४ आली रे आली स्वारी आली
डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये म्हणजे साधारण पौष व माघ या महिन्यांमध्ये कोकणात देव व देवींचे मोठ्या प्रमाणात उत्सव असतात . पावसाळ्यात पाऊस खूप असल्यामुळे व इतर कामामुळे रोज रोज एकत्र जमणे कठीण असते.पावसाळय़ाच्या सुरुवातीला शेतीची कामे चालू असतात .नंतर गणपती घरी असतो व कमी जास्त दिवसांचा गणपती असतो .मग भात कापणी व झोडणी याचा हंगाम येतो . त्यानंतर दिवाळी येते . त्यामध्ये सर्व मग्न असतात .पौष माघ या महिन्यांमध्ये साधारणपणे कोणतीही कामे कोकणात नसतात .नंतर होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो . त्यानंतर उन्हाळा व पुढे आंब्यांचा हंगाम चालू होतो . डिसेंबर जानेवारी या काळात सगळ्यांना रिकामा वेळ असतो .कोकणात या काळात उकाडा नसतो . गुलाबी थंडीचे उत्साहवर्धक दिवस असतात .लोकांना त्यांचे कलागुण दाखवावयाचे असतात .नाटक हा उत्सवाचा एक अपरिहार्य भाग समजला जातो .कोणते नाटक करावयाचे त्यासाठी कुणी कुणी कोणते पार्ट करावयाचे ,यावरील चर्चा , पुस्तकाच्या अनेक प्रती खरेदी करणे ,पाने फाडून वहीवर चिकटवून, प्रत्येक पार्टची कॉपी तयार करणे , दिग्दर्शक निश्चित करणे इत्यादी .कामांसाठी बैठका चालू होतात. त्यावरील चर्चा वादविवाद गप्पा टप्पा हशा खाणेपिणे तालमी यामध्ये महिना कधी निघून जातो ते कळत नाही व प्रत्यक्ष उत्सवाचे दिवस जवळ येतात.नाटकाप्रमाणे भजन गायन कीर्तन हे भाग अपरिहार्य समजले जातात.बाहेरचा एखादा गायक ,भजनी मंडळ, बोलावले जाते .देवळाला दोनचार वर्षांनी किंवा दरवर्षी सुद्धा रंगरंगोटी केली जाते .देऊळ पालखी मूर्ती सजवली जाते.लोकांना एकत्र येण्यासाठी काही कारण हवे असते ते या उत्सवामुळे मिळते.पूर्वी खेडेगावातून वीज नव्हती टीव्ही नव्हते स्मार्टफोन तर शहरातही नव्हते . त्यामुळे करमणूकीची काही साधने नव्हती .शहरात गेले तरच काही करमणूक मिळत होती .हल्ली वीज टीव्ही इंटरनेट स्मार्टफोन खेडेगावात गेले आहेत .आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे .असे असले तरीही उत्सव प्रवृत्ती कायम आहे .त्याला आधुनिकतेची जोड दिली जाते .शहरात राहणाऱ्या मंडळीना त्या गजबजाटापासून शांत ठिकाणी जावयाचे असते .आपल्या गावाशी ज्यांची नाळ जोडलेली आहे असे लोक तर हमखास उत्सवाची वाट पाहत असतात.
मी सांगतो ही गोष्ट पाच पन्नास वर्षांपूर्वीची आहे .ज्यावेळी रस्ते नव्हते वाहने नव्हती चालत कष्टाने मार्गक्रमण करीत आपले गाव गाठावे लागे .त्या काळी वेळात वेळ काढून शहरातील मंडळी खेडेगावात आवर्जून येत असत .कोणाच्या तरी घरी तालमी होत असत परंतु मंदिरांमध्ये तालमी होण्याचे प्रमाण जास्त असे. स्वाभाविकपणे मंदिराच्या जवळ ज्या गावकऱयांची घरे असत त्यांच्यावर जास्त ताण पडे.उत्सव संपल्यावर श्रमपरिहारार्थ एकत्र जेवण हे नेहमीच असे.चटकन होण्यासारखे चविष्ट असे पदार्थ केले जात .चविष्ट पदार्थ हे बरेचवेळा पोटाला त्रासदायक असतात म्हणजेच वातूळ व वातकर असतात. (वाटाणा उसळ हरभरा उसळ भजी पिठले वगैरे )
तर असाच उत्सव काळ होता. शहरातील बरीच मंडळी जमा झालेली होती.पाऊस जास्त झाल्यामुळे यावर्षी थंडी जरा जास्तच पडली होती .थंडीचे प्रमाण समुद्र किनारी जरा कमी असते परंतु वलाट पट्याला( अंतर्भागात समुद्र किनाऱ्यापासून दूर )थंडी जास्त असते जर गावाला पाटाचे पाणी असेल आणि माड पोफळी (नारळ सुपारी ) इत्यादींच्या बागा असतील तर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे थंडी जास्तच असते .तर असाच उत्सव काळ होता .माड पोफळीचे गाव होते .पाटाचे पाणी होते.उत्सव झाला. श्रमपरिहाराचे जेवणही झाले .जेवण होण्याला दुपारचे चार वाजले .आदल्या दोन तीन रात्रीचे जागरण होते . मंडळी सुस्तावली व आडवी झाली .संध्याकाळ झाली आपापले गावी किंवा शहरी जाण्याचे रद्द झाले.पत्त्यांचा डाव बसला मध्ये केव्हातरी उठून जेवणही झाले .रात्री इथेच झोपण्याचे ठरले . थंडी मी म्हणत होती .देवळातील व इतर ठिकाणाहून आणलेली जाजमे होती .त्यातील एक जाजम खाली व दुसरे जाडसर जाजम आठ दहाजणांनी मिळून अंगावर घेण्याचे ठरविले .मंडळी झोपली . जरावेळाने थंडी जास्तच वाजू लागली. तेव्हा मंडळीनी जाजम डोक्यावरून घेण्याचे ठरविले व सर्वांनी जाजम डोक्यावरून घेतले .मंडळी थोड्या वेळात झोपेच्या अधीन होऊ लागली. जागरणे वातूळ खाणे थोड्या वेळाने पोटामध्ये बोलू लागले.एकाने सुवासिक!! अपान वायू सोडला .डोक्यावरून घेतलेले जाजम बंदिस्त वातावरण यामुळे त्या वायूने बर्याच जणांच्या नाकाला चांगल्याच गुदगुल्या केल्या.काही जण चाळवले .वास असह्य होता .डोक्यावरून पांघरूण काढल्यावर थंडी जबरदस्त वाजत होती . काही जण जागे झाले .कोण रे तो म्हणून एकाने हाळी ही दिली.थोड्या वेळात पुन: सामसूम झाले आणि नंतर दुसर्याने अपानवायू सोडला .आणि नंतर अपानवायू सोडण्याची स्पर्धा सुरू झाली.थंडीमुळे जाजम डोक्यावरून काढता येईना .वास सहन होईना.झोपेचे तर खोबरे झाले होते .शेवटी एकमताने असे ठरले की कोणालाही उबळ आल्यावर त्याने खुणेचे शब्द उच्चारायचे आणि ते ऐकल्याबरोबर सर्वांनी आपले पाय वर करून जाजम वर करावयाचे आणि अपान वायुला जाण्यासाठी डायरेक्ट रस्ता करून द्यावयाचा.म्हणजे वायू कोंडून गोंधळ उडणार नाही .खुणेचे शब्द ठरले "आली रे आली स्वारी आली"
एवढे होईपर्यंत झोपेचे चांगल्यापैकी खोबरे झाले होते.जबरदस्त थंडीमुळे बाहेर पडता येत नव्हते .मग काय ज्याच्याकडे स्वारी येई तो ओरडे आली रे आली आणि मग उरलेले ओरडत स्वारी आली आणि नंतर स्वारीला जाण्यासाठी रस्ता करून दिला जाई .मग काय आली रे आली स्वारी आली आणि मग हशा असा कार्यक्रम सुरू झाला .!!!!! जेव्हा चहा आला तेव्हाच मंडळी जाजमातून बाहेर आली.
२३/७/२०१८©प्रभाकर पटवर्धन