१ वादळ १-२
आम्ही सकाळी आठ वाजता पोरबंदरहून जहाजाने निघालो.आमचे जहाज मालवाहू होते .या जहाजातील सर्व माल कोचीनमध्ये जायचा होता .त्यामुळे मध्ये कुठल्याही बंदरात हे जहाज थांबणार नव्हते.जहाजावर कॅप्टनसह क्रू मेंबर्स पंचवीस होते .सर्वसाधारण खलाशांसाठी तळमजल्यावर एक मोठा हॉल होता . स्वयंपूर्ण अश्या आठ केबिन्स होत्या. कॅप्टन दर्जाचे कॅप्टनला मदत करणारे असे कॅप्टनसह तीन जण होते.या कॅप्टन्ससाठी एक केबिन , निरनिराळ्या प्रकारच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी तीन केबिन्स ,अश्या एकूण चार केबिन तांत्रिक कर्मचारी वर्गासाठी होत्या.तर उरलेल्या चार केबिन्स प्रवाशांसाठी होत्या.प्रत्येक केबिनमध्ये दोन अशी एकूण आठ माणसांची व्यवस्था होती .जहाज जिथे जिथे जाणार आहे त्या त्या बंदरात जाणारे प्रवासी कांहीवेळा हौशीने बोटीतून जात असत. ज्यांच्या जवळ भरपूर वेळ आहे, ज्यांना तुलनात्मक स्वस्तात प्रवास करायचा आहे,जहाजाने जाण्याची मजा अनुभवायची आहे,असे हे हौशे गवशे व नवशे प्रवासी असत. केव्हां केव्हां ज्यांचा माल जहाजातून एखाद्या बंदरात जात आहे किंवा एखाद्या बंदरातून खरेदी करून माल आणायचा आहे, असे व्यापारीही काहीवेळा जहाजातून प्रवास करीत .दोन केबिनमध्ये चार व्यापारी होते .दोन केबिन्स संपूर्ण रिकामी होती .
मी समुद्रातून जास्त दिवसांचा प्रवास अद्याप केलेला नव्हता .आम्ही म्हणजे एखाद्या बंदरात चढणार आणि दोन चार तासांमध्ये दुसऱ्या बंदरात उतरणार.संपला आमचा समुद्रप्रवास. कॅप्टन माझा मित्र होता .बोलता बोलता मी पंधरा दिवसांची रजा काढली आहे असे बोलून चुकलो होतो .कुठेतरी फिरायला जायचे निश्चित होते .परंतु कुठे ते अजून ठरले नव्हते .
मी पोरबंदरमधील एका रेस्टॉरंटमध्ये चहा पीत बसले होतो. तेवढ्यात माझा हा मित्र हरिचरणदास तिथे मला भेटला. एका मालवाहू जहाजाचा तो कॅप्टन होता .लहानपणी आम्ही दोघेही एका शाळेत होतो .नंतर आमचे मार्ग निरनिराळे झाले .त्यानंतर आज आम्ही भेटलो होतो .तुम्ही कुठे? आम्ही कुठे? तुम्ही काय करता?आम्ही काय करतो? वगैरे गप्पा चालल्या असताना मी पंधरा दिवसांच्या रजेवर आहे हे त्याला कळले .दोन दिवसांनी त्याचे कार्गो जहाज पोरबंदरहून कोचीनला जाण्यासाठी सुटणार होते.त्याने मला त्याच्या बरोबर येण्याचा आग्रह केला .समुद्र प्रवासाची मजा तर एकदा लूट,असा त्याचा आग्रह होता.तुम्ही जमिनीवर राहणारे लोक किती सुरक्षित वातावरणात असता, आम्ही किती असुरक्षित वातावरणात असतो,त्याचा अनुभव तर घे असे तो म्हणाला. कुठे तरी जाण्याऐवजी चला बोटीने जाऊ असा मी विचार केला .पंधरा दिवसांत तुला मी येथे परत पोरबंदरला आणून सोडतो असे आश्वासन त्याने मला दिले .आणि अश्या प्रकारे शेवटी मी या कार्गो जहाजाने कोचीनला निघालो होतो.
आम्ही निघालो तेव्हा समुद्र शांत होता .एखाद्या तळ्यामधून आमची बोट चालली आहे असे वाटत होते.आम्ही निघालो ती पौर्णिमेची रात्र होती .पौर्णिमेचे चांदणे सर्वदूर समुद्रावर पसरलेले होते.चांदण्यामुळे सर्वत्र चांदीचा रस पसरल्यासारखे वाटत होते .बोटीच्या बंबातून येणार्या धुराची रेषा क्षितिजाकडे सरपटत जाणाऱ्या एखाद्या काळ्या सापासारखी दिसत होती .बोटीच्या प्रोपेलरमुळे बोटीच्या मागे जाणारे पाणी पौर्णिमेच्या चांदण्यात चांदीच्या रसाला उकळी आल्यासारखे दिसत होते .थोडा वेळ चांदण्या रात्रीचा आस्वाद घेतल्यानंतर मी झोपी गेलो . जहाज इतके स्थिर होते की झोपल्यावर आपण घरीच आपल्या कॉटवर झोपलो आहोत असे वाटत होते .जहाजाच्या इंजिनचा घुमणारा आवाज दूरवरून आल्यासारखा वाटत होता .त्या आवाजामुळे त्रास होण्याऐवजी उलट त्या सुरावर झोप चांगली लागली .
रात्री चांदण्यात रम्य वाटणारा समुद्र दिवसा त्रासदायक वाटत होता .सूर्यामुळे चमकणाऱ्या पाण्याकडे बघवत नव्हते.नुसत्या डोळ्यांनी तर पाहणे शक्यच नव्हते. परंतु डार्क गॉगल लावूनही त्रास होत होता . दोन दिवस काहीही झाले नाही .समुद्रातील प्रवासाचा आता कंटाळा येऊ लागला होता.विलक्षण उकाड्याने आणि येणाऱ्या घामाने त्रस्त झालो होतो.केबिनमध्ये एसीमध्ये बसून राहावे असे वाटत होते .तिथेही कंटाळा येत होता .टीव्ही, रेडिओ, मोबाइल,पुस्तक, यांचा कंटाळा आला . दिवसा चारी बाजूला दूरवर दिसणारे तीव्रपणे चमकणारे पाणी आणि आकाशात आग ओकणारा सूर्य तर रात्री सर्वदूर पाणीच पाणी व चंद्रप्रकाश पाहून कंटाळा आला होता . दोनच दिवसात केव्हा एकदा जमीन बघतो असे झाले होते. आकाशात एकही पक्षी दिसत नव्हता .क्वचित दूरवर एखादे जहाज जाताना दिसे.एकदाच आकाशात एक विमान जाताना दिसले.घोंघावणारा वारा, जहाजाची थरथर व घुम्म असा एक जहाजाच्या इंजिनचा येणारा एकसुरी कंटाळवाणा आवाज,यामुळे उगीचच अत्यंत दमल्यासारखे वाटत होते . कॅप्टनच्या सांगण्यावरून जहाजाने जाण्याच्या फंदात उगीचच पडलो असे वाटू लागले होते .
जमिनीवरून प्रवास करताना आपल्याला बरेच काही चारी बाजूला दिसत असते.प्रवास करताना आपण मधून मधून थांबत असतो.तेथील माणसे, रेस्टॉरंट,यामुळे एकसुरी वाटत नाही .घाटातून वगैरे जाताना तर, सृष्टी सौंदर्य पाहात जाता येते .प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे असते .कंटाळा आला तरी इतका कंटाळा येत नाही .जहाजामधून प्रवास करताना फारच एकसुरी वाटते .जहाजावरील कर्मचाऱ्यांना काम असते.त्यामध्ये त्यांचा वेळ जातो . पण आमच्या सारख्या रिकामटेकडय़ांचा वेळ जाता जात नाही .सवय नसल्यामुळे समुद्रावरील खारा वारा, दमट हवा,त्रासदायक वाटते.
तरंगत्या समुद्रावरील विलासी नगर अश्या क्रूझने जाताना वेळ घालवण्याची अनेक साधने असतात. क्रूझ संपूर्णपणे वातानुकुलित असते . या कार्गो जहाजावर करमणुकीचे काहीही साधन नसते. किंचित हलणारे जहाज,जहाजाच्या इंजिनचा येणारा एक विशिष्ट कंटाळवाणा आवाज,जहाजाची जाणवणारी परिचित थरथर ,याशिवाय जिवंतपणाचे काहीही लक्षण नसते .कधी कधी आपण माणसांच्या समुद्राचा कंटाळा आला, या समुद्रात गुदमरायला होत आहे असे म्हणतो .सभोवतालच्या माणसांशी संवाद नसला तरीही आसपास माणसे असणे हे आनंददायी असते हे अश्या प्रकारच्या एकांतात कळते.
दोन दिवस असेच गेले.आणखी पाच सहा दिवसांत आपण कोचीनला पोचू असे कॅप्टन म्हणत होता .तिसऱ्या दिवशी सकाळी पाण्याची थोडी हालचाल दिसू लागली होती.दुपारी जरा मोठ्या लाटा उठू लागल्या . क्षितिजावर काळे ढग जमू लागले होते.वादळ येणार असे वाटू लागले होते .वेदर रिपोर्ट सामान्य होता असे कॅप्टन म्हणाला .काळजीचे काही कारण नाही असे त्याचे आश्वासन होते . काहीतरी हालचाल होत असलेली पाहून मी खूष होतो .रात्री बोट बऱ्यापैकी हालत होती .
हलण्याची सवय नसल्यामुळे व्यवस्थित झोप लागली नाही .
चवथ्या दिवशी सकाळीच सर्व आकाश काळ्या मेघानी भरून गेले. आज कॅप्टनचा चेहरा जरा चिंताक्रांत दिसत होता .कुठे तरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असणार .त्यामुळे समुद्रातून एखादे लहान किंवा मोठे चक्रीवादळ जाणार.कार्गो जहाज मोठे होते .सामानाने गच्च भरलेले असल्यामुळे ते चांगल्यापैकी जड झाले होते . अशी कित्येक वादळे त्या जहाजाने, कॅप्टनने आणि खलाशांनी पाहिली होती .मला मात्र बरीच काळजी वाटू लागली होती.कार्गो जहाजाने प्रवास करण्याच्या फंदात उगीच पडलो असे वाटू लागले होते.
सहज बोलता बोलता कॅप्टनने त्याच्या चिंतेचे कारण सांगितले.दहा वर्षांपूर्वी समुद्रात एक भूकंप झाला होता .त्यामुळे मुंबईपासून सुमारे शंभर किलोमीटरवर जमीन वर आली होती.ही जमीन केवळ वालुकामय पट्टा अश्या स्वरूपात होती .सर्वत्र पांढरी शुभ्र वाळू .पन्नास किलोमीटर रुंद व दोनशे किलोमीटर लांब असा हा वाळूचा पट्टा होता .या पट्ट्यावर मोकळी जमीन नव्हती .हा पट्टा एका जागी स्थिर न राहता कसा कोण जाणे निसर्गाचा चमत्कारच परंतु तो उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम असा सरकत असे.त्याला वळसा घालून जहाज न्यावे लागत असे .अन्यथा जहाज वाळूमध्ये फसण्याचा संभव असे.
हां हां म्हणता समुद्र खवळू लागला. त्याने रौद्र स्वरूप धारण केले .उंच उंच लाटा उसळू लागल्या .धुवाँधार पाऊस सुरू झाला.रात्री सारखा अंधार दिवसा पसरला .विजा चमकू लागल्या .कानठळ्या बसवणारे आवाज होऊ लागले .पर्वतप्राय लाटा जहाजावर आदळत असल्यामुळे एखाद्या खेळण्यासारखे जहाज समुद्रावर हलू लागले.
अश्या बिकट परिस्थितीत जहाज स्थिर राखणे, लाटांवर जहाज तरंगत ठेवणे,त्या वालुकामय पट्ट्यावर आपण फसू नये म्हणून काळजी घेणे हे सर्व तारेवरच्या कसरती सारखे होते .कॅप्टन क्षणोक्षणी निरनिराळे हुकूम सोडीत होता व जहाजावरील क्रू डोळ्यात तेल घालून कॅप्टनच्या आज्ञांचे पालन करीत होता .
संध्याकाळचे चार वाजलेले असताना एक पर्वतप्राय लाट आली. त्या लाटेने जहाजाला खेळण्यासारखे उंच उचलले आणि अलगद एका मोठ्या वाळूच्या राशीवर नेऊन ठेविले.
*त्या सुप्रसिद्ध वाळूच्या पट्ट्यामध्ये जहाज फसले होते.*
* दिवस असला तरी, दाटलेल्या काळ्या मेघांमुळे दुपारी चार वाजताच पसरलेल्या काळोखात ,सहारा वाळवंटाच्या मध्यभागी आपण आहोत असे वाटत होते.*
*चक्री वादळात पाण्यात गोलगोल फिरून मरण्यापेक्षा हे बरे होते .*
*तिथे बुडून तात्काळ मेलो असतो.इथे वाचण्याची शक्यता होती.*
*त्याचप्रमाणे अन्नपाण्याविना तडफडून मरण्याचीही शक्यता होती.*
*वादळाच्या तडाख्यात दूरसंदेश यंत्रणा बंद पडली होती .*
*जमिनीशी असलेला संवाद संपला होता .*
* संवाद प्रस्थापित झाला तर ठीक होते .अन्यथा सर्व काही दैवाधीन होते.*
(क्रमशः)
१५/१०/२०१९©प्रभाकर पटवर्धन