Get it on Google Play
Download on the App Store

१० भुताटकीची खोली ३-३

(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

*आणि त्या चार सहा  दिवसात म्हणजे  रात्रीत भुताचा अनुभव आल्यास या गोष्टीचा छडा मी लावावा असा विचार सर्वांनी मांडला .

*माझ्या धाडसी स्वभावानुसार  मी त्याला संमती दर्शविली*  

खोलीचे कुलूप काढण्यात आले . खोली आम्ही सर्वांनी बघितली.फर्निचर,बेड, यावरील कापड काढण्यात आले.नोकरांकडून खोली स्वच्छ करण्यात आली.माझ्या खोलीतील माझी बॅग व कपडे  आणण्यात आले.संभाजी राजे याच्याकडून परत घरी जाईपर्यंत आता ही खोली मी वापरणार होतो. 

माझ्या धाडसी स्वभावानुसार मला तिथे झोपायचे विशेष काही वाटत नव्हते .मी आरामशीर डाराडूर झोपणार होतो .अर्थात भुताने मला उठविले असते तर मात्र त्याच्याशी मी चार गप्पा मारणार होतो .

पहिली रात्र ~काहीही घडले नाही .दुसऱ्या दिवशी आम्हाला संभाजीचा फार्म हाऊस बघण्यासाठी  जायचे होते .संबंध दिवस तिथे जाणार होता .

दुसरी रात्र ~ संभाजीच्या शेतावरून फिरून आम्ही संध्याकाळी परत वाड्यावर आलो. खोलीत आल्यावर मला काहीतरी वेगळे वाटले .नक्की काय वेगळे आहे ते लक्षात येईना .बंद खोलीत आल्यावर नेहमी जो एक प्रकारचा कुबट वास येतो तो येत नव्हता .उलट कसल्या तरी फुलांचा मंद सुवास सर्वत्र दरवळत होता .कुणी तरी मला त्याचे किंवा तिचे अस्तित्व जाणवून देत होता किंवा होती .

त्या सुवासावरून रहस्य उलगडणार आणि चांगल्या प्रकारे त्याचा शेवट होणार असे मला अांत कुठेतरी जाणवत होते .

त्या दिवशी रात्री लाइट बंद केल्यावर मला एक वेगळेच दृश्य दिसले .माझा पलंग होता त्या भिंतीच्या समोरील भिंत एक प्रकारच्या अद्भुत प्रकाशाने भरून गेलेली दिसली .तो प्रकाश नक्की कुठून येत होता ते कळत नव्हते .थोड्याच वेळात तो प्रकाश दिसत नाहीसा झाला . सर्वत्र काळोख पसरला .नंतर मी गाढ झोपी गेलो .त्या रात्री आणखी काही विशेष घडले नाही .

तिसऱ्या दिवशी आम्हाला तलावावर बोटिंगसाठी जायचे होते .संपूर्ण दिवस बोटिंग पत्ते खेळणे इतर खेळ असा पिकनिकचा कार्यक्रम होता .

तिसरी रात्र~ संध्याकाळी आम्ही दमून भागून वाड्यावर परतलो . खोलीत आल्यावर मंद सुवास तर होताच परंतु सामानाची कुणीतरी फिरवाफिरव केलेली आढळून आली.मी इंटरकॉमवरून हाऊसकीपरला बोलवून घेतले.सामानाची फिरवाफिरव त्याने केली का असे विचारले .त्यावर त्याने तुम्ही गेल्यानंतर तुमची खोली मी माझ्या समक्ष साफ करून घेतली.नंतर बंद केली .कुणीही तुमच्या खोलीत त्यानंतर आलेले नाही. आम्ही सामानाला हातही लावलेला नाही असे त्याने ठामपणे सांगितले .तुम्हाला असे का वाटले म्हणून त्याने विचारले .त्यावर मी सहज असे बोललो .त्याला विशेष काही महत्त्व नाही . तुम्ही मनावर घेऊ नका असे त्याला सांगितले.

सामानाची फिरवाफिरव कुणीतरी केली हे त्याच्याजवळ बोललो नाही.सुदैवाने  सामानाची फिरवाफिरव त्याच्याही  लक्षात आली नाही .

मंद आल्हाददायक  सुवास, भिंतीतून काही वेळ मंद अद्भुत प्रकाश, सामानाची हलवाहलव  यामार्फत कुणीतरी मला काहीतरी संदेश देत आहे असे मला वाटत होते.

चौथी रात्र ~अाज काहीतरी विशेष घडणार असे मला वाटत होते .दिवे मालवल्यावर भिंतीतून अद्भुत प्रकाश येऊ लागला. भिंतीतून दोन धूसर आकृती प्रकट झाल्या त्यातील एका पुरुषाची होते तर दुसरी स्त्रीची होती.त्या आकृती चालत माझ्याजवळ येऊन उभ्या राहिल्या .त्यांना मला काहीतरी सांगायचे असावे.अजून त्यांना स्पष्ट रूप धारण करता येत नव्हते.त्यांना मला जे काही सांगायचे होते ते कसे सांगावे तेही त्यांना बहुधा कळत नसावे . त्या आकृती पुन्हा भिंतीत अदृश्य झाल्या.नंतर मी गाढ झोपी गेलो.

आमचा संबंध दिवस गडावर गेला तिथे एक जागृत देवीचे स्थानही होते.गड चढून गडावर सर्वत्र फिरून आम्ही दमून गेलो होतो .वाड्यावर जाऊन केव्हा झोपी जातो असे मला झाले होते .

पांचवी रात्र ~

आज रात्री नक्की काहीतरी घडणार असे माझे अंतर्मन मला सांगत होते .रोजच्याप्रमाणे एकत्र जेवून गप्पा मारून रात्री अकरा वाजता मी माझ्या खोलीत आलो .मला झोप येत नव्हती .मी त्या दोघांची वाट पाहात होतो.रात्रीचे बारा वाजले .भिंतीमधून अद्भुत निळसर प्रकाश दिसू लागला .एखादा दरवाजा उघडल्याप्रमाणे भिंतीतून दरवाजा उघडून ती दोघे बाहेर आली .आज ती दोघे स्पष्ट दिसत होती.त्यातील पुरुष शिंदेशाही पगडी घातलेला,मुंडेंछाट सदरा असलेला, कमरेला गुडघ्याखाली किंचित  येणारी तंग अर्धी विजार घातलेला असा होता .त्याचा वर्ण काळसर होता.वय सुमारे तीस पस्तीस असावे .मुलगी वीस वर्षांची वाटत होती .तिने नऊवारी पातळ चापून चोपून नेसले होते.काळेभोर डोळे गुलाबी गाल धारदार नाक लांबसडक केस उंच मान कमनीय शरीरयष्टी अशी ती देखणी मुलगी होती .कानात कुडय़ा,नाकात नथ, गळ्यात एकच ठसठशीत सोन्याचा हार, कमरेला सोन्याची मेखला,पायांमध्ये पैंजण असे दागिने तिने घातले होते .

दोघेही सावकाश चालत माझ्या पलंगापाशी आली.मी त्यांच्याकडे विस्फारीत  नजरेने पाहत होतो.मला त्यांची भीती मुळीच वाटत नव्हती.आज तीन चार रात्री ती दोघे मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होती.परंतु त्यांचा संदेश माझ्यापर्यंत पोचत नव्हता .

त्यातील पुरुषाने बोलण्यास सुरुवात केली .त्यांच्या बोलण्याला मधून मधून ती स्त्री साथ देत होती .तो म्हणाला ~माझे नाव शंकर व या मुलींचे नाव नंदा .किती काळ झाला मला आठवत नाही परंतु तीन चारशे वर्षे नक्की झाली असतील.या जगदाळे घराण्याचा संस्थापक भवानराव यांच्या पदरी मी नोकर होतो .ही नंदा दासी म्हणून भवानरावांकडे काम करीत होती.माझे व हिचे प्रेम होते.आम्ही दोघे लग्न करणार होतो .एके दिवशी भवानरावांचे लक्ष हिच्याकडे गेले.भवानरावांच्या खास दासीमध्ये  हिची नेमणूक करण्यात आली.खास दासी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आले असेलच .

ही खास दासी झाल्यापासून मला तिची भेट घेणे कठीण जाऊ लागले .तरीही चोरून मारून आम्ही भेटत होतोच .एके रात्री भवानरावांची  खास सेवा करण्यासाठी तिला बोलाविण्यात आले . त्या रात्री तिने बायकी कारण सांगून आपली सुटका करून घेतली .अशी सुटका दोन चार दिवस करून घेता आली असती.त्यानंतर तिला आल्या प्रसंगाला तोंड देणे भाग होते .तिने कुणामार्फत तरी मला निरोप दिला .आम्ही दोघांनी त्या रात्री पळून जायचे ठरविले .एकदा भवानरावांच्या जहागिरीमधून आम्ही बाहेर पडतो म्हणजे  आमची सुटका झाली असती.नंदावर प्रेम करणारा आणखी एक शिपाई होता . त्याला आम्हा दोघांची जवळीक सहन होत नव्हती .आम्ही पळून जाणार ही बातमी त्याला लागली. त्याने ती तत्परतेने भवानरावांना सांगितली. आम्ही घोड्यावरून पळून जात असताना आम्हाला भवानरावांच्या सैनिकांनी पकडले .

जिथे आपण आत्ता आहोत ती खोली व शेजारील खोली हा एक दिवाणखाना होता. ही भिंत नंतर घालण्यात आली आहे .या दिवाणखान्याखाली मोठे तळघर आहे . शत्रूचा हल्ला झाल्यास त्यामध्ये लपून बसण्याची व्यवस्था केलेली आहे .मालकांनी आम्हाला शिक्षा ठोठावली .आम्हा दोघांना तळघरात टाकून देण्यात आले. तळघरात उतरणारा जिना व दरवाजा ज्या भिंतीतून आम्ही आत्ता बाहेर आलो तिथे आहे .त्या तळघरात उतरणाऱ्या जिन्याच्या तोंडावर ही भिंत बांधण्यात आली.आठ दहा दिवस पुरेल इतके पाणी व अन्न साठा आमच्या जवळ ठेवण्यात आला होता.तळघरातून पळून जाण्यासाठी एक चोरवाट आहे असे आम्हाला सांगण्यात आले .जर तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला ती वाट सापडेल आणि तुमची सुटका होईल.त्या चोरवाटेतून तुम्ही पळून गेल्यास आम्ही तुम्हाला अडवणार नाही .असेही आम्हाला साागण्यात आले होते .

आम्हाला चोरवाट  सापडली . त्यातून आम्ही चालत निघालो .आम्हाला अत्यानंद झाला होता.आपण आता बाहेर पडणार आणि जहागिरीच्या प्रदेशातून बाहेर जाणार असे आम्हाला वाटू लागले होते .परंतु त्या दुष्टाने चोरवाट चिर्‍यांनी चिणून बंद केली होती .अन्नपाण्याविना तडफडून मरण्याशिवाय आम्हाला दुसरा काहीही पर्याय नव्हता .

एकमेकांना मिठी मारून आम्ही केव्हातरी बेशुद्ध झालो .नंतर पुढचे काहीही आठवत नाही .तेव्हापासून आम्ही तळघरात बंद आहोत.आम्ही असे केव्हा जागृत झालो ते माहीत नाही . तेव्हापासून आम्ही प्रत्येकाला आमची कथा सांगण्यासाठी तडफडत आहोत. तळघर व ही खोली या मर्यादेच्या बाहेर आम्हाला जाता येत नाही .जो जो कुणी या खोलीत झोपण्यासाठी रात्री येतो त्याला आम्ही दर्शन देतो .आमची कथा व व्यथा सांगण्याचा प्रयत्न करतो.परंतु ती कुणालाच कळत नाही .सर्वजण आमच्या दर्शनाने घाबरून जातात .तुम्ही पाहतच आहात की आम्हा दोघांच्या दर्शनात घाबरण्यासारखे काहीही नाही .

कुणी पळून गेला. कुणी बेशुद्ध झाला.कुणी वेडा  झाला . कुणाला सणसणून ताप भरला.आम्हाला कुणीच समजून घेत नाही .तुम्हीच असे पहिले आहात की जे आम्हाला घाबरले नाहीत .बेशुद्ध झाले नाहीत .पळून गेले नाहीत.तुम्ही शांतपणे आमची कथा व व्यथा नीटपणे ऐकून घेतली .

एवढे बोलून तो पुरुष बोलण्याचे थांबला.

मी काय करावे म्हणजे  ती मुक्त होतील असे मी त्यांना विचारले .

त्यावर त्यांनी आमच्या अस्थी बाहेर आणून त्याचे रीतसर मंत्राग्नी  देऊन दहन करा. म्हणजे आम्ही मुक्त होऊ असे सांगितले .गेली तीन चारशे वर्षे आम्ही एकत्र आहोत परंतु आम्हाला समाधान नाही सुख नाही .आम्ही पुन्हा जन्म घेऊ आणि मगच एकत्र आल्यावर आणि आम्ही ते नक्की येणारच आम्हाला समाधान शांती सुख व आनंद मिळेल. असे त्यानी सांगितले .

तुमच्या मनाप्रमाणे होईल . तुम्ही काळजी करू नका . मी तुम्हाला मुक्ती दिल्याशिवाय येथून जाणार नाही असे वचन मी त्यांना दिले .माझ्या आश्वासनानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद मला स्पष्टपणे जाणवत होता .

माझ्या आश्वासनानंतर मला प्रणाम करून ती दोघेही अंतर्धान पावली .भिंतीतून येणारा तो अद्भुत निळा सोनेरी प्रकाशही लुप्त झाला .

त्या रात्री मला झोप लागली नाही .दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राला संभाजीला रात्रीची सर्व हकीगत एकांतात सांगितली .सर्व मित्रांसमोर सांगितली असती तर संभाजीच्या पूर्वजांची बदनामी झाली असती.

ठरल्याप्रमाणे सर्व मित्र दुसऱ्या दिवशी निघून गेले .प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून मी मागे थांबलो .दोन खोल्यांना जोडणारी ती भिंत पाडण्यात आली .खालील चिरे काढल्यानंतर तिथे एक चोर दरवाजा होता .दरवाजा उघडल्यावर जिना तळघरात जात होता .तळघरात गेल्यावर तिथे दोन कवट्या  व इतर हाडे एकमेकांमध्ये मिसळलेली अशी दिसून आली .जर एकमेकांना मिठी मारून स्त्री पुरुष झोपले व तसेच मृत्यू पावले तर त्यांचे सांगाडे जसे एकमेकांत मिसळून गेलेले आढळतील तसे ते सांगाडे होते.

*सन्मानपूर्वक ते सांगाडे वर आणून त्यांना रीतसर मंत्राग्नी  देण्यात आला .*

*तळघराकडे जाणारा रस्ता कायमचा बंद करण्यात आला.*

*त्या खोलीचे कुलूप कायमचे काढण्यात आले *

*त्यानंतर तिथे झोपणाऱ्या कुणालाही काहीही भास झाले नाहीत . कुणीही भेटले नाही.*

* प्रेमी युगुलाची दीर्घकाळच्या बंदिवासातून सुटका होण्याला मी निमित्त मात्र झालो.*

* जगदाळे घराण्यावरचा कुणालाही माहीत नसलेला कलंक पुसला गेला*

(समाप्त)

२९/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन