०९ प्रवेश निषिद्ध आहे ३-३
दासीनी तिला शयनकक्षामधील राजकन्येच्या कक्षात नेले.उंची शिसवी पलंगावर, परांच्या गादीवर, परांच्या उशीवर, परांची दुलई घेऊन, ती शांतपणे निद्राधीन झाली.
सकाळी सवयीप्रमाणे तिला सूर्योदयाअगोदर जाग आली .दासी तिच्या उठण्याची वाट पाहात होत्या . मुखमार्जन इत्यादी केल्यानंतर तिला न्याहारी देण्यात आली. न्याहरीला विविध खारे व गोडे पदार्थ होते .तिच्या आवडीची फळेही होती.
एखाद्या जादूच्या प्रदेशात आल्याप्रमाणे तिची सर्व रात्र गेली होती .सर्वांचा निरोप घेऊन ती राजवाड्यातून बाहेर पडली .काल रात्र झाल्यामुळे तिने बाग बघितली नव्हती .बाग दाखवण्यासाठी तिच्याबरोबर माळी होता.शिवाय एक दासीही होती .तिला समोर विस्तीर्ण बाग दिसत होती .प्रयत्नपूर्वक संगोपन केलेली ती बाग होती .बागेत निरनिराळ्या आकाराच्या पुष्करणी व कारंजी होती .पक्षी मधुर गायन करीत होते .बागेत फिरत असताना तिला मयुरनृत्यही पाहायला मिळाले .
तिच्या अंगावर उंची कपडे होते .काल रात्री स्नान झाल्यावर मोजकेच परंतु हिऱ्याचे दागिने तिने घातले होते .ती बागेच्या फाटकातून बाहेर पडली .राजवाड्याकडे तिने वळून पाहिले .बाग व राजवाडा नाहीसा झाला होता .सर्वत्र विस्तीर्ण षटकोनी पटांगण पसरलेले होते.त्यावर सर्वत्र हिरवळ होती .
ती लगबगीने तो काल बंद झालेला व काहीही करून न उघडणारा दरवाजा सहज उघडून हायवेवर आली .तिला समोर हनुमान डोंगर दिसत होता .शाळा दिसत होती .तिला वाटेत शाळेत जाणारी मुले भेटत होती.सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहात होते .तिच्या अंगावर राजकन्येचे उंची कपडे व दागिने तसेच होते .
ती घरी पोचली तेव्हा तिथे पोलीस आलेले होते . विमल जवळ कमल कशी नाहीशी झाली याची ते चौकशी करीत होते .तेवढ्यात कमल आलेली पाहून सर्व आनंदित झाले .तिला घेऊन सर्वजण त्या षटकोनी पटांगणात आले.तिथे दरवाजा नव्हता.
गुलाबाची बागही नव्हती.राजवाडा तर नव्हताच .केवळ हिरवळीचा गालिचा पसरलेले पटांगण होते .
कमलला तू रात्री कुठे होतीस असे विचारल्यावर तिने राजवाड्याचे वर्णन केले.पटांगणात राजवाडा नव्हता. बागही नव्हती.कमल थापा मारीत आहे असेही म्हणता येत नव्हते . तिच्या अंगावरील उंची वस्त्रे व किमती दागिने तिची हकीगत खरी आहे असे सांगत होते.
त्या दिवशी संध्याकाळी ती या जगातून दुसऱ्या कुठल्या तरी याच ठिकाणी इथे असलेल्या जगात गेली असली पाहिजे .सकाळी ती त्या जगातून इथे परत आली .हे सर्वांचे सुदैव होय .कदाचित कमल त्या जगात कायमची राहिली असती .या जगातील पोलीस व तिचे आई वडील कमल कुठे गेली म्हणून तपास करीत राहिले असते .
दोघींनाही दिसणारे गुलाब, गुलाबाची बाग, निरनिराळ्या रंगांचे गुलाब, हेसुद्धा दुसऱ्या कुठल्या तरी जगातील किंवा याच जगातील परंतु दुसऱ्या कुठल्या कालखंडातील असावेत.
पुस्तकातील वाचलेल्या अद्भूत कथा, सिनेमातील पाहिलेले निरनिराळी राजवाडे, यांचे ठसे स्मृतिकोषात राहिले व ते प्रत्यक्ष अनुभवत आहोत असा त्यांना भास (साक्षात्कार) झाला असे कदाचित मानसशास्त्रज्ञ म्हणतील.
निरनिराळे विद्वान, निरनिराळया प्रकारे या गोष्टींचे स्पष्टीकरण देतील .
आपण पाहतो तेवढेच जग नाही . आपल्याला अज्ञात अशा अनंत गोष्टी या विश्वात आहेत एवढे समजले तरी पुरे.
दुसऱ्या दिवसापासून दोघीही परत शाळेत जाऊ लागल्या . दोघीना कोणती दिव्यदृष्टी होती काही माहित नाही. फक्त त्या दोघींना निरनिराळ्या रंगांचे गुलाब असलेली गुलाबाची बाग दिसत असे .फुले तोडण्याची ,बाग सविस्तर बघण्याची,केसात गुलाब माळण्याची,देवावर फुले वाहण्याची , त्यांची इच्छा पुरी होऊ शकली नाही.विमल कमलला तू त्या रात्री काय काय पाहिले ते विचारीत असे.ती पाहिलेल्या अनुभवलेल्या सर्व गोष्टींचे सविस्तर वर्णन करीत असे .
विमललाही राजवाडा पाहावा, राजवाड्या सभोवतालची बाग पाहावी असे उत्कटतेने वाटत असे.शाळेतून परत येताना त्या दोघी दरवाजा ढकलून पाहात असत .एक दिवस दरवाजा उघडला .दोघींनीही आत शिरण्याचा प्रयत्न केला .कमल आत जावू शकली नाही .कोणती तरी अदृश्य शक्ती तिला अडवीत होती.
विमल सहज आत गेली.कमलला जो अनुभव आला तोच अनुभव तिने घेतला.दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरी आली .तसेच उंची कपडे व हिऱ्याचे दागिने तिच्या अंगावर होते.
दोघींचेही विवाह आता झाले आहेत .दोन सख्ख्या भावांशी त्यांचे विवाह झाले.दोघी जिवलग मैत्रिणी आता सख्ख्या जावा जावा झाल्या आहेत .
ते उंची कपडे व दागिने त्यांनी जपून एका पेटीत ठेवले आहेत.ती पेटी त्यांनी बँकेत लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली आहे.
*केव्हांतरी त्या आपल्या पेट्या बँकेतून आणतात.ते कपडे आता त्यांना होत नाहीत . दागिने अंगावर घालतात . *
* जुन्या स्मृतीत गुंगून जातात .*
* दोघीही ज्या जगात गेल्या होत्या .तेथून परत आल्या. त्याचा तोच एकमेव पुरावा .*
त्या कधीतरी माहेरी येतात.त्यावेळी हनुमान डोंगरावर जातात . दोघींनाही अजूनही गुलाबाची बाग दिसते .प्रयत्न करूनही त्या दरवाजातून आत जाऊ शकत नाहीत .शाळेच्या जवळून षटकोनी पटांगणाकडे पाहताना त्याना भव्य राजप्रासाद आणि त्यातील मोठाली दालने आठवतात .विविध कक्ष आठवतात .त्या राजवाड्याची स्पष्ट चित्रे त्यांच्या स्मृतीत साठवलेली आहेत.
आडगाव व पाडगाव अजूनही हनुमान डोंगरांच्या या व त्या बाजूला आहेत .डोंगरावर शाळा आहे .हायवे तसाच आहे.पूर्वी तो चौपदरी होता तो आता आठ पदरी झाला आहे .हनुमान डोंगर व षटकोनी पटांगणावरील हिरवेगार गवत सर्व ऋतूत पूर्वीप्रमाणे तसेच असते . पर्यटकांची संख्या वाढली आहे .शिखर सर करण्यासाठी गिर्यारोहकही मोठ्या संख्येने येतात .
*अजून तरी कुणाला गुलाबाची बाग दिसलेली नाही .*
*कमल व विमल यांना आलेला अनुभव न भूतो भविष्यती असावा.*
*कोणीही केव्हाही येउन हनुमान डोंगर व त्या समोरील षटकोनी पटांगण पाहू शकतो.*
*नशिबात असेल तर राजवाडा व गुलाबाची बाग दिसू शकेल .*
(समाप्त)
५/१/२०२०©प्रभाकर पटवर्धन