Get it on Google Play
Download on the App Store

९ शापित पेठ १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

माझा मित्र आनंदकडे आम्ही सुटीमध्ये मजा करण्यासाठी गेलो होतो.आम्ही पाच जण होतो .त्यांच्या घरात संयुक्त कुटुंब असल्यामुळे दोन काका काकू आई वडील भाऊ बहिण असा मोठा बारदाना होता .त्यांची शेती दुकान आणि काही व्यवसाय होते .वडील व दोन काका सर्व उद्योग, व्यवसाय, व शेती समर्थपणे सांभाळत असत .

सकाळी नाष्टा केल्यावर पोहायला जात असू.बऱ्याच वेळा  विहिरीवर तर क्वचित नदीवर पोहायला जात असू.विहिर शेतात होती. गोल होती. त्याला आड म्हणत असत.नदी गावापासून थोडी लांब होती .तिथेही आम्ही कधी कधी पोहायला जात असू.दुपारी भरपूर जेवण नंतर वामकुक्षी दक्षिणकुक्षी संध्याकाळी पुन्हा भटकंती रात्री जेवणानंतर मध्यरात्रीपर्यंत पत्ते गप्पा झोप असा कार्यक्रम चालला होता .

माझ्या मित्राचा गाव बराच मोठा होता .एकूण आठ वाड्या,आळ्या,किंवा पेठा होत्या . सोमवार पेठ ते रविवार पेठ अशा सात आणि आठवी पेठ शापित पेठ म्हणून होती.मोठ्या गावात निरनिराळ्या विभागांना आळी, पेठ,वाडी,क्वचित  मोहल्ला अश्या  नावाने ओळखले जाते .कधी वार(रवी, सोम, इत्यादी ),कधी राष्ट्रीय थोर व्यक्ती(टिळक, गांधी ,फुले, इत्यादी ),कधी संत( तुकाराम, ज्ञानेश्वर, इत्यादी),कधी स्थानानुसार वरची, खालची,मधली, नदीकाठची, सड्यावरची आळी, कधी जातीवर आधारित ,कुणबी भंडारी  गुरव  इत्यादी नावाने  ओळखले जाते. परंतु शापित पेठ हे एक वेगळेच विशेष नांव मला आढळले .

मी आनंदला हे कसले विचित्र नाव असे विचारले . पुढे मी म्हटले शापित पेठेमध्ये राहणाऱ्या लोकांना मी शापित पेठेमध्ये राहतो असे सांगताना काय वाटत असेल ?त्यावर आनंद म्हणाला या पेठेमध्ये कुणीही राहत नाही .पेठेमध्ये फक्त पडकी घरे आहेत .पाच सात वाडे आहेत .वाडे ब्राह्मण समाजाचे आहेत .तर घरे कुणबी समाजाची आहेत .एवढी सर्व घरे पडकी रिकामी कां आहेत? असे मी आनंदला विचारले .तो म्हणाला ती एक मोठी कहाणी आहे.

एके काळी ही सर्व घरे नांदती होती .ब्राह्मणांची घरे खोत मंडळींची होती .ते सर्व चुलत चुलत नातेवाईक होते .जमिनीवरून व पैशावरून  तंटे होत असत .शेवटी हे तंटे ही भांडणे विकोपाला गेली .शहरातून गुंड आणून मारामारीपर्यंत प्रकरण गेले .त्यामध्ये काहींचे खून पडले .एका वाड्याला आग लावण्यात आली .तो वाडा जळका वाडा म्हणून ओळखला जातो. काही तुरुंगात गेले .काही देशोधडीला लागले .एकेक जण आपापले वाडे सोडून शहरात निघून गेले .नंतर रात्रीचे त्या वाड्यांतून विचित्र भयानक आवाज येऊ लागले .कधी एखादा वाडा जळताना दिसे.जवळ गेल्यावर रात्री त्याची धग उष्णता जाणवे.दुसऱ्या दिवशी सकाळी पाहावे तो वाडा जसाच्या तसा असे . कधी वाड्यातून किंकाळ्या ऐकू येत .हळूहळू तिथे वटवाघूळे, घुबडे,उंदीर घुशी पाली कांडेचोर यांनी यांनी वस्ती केली.

कुणबी खोतांवर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून होते .खोत गेल्यावर त्यांचा आधारच निघून गेला .त्यात रात्री या वाड्यातून येणारे आवाज किंकाळ्या यांनी सर्व भयभीत झाले. कुणबी आपली घरे मोडून दुसरीकडे राहायला गेले .संपूर्ण पेठ रिकामी झाली.पूर्वीं या पेठेचे नाव खोतांची पेठ असे होते.लोक हळूहळू त्या पेठेला शापित पेठ असे म्हणू लागले.   

रिकामी पडकी घरे पाहून भुते तिथे आता वस्तीला आली. आता तिथे भुतांची वस्ती आहे असे समजले जाते.रात्री त्या विभागात कुणीही जात नाही .रात्रीचे सोडा परंतु दिवसाही कुणी जात नाही.  कधी एकदा वाटसरू चुकून त्या पेठेत गेला तर त्याला भयानक अनुभव येतात .सकाळी मनुष्य तिथे बेशुद्ध होऊन पडलेला आढळून येतो .त्याला विचारल्यास तो काहीही सांगायला तयार नसतो .नुसती रात्रीच्या प्रसंगांची आठवण आली तरी तो भयाने कांपत असतो. एखादा चुकून तिथे गेल्यावर आलेल्या अनुभवानी पळत सुटतो तो पेठेबाहेर असलेल्या मारुती मंदिराजवळ येऊनच थांबतो .

आम्ही नदीवर पोहायला जाताना ही सर्व हकिगत आनंदने आम्हाला सांगितली.मी त्यावर हसून एकदा त्या पेठेत रात्रीचे गेले पाहिजे असे म्हटले .त्यावर एक दोन मित्रांनी नको रे बाबा विषाची परीक्षा असे म्हटले.  तर एक दोघांनी हसून अवश्य जाऊया म्हणून उत्साह दाखविला .

शेवटी एका रात्री जेवण झाल्यावर आम्ही सर्व चांदण्यात फिरून येतो  असे सांगून शापित पेठेकडे जाण्याच्या इराद्याने  बाहेर पडलो.

त्या दिवशी बहुधा पूर्णिमा असावी .चंद्र अजून डोकीवर यायचा होता . चांदणे सर्वत्र पडले होते .आनंदच्या गावामध्ये दाट झाडी आहे .त्यातून चंद्राचे कवडसे जमिनीवर पडले होते.कधी कधी चांदण्या रात्रीपेक्षा काळोखी रात्र बरी वाटते .सर्वत्र दाट काळोख असल्यामुळे आपल्याला उगीचच निरनिराळया आकृती दिसत नाहीत.चांदण्या रात्री आपल्याला झाडांच्या निरनिराळ्या आकृती दिसतात .प्रत्येकाच्या स्वभावानुसार प्रत्येकाच्या बघण्याच्या कोनानुसार,झाडीच्या प्रकारानुसार,  त्यातून वाटेल ते भास होत असतात  .चांदण्याचा आधार वाटण्याऐवजी जास्तच भीती वाटू लागते.आमचेही बहुधा तसेच झाले असावे .जवळ ,दूर ,डावीकडे, उजवीकडे ,झाडांवर, आम्हाला निरनिराळे भास होऊ लागले .कधी वानर, कधी माणूस, कधी एकदा राक्षस,वाटेल ते भास होऊ लागले होते .दूरवर एक वानर खिंचिक खिंचिक आवाज करीत होता.कुणीतरी खेकसल्यासारखे खाकरल्यासारखे वाटत होते .लांबवर एक घुबड घुघुत्कार करत होते.सर्वत्र पसरलेल्या शांततेमध्ये ते ओरडणे .अंगावर काटा उभा करीत होते .आम्ही हळूहळू शापित पेठेच्या दिशेने वाटचाल करत होतो.

एवढ्यात डोकीवरुन दोन टिटव्या ,टिटीव टिटीव आवाज करीत उडत गेल्या .सर्वत्र पसरलेल्या भयानक शांततेमध्ये तो अावाज काळीज चिरत गेला.आपण उगीच शापित पेठेकडे जायला निघालो असे आम्हाला वाटू लागले.आम्हाला तिथे जाऊन ऐकीव गोष्टी खऱ्या आहेत का ते पाहायचे होते .बऱ्याच वेळा आपल्याला अज्ञात गूढ भीतीदायक गोष्टींबद्दल एक अनाकलनीय आकर्षण असते .आम्ही कदाचित तशाच आकर्षणामुळे शापित पेठेकडे जाण्यास निघालेले असू. काही वेळा उगीचच एखाद्या वस्तूबद्दल, जागेबद्दल,अफवा पसरतात .एखाद्याचे नाव जसे कानफाटे पडते त्याचप्रमाणे जागेचेही होते . 

आमच्या पैकी एक मित्र नको आपण परत जाऊ या असे म्हणू लागला .आम्ही त्याला तुला हवे तर परत जा आम्ही ठरल्याप्रमाणे शापित पेठेमध्ये जाणारच असे सांगितले .त्याची एकट्याने परत जाण्याची हिंमत नव्हती.आमच्या बरोबरही पुढे यावे असे त्याला वाटत नव्हते . आम्ही त्याला तू इथेच थांब. आम्ही परत जाताना आमच्याबरोबर ये असे सांगितले. शापित पेठेच्या बाहेर थांबण्याचीही त्याची हिम्मत नव्हती.शेवटी लळत लोंबत तो नाइलाजाने आमच्या बरोबर निघाला.

आम्ही पाचही जण शेवटी शापित पेठेमध्ये शिरलो.गल्लीमध्ये सर्वत्र सन्नाटा पसरला होता .आम्हाला आमच्याच  पायांचा आवाज ऐकू येत होता.छातीची धडधड ऐकू येत होती . भूत अस्तित्वात असेल किंवा नसेल,पण ते उगीचच्या उगीच कुणाला दगाफटका करणार नाही असा माझा ठाम विश्वास होता.सर्व माणसे कुठे चांगली असतात .सत्व रज तम गुणांचे मिश्रण प्रत्येकामध्ये निरनिराळे असते.प्रत्येक गुणाच्या आधिक्याप्रमाणे माणूस चांगला वाईट असतो .देव इथेच आहे आणि दानवही इथेच आहे माणूस तर इथे आहेच आहे .यावर मी ठाम होतो.

जी गोष्ट माणसांची तीच गोष्ट भुतांची .चांगले वाईट त्यांमध्येही असणारच . मदत करणारी , विरोध करणारी, त्रास देणारी, घाबरवणारी,विनोदी,दुष्ट प्रवृत्तीची, इत्यादी सर्व प्रकारची भुते असणार असा एक मला कुठेतरी अंतर्यामी विश्वास वाटत होता .समजा या वाड्यातून भुते असलीच तर तीही विविध प्रवृत्तींची असणार .एखाद्या भुताने आम्हाला त्रास देण्याचे ठरविले तरी दुसरे एखादे भूत आम्हाला मदत करणार नाही कशावरून .आपण न घाबरता सर्वत्र फिरून आले पाहिजे असे मी मनाशी ठरविले होते.

एक दोन वाड्यांचे दरवाजे बंद होते.एक वाडा उघडा होता.  या वाड्याला दरवाजेच नव्हते .

*चंद्र अाकाशाच्या मध्यावर आला होता.*

*वाड्यावरील कौले  बहुधा उडालेली असावीत.*

*वाडा चंद्र प्रकाशाने उजळलेला होता.

*या वाड्यात जावे, वाडा सर्वत्र फिरून पाहावा.*

*भूत भेटल्यास त्याला हॅलो हाय करावे .अश्या  गमतीशीर विचाराने आम्ही त्या वाड्यात पाऊल ठेवले  .*

(क्रमशः)

२/४/२०२०©प्रभाकर  पटवर्धन