६ बंद फ्लॅटमधील खून
सकाळचे सहा वाजले होते .प्लेझंट हाइट्स या बहुमजली इमारतींमध्ये चौथ्या मजल्यावरील, फ्लॅट नंबर चारशेदोनच्या कडीमध्ये अडकवलेल्या एका पिशवीमध्ये दुधवाला दुधाच्या पिशव्या ठेवीत होता .दुधाच्या पिशव्या,पिशवीत ठेवल्यावर आतील लोकांना कळावे म्हणून बेल वाजवावी अशी त्याला सूचना होती .त्याप्रमाणे दुधवाल्याने बेल वाजविली परंतु आतून कुणीच पिशव्या घेण्यासाठी आले नाही.नेहमी सुधा दुधाच्या पिशव्या नेण्यासाठी लगेच दरवाजा उघडत असे. आज कुणीच आले नाही.त्यामुळे दुधवाल्याला जरा आश्चर्य वाटले .आज कोणतीही सुटी नव्हती. कुणीतरी येईल आणि पिशव्या नेईल.कुणी आले नाही यामध्ये विशेष काही आहे असे दुधवाल्याला वाटले नाही . दुधवाला निघून गेला.जर दूध नको असेल तर त्याप्रमाणे चिठी कडीला अडकविण्यात येत असे. एकदा त्याने कुठे चिठी अडकवलेली नाहीना ते बघून खात्री केली. त्या चिठीप्रमाणे दुधवाला दूध टाकीत असे.फ्लॅटमध्ये सर्वत्र सामसूम होते .
फ्लॅटमध्ये वसुधा व सुधा अशा दोघी मैत्रिणी राहात असत.वसुधा बँकेत नोकरी करीत असे .ती दहा वाजता बँकेत जाण्यासाठी निघे .सुधा शाळेत शिक्षिकेची नोकरी करीत होती .तिची सकाळची शिफ्ट असल्यामुळे ती लवकर उठत असे .सहा वाजता दूध आल्याबरोबर चहा करून आपले आवरून शाळेत जाण्यासाठी निघे.त्यामुळे ती सहा वाजता दुधाची वाट पाहात असे .तिला चहा ताज्या दुधाचा लागत असे .आज बेल वाजविल्यावर ती दार लगेच उघडण्यासाठी न आल्यामुळे दुधवाल्याला जरा आश्चर्य वाटले होते .
सुधा सात वाजता शाळेत जाण्यासाठी निघे त्याचवेळी समोरच्या फ्लॅटमधील नयना रांगोळी काढण्यासाठी दरवाजाजवळ बसलेली असे .त्यावेळेला दोघी एकमेकांकडे बघून स्मितहास्य करीत असत .आज नयना रांगोळी काढीत असतांना सुधा न दिसल्यामुळे तिला थोडे आश्चर्य वाटले.आज शाळेला सुटी तर नाही ना म्हणून तिने क्षणभर विचार केला परंतु सुटीचे काही कारण तिला आढळले नाही . तिची कदाचित रजा असेल असे म्हणून तिने तो विषय आपल्या डोक्यातून काढून टाकला.
बरोबर नऊ वाजता सुनंदा कामासाठी आली .तिच्याजवळ एक चावी दिलेली होती. तिने बेल वाजवावी कुणी दरवाजा न उघडल्यास चावीने उघडून आत यावे अशी तिला सूचना होती.तिने बेल वाजविली .कुणीही दरवाजा उघडला नाही .जवळच्या चावीने दरवाजा उघडण्याला तिने सुरुवात केली .परंतु किल्ली फिरवून दरवाजा ढकलल्यावर तो आत जाईना.तिने पुन्हा एकदा प्रयत्न केला .आतील कडी लावलेली आहे असे तिच्या लक्षात आले. तिने पुन्हा दोन तीनदा बेल वाजवली .कुणीही दरवाजा उघडला नाही त्यामुळे तिला थोडे आश्चर्य वाटले .बाथरूम टॉयलेटला बाई गेल्या असतील असे समजून ती पाच दहा मिनिटे तशीच बाहेर उभी राहिली .तरीही कुणी दरवाजा उघडला नाही .तेव्हा तिने पुन्हा दोन तीनदा बेल वाजविली .कुणीही दरवाजा न उघडल्यामुळे शेवटी ती समोरच्या फ्लॅटमधील नयनाकडे आली.दोघीनीही दरवाजावर जोरात थापा मारल्या .बेल अनेकदा वाजविली.शेवटी त्यांनी पोलिसाना फोन करण्याचा निर्णय घेतला .
पोलिस स्टेशनमधून तिला अाम्ही लगेच येत आहोत असे सांगण्यात अाले .नेहमीचा पोलिसगट जाण्यासाठी जीपमध्ये बसला.तेवढ्यात समोरून शामरावांची मोटार येऊन थांबली. मोटारीतून उतरताना शामरावांनी गटप्रमुखांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले .गटप्रमुख जीपमधून उतरला त्याने एक कडक सॅल्यूट शामरावांना मारला आणि हकीकत सांगितली. वाटल्यास मला फोन करा. एवढे म्हणून शामराव आपल्या केबिनकडे निघाले .
पोलिसांनी कुणीही दरवाजा उघडत नाही असे पाहून दरवाजा फोडण्याचा निर्णय घेतला .दरवाजा उघडल्यानंतर त्यांना बेडरूममध्ये एक प्रेत पंख्याला लटकताना आढळले.शेजारीच एक चिठी ठेवलेली आढळून आली. त्यामध्ये मी जीवनाला कंटाळली असल्यामुळे आत्महत्या करीत आहे कुणालाही दोष देऊ नये : सुधा असे लिहिलेले होते .त्या चिठीवरून मृत स्त्री सुधा हे कळत होते . सुनंदा व नयना या दोघींनी त्याला दुजोरा दिला .गट प्रमुखाने शामरावांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. शामरावांनी लगेच तिकडे जाण्याचा निर्णय घेतला .
चौकशी करता या फ्लॅटमध्ये वसुधा व सुधा अशा दोघी मैत्रिणी राहतात असे कळले.वसुधा कुठे आहे अशी चौकशी करता ती बहुधा बँकेत असेल असे कळले.बँकेत फोन करता तिची आज रजा आहे असे सांगण्यात आले .वसुधा कुठे असेल ते कुणालाच सांगता येईना .सुधाचा मोबाइल तिथेच कॉटवर पडलेला होता .मोबाइल एक्स्पर्ट शिवाय किंवा पासवर्ड माहित असल्याशिवाय फोन उघडणे शक्य नव्हते.एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली .फोन सुदैवाने वसुधाने केलेला होता .शामरावांनी फोन उचलल्यावर तिने तुम्ही कोण ?सुधा कुठे आहे तिला फोन द्या म्हणून सांगितले. शामरावांनी सुधाला अॅक्सिडेंट झाला आहे .ती हॉस्पिटलमध्ये आहे.म्हणून मी फोन उचलला .मी पोलीस इन्स्पेक्टर आहे असे सांगितले.कसला अपघात कुठे अपघात झाला वगैरे सुधाने किंचित किंचाळून विचारले. मी पुण्याला आहे .मी आणखी एक दिवस इथे राहणार आहे हे कळविण्यासाठी फोन केला होता असे तिच्या बोलण्यात आले .अपघात कुठे झाला असे विचारता जास्त काही न बोलता शामरावानी तिला इकडे लगेच निघून या म्हणून सांगितले. अपघात झाला. ती जिवंत आहे.ती कदाचित वाचेल.हे ऐकल्यावर वसुधाच्या आवाजामध्ये किंचित फरक पडला व कंप निर्माण झाला असे शामरावांना वाटले .या वसुधाची कसून चौकशी केली पाहिजे एवढी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली.
सुधाचे हस्ताक्षर मिळाल्यानंतर , हस्ताक्षर तज्ज्ञाने चिठीतील हस्ताक्षर तिच्या हस्ताक्षराशी ताडून बघितल्यानंतर चिठी कुणी लिहिली सुधानेच लिहिली का ते कळणार होते . पोस्टमार्टेम रिपोर्टशिवाय मृत्यूचे कारण कळणार नव्हते.वसुधाला पुण्याहून येण्यासाठी तीन चार तास तरी लागणार होते.पंचनामा करून ठसे वगैरे घेऊन फोटो काढून ब्लॉकला सील करून मंडळी पोलिस स्टेशनला परत आली वसुधा आल्यावर तिला पोलिस स्टेशनमध्ये येऊन भेटा असे कळविण्यात आले .
पोस्टमार्टेम रिपोर्ट आला .बहुधा गळा दाबून अगोदर खून करण्यात आला असावा आणि नंतर तिला फासावर लटकविण्यात आले असावे असा रिपोर्ट होता.पोटातील व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेला आहे .त्याचा अहवाल चार दिवसांनी येईल असे सांगण्यात आले .सुधाच्या शाळेतून तिचे हस्ताक्षर आणण्यात आले.चिठीतील हस्ताक्षर बहुधा जुळत नाही.खात्रीपूर्वक काही सांगता येत नाही असा रिपोर्ट आला.ब्लॉक तर आतून बंद होता .जर खून झाला असेल तर खुनी बाहेर कसा गेला ? दोन्ही रिपोर्ट निश्चित काही सांगत नव्हते.खून की आत्महत्या ?चिठी सुधाने लिहिली की नाही? खून असेल तर खुनी बाहेर कसा गेला ?वसुधाच्या आवाजात फरक का पडला ?एकूण केस सरळ वाटत होती तशी ती नसून त्यामध्ये गुंतागुंत आहे असे वाटत होते .
शामरावांनी जरा वेळ विचार करून युवराजांची मदत घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी युवराजांना फोन लावला.युवराजांनी शामरावांना लगेच ऑफिसवर बोलून घेतले.युवराजांनी प्रथम फ्लॅटला भेट देण्याचे ठरविले .तिथे सूक्ष्म निरीक्षणानंतर कितीतरी गोष्टी त्यांना समजण्यासारख्या होत्या .त्याचप्रमाणे वसुधाला भेटून तिच्याशी सविस्तर बोलले पाहिजे असे त्यांना वाटत होते.
दुपारी चारच्या सुमारास वसुधा पुण्याहून परत आली .म्हणजे तिने मी पुण्याहून आले असे सांगितले .पोलीस किंवा युवराज कधीही पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवीत नसत.
वसुधा उंच निंच स्ट्राँग स्टाउट व थोडी पुरुषी वळणाची वाटत होती .सुधा लहानखुरी कोमल अशी वाटत होती.दोघी एकमेकांच्या बरोबर विरुद्ध वाटत होत्या.वसुधा पुरुष असती तर यांचा जोडा चांगला दिसला असता असा एक विचित्र विचार युवराजांच्या मनात येऊन गेला .
वसुधाची चौकशी करता ती पुण्याला खरोखरच गेली होती असे आढळून आले .ती पुण्याला कुणाकडे गेली होती त्याची खात्री पुण्यातील पोलिसांमार्फत युवराजांनी करून घेतली .तिने तिची मोटार पार्किंग लॉटमध्ये लावलेली होती नंतर ती ट्रेनने पुण्याला गेली. परत आल्यावर गाडी पार्किंग लॉट मधून घेऊन ती तशीच ऑफिसवर आली होती .पार्किंग लॉट मधील सीसीटीव्हीमधील फुटेज त्यांनी मागितले होते त्यावरून बऱ्याच गोष्टी कळण्यासारख्या होत्या .पोलीस जो दिसेल त्याच्यावर संशय घेतात .वसुधाला सुधाचा खून करण्याचे काहीही कारण दिसत नव्हते .दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या .आत्महत्या म्हणून केस फाइल करावी व वसुधाला क्लीन चिट द्यावी असे एकदा शामरावांना वाटत होते.
युवराजांचे मत मात्र वेगळे होते .कुठे तरी काही तरी चुकत आहे असे त्यांना वाटत होते .हा न सापडणारा दुवा कोणता ते मात्र त्यांच्या लक्षात येत नव्हते.शामराव व ते एकदा फ्लॅटमध्ये जाऊन सर्वत्र सूक्ष्म निरीक्षण करून आले .त्यांनी संदेशला फोन लावून सुधा व वसुधा यांची सर्व बाजूनी चौकशी करण्यास सांगितले .त्या दोघींचा गेल्या पाच वर्षातील इतिहास ,त्यांच्या आवडी निवडी ,त्यांचे मित्र मंडळ ,त्यांची प्रेमप्रकरणे इत्यादी सर्व माहिती गोळा करण्यास सांगितले .फ्लॅटमधील दरवाजे खिडक्या याही युवराजांनी बारकाईने आतून व बाहेरून पाहिल्या .
व्हिसेराचा रिपोर्ट, संदेशचा रिपोर्ट, हे आल्याशिवाय युवराजांनी मनाशी बांधलेल्या अंदाजांना पुष्टी मिळणार नव्हती .
चार दिवसांनी व्हिसेराचा रिपोर्ट आला .त्यामध्ये सुधाला काहीतरी गुंगीचे औषध देण्यात आले होते त्याचे अवशेष सापडले .
संदेशने दिलेल्या अहवालात पुढील मजकूर होता . सुधाचे संजय बरोबर जवळजवळ गेले चार महिने प्रेम प्रकरण होते .त्यांनी लग्न करण्याचे निश्चित केले होते .सुधा ही शांत सज्जन प्रेमळ सालस मुलगी होती .गेले सहा महिने वसुधा व सुधा एकत्र राहात होत्या .त्या अगोदर वसुधा दुसऱ्या कुणा तरुणीबरोबर फ्लॅट शेअर करत होती असे म्हटले होते .फ्लॅट वसुधाच्या नावावर होता .ती कुणा ना कुणा मुलींबरोबर गेल्या पाच वर्षांमध्ये फ्लॅट शेअर करत होती.कुणाही मुलीबरोबर चार ते सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ तिने फ्लॅट शेअर केला नव्हता अशी टीप होती.शेअर केलेल्या मुलींचे नाव व पत्तेही दिलेले होते.
वसुधाचे कोणतेही प्रेमप्रकरण आढळले नाही .ती कधीही कोणत्याही मुलाबरोबर फिरताना आढळली नाही असेही लिहिले होते .शेजाऱ्यांजवळ चौकशी करता शेजाऱ्यांचे वसुधाबद्दल मत तितकेसे चांगले नाही असे आढळून आले .वसुधा नेहमी सुधावर हुकमत गाजवत असे, असेही नयनाच्या बोलण्यात आले .
गुप्तहेराचे काम जिगसॉ पझल जुळविण्यासारखे असते .निरनिराळे तुकडे समोर दिसत असतात .ते यशस्वीपणे एकमेकात बसवणे महत्त्वाचे असते .त्यानंतरच चित्र स्पष्ट होते .
पुरुषी वसुधा ,बायकी सुधा , वसुधाला कुणीही पुरुष मित्र नसणे,सुधाचे लग्न ठरणे,सुधाचा संशयास्पद मृत्यू ,त्याचवेळी वसुधा मुंबईत नसणे ,वसुधाचे वारंवार पार्टनर्स बदलणे,या सर्व गोष्टी एकत्र यशस्वीपणे जोडून चित्र तयार करावयाचे होते . वसुधा दोषी नसेलही परंतु तिच्यावर संशय निश्चित होता .फ्लॅटची कडी आतून लावलेली असताना खून कसा काय होऊ शकतो हाही एक मुद्दा होता .विषप्रयोगाने सुधा मेली नव्हती तर तिने गळफास घेतला होता .जर खुन्याने तिला गळफास दिला असे म्हटले तर खुनी बाहेर कसा आला हाही एक प्रश्न होता .
युवराजांनी पुन्हा एकदा फ्लॅटचे निरीक्षण करावे .त्याचप्रमाणे सुधाचा प्रियकर संजय ज्याच्याशी तिचे लग्न ठरले होते त्याच्याशीही एकदा बोलावे,वसुधाची पार्टनर म्हणून राहिलेल्या दोन तीन मुलींबरोबरही बोलावे व नंतर काय तो निर्णय घ्यावा असे ठरविले .
हे सर्व केल्यावर युवराजांनी मनाशी काही एक आराखडा तयार केला आणि शामरावांना फोन केला .वसुधाला फोन करून आम्ही तुझ्याशी जरा काही माहिती विचारण्यासाठी येत आहोत तुला वेळ आहे ना आम्ही आता येऊ का असे विचारले .तिने होकार दिल्यावर ही जोडगोळी वसुधाच्या फ्लॅटवर पोहोचली .
बंद फ्लॅटमधील खून*.
(युवराज कथा) भाग २ (अंतिम )
हॉलमध्ये सोफ्यावर शामराव व युवराज बसले होते .समोरच्या सोफ्यावर वसुधा बसली होती .युवराजांनी अशी जागा निवडली होती की वसुधा जिथे बसेल तिथे तिच्या तोंडावर भरपूर प्रकाश येईल त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील भाव सहज लक्षात येऊ शकतील.
युवराज व शामराव काहीही न बोलता स्तब्ध बसले होते .ते दोघेही वसुधाच्या चेहऱ्यावरील भाव निरखीत होते.दोघेही काहीही बोलत नसल्यामुळे वसुधा अस्वस्थ वाटत होती .हे दोघे कशासाठी आले असावेत असे प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.
शेवटी शांततेचा भंग वसुधानेच केला .तुम्हाला काय विचारायचे आहे? तुम्ही कशासाठी आलात? असे प्रश्न तिने विचारले.
सुधाने आत्महत्या का केली असेल असे तुला वाटते? असे युवराजांनी उलट विचारले.त्यावर तिचा कदाचित प्रेमभंग झाला असेल, किंवा ती एखाद्या असाध्य रोगाने ग्रस्त असेल, एखादवेळी काही कारणाने तिला नैराश्याने ग्रासले असेल आणि त्या डिप्रेशनमध्ये तिने हा आत्मघातकी निर्णय घेतला असेल,मला काही कल्पना नाही .ती माझ्याशी मोकळेपणाने बोलत नसे .असे त्यावर वसुधाने उत्तर दिले.आणि पुढे लगेच प्रश्न विचारला की तुम्हाला चौकशीतून काय आढळून आले .
त्यावर युवराजांनी जास्त गोलगोल न बोलता सरळ वसुधावर आरोप केला.तू तिचा खून केला असे आम्हाला आमच्या चौकशीतून आढळून आले आहे . युवराज हा आरोप करीत असताना दोघेही तिच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन पाहात होते.ती दचकली आणि यांना हे कसे काय कळले बुवा अशासारखे भाव तिच्या चेहऱ्यावर होते .
तिने लगेच असे कसे शक्य आहे ?मी तर तिची मैत्रीण होते? मी तिला कशाला मारू? तिला मारून मला काय मिळणार ?मी तर त्या वेळी पुण्याला जाणाऱ्या गाडीत होते ?मी तिला कशी मारू शकणार होते ?फ्लॅटला आंतून कडी लावलेली होती जर मी तिला मारले तर कडी लावलेली असताना मी बाहेर कशी आल्ये?असे अनेक प्रश्न विचारून शेवटी तुम्ही उगीच माझ्यावर आरोप करीत आहात.असे म्हणत समारोप केला.
यावर युवराजांनी आमच्याजवळ सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आहेत असे सांगितले .व पुढे बोलण्यास सुरुवात केली .
तुम्ही दोघी मैत्रिणी होता हे बरोबर आहे. परंतु तुमची मैत्री दोन मुलींमधील जशी असते तशी नव्हती .तू लेस्बियन आहेस .जाहिरात देऊन फ्लॅटमध्ये शेअरिंग बेसिसवर तू मुली ठेवतेस.वरवर तुझा उद्देश आपले भाडे कमी व्हावे आणि सोबतीला कोणीतरी मैत्रीण मिळावी हा असतो परंतु तुझा अंतस्थ हेतू दुसराच काहीतरी असतो .तू भाडेकरू मुलीला त्या विशिष्ट अर्थाने नादी लावू पहातेस.त्यांना गुंगीचे औषध देऊन तू त्यांच्याशी वाटेल ते चाळे करतेस. तुला ज्या वश होत नाहीत त्यांना तू काही ना काही कारणाने काढून टाकतेस.ज्या वश होतात त्यांचा तुला कंटाळा येतो म्हणून तू त्यांना काढून टाकतेस.गेल्या पाच वर्षात तू सरासरीने दर वर्षाला दोन ते तीन मुली याप्रमाणे पाच वर्षांत बारा मुली भाडेकरू तत्त्वावर ठेवल्या होत्यास.मी त्या सर्वांची चौकशी केली आहे .जर कोर्टात केस उभी राहिली तर त्या तुझ्याविरुद्ध साक्ष देण्यास तयार आहेत .यावर तुला काय म्हणायचे आहे असे युवराजांनी विचारले .
तुम्ही हा माझ्यावर किळसवाणा भयानक आरोप करीत आहात .मी तुमच्या विरुद्ध कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा लावीन.त्या मुली नीट वागत नव्हत्या .त्यांच्या सवयी मला पटण्यासारख्या नव्हत्या .कुणी आळशी, कुणी अस्वच्छ,कुणी भांडखोर ,कुणाचे अनेक तरुण मित्र ,कुणी रात्री फार उशिरा येणार ,कुणी तुम्ही माझ्यावर जो आरोप करीत आहात तश्या ,कुणी वेळेवर भाडे देत नसे,अश्या कारणांमुळे मी त्यांना भाडेकरू म्हणून काढून टाकले .त्या सर्व माझ्याविरुद्ध कुभांड रचत आहेत .कोर्टात माझ्या वकिलांसमोर उलट तपासणीमध्ये त्या टिकणार नाहीत.असे म्हणत उलट जोरदार प्रतिहल्ला चढविला .दुसरा एखादा गांगरून गेला असता परंतु युवराज त्यातले नव्हते.ते फक्त एवढेच म्हणाले की जेव्हा कोर्टात आपण आमने सामने येऊ त्या वेळी पानीका पानी और दूध का दूध हो जायेगा .
जरी वसुधा खोट्या आवेशाने वरीलप्रमाणे बोलत असली तरी युवराज बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडत चालला होता .त्यावरून ती नुसती पाण्यात नसून चांगली खोल पाण्यात आहे असे लक्षात येत होते.
आणखीही मला बरेच काही सांगायचे आहे माझे बोलणे पूर्ण झाल्यावर मग तुला काय सांगायचे आहे ते सांग असे म्हणून युवराज पुढे बोलू लागले.
लहानखुरी नाजूक सुधा तुला खूप आवडली .तुम्ही दोघीनी एकत्र रहावे असा तुझा आग्रह होता .तुझे चाळे सुरुवातीला तिला जरी कदाचित आवडले असले तरी नंतर तिला ते नकोसे झाले.ती जरी तुला प्रतिकार करीत असली तरी तू ते लक्षात घेत नव्हतीस. तू तिला गुंगीचे औषध देऊन हे सर्व करीत होतीस.एक प्रकारे तू तिच्यावर बलात्कार करीत होतीस.सुधाला दुसरी जागा मिळत नसल्यामुळे आणि हॉटेलमध्ये राहाणे परवडण्यासारखे नसल्यामुळे ती नाईलाजाने तुझे अत्याचार सहन करीत राहिली . तेवढ्यात तिला संजय भेटला .दोघांचेही आकडे जुळले .त्यांच्या भेटीगाठी वाढत चालल्या.दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला .यातील तुला काहीही पसंत नव्हते .सुधा तुला कायमची सोडून जाणार हे तुला मानवले नाही .तू सुधाला नाना प्रकारे समजावून पाहिले .सुधा काहीही ऐकण्याला तयार नव्हती.शेवटी सुधा मला मिळणार नाही तर तुलाही मिळणार नाही अशा पायरीपर्यंत तू येवून पोहोचलीस .
नंतर सुधाला मारण्याचा तू परफेक्ट प्लॅन आखला .तिला पाण्यातून पेयातून किंवा जेवणातून गुंगीचे औषध दिले.मुली तुला वश व्हाव्यात म्हणून पूर्वीही हा प्रयोग तू अनेक जणींवर केला होतास. आपल्याला कुणी खुनी म्हणून ठरवू नये यासाठी तू पुण्याला जाण्याचा प्लॅन आखलास.पार्किंग लॉटमध्ये गाडी उभी केल्यानंतर तू बाहेर येऊन टॅक्सी केलीस.पुण्याला जाणारी गाडी अकरा वाजता असताना तू पार्किंग लॉटमध्ये मोटर साडेआठला उभी केलीस.पार्किंग लॉट मधल्या सीसीटीव्हीमध्ये तू स्पष्टपणे मोटार उभी करून बाहेर येत असताना व टॅक्सीमध्ये बसताना दिसत आहेस.प्लेझंट हाइट्सवर टॅक्सी आल्यावर तू तिथून वॉचमनला फोन केला .फोन घेण्यासाठी वॉचमन केबिनमध्ये गेलेला असताना तू त्याची नजर चुकवून पटकन लिफ्टमध्ये शिरलीस.लिफ्टमध्ये तू चेहऱ्याला तुझा स्कार्फ बांधलास आणि चेहरा झाकलास.त्यामुळे कॉरिडॉरमधून तुझ्या फ्लॅट पर्यंत येताना तुझा चेहरा सीसीटीव्हीमध्ये दिसला नाही. फक्त स्कार्फ बांधलेली तरुणी तुझ्या फ्लॅटपर्यंत येताना दिसली .आता जर तुझा वॉर्डरोब पाहिला तर त्यात तो ड्रेस स्कार्फ नक्की आढळून येईल .
नंतर फ्लॅट उघडून आत आल्यावर अगोदरच गुंगीचे औषध पाजलेली सुधा झोपेत होती तिला तू फास देऊन पंख्याला लटकाविले.त्या ओढाताणीमध्ये तिच्या मानेवर वळ उठले.त्याचप्रमाणे तिला पंख्याला दोरी अडकवून ओढताना दोरी घासली गेली . तिला फास देण्या अगोदर तू तिच्याकडून आत्महत्या करीत आहे दुसऱ्या कुणाला जबाबदार धरू नये अशी नोट लिहून घेतली . ती अर्धवट गुंगी मध्ये असल्यामुळे तिला आपण काय लिहित आहोत,कय करीत आहोत, याचे भान नव्हते. त्यामुळे तिचे हस्ताक्षर वेडेवाकडे आलेले आहे . काही वेळा जुळते आणि काही वेळा जुळत नाही .तिच्या पोटातील व्हिसेराचा रिपोर्ट गुंगीचे औषध दिल्याचे दाखवितो.आता जर तुझे कपाट तपासले तर ते गुंगीचे औषध तुझ्या कपाटात सापडेल .तू बाहेरच्या दरवाजाला आतून कडी अगोदरच लावलेली होती .तुमच्या फ्लॅटची एक खिडकी फ्रेंच विंडो म्हणजेच ज्याला ग्रील नाही अशी होती .त्याला ग्रील बसविताना फक्त वरच्या खालच्या पट्टीला मध्ये एकेक स्क्रू लावलेला आहे.कदाचित साईडचे स्क्रू तू काढून टाकले असशील त्यामुळे ते ग्रील फिरवून आत बाहेर करता येणे शक्य आहे .खिडकीची खालच्या बाजूची खिटी जर अर्धवट ठेवली आणि झडप जोरात ओढले तर ती खिटी खाली पडते व खिडकी लॉक होते. तर तू तिला फाशी दिल्यावर ग्रील फिरवून खिडकीतून बाहेर पडलीस.ग्रील जाग्यावर बसवून नंतर खिडकी ओढली व अश्या प्रकारे खिडकी लॉक झाली.सुदैवाने सर्व फ्लॅट बंद असल्यामुळे तुला कुणीही पाहिले नाही .जर पाहिले असते तर तू खिडकी बंद होत नाही वगैरे काहीतरी कारण सांगितले असतेस.
नंतर वॉचमनची नजर चुकवून टॅक्सी पकडून तू स्टेशनवर आलीस. अकराची गाडी तुला बरोबर मिळाली.तू पुण्याची दोन तिकीटे काढली होतीस एक नऊच्या गाडीचे व दुसरे अकराच्या गाडीचे. दुसऱ्या दिवशी तू पुण्यावरून येथील परिस्थिती पाहण्यासाठी फोन केलास.तो फोन शामरावांनी उचलला. तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे कदाचित तिचा जीव वाचेल हे ऐकून तू जोरात ओरडलीस.ती शुद्धीवर आली तर तुला धोका होता.दुसऱ्या दिवशी तू पोलीस स्टेशनमध्ये भेटण्यासाठी आलीस.
तर तू हा खून वर सांगितलेल्या कारणासाठी केलास आणि आतील कडी लावलेली असूनही तू बाहेर येवू शकलीस. संजय व तुझ्या निरनिराळ्या पार्टनर्स यांचे जबाब मॅजिस्ट्रेटसमोर नोंदविले आहेत.त्यावरून तू तुझ्या निरनिराळया पार्टनर्सची कशी वागत होतीस ते स्पष्ट होते. आता यावर तुला काय बोलायचे आहे ते बोल .
हे सर्व एेकून वसुधाचा चेहरा हिंस्र दिसू लागला .ती ज्याप्रमाणे लेस्बियन होती त्याचप्रमाणे ती थोडी सायकिकही असावी .तिला बेड्या घालण्यासाठी शामराव उठले.एवढ्यात उभी राहून ती धावत उघड्या दरवाजातून बाहेर पडली व गॅलरीतून तिने खाली उडी मारली. शामरावांना तिचा निष्प्राण देहच ताब्यात घेता आला .
१/३/२०१९©प्रभाकर पटवर्धन