अध्याय ३: एक नवीन साम्राज्य
मी घोड्याला नदीकडे नेले. जेव्हा आम्ही पाण्याजवळ पोहोचलो तेव्हा त्याने माझ्याकडे पाहिले.
"पाणी पी." मी त्याला म्हणालो.
मग मी स्वतः माझे तोंड पाण्यात बुडवले आणि एक मोठा घोट घेतला. घोड्याने तेच केले. मग त्याने डोके गदगद हलवले आणि तो फुरफुरला. तो जणू आनंदाने हसत होता.
"तू खूप शूर आहेस. अगदी एखाद्या सैनिकाप्रमाणे!" मी म्हणालो, “आजपासून मी तुला चेतक म्हणेन."
मग चेतकने त्याचा एक खूर उचलला नि पाण्यावर मारला आणि माझ्यावर पाणी उडवले. मी हसलो आणि मीहि त्याच्यावर पाणी उडवले. चेतक नदीच्या पाण्यात इकडे तिकडे पोहत फिरत राहिला. भरपूर खेळला. पाण्यात मध्यभागी गेल्यावर मागे वळून पाहू लागला. जणू तो माझ्या येण्याची वाट पाहत होता. मी त्याच्या दिशेने पोहत गेलो. त्याने गुडघे टेकले, आणि मग मी त्याच्या पाठीवर चढलो. मग आम्ही दोघे लाटांचा पाठलाग करत धावत सुटलो. भरपूर खेळलो. असे वाटले की आम्ही एकमेकांचे जुने मित्र आहोत.
मग मला माझा जुना घोडा अतुल आठवला आणि त्यामुळे मला खूप दु:ख झाले. जेव्हा आम्ही परत गेलो तेव्हा मलयकेतु आणि माझ्या वडिलांचा एक सैनिक आमची वाट पाहत होते.
"आज रात्री घोड्याची रखवाली तुम्ही करा, राजकुमार ऋषिकेश!" शिपाई म्हणाला.
मलयकेतु हसला. "पण तू आता राजकुमार नाहीस," तो पुढे म्हणाला. "तू आता गुलाम आहेस." चेतक रागाने फुरफुरला. जणू मलयकेतुचे शब्द त्याला समजत होते.
त्या रात्री, मी चेतकच्या शेजारीच कुरणात झोपलो. त्याची मोठी छाती त्याच्या श्वासोच्छवासाने वर खाली होत होती. लवकरच काही दिवसात तो घोडा श्वास घ्यायचा थांबेल. लवकरच त्याला देवांना बळी दिला जाईल. चेतकच्या गुळगुळीत काळ्या त्वचेवर माझे अश्रू पडू लागले.
सकाळी आम्ही आमचे गाव सोडण्यासाठी सज्ज झालो तेव्हा सूर्य नारायण आग ओकत होता. आई मोरपिशी पंख्याने वारा घेत घेत बाहेर आली आणि विचारू लागली, "मी कोणत्या रथावर स्वार होऊ?"
मलयकेतुने आईच्या हातातला पंखा हिसकावून जमिनीवर फेकला. "तू पायी जाशील," तो म्हणाला.
"आमच्याशी अशी वाईट वागणूक करू नका." माझे वडील म्हणाले. “तुम्ही एक पराभूत राजा आहात. मग मी तुमच्याशी कसे वागणे अपेक्षित आहे?”
"आम्हाला राजासारखे वागवा," माझे वडील म्हणाले.
मलयकेतू उपहासाने हसत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले
बरेच दिवस आणि रात्री चालल्यानंतर आम्ही पौरव देशाकडे प्रयाण केले. आम्ही हिमालयाच्या अवघड टेकड्यांमधून पायी चालत गेलो. आम्ही कितीतरी छोट्या नद्या आणि नाले ओलांडले. शेवटी, आम्ही झेलम नदीवर पोहोचलो. नदीच्या पलीकडे पौरव म्हणजे पोरसचे राज्य होते.
राजा पोरस स्वत: आमच्या भेटीला आला. एवढा उंच माणूस मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्याचा मुकुट मोत्यांनी आणि सोन्याने चमकत होता. त्याने आमच्याकडे पाहिले आणि मला भीती वाटली. माझे अंग भीतीने थरथर कापू लागले.
"घोड्याने जिंकण्यासाठी तुमचे राज्य निवडले, राजा सुंदर," पोरस माझ्या वडिलांना म्हणाला. "तुम्ही शरणागती पत्करून योग्यच केले. पण तुमच्याकडून राज्य हिसकावून घेतल्याबद्दल मला खेद आहे."
माझ्या वडिलांनी उसासा टाकला. "हाच क्षात्रधर्म आहे," ते म्हणाले.
"त्यांना कामाला लावा!" मलयकेतु म्हणाला "घोड्याचा बळी देण्यापूर्वी आपल्याला बरेच काम उरकायचे आहे."
"आधी ते जेवतील. मग ते झोपतील," राजा पोरस म्हणाला.
"ते विश्रांती घेण्यास पात्र नाहीत!" मलयकेतुने विरोध केला.
पोरस मलयकेतूवर डाफरला, “"राजा मी आहे! मी जे म्हणेन तसेचं केले जाईल!"
मलयकेतुचा चेहरा उतरला, पण त्याने माझ्याकडे डोळ्यांच्या कडेने रागावून तिरस्काराने पाहिले.
"उद्या रात्री आपण अश्वमेध यज्ञ सुरू करू," राजा पोरस म्हणाला. "घोड्याने आमच्यासाठी चांगले काम केले आहे. त्याने अनेक राज्ये जिंकली आहेत. उद्या त्याला स्वर्गात पाठवले जाईल"
माझ्या अंगावर काटा आला. माझ्या बाजूला उभ्या असलेल्या चेतकने जमिनीवर खुर आपटला आणि त्याच्या नाकातून फुरफुर करत श्वास सोडला. मी प्रार्थना केली की उद्याचा दिवस कधीही येऊ नये.