Get it on Google Play
Download on the App Store

०८ भुताटकीची खोली १-३

(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

टपालामध्ये पत्र बघून मी आश्चर्यचकित झालो .हल्ली सहसा कुणी पत्र लिहित नाही .प्रत्यक्ष फोनवर बोलणे होते किंवा व्हॉट्सअप,इत्यादी माध्यमांचा संदेशवहनासाठी वापर केला जातो .पाकिटाचा कागद जर एवढा  गुळगुळीत, जर पाकीट एवढे उत्कृष्ट ,तर आतील पत्राचा कागद किती छान असेल असा विचार माझ्या मनात येऊन गेला .पत्र उघडण्याअगोदर मी ते कुणाकडून आले आहे ते पाहिले .पत्राला छान सुवास येत होता. 

माझा जुना मित्र राजे संभाजीराव याच्याकडून पत्र आले होते .आम्ही कॉलेजात शिकत असताना आमचा जो एक गट होता त्यात संभाजी होता.संभाजी खानदानी श्रीमंत होता .त्यांचे घराणे जहागीरदाराचे होते.संभाजीच्या पंजोबाच्या पंजोबांच्या पंजोबानी कुणा पूर्वजाने पेशव्यांवरील वार स्वतःवर झेलला होता.पेशव्यांनी  त्यांना पन्नास गावांची जहागिरी दिली होती .स्वातंत्र्यानंतर त्यांची जहागिरी गेली परंतु त्यांच्या मालकीची जमीन त्यांच्याजवळच राहिली.ती जमीन सुमारे पाचशे एकर होती .ती जमीन म्हणजे सोन्याचा तुकडा होता .

संभाजीचे वडील मजूर लावून स्वतः ती जमीन कसत असत .जमीन स्वतः कसण्याची परंपरा त्यांच्यात पिढ्यान पिढ्या  चालत आली होती.त्यामुळेच त्यांची जमीन कुळ कायद्याखाली कुळांकडे गेली नव्हती .गावालाच त्यांचा मोठा राजवाड्यासारखा वाडा होता .त्या वाड्यात जवळजवळ पन्नास खोल्या होत्या . एके काळी मुले बाळे नातेवाईक नोकर चाकर यांनी वाडा गजबजलेला असायचा .

बरेच चुलत चुलत  नातेवाईक नोकरी धंद्याच्या निमित्ताने निरनिराळ्या शहरात जाऊन स्थायिक झाले होते .संभाजींच्या वडिलांनी व आजोबानी प्रत्येकाला पैशांच्या रुपात त्यांचा वाटा देऊन सर्व जमीनजुमला स्वतःच्या मालकीचा ठेवला होता .खानदानी श्रीमंत म्हणजे काय त्याचा संभाजी हा खास नमुना होता .कॉलेजात असताना आम्ही एक दोनदा त्याच्या राजवाडय़ावर गेलो होतो .कॉलेज सुटल्यापासून गेली दहा वर्षे आमचा केव्हां तरी फोन  करण्याशिवाय विशेष संबंध राहिला नव्हता.

आज त्याचे खास पत्र पाहून माझ्या पूर्वींच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या . कॉलेजात असताना आमचा दहा जणांचा एक ग्रुप होता .पिकनिक गॅदरिंग टवाळखोरी सिनेमा प्रत्येक ठिकाणी आमच्या पैकी बहुतेक जण हजर असत .असेच आम्ही एकदा एका गडावर गेलो होतो .त्या गडावर एक पडका वाडा होता .आम्हाला बाहेर भेटलेल्या एका मजुराने सांगितले की त्या वाड्यात तुम्ही जाऊ नका.आम्ही का म्हणून विचारले असताना त्याने त्या वाड्यात भुताटकी आहे असे सांगितले होते .कशावरून असे विचारता तो म्हणाला की जर आत कुणी गेले तर ते भूत त्याला गुंगविते.तो बाहेर येण्याचे विसरतो.

त्यावेळी मी सर्वांना म्हटले होते की बघुया ते भूत काय करते ते! आपण आत जाऊया.कुणीही आत यायला तयार नव्हते .उगीच विषाची परीक्षा कशाला असे सर्वांचे म्हणणे होते .मी मात्र आत जाऊन पाहिले पाहिजे असे म्हणत होतो.लहानपणापासूनच माझा भुताखेतांवर विश्वास नव्हता .अनेकदा रात्रीचा मी वडापिपंळाखालून गेलो होतो परंतु मला कधीही कुणीही भेटले नव्हते .भूतयोनी नसेलच असे नाही परंतु भूत वाटेल त्याच्या वाटेला जाणार नाही .जर तुमचा काही पूर्वीचा संबंध असेल तरच ते तुमच्या वाटेला जाईल असा माझा ठाम विश्वास होता .भूत असलेच तर त्याला घाबरण्याचे काही कारण नाही असेही  माझे मत होते .त्याला आपण हॅलो हाय करावे तेही आपल्याला हॅलो हाय करील असे मी म्हणत असे .

त्या दिवशी माझ्याबरोबर कुणीही त्या पडक्या वाड्यात यायला तयार झाले नाही .मी एकटाच वाड्यात गेलो. संपूर्ण वाडा फिरून पाहिला मला कुठेही काहीही आढळले नाही मी काहीही पाहिल्याशिवाय,मला काहीही झाल्याशिवाय, सुखरूप बाहेर आलो .तेव्हापासून डेअरिंगबाज म्हणून मला ओळखले जात असे .

एवढ्यात कुणीतरी मला हाक मारली आणि मी माझ्या जुन्या आठवणीतून जागा झालो .अजूनही पत्रात काय आहे ते मी पाहिले नव्हते .मी पत्र वाचायला सुरुवात केली .

पत्र टाईप केलेले होते. सुरुवातीला प्रिय या शब्दापुढे माझे नाव हाताने लिहिलेले होते .त्याअर्थी बर्‍याच  जणांना ते पत्र पाठवलेले असावे हे माझ्या लक्षात आले .पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे होता .

आपण सर्व कॉलेजमध्ये असताना धमाल करीत असू .त्यानंतर आपली भेट झाली असली तरी ती फक्त लग्न समारंभ अशा कार्यक्रमातच.आपण माझ्या वाड्यावर कॉलेजात असताना आले होतात .यावेळी आपण सर्वांनी एकत्र जमून पुन्हा पूर्वीसारखीच धमाल करावी असे मला वाटते .

आपण सर्वांनी पूर्वीप्रमाणेच धमाल करायची असल्यामुळे मी तुम्हाला तुमच्या पत्नीसह येण्याचे निमंत्रण मुद्दामच  देत नाही पुन्हा केव्हातरी आपण सर्व सपत्नीक एकत्र येऊ .

माझी पत्नी तिच्या धाकट्या बहिणीच्या लग्नासाठी माहेरी गेली आहे मुलेही तिच्या बरोबरच गेली आहेत.मीही एकटाच  आहे तेव्हा आपण सर्वांनी येऊन  चार दिवस धम्माल करूया. मी तुमची एक तारखेला स्टेशनवर वाट पाहात आहे .येथे थांबणारी एकच गाडी आहे त्याने तुम्ही यावे .

बाकी सर्व समक्ष भेटीअंती.

तुमचाच

संभाजी 

पत्नीला मी माझ्या मित्राकडे जात आहे हे बॅचलर्स  गॅदरिंग असल्यामुळे तुला नेत नाही असे सांगून एकटाच संभाजीकडे निघालो .सर्व मित्र संभाजीच्या गावच्या  स्टेशनवर भेटले . संभाजीकडे निरनिराळ्या मेकच्या दोन चार मोटारी असूनही तो पूर्वीच्या थाटात घोड्यांच्या बग्गी घेऊन आमच्या स्वागताला आला होता .तीन चार बग्गीमध्ये बसून आम्ही त्याच्या वाड्यावर निघालो .

वाड्यावर आमच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती .अनेक नोकर चाकर आमच्या दिमतीला होते. वाड्यावर गेल्यावर  त्याने प्रथम आम्हाला वेलकम ड्रिंक दिले .नंतर आमच्या खोल्या आम्हाला दाखविल्या .खोल्या सर्व अद्यावत साधनांनी सुसज्ज होत्या .नोकरांना बोलविण्यासाठी इंटरकॉमही होता. टीव्ही, फ्रीज,एसी, नेट, सर्व व्यवस्था होती .फ्रेश होऊन चहापानासाठी हॉलमध्ये येण्याला त्याने सांगितले .

हॉलमध्ये गप्पा मारता मारता चहा नाष्टा करता करता सर्वजण पूर्वींच्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देत होते .प्रत्येकाला काही ना काही आठवण येत होती व तो लगेच अरे ते  तुला आठवते का म्हणून सुरुवात करून पूर्वीची एखादी गंमत सांगत होता . हसण्या खिदळण्यात तासभर गेला.

चार दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाची आंखणी केली आहे असे त्याने सांगितले .आम्ही त्याला काय कार्यक्रम आखला आहे असे विचारल्यावर तो म्हणाला .मी तुम्हाला कार्यक्रम आधी सांगणार नाही .मी रोज तुम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहे . तुम्हाला कंटाळा येणार नाही याची जबाबदारी माझी .हे चार दिवस तुमच्या कायमचे स्मरणात राहतील याची मी खबरदारी घेणार आहे .

चार दिवसांचा कार्यक्रम काय आहे तो विषय तिथेच संपला .

नंतर त्याने आम्हाला मी आता तुम्हाला माझे गरीबाचे घर दाखवितो असे म्हणून राजवाडा दाखविण्याला सुरुवात केली .एकूण राजवाड्याला तीन मजले होते .तो फक्त तळमजलाच वापरत होता .

वरच्या मजल्यांचा वापर होत नसल्यामुळे त्याचे रूपांतर  हॉटेलमध्ये करावे असा संभाजीचा मनसुबा होता .त्यादृष्टीने कामाला सुरुवातही झाली होती .जवळच एक मोठे धरण झाले होते .तिथे बोटिंगची सोय होती.पाच किलोमीटरच्या अंतरावर एक टेकडी होती. त्या टेकडीवर एक जागृत देवस्थान होते . शिवाय संभाजीचा विस्तृत पसरलेला संपन्न मळा हेही एक प्रेक्षणीय स्थळ होते. ग्रामीण भागात जाण्यासाठी ,ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्यासाठी, आसुसलेली शहरी मंडळी मोठ्या संख्येने येऊन येथे राहतील असे आम्ही म्हटले .आम्ही त्याच्या कल्पनेला दाद दिली . व त्याच्या हॉटेलला सुयश चिंतीले .

आम्ही वाड्यावर आलो त्यावेळी गप्पांमध्ये गुंतलेले असल्यामुळे भोवतालच्या परिसराकडे आमचे लक्ष गेले नव्हते.आता आम्ही आसपास पाहायला सुरुवात केली .वाड्याच्या सभोवती घनदाट झाडी होती .जणू काही आपण जंगलात असल्यासारखे वाटत होते.हळूहळू रात्र व्हायला सुरुवात झाली होती .चारी बाजूंनी रातकिडय़ांचा किर्र आवाज येत होता.वाड्याच्या चारी बाजूंनी प्रकाशाचे झोत सोडलेले होते .प्रकाशाने वाडा उजळून निघाला होता .मुख्य रस्त्यापासून वाड्याकडे येणारा रस्ता काँक्रिटचा होता .त्याच्या दोन्ही बाजूला फुलझाडे लावलेली होती .संपूर्ण रस्ता प्रकाशाने उजळलेला होता .बाजूच्या झाडांमधील काळोख आणि रस्त्यावरील प्रकाश हे विरोधामुळे जास्तच तीव्र वाटत होते.खेडेगावात नेहमी राहणाऱ्या किंवा ज्याला खेडेगाव माहीत आहे अश्या व्यक्तीला जरी यांमध्ये काही नाविन्य नसले तरी शहरातील व्यक्तीला हे वातावरण एका बाजूने आकर्षक तर दुसऱ्या बाजूने थोडे भितीदायक वाटणे स्वाभाविक होते.वाड्यामध्ये हॉटेल करण्याची कल्पना निश्चित आकर्षक होती .उत्पन्नाचे एक चांगले साधन निर्माण झाले असते .संभाजीचे उत्पन्न अगोदरच भक्कम होते ते आणखी भक्कम झाले असते .

वाडय़ाभोवती फिरताना चारी बाजूला उत्तम पैकी केलेली बाग  वाड्याच्या सौंदर्यात भर घालीत होती .बागेच्या हिरवळीला लागून आऊट हाऊस होते .त्यामध्ये सर्व नोकरवर्गाची राहण्याची सोय केलेली होती.

जर प्रकाश एकदम नाहीसा झाला तर एखाद्याला भीती वाटेल अशीच परिस्थिती होती .सभोवतालच्या झाडांमध्ये काही झाडे वड व पिंपळ यांची होती.अशा झाडांवर भुते  वास करतात असे म्हणतात. 

तळमजल्यावरील दिवाणखाना,सैपाकघर, कोठीघर,आरसेमहाल,निद्रा खोल्या, इत्यादी खोल्या आम्ही पाहात पाहात जात असताना एक खोली अशी होती की जी उघडी नव्हती.

ती उघडून दाखविण्याचा संभाजीचा विचारही दिसत नव्हता .जशी काही ती खोली अस्तित्वात नाही अशा प्रकारे तो  पुढची खोली दाखविण्यासाठी पुढे निघाला .आम्ही मात्र तिथेच खोलीसमोर सर्वजण थांबलो.

*खोलीला एक भक्कम कुलूप लावलेले होते .कदाचित या खोलीत बँकेसारखी तिजोरी वगैरे असेल असे आम्हाला वाटले .

*आम्ही म्हटले सुद्धा की तुझा हा प्रचंड कारभार व खेडेगाव पाहता येथे एखादी बँक पाहिजे ती नाही म्हणून तू इथे स्ट्राँगरूम बनवली का ?

* त्यावर तो हसून म्हणाला जर तुम्हाला हवी असेल तर ही खोली मी तुम्हाला द्यायला आनंदाने तयार आहे .

*नुसती खोली आणखी काही नाही .खोली आमची आणि आतील माल तुझा असे कसे ?*

*त्यावर तो हसून म्हणाला खोलीतील सर्व मालही तुम्हीच घ्या.*

*कारण ती खोली भुतांची आहे*!!!

(क्रमशः)

२७/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन