Get it on Google Play
Download on the App Store

११ पाहुणचार २-४

गोष्ट काल्पनिक आहे यदाकदाचित स्थळ नाव  इत्यादीबद्दल साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)                       

रात्री त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे.

त्यांना कशा कशाला रात्री तोंड द्यावे लागणार आहे .

याची जर त्यांना तिळमात्र कल्पना असती तर ते पुठ्याला पाय लावून सुसाट मिळेल त्या दिशेने पळत सुटले असते .

घरामध्ये एकूण पाच माणसे असावीत. तात्या, तात्यांची पत्नी, मुलगा सून व त्यांचा एक लहान मुलगा .तात्या अंगणात बाजेवर बसून राजेश व योगेश यांच्याशी गप्पा मारीत होते .त्यांचा नातू त्याच्या मांडीवर बसला होता .मुलगा सुधाकर ओटीवर आरामखुर्चीत बसून पेपर वाचत होता. तात्यांची पत्नी व सून स्वयंपाकघरात स्वयंपाकात गुंतलेल्या  असाव्यात .शहरापासून दूर खेडेगाव असूनही घरातील वातावरण शहरी सुशिक्षित वाटत होते .तात्यांची सून आंतबाहेर लगबग करीत होती. घरातील पाणी बहुधा संपले असावे.तात्यांचा मुलगा सुधाकर पायरहाट चालवत होता.  दोणीत(चौकोनी पाणी साठविण्यासाठी दगडी भांडे)  पाणी पडत होते .कळश्या भरभरून सून ते आत नेत होती.

योगेशची नजर ओटीवर गेली.तिथे सुधाकर पेपर वाचत बसला होता .योगेशने विहीरीकडे पाहिले .तिथे सुधाकर रहाट ओढत होता. एकाच वेळी एकच व्यक्ती ओटीवर व ऱहाटावर कशी असू शकेल असा प्रश्न योगेश राजेश दोघांच्याही मनात निर्माण झाला .जुळे भाऊ असतील किंवा भाऊभाऊ सारखे दिसत असतील म्हणून आपला गोंधळ होत आहे  असे स्वाभाविकपणे त्यांना वाटले . घरात आपल्याला वाटले त्याप्रमाणे पाचऐवजी सहा माणसे असावीत असा त्यानी अंदाज केला.तिकडे त्यांनी विशेष लक्ष दिले नाही .

तात्यांजवळ जनरल गप्पा चालल्या होत्या .सुधाकर बाहेर येऊन अंगणात त्यांच्या समोर बसला .गप्पात तोही अधूनमधून भाग घेत होता .राजकारण, पीकपाणी, हवामान ,राजेश व योगेश काय करतात, त्यांची आवडनिवड इत्यादी अघळपघळ इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या. दोघांनीही तात्यांबद्दल चौकशी केली .तात्या गावचे खोत होते .घरचा जमीनजुमला इस्टेट खूप होती .शिवाय त्यांची सावकरी होती .मुलगा सुधाकर ग्रॅज्युएट झाला होता .घरची इस्टेट खूप असल्यामुळे ती सांभाळण्यासाठी तो येथेच राहिला होता.वगैरे  माहिती तात्यांनी सांगितली.घरातून स्वयंपाकाचा खमंग वास येत होता . थोड्याच वेळात घरातून त्या लहान मुलाला हाक मारण्यात आली .बंड्या पाने मांडलेली आहेत जेवायला चला असे आजोबाना सांग.

तात्यांनी त्यांना हातपाय धुवा व जेवायला चला असे सांगितले .समोरच विहीर, हातरहाट, पायरहाट  होता .दोण व पाथर होती. दोणीत पाणी होते .ते घेऊन त्यांनी हात पाय धुतले. बंड्या टॉवेल घेऊन तयारच होता.दोघेही तात्यांबरोबर जेवणासाठी घरात निघाले .

पाहुण्यांचे आगत स्वागत यानीच  योगेश व राजेश भारावून गेले होते . तात्यांचे मृदू बोलणे,चटपटीत बंड्या ,त्यांचा आदरयुक्त बोलणारा मुलगा हे सर्वच छाप पाडणारे होते.विजेच्या प्रकाशात विहीर रहाट मांडव पडवी ओटी घर सर्व काही चित्रासारखे दिसत होते .एक दोन तासांपूर्वी दोघेही आपल्याला रानात रात्र काढावी लागणार म्हणून काळजीत होते. आपण वाट नक्की चुकलो. आता कसे होणार? रात्र सुरळीतपणे पार कशी पडणार  अशा काळजीत होते .ज्याच्यावर आपल्याला रात्र काढता येईल अशा एखाद्या  झाडाच्या शोधात होते . अकस्मात त्यांना दूरवर  प्रकाश दिसला होता .आपण गावाजवळ आलो आहोत या विचारानेच त्यांना समाधान वाटत होते. रात्र सुरक्षितपणे एखाद्या घरात काढता येईल यामुळे ते निर्धास्त झाले होते .

अशा परिस्थितीत तात्या भेटतात काय, ते आपल्याला येथे राहण्याचा आग्रह करतात काय, सर्वच  गोष्टी अनपेक्षित होत्या . दोघेही सुखावले होते .आता सुग्रास जेवण मिळणार या खुशीत ते होते. 

बंड्या सर्वांच्या पाठीमागून येत होता .पुढे तात्या त्यांच्या मागे योगेश,राजेश,सुधाकर ,बंड्या  असे स्वयंपाक घराच्या दिशेने जात होते.स्वयंपाक घरात जाऊन जेवायला बसतात तो बंड्या अगोदरच पाटावर बसलेला आढळला.आपल्या पाठीमागून येऊन तो धावत पुढे गेलेला त्यांना दिसला नव्हता .स्वयंपाकघराला असलेला दरवाजा बंद होता .तो धावत दुसऱ्या वाटेने स्वयंपाकघरात आला असेल आणि दरवाजा त्याने बंद करून घेतला असेल अशी शक्यता होती . दोघांनाही बंड्या इतक्या लवकर कसा आला याचे थोडे आश्चर्य  वाटले .पण तो विचार त्यांच्या डोक्यातून आला तसा नाहीसा झाला.त्यांनी त्याही  घटनेला विशेष महत्त्व दिले नाही .  तरीही आत कुठेतरी अंतर्मनात त्यांना एकाच वेळी दोन ठिकाणी दिसणारा सुधाकर व आपल्या पुढे चपळाईने येऊन बसणारा बंड्या  सलत होते .

स्वयंपाक घरातच पाने मांडली होती .ताज्या ताज्या भाकर्‍या करून काकू सर्वांना वाढत होत्या .तात्यांच्या सूनबाई कुठे दिसत नव्हत्या .योगेश चुलीकडे बघून चमकलाच.चुलीमध्ये अग्नी नव्हता तरीही वरती भाकऱ्या व्यवस्थित भाजल्या जात होत्या .ही गोष्ट योगेशच्या लक्षात आल्याचे काकूंना कळले .क्षणार्धात चुलीमध्ये जाळ दिसू लागला .योगेश डोळे चोळीत चुलीकडे पाहू लागला .थोड्या वेळापूर्वी चुलीत जाळ नव्हता हे त्याला पक्के आठवत होते आता जाळ कुठून आला?

नंतर त्याला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला .भाकरी वाढताना काकू जागेवरून उठत नव्हत्या .त्यांचा हात क्षणार्धात लांब होत असे व भाकरी पानात पडत असे.दुसऱ्या क्षणी त्या त्याच हाताने भाकरी थापत होत्या .अर्थातच हात आखूड नॉर्मल  झालेला असे .

राजेशच्याही या गोष्टी लक्षात येत होत्या .दोघांनाही काहीतरी कुठेतरी चुकत आहे असे वाटत होते .परंतू नक्की काय चुकत आहे त्याच्यावर त्यांना बोट ठेवता येत नव्हते .आपल्याला अतिश्रमाने भास होत आहेत की काय असा त्यांना संशय येऊ लागला .

एकदा तर लाकडाऐवजी काकूंनी आपला पाय चुलीत घातला होता .तो लाकडासारखा जळत होता ते पाहून दोघेही ताडकन उभे राहणार होते .मोठ्या प्रयासाने त्यांनी स्वतःला सावरले .

आता मात्र योगेश व राजेश दोघेही चमकले .आपण कोणत्या चक्रव्यूहात  सापडलो तेच त्यांना कळेना .आपण यातून यशस्वीपणे बाहेर पडणार की आणखी काही होणार ते त्यांना कळेना .ते पूर्णपणे गोंधळात पडले होते .

जेवणे अशीच पार पडली .सर्वजण पुन्हा अंगणात येऊन बसले .हात धुवायला येताना आणखी एक घटना घडली .बंड्या एकदा त्यांना पुढे चालत आहे असे वाटे.तर पुढच्याच क्षणी तो मागून चालत येत आहे असे वाटे.

सर्वजण अंगणात येऊन बसले .तात्या तीक्ष्णपणे आपल्याकडे रोखून पाहात आहेत हे दोघांनाही जाणवले .दोघांनीही आपल्या काही लक्षात आले असे चेहऱ्यावर जाणवू दिले नाही .जसे काही पहिलेच नाही, जसे काही घडलेच नाही, अश्या  प्रकारे ते दोघे तात्यांशी गप्पा मारीत होते .

त्यांच्या मनात मात्र येथून आपली सुटका कशी करून घ्यायची हाच एक विचार होता .दोन दोन सुधाकर, न दिसता अगोदरच पुढे येऊन बसणारा बंड्या,अग्निशिवाय भाजल्या जाणाऱ्या भाकऱ्या,लांब होणारा हात,  चुलीत जळणारा पाय,  क्षणात मागे क्षणात पुढे दिसणारा बंड्या, असे सर्व त्यांना आठवत होते.आपण जर पळून चाललो तर हे आपल्याला सोडणार नाहीत याची त्यांना पूर्णपणे कल्पना होती .आज अमावस्या अमावास्येच्या दिवशी प्रकाश नसल्यामुळे भुते जास्त ताकदवान होतात हे त्यांना माहीत होते .झोपेचे सोंग घ्यावे .रात्री येथून सूबाल्या करावा .असा दोघांनीही विचार केला.

तात्यांनी सुधाकरला त्यांच्या मुलाला सांगून  दोघांची अंथरुणे ओटीवर टाकली.आपण भुतांच्या तावडीत सापडलो आहोत हे दोघांनाही कळून चुकले .चौथऱ्यावर यांचा जास्त प्रभाव असणार . घरात झोपणे जास्त धोकादायक तेव्हा त्यांनी आम्ही अंगणात झोपतो खूप उकाडा आहे असा बहाणा केला.

तात्या विरोध करतील असे दोघांना वाटत होते.तात्यांनी हसत हसत संमती दर्शविली .हा एखादा सापळा तर नाही ना असा विचार दोघांच्या मनात चमकून गेला .

त्यांच्या अंथरुणाच्या वळकट्या होऊन त्या अंगणात हवेतून गेल्या व आपोआप  बाजल्यावर(सुंभाने विणलेली कॉट) उलगडल्या गेल्या. दोघेही पूर्णपणे हादरून गेले होते.दोघेही गुपचूप  अंगणात येऊन बाजल्यावर आडवे झाले.बंड्याने स्टुलावर पाण्याचा तांब्या आणून ठेवला .झोपा आता खूप दमला असाल असे म्हणून तात्या दिवा मालवून झोपायला गेले.

* दोघांनाही आपल्या छातीची धडधड एखाद्या मोटारीच्या इंजिनप्रमाणे जाणवत होती .*

*सर्वत्र सामसूम होताच आपली सॅक पाठीवर टाकून येथून वाटेल तो धोका स्वीकारून पळून जायचे असे त्यांनी मनोमन निश्चित केले .*

*त्यांना तसे पळून जाता येणार नव्हते हे त्यांना माहीत नव्हते* 

(क्रमशः)

७/२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन