अध्याय २ राजाचा निर्णय
मलयकेतुने जमिनीवर पाय आपटत पुन्हा विचारले,
"तुम्ही काय कराल? शरणागती स्वीकाराल कि मृत्यू?"
पिताश्रींनी त्यांचे सैन्य पहिले आणि ते म्हणाले
“आम्ही लढणार नाही, पौरव सम्राट राजा पोरसची प्रजा बनायला तयार आहोत."
काही सैनिक अति आवेशात थोडेसे बडबडले, पण मला खात्री होती की इतर बऱ्याच सैनिकांना तो निर्णय योग्य वाटला असेल.
"आपली शस्त्रे खाली फेकून द्या!" मलयकेतु ओरडला.
"आता तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन कराल."
ढाल आणि तलवारी जमिनीवर आपटल्या गेल्या. मलयकेतुने आमच्या एका सैनिकाची तलवार उचलली आणि त्याच्या निकृष्ट दर्जाच्या पात्याला स्पर्श केला.
"एकदम फडतूस!" तो म्हणाला आणि मग त्याने ती तलवार जमिनीवर फेकली.
माझी नजर घोड्यावरून आजीबात हटत नव्हती. तो गौरवान्वित वाटत होता पण थकलेलाही होता. मलयकेतुने त्याच्या मानेवरून थाप मारली तेव्हा घोडा उधळला. त्याने काय संदेश आणला होता? घोड्याला ते माहित होते का? मला आश्चर्य वाटले. त्याच्या आगमनामुळे दूरदूरच्या गावांमध्ये दहशत पसरली आहे हे त्याला माहित होते का? त्याहूनही अधिक मला आश्चर्य वाटले की घोड्याला माहीत होते का की तो सम्राटाकडे परत गेल्यावर तो मारला जाईल! घोड्याच्या झुकलेल्या मानेमुळे मला क्षणभर असे वाटले की त्याला या गोष्टीची जाणीव असावी.
"आपले घोडे आणि रथ सज्ज करा” मलयकेतुने माझ्या वडिलांना सांगितले. "तुमची मालमत्ता आता आमची मालमत्ता आहे."
माझ्या वडिलांना लाज वाटली.
"आमच्याकडे ना घोडा आहे ना रथ."
मलयकेतुचा चेहरा पडला. मग त्याने घोड्याला शांतपणे थाप मारली.
"आपण इथे उगीच वेळ वाया घालवला.” मलयकेतु म्हणाला.
त्याने आमच्या छोट्या सैन्याकडे पाहिले आणि नंतर माझी आई राणीकडे पाहिले.
"हे पहा, तुमची सेना आता सम्राट पोरसची सेना होईल आणि तुमची राणी पोरसची दासी असेल."
मला खूप राग आला. मला वाटले पोरस दयाळू असेल. मला माहित नव्हते की तो आम्हाला त्याचे गुलाम बनवेल.
माझी आई उसने अवसान आणून हसली ती म्हणाली "दासी होण्यापेक्षा मरणे चांगले!" ती म्हणाली.
माझे वडील म्हणाले, "तुमच्या घोड्यांना अन्न आणि पाण्याची गरज असेल. खासकरून ह्याला” त्यांनी काळ्या घोड्याकडे इशारा केला.”
मी सैनिकांच्या मागे लपलो होतो. वडिलांनी माझ्याकडे रागातच पाहिले. मी कुठे लपलोय हे त्यांना माहीत होते.
"ऋषिकेश! त्या घोड्याला नदीवर घेऊन जा."
मी घोड्याकडे जायला निघालो. पण जसा मी घोड्याकडे जायला गेलो तसा मी घसरलो आणि माझ्या तोंडावर पडलो. माझा चेहरा चिखलात माखला.
हा तमाशा बघून पोरसचे सैनिक जोरजोरात हसले. मी आमच्या सैनिकांना देखील हसताना ऐकले. माझी मान शरमेने खाली गेली
“उsssठ!!” मलयकेतू ओरडला. माझ्या थोबाडात मारल्यासारखी माझी परिस्थिती झाली होती. मी त्या उंच, काळ्या घोड्याचे तपकिरी डोळे पाहिले. त्याने थेट माझ्या हृदयाला स्पर्श केला, त्याच्या डोळ्यात खंत स्पष्ट दिसत होती.
मी उठून उभा राहिलो आणि स्वतःचे कपडे झटकले. मी माझ्या आई वडिलांकडे किंवा सैनिकांकडे पाहिले नाही. मी फक्त घोड्याकडे पाहिले आणि म्हणालो, “चल माझ्या मागे ये”