८ जालिमसिंगचा खजिना २-२
नवीन साथीदार घेताना पारखून घ्यावे लागत .एखादा धाडसी पोलीस बागी म्हणून, साथीदार म्हणून,भरती होत नाहीना हे पाहावे लागे
आपली सर्व गुपिते लपण्याच्या जागा लपविलेले खजिने इ. नवीन साथीदाराजवळ उघड करता येत नसत.सुदैवाने आतापर्यंत तो पोलिसांच्या तडाख्यात सापडला नव्हता . एक दोनदा त्याला गोळ्या लागल्या होत्या परंतु त्या जखमा विशेष गंभीर नव्हत्या .
या गुहेची त्याच्या साथीदाराना कल्पना होती.एकूण लुटीपैकी त्याचा वाटा तो इथे आणून सुरक्षित ठेवत असे.आता तो थकला होता .शासनाने जे बागी शरण येतील त्यांना थोडीबहुत शिक्षा देऊन माफ करण्याचे धोरण प्रसिद्ध केले होते .त्याचा लाभ घेऊन आपण शरण जावे .जी शिक्षा होईल ती भोगावी .उरलेले आयुष्य कुटुंबात मुलाबाळांत सुखासमाधानाने घालवावे असा विचार होता.अजून त्याने हा विचार आपल्या साथीदारांजवळ बोलून दाखविला नव्हता.साथीदार तुलनात्मक तरुण होते .त्यांना हा विचार कदाचित पटला नसता. अश्या परिस्थितीत संघर्ष निर्माण झाला असता .तसे झाले तर काय करावे असाही एक विचार त्यांच्या मनात होता.
जालिमसिंग म्हटला की प्रत्येक जण थरथर कापत असे.त्याच्या टोळीने गेली पंचवीस वर्षे राजस्थान व मध्यप्रदेश यातील काही जिल्ह्यांमध्ये दहशत पसरवली होती.दरोडे खून हत्या लूटमार यांमध्ये त्यांनी काहीही कमी ठेवले नव्हते .जालिमसिंग म्हटले की सावकार जमीनदार चळचळा कापत असत.त्याला काही करावे लागत नसे .केवळ त्याची धमकी,खंडणी गोळा करण्यासाठी पुरेशी असे .त्याने मागितलेली रक्कम निमूटपणे प्रत्येकजण त्याच्या माणसाकडे देत असे.त्याला विरोध, त्याने मागितलेली खंडणी न देणे, म्हणजे मृत्यूला हाक मारण्यासारखे होते. ही गोष्ट सर्वांना माहित होती.
त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने एकच पथ्य पाळले होते. बाईमाणसांवर तो कधीही हात टाकीत नसे.त्याचप्रमाणे लग्न समारंभात लूटमार कधीही त्याने केली नाही.त्याच्या टोळीतील कुणाही साथीदारांने जर एखाद्या स्त्रीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला असे त्याला कळले तर तो त्याचा हात तिथल्या तिथे तोडीत असे .
तो बागी झाला त्यावेळचे दोनतीन खून सोडले तर एरवी त्याचे हात रक्ताने माखलेले नव्हते. साथीदारांनीही शक्यतो हत्या टाळावी असा त्याचा कडक नियम होता.सुरुवातीची काही वर्षे सोडली तर त्याच्यावर वैयक्तिक विशेष आरोप होण्याचा संभव नव्हता.जालिमसिंग कसा दिसतो तेही बऱ्याच जणांना माहित नव्हते.
त्याला त्याने जमविलेली संपत्ती सुरक्षित राहावी असे वाटत होते.ही गुहा संपूर्ण सुरक्षित आहे असे त्याला वाटत नव्हते .गुहेप्रमाणे त्याने आणखी काही ठिकाणी त्याच्या वाट्याची संपत्ती लपवून ठेविली होती.शरणार्थी होण्यापूर्वी ही सर्व संपत्ती कुठे तरी जपून सुरक्षित ठेवावी असे त्याला वाटत होते .
ती कुठे ठेवावी असाच विचार तो करत होता .शेवटी त्याला एक भन्नाट कल्पना सुचली .बिहाडमधील वालुकामय प्रदेशात गुहेपासून जवळ, दोन गावांच्या मध्ये, कुठेतरी वाळूमध्ये खोलवर संपत्ती पुरून ठेवावी म्हणजे ती सुरक्षित राहील असे त्याला वाटले.शिक्षा भोगून आल्यावर नंतर ती जाऊन निश्चितपणे मिळविता आली पाहिजे.साथीदारांना न सांगता त्याने ती सर्व संपत्ती एका उंटावर लादली.गुहेच्या जवळच्या एका वालुकामय बिहाड प्रदेशात तो गेला.दोन गावांमध्ये खाणाखुणा लक्षात ठेवून त्याने त्या संपत्तीतील एक भाग वाळूत खोलवर पुरला.आणखी सुरक्षितता म्हणून दुसरा भाग त्याने एका जवळच्या विहिरीत टाकून दिला .
सरकारला शरण जाण्याची कल्पना जालिमसिंगच्या साथीदाराना रुचली नाही.त्यांनी जालिमसिंगला कडकडून विरोध केला.सरकारला तो त्यांच्या लपण्याच्या जागा, लपविलेली संपत्ती, साथीदार, यांची माहिती देईल अशी त्यांना भीती वाटत होती .आपण ऐकले नाही तर आपले साथीदार आपल्यावर उलटतील आणि आपला खूनही करतील अशी त्याला भीती वाटत होती .शेवटी त्यांची समजूत घालण्यात जालिमसिंग यशस्वी झाला.सरकारच्या प्रतिनिधीजवळ बोलून आपण शरण आल्यावर कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल,काोणत्या सवलती मिळतील, त्याबद्दल गुप्त करार करण्यात आला . नंतरच सर्वजण पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शरण गेले.
काही जणांना माफी देण्यात आली.उरलेल्यांना पाच ते तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षा देण्यात आल्या.जालिमसिंग पाच वर्षांची शिक्षा भोगून परत आला.आता तो सामान्य नागरिकाचे शांत जीवन जगू शकणार होता .शासनाने तो बागी झाल्यावर त्यांची सर्व जमीन जप्त केली होती.तीच जमीन जरी शासन परत करू शकले नाही तरी त्यांचे पुनर्वसन यशस्वीपणे करण्यात आले .
जालिमसिंगसमोर खरा प्रश्न होता तो त्याने लपविलेली संपत्ती कुणालाही न कळता सुरक्षितपणे कशी प्राप्त करून घ्यावी.आपली संपत्ती निश्चित कुठे लपविलेली आहे ते पाहण्यासाठी तो घोड्यावरून तिकडे गेला.पाच वर्षात पाऊस वारा यामुळे बिहाडांची रचना बदलली होती.त्याला आपण कुठे संपत्ती लपविली ते ओळखता येईना.काय करावे ते त्याला कळेना.
त्याला एक कल्पना सुचली .ज्या उंटाच्या पाठीवरून त्याने त्याचा खजिना नेला होता तो उंट त्याने शोधून काढला.हा उंट जालिमसिंगकडे बरीच वर्षे होता.त्याने लगेच मालकाला ओळखले .त्याला घेऊन जालिमसिंग त्या बिहाडामध्ये गेला.उंटाने जिथे खजिना पुरला होता ती जागा बरोबर शोधून काढली .तेथील व जवळच्या विहिरीतील खजिना उंटांवर लादून जालिमसिंग घरी आला.
*त्यानंतर पुढील आयुष्य त्याने सुखासमाधानात आपल्या कुटुंबाबरोबर घालविले*
*एकदा आपल्या कुटुंबातील मंडळींबरोबर पिकनिक म्हणून तो त्या त्या गजाननामागच्या चंबळकाठच्या प्रसिद्ध गुहेमध्ये गेला होता*
*वाहणाऱ्या पाण्याकडे पाहताना त्याला आपले मागील दिवस आठवले .तो गंभीर झाला.*
*काय झाले म्हणून त्याच्या नातवानी विचारता त्याने हसून काही नाही म्हणून सांगितले*
(समाप्त)
४/८/२०१९©प्रभाकर पटवर्धन