१० न्याय ३-३
( ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
राधाबाईंच्या प्रयत्नांना यश आले .एकूण पाच आरोपींपैकी एकाला फाशी झाली .दोघांना जन्मठेप झाली.दोघे जण निर्दोष सुटले त्यांत अभंग होता .
सर्वत्र राधाबाई व अभंग यांच्याबद्दल कुजबूज सुरू झाली होती .राधाबाईंनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ असलेल्या खास संबंधांचा उपयोग करून त्यांच्या मुलाविरुद्धची केस कमकुवत केली .
अभंग काम पिसाट आहे. बदमाश आहे. तोच या सर्वांचा प्रमुख होता.आणि त्याला निर्दोष म्हणून सोडण्यात आले. ही न्यायाची थट्टा आहे असे उघडपणे लोक बोलत होते.
खटला सुप्रीम कोर्टापर्यंत गेला .खालील कोर्टाचा निकाल वरिष्ठ कोर्टाने तसाच ठेवला . माझा अभंग कसाही असला तरी तो तसा नाही . तो निर्दोष आहे . असे राधाबाई सर्वाना सांगत असत .त्यावर लोक कुत्सितपणे हसत असत .
निर्दोष सुटल्यामुळे अभंग कॉलर ताठ करून गावात फिरत असे .तो आणखीच चेकाळला होता.
* राधाबाई कशाही असल्या तरी त्या न्यायनिष्ठूर होत्या .*
स्त्रीच्या मर्जीविरुद्ध काहीही होता कामा नये याबद्दल त्या आग्रही होत्या .
स्त्रियांची छेड काढणे, अत्याचार ,स्त्रियांबद्दल हिणकस वृत्ती ,खालच्या थरावर जाऊन वाटेल ते बरळणे याबद्दल त्यांना प्रचंड चीड होती.
त्यांना त्यांचा अभंग निर्दोष आहे असे प्रामाणिकपणे वाटत होते.लोक उगीचच वाटेल ते बोलतात असे त्यांचे मत होते.
एक दिवस अभंग व त्याचे काही मित्र घरी जमले होते.रात्रीचे बारा वाजून गेले होते .राधाबाईंना निद्रेची गोळी घेऊन झोपण्याची सवय होती .त्याशिवाय त्यांना झोप येत नसे .त्या त्यांच्या वाड्याच्या वरच्या मजल्यावर शायनकक्षामध्ये झोपत असत .हे मित्रांचे टोळके दिवाणखान्यात पीत बसले होते .त्या दिवशी अभंगला दारू थोडी जास्तच चढली होती.
गप्पा मारता मारता मित्रांमध्ये त्या बळी पडलेल्या मुलीचा विषय निघाला .अभंग चविष्टपणे त्या विशिष्ट रात्रीचे सविस्तर वर्णन अभिमानपूर्वक करीत होता .त्या मुलीला कशी उचलली इथपासून तिला ठार कसे केले व कुठे फेकले इथपर्यंत तो आपली प्रौढी व बढाई मारीत होता.
त्याला आपल्या कृत्याचा कुठेही पश्चाताप होताना दिसत नव्हता . आपल्या आईमुळे अापण फाशीच्या तक्तापर्यंत जाऊन परत आलो याचे त्याला भानही नव्हते.आईला आपण अजून कुकुल बाळ वाटतो परंतु आपण पार पोचलेले आहोत अशी दर्पोक्ती तो करीत होता .आपली आई गाढ झोपलेली असणार याची त्याला शंभर टक्के खात्री होती.तो मित्रांचे टोळके घेऊन पीत बसलेला असताना आतापर्यंत राधाबाई तिथे कधीही आल्या नव्हत्या.
आज झोपेची गोळी घेऊनही राधाबाईंना झोप येत नव्हती.त्या सहज खालच्या मजल्यावर आल्या होत्या .त्यांना अभंगचा चढलेला आवाज व त्याच्या मित्रांचे हसणे ऐकू आले.त्या बळी पडलेल्या मुलीचा ओझरता उल्लेख त्यांनी ऐकला.दबक्या पावलांनी त्या दिवाणखान्यात बाहेर येऊन थांबल्या होत्या .ही गोष्ट आतील टोळक्याच्या गावीही नव्हती.
त्यांना आपला निर्दोष वाटणारा चिरंजीव किती पोचलेला आहे. निघृणआहे.उलट्या काळजाचा आहे. हे ऐकायला मिळाले.त्याला त्याने केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप होत नाही हे लक्षात आले .उलट तो ती गोष्ट अभिमानाने सांगत असलेला आढळून आला .पुन्हा तशीच संधी आली तर ती तो सोडणार नाही हेही त्यांच्या लक्षात आले .
त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली .त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरचे लायसेन्स होते. ते त्या उत्तम प्रकारे चालवूही शकत.तसेच दिवाणखान्यात जाऊन त्या नराधमांना गोळ्या घालाव्या असे त्यांना वाटले .
भावनेच्या भरात निर्णय न घेता शांतपणे निर्णय घेण्याची त्यांची सवय होती.विषण्ण मन:स्थितीत त्या आपल्या कक्षात गेल्या.त्यांची झोप पूर्णपणे उडाली होती . त्यांची मनोदेवता त्यांना शांत बसू देत नव्हती .
अभंगला आपण हरप्रयत्न करून सोडविले ही मोठी चूक झाली.आपण त्याला तसेच जाऊ द्यायला हवे होते .आपण न्यायप्रक्रियेच्या आड आलो.त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना खंत व खेद वाटत होता.
अभंग कायद्याच्या कचाट्यातून सुटला तरी तो न्यायाच्या कचाटय़ातून सुटता कामा नये.केल्या कृत्याची त्याला शिक्षा झालीच पाहिजे .या निर्णयावर त्या शेवटी आल्या .त्यानंतरच त्यांच्या मनातील खळबळ शांत झाली .
दुसर्या दिवशी त्यांनी आपल्या मनातील खळबळ बाहेर दिसू दिली नाही.नेहमीप्रमाणेच शांतपणे त्यांची दैनंदिन कृत्ये चालली होती.त्यांच्या मनातील तुफानाची, वादळाची, पुसटशीही छाया त्यांच्या चेहऱ्यावर, वर्तणुकीत, बोलण्यात दिसत नव्हती .
शेवटी त्यांनी आपल्या मनाशी एक कठोर निश्चय केला होता .दुसऱ्याच दिवशी शहरात जावून त्या आपल्या बंधूभगिनींना भेटून आल्या .त्यांचे आई वडील अगोदरच निवर्तले असल्यामुळे तो पाश त्यांना नव्हता.
रात्री जेवण झाल्यावर त्यांनी आपल्या मुलाला समोर बसण्यास सांगितले .मला तुझ्याजवळ काही महत्त्वाचे बोलायचे आहे असे त्यांनी सांगितले .त्यांचा गंभीर चेहरा पाहून अभंग काही न बोलता त्यांच्यासमोर सोफ्यावर बसला .
राधाबाईंनी अभंगसमोर त्याच्या पापाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली .प्रथम त्याने कांगावा करण्यास सुरुवात केली .तुझे कुणीतरी माझ्याविरुद्ध कान भरले आहेत असे त्यांचे म्हणणे होते.त्या रात्री तू दारूच्या नशेमध्ये मित्रांबरोबर जे काही बरळत होतास, बढाई मारीत होतास,ते सर्व काही मी ऐकले आहे असे त्यांनी करारी स्वरात सांगितले .
त्यांचा करारी व गंभीर आवाज एेकून अभंग चपापला.आईचं हे रूप त्याने आतापर्यंत कधीही पाहिले नव्हते .अशा सुरीसारखा आरपार चिरत जाणारा आवाजही त्याने ऐकला नव्हता.आईचे प्रेमळ बोलच त्याने ऐकले होते .नेहमी ती रागावताना सुद्धा त्याच्यात प्रेम व वात्सल्य दिसत असे.आजचा आईचा नूर काही वेगळाच होता.
आई बोलत असताना खिळल्यासारखा तो सोफ्यावर बसून होता.
शेवटी आई म्हणाली, मला तू निर्दोष वाटत होतास म्हणूनच मी तुला सोडविण्याचा हरप्रयत्न केला.त्यात मी यशस्वीही झाले .
*तू कसा आहेस हे मला माहीत होते .*
*परंतु तू असा असशील याची मला कल्पना नव्हती .*
*त्याचा अंदाज मला कधीच आला नाही .त्याबाबतीत मी कमी पडले .*
तू केलेल्या गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे . आणि ती मी देणार आहे.एकदा तुला नकळत तात्काळ तुझे जीवन तसेच संपवावे असे मला वाटत होते.परंतु तुला शिक्षा कां होत आहे हे कळल्याशिवाय मृत्यू मला योग्य वाटत नव्हता .
*मृत्यूपेक्षा तो तुला कां येत आहे ते तुला कळणे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. *
तू केलेला गुन्हा माणुसकीला काळिमा लावणारा आहे .सर्व स्त्री जातीचा अपमान करणारा आहे .या गुन्ह्याला मृत्यूची शिक्षाही कमीच आहे .
मी तुला आता मृत्यूची शिक्षा ठोठावत आहे . न्याय करणारी मीच. न्यायाची अंमलबजावणी करणारीही मीच.
आईचे हे बोल व रौद्र स्वरूप पाहून अभंग गर्भगळीत झाला .त्याने पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला .दुसऱ्याच क्षणी राधाबाईंच्या हातात रिव्हॉल्वर होते .ते पाहून पायातील अवसान गेल्यासारखा अभंग धपकन सोफ्यात कोसळला . त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता .त्याचे सर्व अवसान संपले होते .तो भीतीने अर्धमेला झाला होता.
राधाबाईंनी शांतपणे नेम धरून त्याच्या दोन भिवयांमध्ये गोळी झाडली.गोळी मेंदूतून आरपार जाऊन सोफ्यामध्ये रुतली.भिवयांच्या मध्यभागी एक भोक व त्यातून रक्ताची धार सुरू झाली.
अभंग सोफ्यामध्ये वेडावाकडा पडला होता .रक्ताच्या धारेने सोफा लाल लाल होत होता.
राधाबाई शांतपणे उठल्या . त्यांची जीवनाशा संपली होती. त्यांनी पेट्रोलचा कॅन उघडून सर्वत्र पेट्रोल शिंपडले. काडी ओढताच दिवाणखाना धडाडून पेटला.त्याच्या पाठोपाठ सर्व वाड्याने पेट घेतला .जुनाट तुळया वासे धडाडून पेटत होते .
आग लागलेली पाहून गावातील मंडळी वाड्याकडे धावत सुटली. त्यामध्ये वाड्यावर काम करणारी नोकरमंडळीही होती.
त्यांना आज राधाबाईंनी सुटी दिली होती.एवढा मोठा जुना राजवाडा चौवीस तास धुमसून धुमसून जळत होता.त्याची धग तीन चार दिवस जाणवत होती .आग विझविणे कुणालाही शक्य नव्हते .
*एका जुनाट सरंजामशाही काळातील राजवाड्याचा विषण्ण करणारा शेवट झाला होता.*
*राधाबाईनी काळजावर दगड ठेवून, त्याच्या लाडक्या, एकुलत्या एक मुलाला,ज्याच्यासाठी त्यांनी आजारपणात रात्र रात्र जागरण केली, नवस सायास केले,त्याला संपविला होता .*
*त्यानी न्याय केला होता .*
(समाप्त)
२/१/२०२०©प्रभाकर पटवर्धन