३ सुलभाने न्याय केला का?
नंदिनी एकाएकी दरवाजा उघडून घरातून धावत बाहेर आली. शेजारच्या जोशी काकांचा दरवाजा जोरजोरात वाजवून ती ओरडू लागली .ती जोरजोरात ओरडत होती."आईला बाबांनी मारले"."आईला बाबांनी मारले".जोशी काका दरवाजा उघडून बाहेर आल्याआल्या नंदिनीने त्यांना मिठी मारली.आणि ती जोरजोरात रडू लागली .नंदिनीचे वय सात आठ वर्षे होते.जोशी काका नंदिनीला घेऊन महादेवाच्या ब्लॉककडे धावत सुटले.मोठा आरडाओरडा एेकून इतर ब्लॉकमधील मंडळीही बाहेर आली .महादेवाच्या ब्लॉकमध्ये शिरल्यावर त्यांना पुढील दृश्य दिसले .पंख्याला दुप्पटा बांधलेला होता .त्याला नंदिनीची आई सुलभा लटकलेली होती .तिच्या पायाखाली खुर्ची ठेवून शेजारी स्टुलावर चढून महादेव दुप्पटा पंखातून सोडविण्याची खटपट करीत होता.पंख्यातून दुप्पटा काढल्याबरोबर सुलभा वेडीवाकडी जमिनीवर कोसळली.जमलेल्या कुणीतरी,कोणत्याही वस्तूला हात लावू नका,पोलिसांना बोलवा, ही पोलिस केस आहे वगैरे सूचना केल्या . जमलेल्यापैकी एकाने तो बहुधा डॉक्टर असावा सुलभाची नाडी पाहिली. ती अस्पष्ट जाणवत होती .तिच्या मानेभोवतालचा फास कुणीतरी केव्हाच ढिला केला होता.
सुलभा बेशुद्ध होती. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचविण्यात आले. पोलिस आले त्यांनी जाब जबाब घेतले शेजाऱ्यांना काहीच माहित नव्हते.नंदिनीला विचारता तिने बाबा आईचा गळा दाबत होते असे सांगितले .
*पोलिसांनी महादेवचा जबाब घेतला .त्यांने पुढील प्रमाणे जबाब दिला .*
सुलभा माझ्या जवळ पाच हजार रुपये मागत होती. इतके पैसे कशाला असे विचारता तिने तिला साड्या व नंदिनीला ड्रेस घ्यायचा आहे असे सांगितले .आता आपल्या जवळ एवढे पैसे नाहीत मी दोन हजार देतो त्यात अत्ता भागव.पुढच्या महिन्यात बघू असे मी तिला समजावून सांगत होतो .त्यावरून आमच्या दोघात भांडण झाले .ती तापट होती .माझ्याजवळ येऊन तिने माझे हात तिच्या गळ्यावर ठेविले .माझा गळा दाबा आणि मला ठार मारून टाका म्हणजे मीही सुटेना आणि तुम्हीही सुटाल म्हणून रागारागाने सांगितले .त्यावर असे काय वेड्यासारखे बोलते असे म्हणून मी तिला ढकलून दिले.
नंतर मी टॉयलेटला गेलो. येऊन पाहतो तो सुलभा पंख्याला दुपट्टा बांधून फास घेत होती .मी तिला वाचवण्याचा प्रयत्न करीत होतो.नंदिनीला मी तिच्या आईला मारीत आहे असे वाटल्यामुळे ती ओरडत जोशीकाकांकडे गेली.तेवढ्यात हे शेजारी नंदिनीच्या ओरडण्यामुळे आले.
नंदिनीने पुढील प्रमाणे जबाब दिला.
शाळा नसल्यामुळे मी झोपले होते . मी कसल्या तरी मोठ्या आवाजाने जागी झाली .स्वयंपाकघरातून भाड्याचे जोरजोरात आवाज येत होते .तेवढ्यात बाबांच्या ओरडण्याचा आवाज आला .मी उठून गेले तो बाबा आईचा गळा दाबत होते .मी जोरात ओरडत शेजारच्या जोशीकाकांकडे गेले .
शेजाऱ्यांकडे चौकशी करता त्यात अशी माहिती मिळाली .
दोघांचेही आवाज मोठे होते .ब्लॉकचे दरवाजे बंद असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात नक्की काय घडत आहे ते कळत नाही .परंतु दोघांमध्ये विशेष काही भांडण लक्षात आलेले नाही .
सुलभा जिवंत होती. महादेववर खुनाचा आरोप लावता आला नसता.फारतर खून करण्याचा प्रयत्न एवढाच आरोप लावता आला असता . सुलभाचा जबाब महत्त्वाचा होता .त्यासाठी ती शुद्धीवर येणे आवश्यक होते .तिचा मृत्यू झाला तर ही खुनाची केस झाली असती .जिवंत राहिली असती तर तिच्यावर आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला असता .
प्रत्यक्षात जे झाले ते असे होते .सुलभा व महादेव यांचा संसार तितकासा व्यवस्थित चालला नव्हता. निरनिराळ्या लहानसहान कारणावरून त्यांची भांडणे सतत होत असत .त्याचा मोठा स्फोट आतापर्यंत झाला नव्हता .त्या दोघांना बांधून ठेवणारा एकच धागा होता. तो म्हणजे त्यांची मुलगी नंदिनी .महादेव हा स्वभावाने तापट होता .एकदा रागावला की त्याला त्याचे भान राहात नसे.त्याचा तो राहात नसे .त्याने अनेकदा आपल्या या स्वभावाला मुरड घालण्याचा प्रयत्न केला होता .परंतु प्रसंग आला की तो पुन्हा बेभान होत असे .हा त्याचा तापटपणा फक्त पत्नीच्या बाबतीतच नव्हे तर सर्वत्र दिसून येत असे.
ज्या दिवशी हा सुरुवातीला उल्लेख केलेला प्रसंग घडला त्यावेळीसुद्धा अगदी साध्या क्षुल्लक कारणावरून त्यांच्यामध्ये ठिणगी पडली .सुलभाच्या हातून दूध उतू गेले एवढेच कारण पुरेसे होते .त्यावरती महादेवने बडबड सुरू केली .महादेवाच्या विक्षिप्त स्वभावाला तापटपणाला जिथे तिथे नाक खुपसण्याचा प्रवृत्तीला कंटाळलेली सुलभा त्या दिवशी का कोणजाणे परंतु प्रचंड चिडली .तिने भांडय़ांची आदळआपट सुरू केली. त्यामुळे महादेव आणखीच चिडला.शेवटी दोघांची मी मी तू तू सुरू झाली.सुलभाने रागारागात महादेवला मला एकदा मारून टाका म्हणजे तुम्ही आणि मी दोघेही सुटलो असे म्हटले .आणि नंतर तावातावाने जवळ येऊन त्याचे हात आपल्या मानेभोवती ठेविले.महादेवही रागाच्या ताब्यात ,रागाच्या नशेमध्ये, असल्यामुळे त्याने ते हात रागारागाने सुलभाच्या मानेभोवती आवळले.नाजुक सुलभा गुदमरली व जमिनीवर कोसळली.
आपल्या हातून खून झाला हे पाहून महादेव घाबरला.जर तिला दुप्पट्याच्या सहाय्याने पंख्याला टांगले व आत्महत्येचा भास केला तर आपण वाचू असे त्याला वाटले .घाबरटीमध्ये त्याला सुलभा जिवंत आहे, तिची नाडी सुरू आहे, तिची छाती वर खाली होत आहे, तिला आपण हॉस्पिटलमध्ये नेले पाहिजे, कदाचित पाणी मारल्यावर ती तशीच शुद्धीवर येईल यातील कोणतीच गोष्ट लक्षात आली नाही . त्यामुळे त्याने दुप्पट्याचा फास करून तो तिच्या गळ्यात अडकवला आणि तिला पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला .
शांत झोपलेली नंदिनी या आरडाओरडीने भांड्यांच्या आवाजाने जागी झाली होती .आई बाबांची नेहमीची भांडणे तिला काही नवीन नव्हती. भांडण सुरू झाले की ती बिचारी मुकाटय़ाने थरथरत एका कोपऱ्यात उभी राहात असे .या वेळीही ती तशीच डोळे विस्फारून उभी होती .शेवटी आई धाडकन जमिनीवर पडलेली तिने बघितली आणि बाबा आईच्या गळ्याभोवती काहीतरी अडकवित आहेत असे तिने पाहिले .आता तिचा धीर सुटला .तिने दरवाजा उघडून बाहेर धाव घेतली आणि जोशी काकांचा दरवाजा जोरजोरात वाजविला.
पुढचा प्रकार आपणा सर्वांना माहितच आहे .नंदिनीची साक्ष महत्त्वाची होती .लहान मुलगी उलट तपासणीत टिकलीच असती असे नाही .विरुद्ध बाजूच्या वकिलांनी तिच्या चिंधड्या चिंधड्या उडविल्या असत्या .पोलिसांना खुनाचा प्रयत्न केल्याचा जास्त सबळ पुरावा हवा होता .ते सुलभा शुद्धीवर येण्याची वाट पाहात होते.सुलभाचा श्वास बराचवेळ कोंडल्यामुळे तिच्या मेंदूवर व अंतर्गत इंद्रियांवर वाईट परिणाम झाला होता .ती जगेल की नाही आणि जगलीच तर कोणत्या परिस्थितीत जगेल याबद्दल डॉक्टर साशंक होते. ती शुद्धीवर आली तरी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय पोलिसांना तिचा जबाब घेता आला नसता.
महादेवला अटक करावी की नाही याबद्दल पोलीस साशंक होते.त्यानी महादेवावर वॉच ठेवला होता .तो कुठे फरार होणार नाही इकडे लक्ष ठेवले होते.
चार दिवसांनी सुलभा शुद्धीवर आली .पोलिसांना तिचा जबाब घेता आला .ती सर्व काही सविस्तर सांगू शकली असती .परंतु तिने सत्य सांगण्याचे टाळले .कारण त्या सत्यामुळे कुणाचेच हित झाले नसते .महादेववर केस चालली असती.त्याला निदान काही वर्षांची तरी शिक्षा झाली असती .त्याची नोकरी अर्थातच गेली असती .कुटुंबाचा प्रमुख तुरुंगात गेला असे म्हटल्यावर सर्व कुटुंबच उद्ध्वस्त झाले असते.नंदिनीला तिचे आवडते बाबा मिळाले नसते.नंदिनीच्या कोवळ्या मनावर आणखीच वाईट परिणाम झाला असता . खुनाच्या आरोपावरून तुरुंगात गेलेल्या खुनी माणसाची मुलगी म्हणून तिच्याकडे बघितले गेले असते .त्याचा तिच्या भविष्यावर वाईट परिणाम झाला असता.महादेव हाडाचा वाईट नाही याची तिला कल्पना होती .महादेवावर तिने मनापासून प्रेम केले होते.जे काही दोघांकडून झाले ते केवळ रागाच्या आहारी गेल्यामुळे झाले.त्याच्यावर सूड घ्यावा असे तिला कोणत्याही परिस्थितीत वाटत नव्हते.तिने विचार करून त्याला माफ करण्याचे ठरविले.पोलिसांना तिने पुढील जबाब दिला .
मला जीवनाचा कंटाळा आला होता म्हणून मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .मी स्वतःला पंख्याला टांगून घेत असताना महादेव तिथे आला त्याने मला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला .शेवटी त्याने बळाने मला परावृत्त केले .तो निर्दोष आहे त्याने मला मारण्याचा प्रयत्न केलेला नाही .
असा जबाब दिल्यानंतर काही तासांनीच सुलभाने प्राण सोडला.तिचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले .रिपोर्टमध्ये गळा दाबल्यामुळे प्राणवायूचा अपुरा पुरवठा झाला आणि त्याची परिणती सुलभाच्या मृत्यूमध्ये काही दिवसांनी झाली. असे स्पष्ट लिहिले होते.
मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरला जातो .प्राणवायूचा अपुरा पुरवठा आत्महत्येच्या प्रयत्नामुळे झाला की महादेवने गळा दाबल्यामुळे झाला हे नक्की सिद्ध करता येणे कठीण होते.
छोटी नंदिनी ही उघड्यावर पडली असती .तिच्या प्रतिपाळाचा प्रश्न उद्भवला असता .पोलिसांनी त्याच्यावर केस करावी की नाही यावर खल केला.शेवटी ज्या हेतूने सुलभाने मृत्यूपूर्व जबाब दिला होता.व एक वेगळाच न्याय करण्याचा प्रयत्न केला होता. तोच ग्राह्य मानून केस बंद करावी असा निर्णय घेण्यात आला .
त्या दिवसापासून महादेव अंतर्बाह्य पूर्णपणे बदलला .सुलभावर आपण निष्कारण क्षुल्लक कारणाने चिडत होतो याची त्याला खोलवर जाणीव झाली .सुलभाच्या दयेने तिने दाखविलेल्या क्षमावृत्तीने तो अंतर्यामी पूर्णपणे हलला.नंदिनीवर त्याचे प्रेम होते ते आणखी दुप्पट झाले.
शिक्षेमुळे व्यक्ती सुधारते असे मुळीच नाही .फक्त तेवढा काळ समाज तिच्यापासून सुरक्षित राहतो.अनेक अपराधी पकडले जातात. त्यांना कमी जास्त शिक्षा होते.तुरुंगातून परत आल्यावर सुधारलेल्यांचे प्रमाण नगण्य असावे असे मला वाटते .कदाचित इतर पोचलेल्या गुन्हेगारांच्या संगतीने व्यक्ती जास्तच गुन्हेगार बनत असावी. अपराधाच्या स्वरूपावर व त्या त्या व्यक्तीवर सर्व काही अवलंबून आहे .
सुलभा तर मृत्यू पावली .त्याबरोबर आणखी दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते ते तिने खोटा जबाब देऊन टाऴले.
*केवळ क्षणिक रागाच्या भरात केवढा मोठा घात झाला.*
*सुलभाने केलेला न्याय सर्वांनाच पसंत पडेल असे नाही .कदाचित कायद्यालाही तो मान्य नसेल. कायद्याप्रमाणे खोटी साक्ष त्याप्रमाणेच खोटा जबाबही अपराध आहे.*
*हाताच्या बदल्यात हात, डोळ्याच्या बदल्यात डोळा, खुनाच्या बदल्यात फाशी,(कायद्याने केलेला कायदेशीर खून )असे कायदे सर्वत्र आहेत .त्यामुळे गुन्हे कमी होतात का हा एक प्रश्नच आहे ?*
*समाज अशा धोकादायक व्यक्तींपासून काही काळ सुरक्षित राहतो याशिवाय अशा शिक्षेतून काही निष्पन्न होते असे मला वाटत नाही*
११/४/२०१९©प्रभाकर पटवर्धन