त झाल्यास आम्हाला संकटग्रस्त असल्याची सूचना देता येणार होती .ती मिळताच एखादे ओढून बाहेर काढणारे (टग शिप) जहाज आमच्या मदतीला आले असते.आणि आमची सुटका झाली असती. 

एखादे विमान किंवा हेलिकॉप्टर आकाशातून जात असल्यास त्यालाही लाल बावट्याद्वारे मदतीची सूचना देणे शक्य होते.काही खलाशी आलटून पालटून आकाशाकडे डोळे लावून बसले होते . 

लाल बावट्याप्रमाणेच आकाशात लाल धूर निर्माण करणाऱ्या गोळ्या बंदुकीतून उडवून संकटग्रस्त असल्याची सूचना देणे शक्य होते .त्यासाठी योग्य ती बंदूक व गोळ्या आमच्या जवळ होत्या. एखादे जहाज किंवा विमान दिसल्यास आम्ही लगेच आकाशात फायर करणार होतो .अश्या  वेळी  दूर असलेल्या जहाजालाही आमची सूचना कदाचित कळली असती .

आणखी एक मार्ग होता .जहाजावर जीवन संरक्षक जाकिटे व त्याचबरोबर जीवन संरक्षक छोट्या बोटी होत्या.त्यातील एखाद्या बोटीतून काही खलाशांना शंभर किलोमीटर दूर अंतरावरील किनाऱ्याकडे पाठविणे व त्यांच्या मार्फत मदत मागाविणे.

वादळ शमल्यावर काही खलाशी लाईफ बोट घेऊन किनाऱ्याकडे निघाले.परंतु ते किनार्‍यापासून दूर जावू शकत नव्हते .वाळूच्या पट्ट्यापासून साधारणपणे शंभर मीटर अंतरापर्यंत गेल्यावर ते लगेच किनाऱ्याकडे  कुठल्या तरी अदृश्य शक्तीने खेचले जात होते . त्या विचित्र आकर्षणातून सुटण्यासाठी खलाशी जवळजवळ एक संपूर्ण दिवस धडपड करीत होते .शेवटी आपण बाहेर पडू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले .आणि सुटकेची तीही शक्यता मावळली .

रेडिओही दुरुस्त होत नव्हता .जवळून जहाज जात नव्हते .आकाशातून विमान हेलिकॉप्टर जात नव्हते .विमानांची रेग्युलर फ्लाइट या वाळूच्या पट्ट्यावरून जात नव्हती .

अश्या  प्रकारे सहा दिवस गेले.सुटकेचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता .

आम्हाला आणखी एक आशा होती .आमच्याकडून कोणतेही रेडिओ सिग्नल मिळत नाहीत असे लक्षात आल्यावर पोर्ट अथॉरिटी व त्याचबरोबर आमची जहाज कंपनी आम्हाला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करणार होती .या प्रयत्नात आमचा शोध लागला असता .आणि आमची सुटका झाली असती .

अजूनतरी कोणतीही आशा फलद्रुप होत नव्हती .

कोणतीही शक्यता अस्तित्वात येत नव्हती.

आम्ही होतो तिथेच होतो .

जहाजावरील अन्नसाठा आणि गोड्या पाण्याचा साठा संपत चालला होता .गोड्या पाण्याचे व अन्नाचे रेशनिंग सुरू झाले होते .त्यावर आम्ही अजून दहा दिवस काढू शकलो असतो .तो पर्यंत कोणतीही मदत न मिळाल्यास, सुकून, अन्न पाण्यावाचून तडफडून ,मरण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता .

एकेक दिवस व रात्र उलटत होती .ए.सी. यंत्रणाही डिझेल बचत करण्यासाठी बंद ठेवण्यात आली होती.त्यामुळे प्रचंड घाम येत होता . प्रचंड उकाडा जाणवत होता.दुपारी तर त्या वाळवंटात उष्णतेने जीव नकोसा होत असे.

माझा मित्र कॅप्टन माझी पुन्हा पुन्हा क्षमा मागत होता .मी तुला आग्रह करून या नसत्या संकटात टाकले असे तो म्हणत होता .तू स्वतःला दोष देऊ नकोस . "जे जे जेव्हा जेव्हा व्हायचे असते ते ते तेव्हा तेव्हा होत असते" असे सांगून मी  त्याला उगीचच स्वत:ला दोष देऊ नकोस असे सांगत होतो .

कोणत्याही मदतीशिवाय कोणत्याही आशेशिवाय  अश्या प्रकारे बारा दिवस संपले.

असे आम्ही सर्व हताश असताना माझ्या मित्राच्या साहाय्यक कॅप्टनपैकी एकजण आमच्याजवळ म्हणाला,

"आपल्याला कोणताच सुटकेचा मार्ग दिसत नाही.दिवसामागून दिवस चालले आहेत .दर दिवसांगणिक आपण  निराशेच्या खोल गर्तेत जात आहोत.मला सुटकेचा एक मार्ग दिसत आहे .मला जर खात्री असती तर या अगोदरच मी तो तुम्हाला सांगितला असता .परंतु मीच अनिश्चित असल्यामुळे गप्प बसलो होतो .आता काहीच आशा नसल्यामुळे हा उपाय करून बघायला हरकत नाही.कदाचित आपल्याला यश मिळेल. मिळाले तर उत्तमच. उपाय यशस्वी  झाला तर फायदा. नाही झाला तर तोटा नक्की नाही ."

माझा मित्र त्या सहाय्यक कॅप्टनला म्हणाला : अरे भल्या गृहस्था ,जर एखादा उपाय तुला माहीत आहे तर तो तू अगोदरच का सांगितला नाहीस ?  

तो उत्तरला," हा उपाय थोडा वेगळा आहे तंत्र मंत्र जारणमारण यापैकी हा आहे .म्हणून मी आपल्याजवळ हे बोलण्याला बिचकत  होतो."

" माझे वडील महान मांत्रिक होते .आमच्या घराण्यात पिढय़ानपिढय़ा ही मंत्रविद्या चालत आलेली आहे .वडिलांकडून ही मंत्रविद्या थोरल्या मुलाला देण्यात येते .अश्या  प्रकारे परंपरेने पिढ्यान पिढ्या ही  विद्या पुढे चालत आलेली आहे .मी लहान असल्यामुळे मला ही विद्या प्राप्त होणार नव्हती .माझ्या वडील भावाला ती माझ्या वडिलांकडून देण्यात आली .मला या विद्येमध्ये रस होता .वडील माझ्या थोरल्या भावाला मंत्र तंत्र विद्या देत असताना मी ती एेकत असे.ऐकून ऐकून बरेच मंत्र व त्यांच्या कृती मला अवगत आहेत ."

"विशिष्ट प्रकारे आकृत्या तयार करून जर वरुण देवतेची  मनोभावे प्रार्थना केली तर ती आपल्याला प्रसन्न होते .व शक्य असल्यास आपल्या मनात असलेले कार्य सिद्धीस नेण्यास मदत करते."

तो पुढे म्हणाला, "वरुण देवतेची आपण मनोभावे  प्रार्थना केली आणि ती जर आपल्याला प्रसन्न झाली तर ती देवता समुद्रात एक प्रचंड लाट निर्माण करू शकते .ही लाट आपले जहाज पुन्हा समुद्रात नेऊन सोडील .ज्याप्रमाणे एक प्रचंड लाट या वाळूच्या पट्टय़ावर आपले जहाज घेऊन आली, त्याचप्रमाणे दुसरी प्रचंड लाट  आपले जहाज पुन्हा समुद्रात नेऊन सोडू शकते ."

"तुम्ही मला परवानगी दिल्यास मी त्या दृष्टीने प्रयत्न करीन."

माझ्या मित्राने त्याला लगेच परवानगी दिली .त्याचे बोलणे ऐकून सर्व क्रू उल्हासित झाला होता. त्याचा मंत्र सफल होवो त्याची प्रार्थना फळास येवो यासाठी सर्वजण प्रार्थना करू लागले.

अगोदर त्याने सकाळी विधिपूर्वक स्नान केले .नंतर तो पद्मासनात वरुण देवतेची प्रार्थना करण्यासाठी बसला.

त्याला तांदूळ तीळ हळद कुंकू उदबत्ती धूप इत्यादी जे काही हवे ते सर्व देण्यात आले .

आकृत्या काढण्यासाठी त्याला एक मोठा पाट व भस्म पाहिजे होते .

पाट नव्हता पाटाऐवजी त्याला जहाजाच्या डेकचा एक भाग धुवून पुसून स्वच्छ करून देण्यात आला .

कुंकुवा ऐवजी तिखटाचा वापर करण्यात आला.

त्या अगोदर वरुण देवतेची प्रार्थना करून हे कुंकू म्हणून तू समजून घे .आम्ही संकटात आहोत .आमच्या जवळ कुंकू नाही .असे मंत्रपूर्वक सांगण्यात आले .

भस्मा ऐवजी उदबत्ती जाळून त्याची झालेली राख वापरण्यात आली .

त्रिकोण चौकोन पंचकोन षट्कोन अष्टकोन वर्तुळ  उभ्या रेषा आडव्या रेषा तिरक्या रेषा  नागमोडी रेषा यांच्या मार्फत त्याने एक न करणारी गुंतागुंतीची आकृती तयार केली .ती आकृती वरुण देवतेची होती असे नंतर तो आमच्याजवळ म्हणाला .

सर्व विधी पूर्ण होण्याला जवळजवळ सहा तास लागणार होते .त्या दिवशी सकाळपासून त्याने अन्न पाणी वर्ज्य केले होते .

आकृती तयार झाल्यावर त्याने मंत्रोच्चारणाला सुरुवात केली .मोठ्याने तो मंत्र म्हणत होता .तो काय म्हणत होता त्यातील एक अक्षरही कुणालाही कळत नव्हते .

एक तास मंत्रोच्चारण केल्यावर तो उभा राहिला .हात जोडून त्याने त्या विशिष्ट आकृती भोवती सात फेऱ्या मारल्या .

नंतर त्याने वरुण देवतेला सात साष्टांग नमस्कार घातले .

नंतर उभा राहून त्याने पुन्हा आणखी काही मंत्रांना सुरुवात केली .

हे सर्व तो करीत असताना सर्वजण त्यात इतके गुंगून गेले होते  की सभोवतालच्या वातावरणात पडत गेलेला फरक त्यांच्या लक्षात आला नव्हता .

जाळणारे ऊन नाहीसे झाले होते .

आकाशात अभ्रे दाटण्याला सुरुवात झाली होती .

जसे मंत्रोच्चारणाचा ध्वनी व वेग वाढत होता त्याबरोबर वातावरणात  झपाट्याने फरक पडत  होता.

काळ्या मेघांनी दाटी करून पाऊस पडण्याला सुरुवात झाली .वारे घोंगावू लागले .प्रतिक्षणी त्यांचा वेग वाढत होता .

पुन्हा एका वादळाची स्पष्ट चिन्हे दिसत होती .आणि ते वादळ आलेच.

त्याबरोबर समुद्रात प्रचंड लाटा उठू लागल्या .आणि एका मोठ्या प्रचंड लाटेने आमचे जहाज पुन्हा समुद्रात नेऊन सोडले.

आम्हाला समुद्रात नेऊन सोडल्याबरोबर एखाद्या जादूसारखे ते वादळ, त्या लाटा, ते मेघ, तो पाऊस, सर्व काही नाहीसे झाले.

पुन्हा स्वच्छ ऊन पडले .पूर्ण तेजाने आकाशात सूर्य तळपू लागला . 

इंजिन सुरू करून आम्ही चार दिवसांत कोचीन गाठले.कशी कोण जाणे परंतु बंद पडलेली संदेशवहन यंत्रणा चालू झाली होती  . 

चौकशी करता आणखी एक वादळ आलेच नाही असे आम्हाला खात्रीपूर्वक सांगण्यात आले .

त्या विशिष्ट प्रदेशात, म्हणजेच वाळूच्या पट्टय़ापुरते, एक वादळ निर्माण झाले.

त्या वादळाची नोंद कुठच्याही यंत्रणेने घेतली नाही .

किंबहुना त्या यंत्रणेला ते समजलेच नाही .

तंत्रमंत्र विद्येने वरूण देवतेने, प्रसन्न होऊन ते वादळ निर्माण केले होते.

*ते वादळ त्या प्रदेशापुरतेच होते .*

*आमच्या जहाजाची सुटका करणे एवढेच त्यांचे काम होते .*

*वरुण देवतेने ते वादळ, ती लाट, निर्माण केली होती .*

* ते नोंद न झालेले वादळ होते .* *वरुण देवता वगैरे सब झूट आहे.* *ही निखालस  अंधश्रद्धा आहे.* *असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे .*

* काही म्हणा आमची सुटका झाली एवढे मात्र खरे* 

(समाप्त)

१६/१०/२०१९©प्रभाकर  पटवर्धन