११ शांति कुंज १-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
मी व माझा जीवश्चकंठश्च मित्र मनोहर आमच्या कुटुंबियांसह राजस्थान बघण्यासाठी गेलो होतो.मुंबईहून विमानाने आम्ही जयपूरला पोचलो.आम्ही एका पर्यटन कंपनीतर्फे परंतु स्वतंत्रपणे गेलो होतो. ठिकठिकाणच्या हॉटेल्समध्ये बुकिंग, सर्व पर्यटनस्थळे दाखवण्याची व्यवस्थाही त्या कंपनीने केली होती. दोन्ही कुटूंबातील मिळून आमची सदस्य संख्या एकूण बारा होती.जयपूरपासून उदयपूरपर्यंत आमच्या दिमतीला एक टाटा विंगर दिलेली होती.उदयपूरहून आम्ही विमानाने परत येणार होतो.एक मार्गदर्शकही (गाइड) आमच्याबरोबर संपूर्ण प्रवासात राहणार होता.शिवाय प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुसार स्थानिक गाइड दिला जाणार होता.
जयपूर पाहून झाल्यावर आम्ही प्रथम बिकानेरला गेलो.बिकानेरसाठी पर्यटन कंपनीने एकूण तीन दिवस ठेवले होते.तीन दिवसांचा कार्यक्रम आखलेला होता. आमचा गाईड आम्हाला म्हणाला,बिकानेर दोन दिवसात सहज पाहून होईल .येथे एक रामगड नावाचा किल्ला आहे.त्या किल्ल्यावर भव्य राजप्रासाद आहे. आहे म्हणण्यापेक्षा होता म्हणूया.ती जागा प्रेक्षणीय तर आहेच परंतु तेथील हकिगत श्रवणीयही आहे. मी म्हणालो जर राजप्रासाद होता असे तुम्ही म्हणता.तर तेथे जावून काय उपयोग?कथा श्रवणीय आहे तर इथेच सांगा.गाईड म्हणाला राजवाडा अद्यायावत स्थितीमध्ये नाही.दुर्लक्षित मोडकळीस आलेला आहे.किल्ल्याचा परिसर फार विस्तृत नाही.दुर्लक्षित राजवाडाही प्रेक्षणीय आहे.त्याची कथाही राजवाडा पाहता पाहताच ऐकली पाहिजे तर जास्त मजा येईल असे मला वाटते.कंपनीने दिलेल्या आराखड्यामध्ये या किल्ल्याचा, राजवाड्याचा,उल्लेख नाही.तीन दिवसांचा बिकानेरचा आराखडा आहे.तुमची इच्छा असल्यास दोन दिवसांत बिकानेर पाहून आपण रामगडला जाऊन येऊ.
आम्ही सर्वानीच गाइडच्या सूचनेचा विचार केला.एवढे गाइड म्हणत आहे तर रामगडला जाऊन यायचे ठरविले.दुसऱ्या दिवशी आम्ही रामगड पाहण्यासाठी निघालो .बिकानेरमधील आमच्या हॉटेलपासून सुमारे दीड तासात आम्ही रामगडला पोचणार होतो .रामगड किल्ल्याच्या पायथ्याशी रामनगर वसलेले होते.रामगड व रामनगर ही नावे इतकी प्रसिद्ध आहेत की भारतात या नावाचे किल्ले व नगरे पाच पंचवीस सहज असतील.
किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर जरा वेळ तिथेच आम्ही थांबलो होतो.सर्वत्र लहान मोठे बंगले व घरे होती.तेथे लहानसे गाव वसलेले होते.जवळच पाण्याचा तलाव होता.राजस्थानमध्ये पाण्याची मुबलकता असणे विरळाच.सर्वत्र दुर्भिक्षच असते.हल्ली गुप्त असलेली सरस्वती नदी एकेकाळी राजस्थानमधून वाहात होती असे म्हणतात.त्यावेळी राजस्थान सुजलाम् सुफलाम् होता.सरस्वती गुप्त झाली आणि राजस्थान वालुकामय झाला असे म्हणतात.
डोंगरावर राजवाडा दिसत होता.राजवाड्याची झालेली पडझड खालून विशेष लक्षात येत नव्हती.दूरदर्शकामधून पाहिल्यास रंग उडालेल्या भिंती ,पडझड झालेले मनोरे दिसत होते.आमची गाडी छोटासा घाट चढू लागली.राजवाडा जसजसा जवळ येत होता तसतशी त्याची भग्नावस्था जास्त ठळकपणे लक्षात येत होती.गाडी राजवाड्याजवळ येऊन थांबली.राजवाडय़ाच्या बाहेर एक मजबूत कुंपण घातले होते.दरवाज्यावरच तिकिटाची सोय होती.तिकीट काढून आम्ही आत शिरलो.गाईड म्हणाला ही वास्तू हल्ली पुराणवस्तुसंशोधन खात्याच्या ताब्यात आहे.राजवाड्याची आणखी पडझड होऊ नये म्हणून पुराणवस्तुसंशोधन खाते त्याची वेळोवेळी डागडुजी करीत असते.संध्याकाळी सहाला कुंपणाचे दरवाजे बंद केले जातात.सहानंतर आंत कुणीही जात नाही.संध्याकाळी सहा ते सकाळी सहा राजवाड्यामध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाही.~अर्थात जर एखाद्याला संशोधनासाठी किंवा येणार्या अनुभवांसाठी रात्री तिथे थांबायचे असेल तर त्यासाठी विशेष परवानगी काढावी लागते.~"मी स्वत:च्या जबाबदारीवर आंत जात आहे. रात्रभर मी येथे राहणार आहे. मला शारीरिक किंवा मानसिक इजा झाल्यास त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे."असे लिहून दिल्यावरच रात्री आंत जाता येते.एकदा आंत गेल्यावर मात्र सकाळी सहा शिवाय तुम्हाला बाहेर येता येत नाही.~तुम्ही व तेथील अमानवी अस्तित्व~ याशिवाय आणखी कुणीही नसते.संशोधक, धाडसी लोक, मांत्रिक, याशिवाय तिथे रात्री राहण्याचे धाडस कुणीही करत नाही.
गाईडने पुढे बोलण्यास सुरुवात केली.आम्ही राजवाड्याबाहेर उभे होतो.तिथे तो आम्हाला राजवाड्याबद्दलची सर्व कथा सांगत होता.थोडीशी कथा सांगून झाल्यावर आम्ही राजवाड्यात प्रवेश केला.
गाईडच्या सांगण्याचा आशय पुढीलप्रमाणे होता.
रामगढ हे राजस्थानमधील भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एक लहानसे संस्थान होते.(अशी शेकडो संस्थानने राजस्थानमध्ये हाेती.)संस्थानामध्ये सुमारे तीन हजार गावे व शहरे असावीत. राजा ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या परवानगीने लहानसे सैन्यही बाळगून असे.जनतेकडून मिळणार्या कररूपी उत्पन्नावर राजाची ऐष चालत असे.मिळणार्या करातून आणि पूर्वी संचय केलेल्या पैशांतून, मुंबई हैदराबाद म्हैसूर लखनौ दिल्ली अशा कांही शहरातून
वेळोवेळी या संस्थानाच्या राजांनी इस्टेटी उभ्या केल्या होत्या.भव्य प्रासाद बांधले होते.त्यानी परदेशातही भरपूर धनसंचय केला होता. अर्थात ही मालमत्ता कांही एकाच राजाने निर्माण केली नव्हती.वंशपरंपरा पैसा धन मालमत्तेचा संचय होत गेला होता.कांही राजे जुलमी होते तर कांही लोकांप्रती आपली जबाबदारी समजणारे होते. कांही ऐषाराम करणारे होते. उधळपट्टी करणारे होते.तर कांही धनसंचय करणारे होते.
स्वातंत्र्य मिळण्याअगोदर पंचवीस वर्षांच्या कालखंडातील राजा अतिशय जुलमी होता.कोणताही अत्याचार जुलूम जबरदस्ती करायची त्याने शिल्लक ठेवली नव्हती.त्याने स्त्रियांवर अत्याचार केले.नोकरांवर जुलूम जबरदस्ती केली.त्याने कित्येकांना मृत्युदंड दिला.कित्येकानी आत्महत्या केल्या.
असे मृत्युदंड दिलेले लोक आणि आत्महत्या केलेल्या व्यक्ती पुढील गतीला जाऊ शकल्या नाहीत.त्यांनी सूड घेण्याच्या बुद्धीने राजाला त्रास देण्यास सुरुवात केली.राजाने जबरदस्त मांत्रिक बोलवून त्या सर्व भुतांना बाटल्यातून बंद केले.त्या सर्व बाटल्या येथून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर एका जंगलात खोल खड्डा खणून पुरण्यात आल्या. अशाप्रकारे राजा निर्धास्त झाला.पुढे त्या राजाचा एकोणीसशे चाळीस साली मृत्यू झाला.त्याचा मुलगा गादीवर बसला.पुढे स्वातंत्र्य मिळाले.इतर संस्थानांप्रमाणे हेही संस्थान भारतीय गणराज्यात सामील करण्यात आले.
सर्व संस्थानिकांचा रुबाब नाहीसा झाला.मिळणार्या प्रिव्हीपर्सवर भागवण्याची त्यांच्यावर वेळ आली.अर्थातच त्यांचा अवाढव्य खर्च विलास ऐषोआराम त्या लहानशा रकमेत चालणे शक्य नव्हते.इतर संस्थांनिकांप्रमाणे याही राजाने त्याच्या कित्येक मालमत्ता विकल्या.काही राजवाड्यांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतर केले.याही राजवाड्याचे पंचतारांकित हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले.राजाला हॉटेल चालविणे जमत नव्हते.मनसुखलाल नावाच्या एका धनाढ्य माणसाला त्याने हा राजवाडा विकला.
मनसुखलालने पंचतारांकित हॉटेल तसेच चालू ठेवले.त्यात अर्थातच त्याने अनेक सुधारणा केल्या.हॉटेलचे नाव बदलून शांतिकुंज असे नाव ठेवले.येथे येणार्या प्रत्येकाला मानसिक शांती मिळावी अशी वातावरण निर्मिती केली.नैसर्गिक व कृत्रिम सौंदर्य सर्वत्र पाहायला मिळेल अशी रचना केली.संपूर्ण डोंगरावर निरनिराळ्या वृक्षांची लागवड केली.त्यामध्ये निरनिराळ्या बागा निर्माण केल्या.सर्वत्र रस्ते खेळविले.रामगडच्या पायथ्याला असलेल्या तलावातून पाणी उपसून ते पंपांच्या साहाय्याने वर चढवण्यात आले.गडावरही विहिर होतीच परंतु त्याचा पाणीपुरवठा सर्वत्र पुरेल इतका नव्हता.ठिकठिकाणी कारंजी निर्माण करण्यात आली.
हॉटेल झोकात चालू लागले.सुमारे दहा वर्षे गेली.एके दिवशी रात्री राजवाड्यातील सर्व लाइट अकस्मात गेले. इलेक्ट्रिशियनने सर्व तपासणी केली. कुठेही कांहीही दोष आढळला नाही.वीज सुरू झाली नाही.कांही कारणाने वीज अकस्मात गेली तर पर्यायी योजनाही होती. तीही बंद पडली होती.वीज गेल्यामुळे मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, पंखे, पाणीपुरवठा ,सर्वच बंद झाले होते.सर्व निवासी ग्राहकांमध्ये हाहा:कार उडाला.वीजयंत्रणा दुरूस्त करणारा हताश झाला होता. थोड्या वेळाने वीज आपोआप आली.वीज कां गेली आणि कशी आली याचे कोणतेही स्पष्टीकरण कुणीही देऊ शकत नव्हता. सर्व निवासी ग्राहकांमध्ये चलबिचल निर्माण झाली.
दुसर्या दिवशी वीजपुरवठा सुव्यवस्थित होता.परंतु अकस्मात पाणीपुरवठा बंद झाला.नळ दुरुस्ती करणाऱ्याने प्लंबरने खटपट केली.कुठेही कांहीही दोष नव्हता.पाणी बंद कां झाले याचे कोणतेही तर्कशुद्ध स्पष्टीकरण देता येत नव्हते.तीन तासाने पाणी पुरवठा आपोआप सुरळीत झाला .
तिसर्या दिवशी सर्व लिफ्ट बंद पडले. सर्वानाच जिन्याने चढ उतार करावा लागला.जे लिफ्टमध्ये होते ते लिफ्टमध्येच अडकले.खटपट करूनही लिफ्ट चालू झाली नाही.मानवी ताकद वापरून लिफ्ट जवळच्या मजल्यावर आणावी लागली.आंतील लोकांची सुटका करावी लागली.
चौथ्या दिवशी मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा बंद पडली.उकाड्याने निवासी ग्राहकांचा प्राण जाण्याची वेळ आली.
एवढय़ा मोठय़ा पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रत्येक विभागासाठी विशेष तंत्रज्ञांचा समूह कायमचा नोकरीला ठेवलेला होता.वातानुकूलित यंत्रणेची देखभाल करणारे,पाणी पुरवठा नीट ठेवणारे,लिफ्ट ,गॅसपुरवठा इत्यादी व्यवस्था पाहणारे, सर्व तंत्रज्ञ विशेषज्ञ व हॉटेल व्यवस्थापक यांची एक मीटिंग झाली.कुणालाही कांहीही दोष आढळला नाही.
केवळ न कळणारे कारण !अगम्य कारण!अमानवी कारण!भुताटकी!अशा निर्णयावर सर्व जण आले.
एकामागून एक अशी आणखीही अनेक संकटे आली.पुढील कांही दिवस या संकटांमध्ये निरनिराळी भर पडत गेली.सर्व ग्राहक हॉटेल सोडून गेले.सर्व( सोशल मीडियावर) सामाजिक माध्यमांवर, न्यूज चॅनेल वर्तमानपत्रे इत्यादीवर ही बातमी आली.कुणीही हॉटेलमध्ये येत नाहीसा झाला.शांतिकुंजचे अशांतीकुंजमध्ये रूपांतर झाले.
*मनसुखलाल (हॉटेल मालक) याचे कारण शोधण्यासाठी प्रयत्नशील होता.*
*कारण मिळाले असते तर ते दूर करता आले असते.*
*शेवटी हा सर्व ~संयुक्त गट भुताटकी~चा प्रकार आहे असे लक्षात आले. *
(क्रमशः)
१४/५/२०२१©प्रभाकर पटवर्धन