Get it on Google Play
Download on the App Store

०५ परीकथ्थू १-२

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

हिमालय हा अद्भुत गोष्टींचा एक अतुलनीय  असा खजिना आहे.अशा एका खजिन्याचा शोध आम्हाला योगायोगानेच लागला.आम्ही चार पाच  मित्रमंडळी सर्वांना रजा मिळेल तेव्हा हिमालयात भटकंती करण्यासाठी जात असतो .प्रत्येक  वेळी अमुक एका ठिकाणी जायचे असा आमचा उद्देश नसतो .हिमालय पूर्व पश्चिम पसरलेला आहे .त्याचा काही भाग नेपाळ भूतान पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान यांमध्ये आहे .तरीही किती तरी भाग भारताला लागून आहे . अशाच एखाद्या भारतीय भागातील हिमालयाच्या पायथ्याला जावे .तिथे एखादा स्थानिक मार्गदर्शक मिळाला तर तो घ्यावा.दहा बारा दिवस हिमालयात पर्यटक सामान्यपणे जात नसलेल्या भागात फिरावे.असा आमचा कार्यक्रम असतो.अशा पर्यटनातून खऱ्या हिमालयाची ओळख होते असे माझे मत आहे.

आम्ही चार मित्र तीन वर्षांपूर्वी आमच्या,अशा खास हिमालय पर्यटनासाठी गेलो होतो .आम्ही प्रथम ऋषिकेशला गेलो. ऋषिकेशला अनेक मठ आहेत.अशा मठामध्ये अनेक वेळा हिमालयाच्या अंतर्गत भागाची माहिती असलेले वाटाड्या मिळतात .आम्ही तिथे जमदग्नी नावाच्या एका मठात गेलो.तिथे आम्हाला मनासारखा वाटाड्या  मिळाला.वाटाड्याचे नाव  होते पाराशर .एकूण आज प्रत्यक्ष ऋषींची नाही तरी त्या नावाच्या संस्थांशी व्यक्तींशी भेट होण्याचा योग होता.  

आम्ही त्याला प्रथमच सांगितले होते की आम्हाला पर्यटक जात असलेल्या नेहमीच्या रुळलेल्या वाटेने जायचे नाही .त्याशिवाय हिमालयाच्या  अंतर्भागात  असलेली कोणतीही प्रेक्षणीय ठिकाणे आम्हाला चालतील.

त्याने आम्हाला स्फटिक सरोवर व आसपासचा परिसर पाहिला आहे का म्हणून विचारले . आतापर्यंतच्या आमच्या पर्यटनात आम्ही तिथे गेलेलो नव्हतो.हे स्फटिक सरोवर कुठे आहे? किती लांब आहे? तिथे कसे जायचे? किती दिवस लागतील?मोटारीने प्रवास करता येईल की पायीच जावे लागेल ?अशा अनेक प्रश्नांचा भडीमार आम्ही त्याच्यावर केला .पाराशर म्हणाला तुम्ही सुरवातीलाच मला तुमच्या जवळ फक्त दहा दिवस आहेत असे सांगितले आहे .तेवढ्या मुदतीत तुम्हाला स्फटिक सरोवर दाखवून परत ऋषिकेश येथे आणून सोडण्याची जबाबदारी माझी .

तो पुढे म्हणाला     स्फटिक सरोवर कुठे आहे तिथे कसे जायचे ते मी तुम्हाला आता सांगतो .त्या सरोवराची निर्मिती,त्याचे वैशिष्टय़, त्याच्या आजूबाजूचा परिसर, त्यासंबंधीची लोककथा इत्यादी सर्व गोष्टी  तुम्हाला तिथे गेल्यावरच सांगेन. सरोवराकाठी बसून सरोवराच्या आसपासच्या परिसराकडे पाहात हे सर्व सांगण्यामध्ये व ऐकण्यामध्ये जी मजा आहे ती येथे कथा ऐकून किंवा वाचून येणार नाही 

तो पुढे म्हणाला काही भाग मोटारीने जाता येईल. काही प्रवास होडीतून करावा लागेल.तर काही पायी करावा लागेल .प्रथम आपण नेहमीच्या रस्त्याने देवप्रयाग पर्यंत जाणार आहोत .त्यानंतर पुढे कसे जायचे ते तुम्हाला कळेलच .आम्ही एक भाडय़ाची मोठी टॅक्सी  देवप्रयागपर्यंत केली.त्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला . 

देवप्रयाग जवळ आल्यावर मुख्य रस्ता सोडून आमची गाडी उजवीकडे वळली . थोड्याच वेळात आम्ही देवप्रयागला  पोचलो.आपल्या संस्कृतीत नद्या अत्यंत पवित्र मानल्या जातात. नद्यामुळे धरती सुजलाम् सुफलाम् होते.आपले अस्तित्व नद्यांमुळे टिकून आहे .दोन नद्यांचा संगम पवित्र मानला जातो.त्या स्थानाला प्रयाग असे म्हटले जाते .प्रयाग  म्हणजे विशेष यज्ञाची जागा .गंगा व यमुना यांचा संगम जिथे होतो त्याला प्रयागराज(प्रयागांचा राजा)  असे म्हटले जाते.

देवप्रयाग येथे भागीरथी व अलकनंदा यांचा संगम होतो.येथून पुढील प्रवाहाला गंगा असे नाव प्राप्त होते .पवित्र दिवशी देव येथे स्नानासाठी येतात म्हणून याला देवप्रयाग असे म्हटले जाते .स्फटिक सरोवर येथे जाण्यासाठी आम्हाला देवप्रयाग येथे गंगा ओलांडायची होती .आम्ही गेलो त्या वेळी तेथे पूल नव्हता.गंगा ओलांडण्यासाठी एका वर्तुळाकृती नावेतून आम्ही पलीकडे गेलो. गंगा उतारावर वाहत असल्यामुळे तिला प्रचंड वेग असतो.दोन तीरावरच्या दोन झाडाना एक मजबूत जाड पोलादी तार बांधलेली असते.त्याला आंकडा टाकून एक पोलादी दोर नावेला बांधतात.त्यामुळे नाव प्रवाहाच्या वेगाबरोबर वहात जात नाही .नंतर वल्हवत वल्हवत होडी  पैलतीराला नेली जाते. अशाप्रकारे आम्ही पलीकडे गेलो. गोल नावेतून  प्रचंड वेगाने वहात असणारी गंगा ओलांडणे हा  एक अनुभव होता.

स्फटिक सरोवरापर्यंतचा, नंतरचा आमचा प्रवास आम्हाला पायी  चालत करावा लागला.एक छोटासा डोंगर ओलांडून आम्ही पलीकडे पोचलो.डोंगर चढताच समोर स्फटिक सरोवर दिसू लागले .  

सरोवर जवळजवळ वर्तुळाकृती होते .त्याच्या तीनही बाजूना उंच उंच डोंगरांच्या रांगा होत्या.त्यातील दोन बाजूंच्या दूरवरच्या पर्वतांच्या शिखरांवर बर्फाची टोपी घातलेली दिसत होती.विस्तीर्ण पसरलेला सरोवराचा जलाशय, त्याच्या पाठीमागे उंच उंच पर्वताची रांग,त्यावरील बर्फ ,त्या सर्वांचे जलाशयात पडलेले प्रतिबिंब ,हे दृश्य खिळवून ठेवणारे होते . आम्ही उतरत होतो त्याच्या उजव्या बाजूला काहीसा सपाट प्रदेश होता .नंतर लहान लहान डोंगरांच्या व नंतर उंच पर्वतांच्या रांगा होत्या. डोंगरउतारावरील लहान मोठी खेडी ओलांडत आम्ही सरोवराच्या किनाऱ्यावर पोचलो.

तलावाच्या जसे जवळ आम्ही पोचलो तशी त्याची भव्यता  जाणवू लागली . सरोवरच्या एका काठावरून पलीकडचा काठ दिसत नव्हता.सरोवराचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ व नितळ होते.अश्या पाण्यामुळेच त्याला स्फटिक हे नाव पडले होते. 

सरोवराचा तळ स्पष्ट दिसत होता . सरोवराच्या  मधील भागात खोल पाणी आहे असे पाराशर  म्हणाला.कोणत्याही साधनाशिवाय बुडी मारणारा पाणबुड्या तळापर्यंत जाऊ  शकत नाही असे त्याच्या बोलण्यात  आले.

आम्ही सरोवराच्या काठाकाठाने फिरत होतो.पाराशर  आमच्याबरोबर फिरत होता.तो म्हणाला,

या सरोवराची निर्मिती  चारशे पाचशे वर्षांपूर्वी झाली असावी .मोठा भूकंप झाल्यामुळे इथे एक प्रचंड खड्डा पडला .जवळून गंगामाई वहात असल्यामुळे तिच्या प्रवाहाचा दाब असह्य झाला .गंगामाईचे तीर तुटले आणि पाणी या खड्डयात शिरले.सुरुवातीची काही वर्षे गंगेचे पाणी या सरोवरात येत असे .नंतर भूगर्भात पुन्हा काही उलथापालथी झाल्या .गंगामाईचा तुटलेला तीर सांधला गेला.आपण ओलांडून आलो त्या डोंगराची निर्मिती झाली .चारी बाजूच्या डोंगरावरील पाणी या सरोवरात येते.अजून तरी या  सरोवरातून एखाद्या नदीची निर्मिती झालेली नाही.आलेल्या पाण्यामुळे सरोवराची पातळी वाढत नाही .त्या अर्थी पृथ्वीच्या पोटातून एखादा गुप्त प्रवाह गंगामाईपर्यंत जात असावा .

सरोवरात कांही होड्या फिरताना दिसल्या.त्या बहुधा मच्छीमारी करीत असाव्यात.असे आमच्यापैकी एकजण म्हणाला .त्यावर पाराशर  म्हणाला येथे मासे पकडण्याला बंदी आहे.आम्ही बंदी कां असे विचारता तो म्हणाला, ती एक मोठी कथा आहे.तेच तर या सरोवराचे वैशिष्ट्य आहे.  येथे पर्यटक कुणीही दिसत नव्हते. हे सरोवर बऱ्याच जणांना माहीत नसावे .मोटार येण्यासारखा रस्ता झाल्याशिवाय पर्यटकांचा ओघ सुरू होणार नव्हता . पर्यटक आले तरी तुमच्या सारखे काही हौशी पर्यटक येणार होते .इकडे रस्ता करण्याचे काम सुरू होणार आहे .एकदा रस्ता झाला की येथे पर्यटक येऊ लागतील .सरोवराच्या काठाकाठाने रस्ता होईल .हॉटेल्स उभी राहतील.वीज सर्व परिसर उजळून टाकील .बोटिंग, स्वीमिंग, स्कुबा डायव्हिंग,इत्यादी सुविधा निर्माण होतील.हा सर्व भाग मागासलेला आहे .त्याचा विकास होईल.पाराशर म्हणाला .

उत्तरांचलमध्ये जिकडे तिकडे पर्वतरांगा असल्यामुळे खेडी विखुरलेली आहेत .खेडी दुर्गम भागात वसलेली आहेत .बहुतेक वस्ती लहान मोठ्या शहरातून आहे.मोठ्या प्रमाणात भाविक येथे देवदर्शनासाठी येत असल्यामुळे पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे .

हळूहळू संध्याकाळ होवू लागली होती.  मार्गदर्शक पाराशर आम्हाला एका घरात घेऊन गेला .तिथे आमची निवासाची व जेवणाची सोय केलेली होती.

पाराशर आमच्याबरोबर जेवताना गप्पा मारीत होता .

सरोवरात मासेमारीला बंदी आहे असे तो म्हणाल्याचे आम्हाला  आठवले .

इतर गप्पांच्या व परिसर पाहण्याच्या नादात आम्ही ते विसरून गेलो होतो.

आम्ही तो विषय पुन्हा काढला .

त्यावर तो म्हणाला या सरोवरात फक्त दोनच रंगाचे मासे आहेत .सोनेरी व सावळ्या रंगाचे.

*फक्त या दोनच  रंगांचे मासे कां?आणि मासेमारीला बंदी कां आहे,  त्यासंबंधीची कथा फार मोठी आहे.* 

*उद्या सरोवराचा परिसर फिरत असताना तुम्हाला सांगेन.असे म्हणून त्याने तो विषय बंद केला .*

*आमची उत्सुकता वाढवून तो दुसऱ्या विषयावर गप्पा मारू लागला. *

(क्रमशः)

२२/८/२०२०©प्रभाकर  पटवर्धन