८ कासव आणि कासव १-२
(ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
एक आदिवासी पाडा होता .नागरी संस्कृतीशी त्याची ओळख जवळजवळ नव्हती .म्हणूनच कदाचित त्यांची संस्कृती जास्त चांगली होती असे काही जणांचे मत होते.राना वनात राहात असले तरी आजारपण हे होतेच .त्यांचा एक देव होता .त्याला ते वाघोबादेव म्हणत.
कुणीही आजारी पडल्यावर किंवा आणखी कुठलीही समस्या आल्यावर त्याला नवस बोलला जाई.परिस्थितीनुसार कोंबडे बकरे बळी दिले जाई.
आजारपणावरील दुसरा उपाय म्हणजे गावातील भगताकडे जाणे.तो सामान्यतः हे आजारपण बाहेरचे आहे असे सांगे.बाहेरचे याचा अर्थ भूत पिशाच्च इत्यादी कुणीतरी त्रास देत आहे .त्यासाठी भगत सांगे ते ते करावे लागे.भगताच्या अंगात जेव्हा केव्हां येत असे त्या अवस्थेत तो कुणाचे लागीर आहे .त्यासाठी काय केले पाहिजे वगैरे सांगे .आणि ते केल्यावर पाड्यावरील लोकांना बरे वाटत असे .
तिसरा उपाय गावातील किंवा दुसऱ्या पाड्यावरील वैदूकडे जाणे. त्याच्या जवळ पाळेमुळे जडीबुटी इत्यादी असत .पैसे घेऊन किंवा वस्तू घेऊन तो उपाय करीत असे .
प्रत्येकाची एक जीवनशक्ती असते .तिच्यामुळे कुणीही काहीही केले नाही तरी व्यक्ती बरी होत असते .तेव्हा कुठल्याही आजारपणावर काहीही केले तरी आणि काहीही केले नाही तरी साधारणत: पन्नास टक्के लोक बरे होतच असतात.
मानवी मन ही एक गूढ गोष्ट आहे .वैद्य,डॉक्टर,भगत,देव, यावरचा अढळ विश्वास तुम्हाला बरे करण्यास मदत करीत असतो .
तरीही साथीचे रोग आहेत .शरीर यंत्रणेतील कमतरतेमुळे होणारे आजार आहेत .पाऊस थंडी वारा ऊन इत्यादीमुळे म्हणजेच हवेतील बदलामुळे होणारे रोग आहेतच .
कित्येक आजार अन्नातील कमतरतेमुळे निर्माण होतात .निकृष्ट अन्न पोटभर अन्न न मिळणे हेही कित्येक वेळा प्रतिकारशक्ती कमी होण्याचे कारण असते .त्यामुळेही लहान मुले मोठी माणसे आजारी पडत असतात .स्त्रियांना त्यांचे म्हणून काही विशेष रोग असतात .
थोडक्यात या पाड्यावर सकस अन्नाची गरज होती तसेच कित्येक आजारांवर योग्य औषध योजना आवश्यक होती .
तर या पाड्यावर लोक आजारी पडतच होते. त्यातील काहींना बरे वाटे तर काही कित्येक दिवस लोळत पडत असत . तर काही जण साथीचे बळी ठरत असत.
आदिवासींचे जंगलात असे अनेक पाडे होते .प्रत्येक पाड्याची थोड्याबहुत फरकाने अशीच परिस्थिती होती .प्रत्येक पाड्याला निदान जवळजवळचे दोन तीन पाडे मिळून एखाद्या डॉक्टराची गरज होती .
अशा आदिवासींच्या वसाहतीमध्ये शाळा अभावानेच असत .शाळा असली तर विद्यार्थी नसत .विद्यार्थी असले तर मास्तर नसे. विद्यार्थी व मास्तर दोन्हीही असले तरी शाळेला जागा नसे.जंगलातील शाळेत जायला शिक्षक उत्सुक नसत.
एकूण सर्वच पाड्यांवर आदिवासींमध्ये पोषण शिक्षण आरोग्य याबद्दल आनंदच होता.आदिवासींना समजून घेऊन, त्यांच्या कलाने, त्यांना विरोध न करता, जर एखादा या तीनही गोष्टी देऊ शकला तर अशा व्यक्तीचे पाड्यावर अर्थातच स्वागत होणे स्वाभाविक होते .
शासनाचे दुर्लक्ष, शासकीय यंत्रणेचा सुस्तपणा, यामुळे धर्मप्रसारकांचे फावत असे .धर्म प्रसारकाना मोकळे मैदान मिळत असे .
याच परिस्थितीचा फायदा घेवून फादर जॉन पाड्यावर आला .त्याची औषध योजना अचूक होती . निरनिराळे आजार, रोग व त्यावरील उपाय याबद्दलचे उत्कृष्ट ज्ञान त्यांच्या जवळ होते.थोड्याच काळात त्यांनी आदिवासींची भाषा शिकून घेतली .तनमनधनाने त्यांनी धर्मप्रसाराला झोकून दिले होते .त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून भरपूर पैसा मिळत होता .ख्रिस्ती धर्मप्रसार हे त्यांचे ध्येय होते .त्यासाठी कितीही कष्ट सोसण्यास ते तयार होते .ख्रिस्ती धर्म प्रसाराला तनमनाने वाहून घेतलेला तो मनुष्य होता .
आदिवासींच्या कलाने घेण्यात ते कुशल होते . आदिवासी बऱ्याच वेळा केवळ शिकार व निसर्ग यावर अवलंबून राहात असे .केवळ शिकारीवर अवलंबून राहण्याऐवजी फादरनी शेतीला प्राधान्य दिले. फादरनी शेतीमध्ये सुधारणा घडवून आणली.हे सर्व त्यांनी हळूहळू केले. आदिवासी कुठेही दुखावला जाणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली .ते खरेच सेवाभावी वृत्तीचे होते .आदिवासींची उन्नती आणि धर्मप्रचार यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले होते .
शेती शिक्षण आरोग्य यातील सुधारणामुळे सर्वजण फादर जॉनला देवस्थानी मानू लागले.हळूहळू त्यांनी ख्रिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे ते सांगण्याला सुरुवात केली .पैशाच्या पाठबळावर त्यांनी छोटेसे चर्च बांधले.एकेका आदिवासीला बाप्तिस्मा देण्याला सुरुवात केली .जवळच्या पाड्यांवरही त्यांनी आपले हातपाय पसरले .असे सर्व काही छान चालले होते .परंतु अकस्मात त्यांमध्ये एक अडथळा निर्माण झाला .
मौलवी मोहम्मद जवळच्या एका पाड्यावर त्याच उद्देशाने आले . मोहम्मद जन्माने मुसलमान होता .कर्मठ मुस्लीम घरांमध्ये त्याचा जन्म झाला होता .लहानपणीच त्याने कुराण मुखोद्गत केले होते .त्याला कुराणातील आयात नुसते पोपटासारखे म्हणता येत होते असे नव्हे तर त्या प्रत्येकाचा अर्थ त्याची पार्श्वभूमी त्यांचे महत्त्व तेही त्याला माहीत होते . मुस्लिम धर्म प्रसारामुळे सर्वांचे कल्याण होईल अशी त्याची दृढ धारणा होती.मुस्लिम धर्म प्रसाराला आपण वाहून घ्यावे असे त्याला प्रामाणिकपणे आतून वाटत होते .त्याच्यासमोर ख्रिश्चन धर्म प्रसारकांचे उदाहरण होते .तलवारीच्या जोरावर धर्म प्रसार न करता तो लोकांच्या पोटात व काळजात शिरून केला पाहिजे असे त्याचे ठाम मत होते .या बाबतीत त्याला ख्रिश्चन धर्मप्रसारक आदर्श वाटत असत .ख्रिश्चन धर्मप्रसारकांप्रमाणेच त्याला त्याच्या धर्मीयांचा पाठिंबा होता .यथावकाश तो मौलवी बनला .त्याने वैद्यकीय शिक्षणही थोडे बहुत घेतले .ख्रिस्ती धर्मप्रसारकांप्रमाणेच शिक्षण आरोग्य व आर्थिक उन्नती या तिन्ही बाजूंवर लढण्याचे त्याने ठरविले .आणि एक दिवस तो आदिवासी पाड्यावर हजर झाला .
फादर जॉन तीन चार पाड्यांवर ताबा मिळवून आणखी पाड्यांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे याची त्याला कल्पना होती .जंगलात असे अनेक पाडे होते .फादर जॉनपेक्षा सरस काम करून त्याला आदिवासींच्या हृदयात जागा मिळवणे आवश्यक होते .त्याशिवाय मुस्लिम धर्म प्रसार करणे त्याला शक्य झाले नसते .
मोहम्मदने काही पाडय़ावर जिथे फादर जॉन पोचला नव्हता तिथे त्यांच्या पद्धतीने काम सुरू केले .आरोग्यसुधारणा, शिक्षणप्रसार, आर्थिक उन्नती, नंतर हळूच मशीद बांधणे आणि धर्मप्रसार या पायर्या त्याने फादर जॉन प्रमाणेच ठरविल्या होत्या.त्याने बऱ्यापैकी कामही सुरू केले होते .
एक दिवस त्याच्या मनात एक विलक्षण कल्पना आली .जर आपण फादर जॉनला मुस्लिम धर्म कसा श्रेष्ठ आहे ते पटवू शकलो,आणि त्यानेच मुस्लिम धर्म स्वीकारला तर सर्वच प्रश्न सुटेल .
एक दिवस तो फादर जॉनला भेटण्यासाठी गेला .त्याने मैत्रीचा हात पुढे केला .फादर जॉन खरा ख्रिस्ती होता. त्याने मोहम्मदचा मैत्रीचा हात स्वीकारला . दोघेही उदारमतवादी होते .ज्याचा धर्म आदिवासींना पटेल, पचनी पडेल, रुचेल, आवडेल तो ते स्वीकारतील.स्वतः झटून आपण जास्त प्रयत्न केले पाहिजेत.असे प्रामाणिकपणे प्रत्येकाला वाटत होते .
दोघांमध्ये स्पर्धा होती परंतु ती निकोप स्पर्धा होती.दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले होते . दोघेही सुशिक्षित व सुसंस्कृत घराण्यातील होते .आसपासच्या प्रदेशात त्यांच्या इतका सुशिक्षित बाहेरचे जग पाहिलेला कुणीही नव्हता.स्वाभाविक परस्पराना भेटण्यात गप्पा मारण्यात त्यांचे मन रमत असे .कधी फादर जॉन,मौलवी मोहम्मदकडे त्यांच्या घरी जात तर कधी मौलवी मोहम्मद,फादर जॉनकडे येत असत .
येनकेनप्रकारेण दुसऱ्याचा काटा काढला पाहिजे, तो आपला शत्रू आहे, त्याला दूर केले पाहिजे,असे कुणालाही वाटत नव्हते .
शांतीच्या मार्गाने परंतु आपलाच धर्म प्रसार झाला पाहिजे याबद्दल दोघांचेही एकमत होते. या मुद्द्यावर दोघेही ठाम होते.
गप्पा मारता मारता प्रत्येकजण दुसऱ्याला त्याचा धर्म कसा श्रेष्ठ आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न करीत असे .
आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व,फादर जॉनला पटवून देण्यासाठी एक विचार मौलवी मोहम्मदच्या मनात आला .
(क्रमशः)
५/११/२०१९©प्रभाकर पटवर्धन