२ गब्बरसिंगचा खजिना १-२
(ही कथा काल्पनिक आहे.वस्तुस्थितीशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
एकोणीसशे सत्तरच्या दशकात रामगढला गब्बरसिंग नावाचा एक मोठा डाकू होऊन गेला .हे सर्वाना माहीत आहेच .लूट हत्या अपहरण हात पाय तोडणे इत्यादी सर्व गुन्हे तो करीत असे हेही सर्वांना माहित आहे .माहीत असलेल्या व माहीत नसलेल्या असंख्य गुन्ह्यांपैकी केला नाही असा एक देखील गुन्हा त्यांने शिल्लक ठेवला नव्हता.गुन्ह्याचे व छळाचे, निरनिराळे प्रकार तो शोधून काढीत असे. ठाकूर बलदेवसिंह व तो यांच्यामध्ये असलेली दुष्मनी तर सर्वांना माहित आहेच त्यावरतीतर शोले सिनेमा आधारित होता . या गब्बरसिंगची दुसरी एक बाजू बर्याच जणांना माहित नाही.कारण त्यावर कुणी सिनेमा काढलेला नाही .
अत्यंत क्रूर व उलट्या काळजाचा अशी त्याची प्रतिमा आहे.हा त्याचा एक चेहरा झाला .परंतु त्याचा दुसराही एक चेहरा आहे .तो बर्याच जणांना माहित नाही .हा चेहरा सौम्य व कुटुंबवत्सल मनुष्याचा आहे .या गब्बरसिंगने लग्न केले होते हे बऱ्याच जणांना माहीत नाही .रामगढपासून सुमारे शंभर किलोमीटरवर भरतगढ नावाचे एक गाव आहे .या भरतगढमध्ये तो अत्यंत सज्जन व कुटुंबवत्सल म्हणून राहात होता.तिथे तो मधुकर नावाने रहात होता.बायको दामिनी व दोन मुले राजा व राणी असे त्याचे चौकोनी कुटुंब होते .एकाच वेळी तो दोन प्रकारचे जीवन जगत असे.त्याचे दोन मुखवटे होते एक डाकू गब्बर सिंग व दुसरा व्यापारी मधुकर.
त्याचा मोठा व्यापार आहे त्यासाठी त्याला वारंवार भारतात व परदेशात फिरावे लागते .त्यामुळे तो फार थोडा काळ भरतगढला असतो असा भरतगढ व आसपासच्या गावातील सर्वांचा समज होता.साधारणपणे पावसाळ्यांमध्ये तो भरतगढला असे.पावसाळय़ाच्या सुरुवातीला तो त्याच्या सर्व सहकाऱ्यांना निरोप देत असे.सर्वजण आपापल्या कुटुंबांमध्ये जाऊन त्यावेळी राहत असत .पाऊस संपला की पुन्हा ते त्यांच्या ठरलेल्या जागी एकत्र जमत .नंतर त्या गुहेत राहून त्यांचा धंदा लूटमार,दरोडे , इत्यादी पुन्हा सुरू करीत असत.
सर्व प्रकारच्या लुटी मधून सहकाऱ्यांना त्यांचा वाटा जाऊनही गब्बर सिंगने पुष्कळ धन गोळा केले .त्याचा कागदी नोटांवर विश्वास नव्हता .तो त्याला मिळालेल्या धनाचे त्याच्या सहकाऱ्यांमध्ये वाटप करीत असे.त्याच्या वाट्याला आलेल्या धनापैकी काही भाग त्याला सामान्यजन वापरतात त्याप्रमाणे घरखर्चासाठी वापरावा लागे. याशिवाय बँकेमध्ये खाते ठेवणे,बँकेमध्ये लॉकर असणे, शेअर्समध्ये पैसा गुंतविणे वगैरे सर्व गोष्टी तो सामान्य लोकांप्रमाणेच करीत असे.त्यानंतर उरलेल्या धनाचे रूपांतर तो मूल्यवान रत्नांमध्ये करीत असे. असे धन तांब्याच्या डब्यांमध्ये सीलबंद करून ठेवण्याचा त्याचा प्रघात होता.असे डबे तो अत्यंत कौशल्याने गुप्त जागी ठेवीत असे .ही गुप्त जागा त्याच्याशिवाय कुणालाही माहित नसे.कित्येक वेळा त्याच्या मनात असा विचार येई की यदाकदाचित लूटमार दरोडे पोलीस यांमध्ये आपले काही बरेवाईट झाले तर हे धन फुकट जाईल त्यासाठी आपल्या बायकोला तरी या धनाचा पत्ता सांगून ठेवावा .परंतु प्रत्यक्षात त्याने तसे काही केले नाही .शेअर्स, बँक,जमीन जुमला यामध्ये आपल्या बायका पोरांसाठी पुरेसे धन ठेवले आहे. ही जागा गुप्त राहावी असे त्याचे धोरण होते.
बलदेवसिंग ठाकूरने गब्बरसिंगला पकडून दिले हे आपल्याला माहीत आहेच.त्यानंतर त्याला जन्मठेप म्हणजे वीस वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याला फाशी झाली असेल असा तुमचा समज असेल परंतू तसे झाले नाही .
या काळात तो अर्थातच घरी नव्हता.त्याने भरपूर पैसे बँकेत ठेवून आपल्या कुटुंबाच्या चरितार्थाची सोय केलेली होती .आपण पकडले जाऊ आणि कधी ना कधी आपल्यावर अशी वेळ येईल याची त्याला कल्पना होती .त्याने कधी सांगितलेले नसूनही त्याच्या पत्नीला मात्र त्याच्या खऱ्या धंद्याची कल्पना होती. गब्बरसिंग पकडला गेल्यानंतर व त्याला दीर्घ कारावासाची शिक्षा झाल्यावर भरतगढ सोडून ती बंगलोर येथे स्थायिक झाली होती.तिथे ती सैन्यातील कॅप्टनची पत्नी म्हणून राहत होती . आपला नवरा युद्धकैदी म्हणून शत्रूच्या ताब्यात आहे असे ती सांगत असे. त्यामुळे तिला नवऱ्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ कधी आली नाही .
राजा व राणी या दोन मुलांनी उत्तम प्रकारे शिक्षण घेतले.राणी डॉक्टर झाली तर राजा सीए होऊन इन्कम टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करू लागला .मुलांना आपले वडील कसे होते व आता कुठे आहेत याची काहीही कल्पना नव्हती.तेही आपले वडील युद्धकैदी म्हणून शत्रूच्या ताब्यात आहेत असे समजत होते.
चांगल्या वर्तनासाठी गब्बरची शिक्षा पाच वर्षांनी कमी झाली.हे वाचून त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही .खरोखरच त्याची वर्तणूक तुरुंगात अतिशय चांगली होती.तुरुंगातून सुटल्यावर सरळ तो आपल्या घरी आला .आता त्याचे वय झाले होते.सहकारी पांगले होते.पुन्हा धोका स्वीकारण्याची लूटमार करण्याची त्याची उमेद राहिली नव्हती .वयोमानानुसार आता तसे काही करावे असेही त्याला वाटत नव्हते .शांतपणे निवृत्त जीवन जगावे असे त्याला वाटत होते .तो आल्यावर त्याच्या पत्नीने आपली जागा पुन्हा बदलली आणि नवीन जागेत ती राहायला गेली.
मोठ्या शहरात कुणी कुणाच्या फंदात विशेष पडत नाही .त्यामुळे कुणाच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ तिच्यावर आली नाही .मुलांना आपले वडील सैन्यात आहेत आणि युद्धामध्ये ते शत्रूच्या ताब्यात तुरुंगात आहेत एवढीच माहिती होती .इथे मधुकर रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर म्हणून वावरत होता.उंचनिंच , धिप्पाड बळकट कसलेले शरीर,रापलेला करारी चेहरा , निवृत्त सैनिकी अधिकारी म्हणून चटकन मान्य होण्यासारखा होता.
त्याची दोन्ही मुले लग्नाच्या वयाची होती .दोघांनीही प्रेमविवाह केला.
राणीने एका डॉक्टरशी लग्न केले .दोघेही एक हॉस्पिटल चालवीत असत . राजाची पत्नी कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती.
गब्बरकडे पाहिले सॉरी कॅप्टन मधुकररावांकडे पाहिले तर त्यांचे पूर्वजीवन कश्या प्रकारचे होते त्याचा थांगपत्ता लागत नसे .
कॅप्टन मधुकरराव मधूनमधून अस्वस्थ होत असत .
*मूल्यवान रत्नांच्या स्वरूपात निरनिराळ्या गुप्त जागी ठेवलेली संपत्ती त्यांना खुणावत असे.*
*आपले आता बरेच वय झाले.जीवनाचा काही भरवसा नाही .*
*आपण गेल्यावर ही संपत्ती आपल्या मुलांना मिळावी अशी त्यांची उत्कट इच्छा होती .*
* गुप्त ठिकाणी लपविलेली संपत्ती आणून मुलांमध्ये वाटणे त्यांना पटत नव्हते.*
(क्रमशः)
२१/७/२०१९© प्रभाकर पटवर्धन