Get it on Google Play
Download on the App Store

७ वांझोटी २-२

(ही कथा व पात्रे काल्पनिक आहेत साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

तिचा केविलवाणा चेहरा पाहून डॉक्टरबाईनी आता मी खोटे बोलते परंतु तुम्ही माझ्याकडे पुन्हा येऊ नका असे कटाक्षाने सुचविले .आल्यास मी तुमच्या सासूला सर्व काही खरे सांगून टाकीन असेही सांगितले.

नंतर तिने आणखी एक योजना आखली .खूप आजारी पडून माहेरी जायचे व तिथेच बाळंत होऊन नंतर मूल घेऊन सासरी यायचे असे ठरविले.सासूला फसविण्यात चकविण्यात नाटक करण्यात ती यशस्वी झाली .व अशाप्रकारे बाळंतपणाच्या निमित्ताने  आजारी पडून ती माहेरी आली.

तिने तिच्या आई वडिलांना सर्वकाही सांगितले .त्यांना जरी असे फसविणे पसंत नसले तरी त्यांनी नाईलाजाने  मान तुकवली.तिच्या सासूचा सासऱ्यांचा मधून मधून फोन येत असे .दरवेळी खोटे बोलणे सर्वांनाच जड जात असे .

मुळात सर्वच मंडळी सज्जन होती परंतु त्यांना परिस्थितीने असे बनविले होते.एक दोनदा सासू तिला भेटायला येऊन गेली .त्यावेळी पोट पुढे आल्याचे गर्भार असल्याचे नाटक तिने चांगल्या प्रकारे वठविले.

* मधून मधून तिचा नवराही तिला भेटण्यासाठी येत असे .*

तिचे माहेरचे शहरही बऱ्यापैकी मोठे होते.येथील एका प्रसूतिगृहात त्यांनी खोटे खोटे नावही घातले.पैशांच्या जोरावर सर्वकाही मॅनेज केले .

मूल कुठून आणायचे असा आता प्रश्न होता.मूल मेले असे जरी सांगितले असते तरी तिचा त्रास व अवहेलना थांबली असतीच असे नाही. पुन्हा दिवस का रहात नाहीत म्हणून चौकशी सुरू झाली असतीच .कुठून तरी एक कायमचे लहान मूल प्राप्त करणे अत्यावश्यक होते.

जवळच्या शहरात तिची एक मैत्रीण राहत होती .तिला तिने सर्व हकिगत सांगितली .त्या मैत्रिणीने अशीच एक चालू बाई गाठली .तिला भरपूर पैसे देण्याचे कबूल केले .आणि ती जेव्हा सांगेल तेव्हा हॉस्पिटलमधून एक गुटगुटीत बाळ चोरून आणून देण्याचे काम तिच्यावर सोपविले .

*आणि आता कमला ते बाळ घेऊन टॅक्सीतून आपल्या घरी जात होती .* 

जिचे बाळ चोरून आणले ती बाई जागी झाल्यावर काय हाहा:कार उडेल ते तिला दिसत होते.त्या बाईच्या मनाची स्थिती काय होईल ते तिला कळत होते .त्या जाणिवेनेच तिचा थरकाप उडत होता.आपण असेच परत जावे. त्या बाईला गाठून तिच्या मार्फत मूल पुन्हा जाग्यावर नेऊन ठेवावे.आवश्यक झाल्यास  गुन्हा कबूल करावा .असे तिला वाटत होते .आपण करतो ते अतिशय चूक आहे हेही तिला कळत होते.

पण आता ती परत जाऊ शकत नव्हती.तसे केल्यास तिला आपल्या सासरी ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले असते ती परिस्थिती तिला दिसत होती .मूल परत ठेवताना सापडल्यास, केलेल्या गुन्ह्याचा परिणाम म्हणून होणारी बेअब्रू,सर्वत्र होणारी  छीथू ,कायदेशीर शिक्षा सर्व काही तिला दिसत होते.

एका बाईचे मूल चोरून आणले म्हणून काळजाला कितीही इंगळ्या डसत असल्या तरी मातृत्वाची तहान भागणार होती.पुढचे आयुष्य सुखासमाधानात जाणार होते .वांझोटी हा किताब कायमचा नष्ट होणार होता .आता कुत्सित नजरेला तोंड द्यावे लागणार नव्हते .

एका बाईचे मूल चोरून आणले हा कलंक तिच्या हृदयाला आयुष्यभर घरे पाडीत राहणार होता .परंतु त्याला काही इलाज नव्हता.

तिने व तिच्या नवऱ्याने तिच्या सासूला आपण अनाथाश्रमातून कायदेशीररित्या एखादे मूल दत्तक घेवू असे सुचविले होते. पण तिच्या सासूला तिच्या वंशाचाच दिवा किंवा पणती हवी होती.सासूची लवचिकता पणती चालेल एवढीच होती .

परिस्थितीपुढे ती हतबल होती .

इकडे हॉस्पिटलमधील ती बाई जागी झाल्यावर तिला तिचे मूल दिसेना.तिने ओरडून ओरडून हॉस्पिटल डोक्यावर घेतले.तिचा आकांत कुणाला ऐकवेना किंवा पहावेना.पोलिस आले. चौकशी झाली. पोलिसांत कम्प्लेंट दिली गेली.हॉस्पिटलमधून त्या मजल्यावरील रात्रीची नर्स, रात्रीची रिसेप्शनिस्ट, गुरखा, अशा काही जणांना कामातील चुकारपणाबद्दल आपली नोकरी गमवावी लागली .

पोलीस विचारल्यावर चौकशी चालू आहे असे एक स्टॅंडर्ड उत्तर देत होते .

कमला खरेच दिमाखाने त्या मुलाला घेऊन आपल्या सासरी आली .मीठ मोहर्‍या ओवाळून टाकून सासूने आपल्या वंशाच्या दिव्याचे स्वागत केले.

असेच काही महिने गेले .आणि एक दिवस कमलाला खरोखरच ओकार्‍या होऊ लागल्या .तिला खरेच डोहाळे लागले .आणलेले मूल भाग्याचे आहे असे तिला वाटू लागले .

या मुलाच्या खऱ्या आईला शोधावे, तिच्याकडे जावे, तिला खरी सर्व हकिगत सांगावी,तिचे मूल तिला परत करावे असेही तिला बऱ्याच वेळा वाटू लागले .

परंतु आता ते प्रत्यक्षात शक्य नव्हते.

*पोलिस चौकशी खरेच चालू आहे.*

*पोलिसांचे हात लांब असतात. कायद्याचे हात लांब असतात असे म्हणतात .*

*कदाचित ती मूल चोरणारी बाई, तिला पटविणारी कमलाची मैत्रीण सापडेल.त्यामार्फत कमलाही सापडेल.तिची बेअब्रू छीथू  होईल .*

*गुन्हा गंभीर आहे तिला शिक्षाही होईल .*

*सासूला आपण अनाथाश्रमातून मूल दत्तक घेतले असते तर बरे झाले असते हेही कदाचित् लक्षात येईल .*

*ज्या बाईचे मूल चोरले ती ते हळूहळू विसरून जाईल .तिला पुन्हा मूल होईल.*

*कदाचित अशक्य ते शक्य होईल. कमला त्या बाळाच्या खर्‍या आईला शोधून ते बाळ तिच्या कडे सोपवील*

*अशा प्रकारे तिच्या काळजाला सतत घर पाडणारा भुंगा दूर होईल* 

* कदाचित काहीच होणार नाही. चोरलेला मुलगा, मोठा भाऊ म्हणून,त्या कुटुंबात संपूर्णपणे सामावला जाईल.*

*अनेक शक्यता आहेत. काळाच्या पोटात काय दडले आहे ते माहीत नाही* 

(समाप्त)

१७/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन