Get it on Google Play
Download on the App Store

७ जालिमसिंगचा खजिना १-२

जालिमसिंग आपल्या गुहेमध्ये बसून चंबळच्या वाहत्या पाण्याकडे पाहात होता.आता त्याचे वय झाले होते .धडधाकट माणसाला पंचावन्न हे काही फार मोठे वय नाही .वयाच्या तिशीमध्ये तो डाकू झाला. बागी झाला.तेव्हापासून दरोडे, खून ,पोलिसांचा ससेमिरा,जुलमी जमीनदार सावकार यांच्या हत्या,सतत धावपळ, यामुळे तो आता थकून गेला होता .आता हे सर्व सोडून देऊन आपल्या कुटुंबामध्ये निवांत बसावे असे त्याला वाटत होते .जी काही पाच पंचवीस वर्षे राहिली असतील ती शांतपणे काढावी असे त्याला वाटत होते .

ज्या गुहेमध्ये तो बसला होता ती एक वैशिष्टय़पूर्ण गुहा होती.त्या गुहेचा शोध त्याला अपघातानेच लागला होता .पोलीस त्याच्या मागे लागले होते .एकदम आपण सर्व सापडू नयेत म्हणून त्यांचे अगोदरच ठरल्याप्रमाणे सर्व साथीदार पळता पळता इतस्ततः पांगले होते.चंबळच्या खोऱ्यातील बिहाडमधून घोड्यावरून पोलीस पाठलाग करीत होते.तो व त्याचे साथीदारही घोड्यावरून दौडत होते .पळता पळता पोलीस ,जालिमसिंग व त्याचे साथीदार ,यांच्या गोळ्यांच्या फैरी चाललेल्या होत्याच .साथीदारांनी इतस्ततः पांगण्याचा उद्देश पोलिसही पांगले जावेत असा होता.एकदा पोलिसांना चकवा दिल्यानंतर कुठे आणि केव्हा जमायचे ते त्यांचे नेहमी अगोदरच ठरलेले असे.दौडता दौडता तो गुहेतील एका मंदिरापाशी आला.ही गुहा सर्वांनाच माहीत होती .पोलीस दूरवर होते .घोड्यावरून उतरल्याबरोबर त्याने खुणेची शिट्टी वाजविली.त्याबरोबर घोडा दौडत दूरवर अदृश्य झाला .पोलिसांना आपण कुठे लपलो आहोत ते दिसू नये असा घोडा दूर पाठविण्यामध्ये एक उद्देश होता .त्याचप्रमाणे  यदाकदाचित पोलीस घोड्यामागे दौडत गेलेच तर आपण सहीसलामत राहावे हाही एक उद्देश होता . 

जालिमसिंग गुहेतील मंदिरात शिरला.चार पाच पोलीस त्याच्या मागे दौडत येत होते .गुहेमध्ये गणपतीची भव्य मूर्ती होती.गणपतीच्या मागे असलेल्या लहानशा फटीमध्ये लपण्याचा त्याने प्रयत्न केला.तेथे असलेल्या एका कळीवर त्याचा हात पडला आणि मागील दगड एखाद्या दरवाजाप्रमाणे बाजूला सरकला .तो पटकन आत शिरला .काळोखात हाताने चाचपडून त्याने शिळा जाग्यावर बसविली .त्या शिळेमागे धडधडत्या हृदयाने तो बाहेरचा कानोसा घेत होता.थोड्याच वेळात पोलिसही गुहेतील  मंदिरात आले.त्यांनी थोडा शोध घेतला .आताही साल्याने चकमा दिला असे बडबडत ते मंदिराबाहेर पडले .घोड्यांच्या टापांचा दूरवर जाणारा आवाज ऐकून त्याने सुटकेचा निश्वास सोडला.गुहा किती खोल आहे ते पाहण्यासाठी तो काळोखात हळूहळू  पुढे सरकू लागला.थोड्याचवेळात तो गुहेच्या दुसर्‍या टोकाला प्रकाशात आला.ती एक नैसर्गिक प्रशस्त गुहा होती .तिचे दुसरे तोंड चंबळ नदीच्या बाजूला होते.त्या गुहेला एक खिडकीवजा मोकळी जागा होती.खिडकीतून बाहेर पाहता तिथे चंबळ नदी वाहत असल्याचा आवाज ऐकू येत होता .डोकावून पाहिल्यावर खोलवर नदी वाहत असताना दिसत होती .दोन्ही बाजूनी नैसर्गिकरित्या तुटलेल्या कड्यांच्या कपारीतून नदी वाहत होती.या गुहेला बाहेर जाण्यासाठी या बाजूने कुठे जागा आहे का ते त्याने पाहिले.बाजूने कुठेही जागा नव्हती.नैसर्गिक खिडकीतून बाहेर पडून कपारीतून वर चढत जाण्याची सोय होती . उभ्या कड्यांमध्ये मधूनमधून नैसर्गिक खाचा होत्या.त्यामध्ये हाताची व पायाची बोटे रोवून जाता येणे शक्य होते.जरी वर चढत जाणे व खाली उतरणे शक्य होते तरी ते फार बिकट होते.जर हात किंवा पाय निसटला असता तर नदीमध्ये पडून बहुधा जलसमाधी मिळाली असती. गजाननामागची चोरवाट हीच सुरक्षित होती.    

या गुहेत नैसर्गिक खिडकीजवळ  बसून जालिमसिंग नदीच्या पाण्याकडे पाहात विचार करीत होता.

त्याला घर संसार होता .पत्नी मुलेही होती .त्याच्या घरावर पोलिसांचा वॉच नसेल तेव्हा तो काही विश्रांतीचे क्षण तिथे घालवीत असे.असे फारच थोडे क्षण त्याच्या वाटेला येत असत.त्याला तो बागी झाला ती घटना आठवत होती.

तो साधा सरळ शांत स्वभावाचा एक शेतकरी होता .धान्य पिकवून मोलमजुरी करून तो आपल्या संसाराचा गाडा हाकत होता .गावातील सावकाराची एक दिवस त्याच्या पत्नीवर नजर पडली.त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला .ती त्यातून मुष्किलीने सुटून तो शेतावर काम करीत होता तिथे पळत आली.सावकाराने तिच्या अंगावर वाईट हेतूने हात टाकला  हे ऐकून त्याचे माथे भडकले.तो तसाच सावकाराच्या घरी गेला आणि रागाच्या भरात त्याने सावकाराचे मुंडके उडवले .वाटेत आलेल्या एक दोन सावकारांच्या रक्षकांचाही त्याने खून केला .आता पोलीस पकडणार यात काही शंकाच नव्हती .तीन चार खून केलेले असल्यामुळे फाशी निश्चित होती .घरी येऊन बायकोचा निरोप घेऊन तो तसाच फरार झाला.

असे काही ना काही कारणाने बागी झालेले दहा पंधरा साथीदार त्याला येऊन मिळाले.त्यांची एक टोळी बनली.परत घरी जाण्याची सोय नव्हती .परतीचे दोर कापले गेले होते .परतीचा मार्ग खुंटला होता.तेव्हापासून आतापर्यंत गेली पंचवीस वर्षे पोलिसांना पाठीवर घेऊन ते पळत होते.प्रत्येकाला घर होते. संसार होता. मधून मधून ते पोलिसांना चकवून आपल्या घरी जात असत.तेवढेच विश्रांतीचे क्षण  त्यांना मिळत. पोलिसांच्या गोळीला काही साथीदार बळी पडत.काही पकडले जात.नवीन साथीदारांची भरती होत असे .

नवीन साथीदार घेताना पारखून  घ्यावे लागत .एखादा धाडसी पोलीस बागी म्हणून, साथीदार म्हणून,भरती होत नाहीना हे पाहावे लागे.त्याची इतरही परीक्षा घ्यावी लागे.घोडेस्वारी, हत्यार चालविण्यातील कसब, धाडस, साहस, शौर्य, निष्ठा, इ. सर्व पारखून घ्यावी लागत .याशिवाय  साथीदार म्हणजे  उपयोग काही नाही आणि जबाबदारी मात्र आपल्या डोक्यावर अशी स्थिती झाली असती  . अशा साथीदारामुळे आपण पकडले जाण्याचा संभवच जास्त .

(क्रमशः)

४/८/२०१९©प्रभाकर  पटवर्धन