Get it on Google Play
Download on the App Store

१ दिक्षितांची दहशत (आमची वाताहात)

महिना दीड महिन्यापूर्वी आमचे फार छान चालले होते .सकाळी उठून चहा व बिस्किटे .मारी फिप्टी फिप्टी खारी ग्लूकोज ब्रिटानिया  इत्यादी आलटून पालटून निदान दोन प्रकार तरी असत.

नाष्टय़ाला शिरा सांजा उपमा पोहे इडली सांबार मेदुवडा थालिपीठ मिसळ यातील एक दोन पदार्थांचा भरगच्च  नाष्टा असे .

दुपारी पोळ्या मुरंबा( कधी कधी पुर्‍या )दही साखर वरण भात लिंबू असे जेवण असे.चार वाजता चहा आणि त्याबरोबर केक चिवडा असे काहीतरी किरकोळ असे. शिवाय सहा वाजता तोंडाला व्यायाम म्हणून सुके अंजीर अक्रोड बिनबियांचे खजूर असे काही खाणे होई.  रात्री पुन्हा साग्रसंगीत जेवण असेच .मुक्षुतीला एक दोन फ्रूट्स असतच .

रविवार व सुटीच्या दिवशी श्रीखंड गुलाबजाम जिलेबी रसमलाई अंगूर मलई  असे काही पदार्थ असत .एकंदरीत तीन चार वेळा  भरगच्च खाणे चालत असे .असे छान काम चाललेले असताना एक दिवस मंगळ शनी राहू केतू असे सर्व खतरनाक गृह एकाच वेळी माझ्या  राशीत आले आणि माझ्या राशीस लागले.

आणि दुसरे दिवशी दीक्षितांचा बॉम्ब फुटला .दुसऱ्या दिवसापासून हा:हा:कार सुरू झाला .सकाळची बिस्किटे वगैरे तर सोडाच पण चहाही मिळणार नाही असे सांगण्यातआले .गयावया करून  चहा मिळाला परंतु बिस्किटे अदृश्य झाली .नंतर दुसरे फर्मान सुटले नाष्टा तरी मिळेल किंवा जेवण , तुम्हाला काय निवडायचे ते निवडा.आम्ही जेवण नाष्टा यामधील वेळ निवडली त्याला जेव-नाष्टा असे नाव आम्ही दिले तेवढेच मनाचे समाधान . झणझणीत सणसणीत चमचमीत गुलगुलीत असे सर्व पदार्थ जेव- नाष्टा मधून गायब झाले.जेवण भरपूर मिळे.चारी ठाव असे विविध पदार्थ असत परंतु पंचावन्न मिनिटात काय ते उरका असे फर्मान सुटले . 

आमचे पोट पडले लहान एका वेळी त्यात जास्त मावत नसे .त्यामुळे आम्ही थोडे थोडे परंतु बऱ्याच वेळा खात असू .पंधरा वीस मिनिटांत आमचे पोट भरे त्यानंतरचा वेळ फुकट जाई.नंतर काहीच मिळत नसे.लाडू चिवडा चकली फरसाण इत्यादींचे डबे कुलपात गेले .कुलूपाची चावी सौ.च्या कमरेला असे.भुकेने जीव कितीही कळवळा तरी दहा बारा तास झाल्याशिवाय पुन्हा जेवण मिळत नसे.आम्ही हवालदिल झालो. बाहेर जाऊनही काही खाण्याची सोय राहिली नाही .पॉकेट मनी मर्यादित असे . वर खर्चावरही नियंत्रण ठेवले जाई.आमच्या हालाला परिसीमा राहिली नाही .

आता कुणी(दिवेकर झाले दिक्षित झाले) दिवाडकर येवोत  आणि आमची यातून सुटका करोत म्हणून परमेश्वराची रोज प्रार्थना चालू आहे .अगोदर दिवेकरांनी छळले आता दिक्षित छळीत आहेत  .एकेकाचे भोग असतात   दुसरे काय ?बघुया परमेश्वर भक्तांच्या हाकेला धावून येतो का !!!!!

१९/८/२०१८© प्रभाकर  पटवर्धन 

विनोदी कथा भाग १

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
१ दिक्षितांची दहशत (आमची वाताहात) २ मेटकरांचे कारनामे-1 ३ कालवं ४ आली रे आली स्वारी आली ५ मस्करी