१० पाहुणचार १-४
(ही गोष्ट काल्पनिक आहे यदाकदाचित स्थळ नाव इत्यादीबद्दल साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
राजेश व योगेश हे दोघे जिवश्च कंठश्च मित्र होते .बालवाडीपासून कॉलेजपर्यंत त्यांची दोस्ती अभंग होती .राम लक्ष्मण कृष्णअर्जुन हे शब्द जसे आपण बरोबरच उच्चारतो त्याप्रमाणे राजेश व योगेश हे दोन शब्द बरोबरच उच्चारले जात असत .किंबहुना या दोहोचे संक्षिप्त रूप राजयोग असे केले जात असे .दोघेही आले की आला राजयोग असे किंचित विनोदाने म्हटले जात असे.
या दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी समान होत्या .कोणत्याही संकटात ते डगमगून जात नसत . दोघांजवळही प्रसंगावधान, प्रसंगानुरूप वर्तन करण्याची क्षमता होती.दोघांनाही प्रवासाची खूप आवड होती. मोटार, मोटारसायकल, सायकल,यांनी तर ते प्रवास करीत असतच परंतु त्यांची आणखी एक खासियत होती.पायी फिरण्याचा प्रवास करण्याचा त्यांना मोठा शौक होता .वेळ मिळाला मनात आले कि दोघेही त्यांची सॅक पाठीवर टाकून पायी प्रवासाला निघत.
एकदा त्यांना अशीच पायी प्रवासाची हुकी आली .बरेच जण नर्मदा परिक्रमा करतात .आपण दुसर्या एखाद्या लहान नदीची परिक्रमा का करू नये असा तो विचार होता .दोघेही कोकणचे एकेकाळचे रहिवासी होते .लहानपणी त्यांनी पाठ करीत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या पाठ केल्या होत्या .त्यात मुचकुंदी नदी म्हणजे पूर्णगडची खाडी हे त्यांच्या कसे कोण जाणे परंतु डोक्यात पक्के बसले होते .भूगोलामध्ये पाठ करीत असताना नदीचे नाव व ती जिथे मिळते त्या गावाचे नाव असे पाठांतर केले जात असे .
आपण मुचकुंदी नदीची परिक्रमा करू या असे दोघांनी ठरविले .मुखापासून(जिथे नदी समुद्राला मिळते) सुरुवात करावयाची उगमापर्यंत जावयाचे आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा परत आल्या ठिकाणी यायचे याला परिक्रमा असे म्हणतात .
दोघे जण पुण्याहून निघाले रत्नागिरीला आले व तेथून बसने पूर्णगड मुक्कामी आले .नदीच्या दक्षिण बाजूने त्यांनी परिक्रमेला सुरुवात केली.सुरुवात त्यांनी गावखडी या मुखाजवळच्या दक्षिणेकडच्या गावापासून केली.परिक्रमा करून ते नदीच्या मुखाजवळच्या पूर्णगड या उत्तरेकडच्या गावी येणार होते. तिथून पुन्हा गावखडीला आल्यावर त्यांची परिक्रमा पूर्ण होणार होती . शक्यतो नदीच्या कडेकडेने जायचे .जिथे शक्य नसेल तिथे रस्त्याने परंतु नदी आपल्या दृष्टिक्षेपात राहील अश्या प्रकारे जायचे त्यांनी निश्चित केले होते.ही संपूर्ण परिक्रमा सुमारे पन्नास मैलांची होईल असा त्यांचा अंदाज होता .सृष्टी सौदर्य पाहात गप्पा मारीत त्यांचा प्रवास चालला होता .
सकाळी सहा वाजता प्रवासाला सुरुवात करावी .अकराच्या सुमारास जिथे आपण असू त्याच्या आसपासच्या गावात भोजनाची सोय बघावी .दोन वाजता पुन्हा प्रवासाला सुरुवात करावी .संध्याकाळी सहाच्या आसपास आपण ज्या गावात असू तिथे मुक्काम करावा अशा प्रकारे त्यांची परिक्रमा सुरू झाली .
हल्ली कोकणात सर्वत्र बर्यापैकी रस्ते झाले आहेत .रिक्षा बस इत्यादी वाहनेही मिळतात .एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना पायी जाण्याची वेळ सहसा येत नाही .पायी जाण्याची वेळ आली तरी रस्ता व्यवस्थित असतो .वाहन नाही, रस्ता नाही, जंगलातून निर्मनुष्य अशा पायरस्त्याने रस्ता तुडवीत जाण्याची वेळ क्वचित येते .अशी परिस्थिती सर्वसाधारण असली तरीही बरीच खेडी रस्त्यापासून दूर अंतर भागात आहेत .तिथे जाण्यासाठी पायवाटेशिवाय दुसरा मार्ग नाही हेही तेवढेच खरे .
रस्त्यापासून दूर अंतर्भागात छोटी छोटी खेडेगावे आहेत.तिथे पायरस्त्याने जावे लागते.या दोघांचा नदी दृष्टीच्या टप्प्यात शक्यतो ठेवण्याचा अट्टाहास त्यांच्या अंगलट आला .तसे केले नाही तर ती परिक्रमा कसली असे त्यांचे म्हणणे होते.आपण खेडेगावातील जीवन अनुभवायला आलो आहोत .कोकणातील सृष्टीसौंदर्याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे .कोकणातील ग्रामीण भोजनाचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे तर सरळसोट रस्त्याने जाऊन कसे चालेल असा त्यांचा स्वतःलाच सवाल होता .
दोघेही शक्यतो हमरस्ता टाळून, पाय रस्त्याने, खेडी पाहात पाहात, नदी दृष्टिक्षेपात ठेवीत ठेवीत, रमतगमत, कोकणातील खास सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत, प्रवास करीत होते .जिथे मिळेल तिथे टपरीवर चहा घ्यावा. मिळेल तो नाष्टा करावा.दुपारी जिथे जे भोजन मिळेल ते घ्यावे . रात्री पोलीसपाटील, तलाठी, खोत, ग्रामप्रमुख,किंवा आणखी कोणत्याही ठिकाणी आसरा घ्यावा. भोजन करावे. पथारी टाकावी . सकाळी उठावे.निरोप घेऊन पुन्हा मार्गस्थ व्हावे असा त्यांचा दिनक्रम चालला होता .अश्या पायी प्रवासाला दोघेही सरावलेले असल्यामुळे त्यांची तीच आवड असल्यामुळे कुठेही त्रास न होता, कुरकुर न करता, दोघेही प्रवास एन्जॉय करत होते . राहण्याचा जेवणाचा मोबदला ते सढळ हाताने देत.कुणी मोबदला घेण्यास नकार दिला तर ते खाऊ म्हणून घरातील एखाद्या लहान मुलाच्या हातात पैसे ठेवीत.लहान मूल नसल्यास देवघरात देवापुढे पैसे ठेवून मनोभावे नमस्कार करीत .
निघताना गावातील लोकांना पुढील गावाचे नाव विचारावे, तिथे कसे जायचे तो रस्ता विचारावा,तिथे कुणाकडे उतरले तर सोयीचे पडेल त्याचीही चौकशी करावी,आणि वाटचाल सुरू करावी असे दोघेही करीत असत . पायरस्त्याने जात असताना वाटेत कुणी ना कुणी भेटत असे .त्याला रस्ता विचारता येई.काही वेळा कुणीच भेटत नसे .कुणाचेच मार्गदर्शन मिळत नसे.बऱ्याच वेळा रस्त्याला अनेक पायवाटा फुटलेल्या असत .अश्या वेळी कुठच्या पायवाटेने जावे असा प्रश्न पडे.पायवाट कोणत्या गावाला जाते त्याची पाटी बऱ्याच ठिकाणी लावलेली असे.दैवावर हवाला ठेवून पायवाट निवडावी लागे.येथे गुगल मॅपचा काही उपयोग नव्हता .होकायंत्राचा थोडा बहुत उपयोग होता .प्रवासाच्या पाचव्या दिवशी दोघेही कुठे जावे कोणती पायवाट धरावी अशा विचारात पडले .एका तिठ्यावर तीन पायवाटा जात होत्या . आपल्या मुक्कामाच्या गावी जाण्यासाठी कोणती पायवाट धरावी ते समजत नव्हते.आसपास किंवा पायवाटेने येणारा जाणारा कुणीही भेटत नव्हता .गावाचे नाव दर्शविणाऱ्या पाट्याही लावलेल्या नव्हत्या .
उगीच आपण कुठे तरी रानात फसू. येणारा जाणारा भेटेलच. म्हणून ते तिठ्यावर वाट पाहात होते .त्या दिवशी त्यांना गावातून निघताना अगोदरच उशीर झाला होता .दुपारी दोनच्या ऐवजी ते तीन वाजता निघाले होते. त्यांची दुपारची किंचित डुलकी जरा जास्तच लांबली होती .तिठ्यावर ते जवळजवळ एक तास थांबले.त्यांना कुणीही भेटले नाही .सूर्य मावळतीला निघाला होता.अशीच वाट पाहत थांबलो तर येथेच रात्र होईल येथेच मुक्काम टाकावा लागेल .अन्न पाण्याशिवाय रात्र काढावी लागेल. तेव्हा एखाद्या पायवाटेने जाऊ या. कोणत्या तरी गावाला तर आपण पोचू . असा विचार करून ते एका पायवाटेने निघाले .ती वाट जंगलातून जात होती .सर्वच वाटा जंगलातून जात होत्या परंतु इथे जरा जास्त दाट जंगल होते.त्यामुळे काळोख जास्तच गडद भासू लागला .दोघेही झपाट्याने मार्गक्रमणा करीत होते .
सूर्य मावळला .काळोख जास्त गडद होत गेला . कुठलाही गाव दृष्टिपथात दिसत नव्हता .दोघांनीही कोकणातील भुलीच्या झाडाबद्दल बरेच काही एेकले होते .माहितगार माणूसही रात्रीचा वाट चुकतो.सडय़ावर, मोकळ्या माळरानावर ,उगीचच गरगर फिरत राहतो .सकाळ होते आणि त्याला आढळून येते की आपण जिथे होतो तिथेच आहोत. भुलीचे झाड उर्फ चकवा मनातल्या मनात हसत असतो.
दोघांनाही आपण चकव्यामध्ये सापडलो .भुलीच्या झाडाने आपल्याला गाठले, असे वाटले. आता कुठेही न जाता आहे तेथेच थांबावे .सॅकमध्ये आहे त्या अन्न पाण्यावर भागवावे.रात्री जमिनीवर झोपल्यास साप ,किरडू बिबट्या, डुक्कर, कुणापासूनही आपल्याला धोका संभवतो.झाडावर चढावे एका झाडाच्या बेळक्यात(खोडाला दोन फांद्या फुटतात त्यांमधील भाग) बसावे.स्वतःला दोरीने बांधून घ्यावे .झोप लागली तरी आपण झाडावरून खाली पडणार नाही .असा विचार त्यांनी केला.झाडावर साप बिबट्या चढल्यास इलाज नाही . त्यांच्याजवळ स्वसंरक्षणासाठी सुरा होता .बॅटरी प्रकाशासाठी होती. मोबाइल होता परंतु आता त्याचा काही उपयोग नव्हता. काळोख झापाटय़ाने वाढत होता .रात्र अमावास्येची होती .चांदणे पडेल आणि आपल्याला थोडातरी धीर मिळेल हीही आशा नव्हती .जवळजवळ दोन झाडे आहेत, उंचावर त्याना व्यवस्थित बेळकी आहेत, अश्या दोन झाडांच्या शोधात ते होते .एकाच झाडाला दोन बेळकी असली तर फारच उत्तम . संकटात एकमेकांजवळ राहता आले असते .
अश्या झाडांचा शोध घेत घेत ,बघत बघत, चालत असताना ,त्यांना दूरवर प्रकाश दिसला.त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला .शेवटी एक घर दृष्टीपथात आले होते .गाव तिथे जवळपास असणार .या घरात आपण तलाठी, पोलीस पाटील, खोत, अश्या एखाद्याचा जिथे आपल्याला आश्रय घेता येईल अश्या माणसाची चौकशी करू,तिथे जावून आसरा घेऊ, असा विचार दोघांनी केला .या घरी आसरा मिळाला तर प्रश्नच नाही ,सोन्याहून पिवळे, असाही विचार त्यांच्या मनात येत होता.
दोघेही घराजवळ येऊन पोहोचले .व्यवस्थित सारवलेले अंगण, तुळशी वृंदावन,घातलेला मांडव ,नंतर घरांचे रेजे, पडवी, ओटी , आत विजेची बत्ती, बाहेर अंगणात टाकलेली खाट, हे सर्व पाहून घर मोठ्याचे आहे ,नांदते आहे, याचा त्यांना विश्वास आला.आपली राहण्याची सोय इथे नक्की होणार .याची त्यांना खात्री पटली.
खाटेवर एक सुमारे साठ वर्षांचे गृहस्थ बसलेले होते .त्यांनी त्याना त्या गावाचे नाव विचारले.राजेश व योगेश या परिक्रमा करणाऱ्या दोघांना ज्या गावाला जायचे होते ते हे गाव नव्हते .वाट चुकून ते दोघे नदीपासून दूर जास्त दक्षिणेला आले होते .गावाचे नाव आंबेगाव होते. या दोघांना फणसगावाला जायचे होते. ते परिक्रमा करीत आहेत, त्यांना रात्रीपुरता आश्रय हवा आहे वगैरे गोष्टी त्या गृहस्थाना सांगितल्या.खोत तलाठी पोलिस पाटील कुठे राहतात म्हणून विचारले .त्या गृहस्थांनी मीच येथील खोत आहे ,तुम्ही माझ्याकडे आनंदाने रहा.उद्या पुढे मार्गस्थ व्हा.आमच्याकडे तुमची जेवणाखाण्याची राहण्याची सर्व सोय व्यवस्थित होईल काळजी करू नका . तुम्ही आपल्याच घरी आला आहात असे समजा असे शब्द अत्यंत प्रेमाने व आपुलकीने उच्चारले.
त्या गृहस्थांना कुणीतरी आतून तात्या म्हणून हाक मारली .तात्यांनी त्या मुलाला तीन कप चहा ठेवण्यास सांगितले .तसेच दोन पाहुणे आले आहेत त्यांच्या स्वयंपाकाचेही बघा म्हणून सांगितले.तुम्हाला उद्या गडी वाट दाखवण्यासाठी बरोबर देईन .तो तुम्हाला तिठ्याजवळ सोडील.तुम्हाला ज्या गावाला जायचे आहे तो रस्ताही दाखवील असे आश्वासन दिले .
*तात्यासाहेबांचा लाघवी प्रेमळ स्वभाव पाहून , गोड बोलणे ऐकून ,आपण वाट चुकलो खरे परंतु फार चांगल्या ठिकाणी आलो ,अशा खुशीत आनंदात दोघेही तात्यासाहेबांजवळ खाटवर बसले .*
* रात्री त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे.*
* त्यांना कशा कशाला रात्री तोंड द्यावे लागणार आहे .*
*याची जर त्यांना तिळमात्र कल्पना असती तर ते पुठ्याला पाय लावून सुसाट मिळेल त्या दिशेने पळत सुटले असते .
(क्रमशः)
६/२/२०२०©प्रभाकर पटवर्धन