Get it on Google Play
Download on the App Store

२ नशा

विनायक तसा साधा सरळ मनुष्य .कुटुंबाची जबाबदारी लहानपणीच त्यांच्यावर पडली .लहान दोन बहिणी व दोन भाऊ .आई वडील लहानपणीच वारले .याला लवकर नोकरीला लागावे लागले .शिक्षण फक्त एसएससी .ही जबाबदारी त्याने समर्थपणे निभावली .लग्न तसे वेळेवर झालेले .त्याच्या बायकोने त्याच्यावरील जबाबदारीमध्ये योग्य वाटा उचलला . भावांना पदवीपर्यंत शिक्षण दिले .ते आपापल्या जागी सुस्थिर झाले.त्यांची लग्नेही झाली . बहिणींची लग्ने झाली .भाऊ त्यांच्या बायका बहिणी मेहुणे  सर्व विनायक व त्याच्या बायकोला योग्य तो मान देत .

हे सर्व करता करता विनायक चाळीशीला आला .दुर्दैवाने त्याला मूलबाळ झाले नाही .त्याची बायको तापाचे निमित्त होउन चार दिवसांत देवाघरी गेली. विनायक सर्वस्वी उघडा पडला .हाताने स्वतः घरी शिजवून खाण्याची वेळ आली .भाऊ गावात असले तरी रोज त्यांच्याकडे जेवायला जाणे किंवा त्यांच्याकडून डबा आणणे विनायकला योग्य वाटेना .

दादाने पुन्हा लग्न करावे असे सर्वांचेच म्हणणे होते .विनायकने होकार दिला परंतु त्यामागे विशेष उत्साह नव्हता .विनायक सारखा शांत सज्जन मनुष्य मिळणार नाही. त्याचे लग्न झालेच पाहिजे असे सर्वांचे म्हणणे होते.सर्वजण चंग बांधून विनायकने लग्न करावे त्यांचा संसार सुरू व्हावा यासाठी प्रयत्नाला लागले.शेवटी एक घटस्फोटिता सर्वांना ठीक वाटली .तिला एक लहान मुलगा होता .तो चौथीत शिकत होता .तिने घटस्फोट का घेतला याची विशेष कुणी चौकशी केली नाही .किंवा काही माहिती होऊनही तिकडे दुर्लक्ष करण्यात आले .दादाला मुलांची आवड आहे या लहान मुलात त्याचे मन रमेल याकडे सर्वांनी लक्ष दिले .

त्याची दुसरी बायको रमा दिसायला बरी होती .ती घरातील कामे व्यवस्थित पार पाडत असे .मुलगा हुषार होता. शाळेत पहिल्या एक दोन नंबरमध्ये  तो असे .लग्नाला एक दोन वर्षे झाल्यानंतर रमाच्या स्वभावामध्ये हळूहळू फरक पडू लागला.तिचे मुलाकडे व विनायककडे लक्ष कमी कमी होऊ लागले.ती बऱ्याचवेळा आपल्या तंद्रीत असे . तिचे डोळे तारवटलेले व  लाल दिसत.तिला रात्री नीट झोप लागत नसावी असे वाटत असे. तिचा चेहरा किंचित लालसर पिवळसर काळसर काही विचित्र दिसे

विनायकच्या काहीच लक्षात येईना.तुझी तब्येत बरी नाही का ?आपण डॉक्टरकडे जाऊ या वगैरे त्याने सांगून बघितले .पण त्यावर तिने मला डॉक्टरकडे जाण्याचे कारण नाही. माझी तब्बेत खडखडीत आहे मला काहीही झालेले नाही असे ठामपणे सांगितले .तरीही विनायकचे समाधान झाले नाही .तिला काही व्यसन तर लागले नाही ना असा त्याला संशय येऊ लागला.त्यादृष्टीने त्याने तिच्यावर .लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

आणि एक दिवस ती कसल्यातरी नशेच्या आहारी गेली आहे असे त्याला आढळून आले .कसली तरी पावडर काचेवर घेऊन जाळून त्यातून येणारा धूर ती नाकातून ओढीत असे .त्यानंतर तिच्या चालीमध्ये फरक पडत असे .तिचे डोळे लाल का दिसतात त्याचा आता उलगडा झाला .तिच्या कातडीचा रंग विचित्र का दिसतो तेही आता लक्षात आले .ही सवय तिला लग्नाच्या अगोदरपासूनच होती का नंतर लागली काहीही कळेना.विनायक साधा असला प्रेमळअसला सरळ असला तरी बुद्धिमानहि होता .त्याने तिला घटस्फोट का मिळाला त्यांची कारणे शोधण्यास सुरुवात केली .तिला नशा करण्याची सवय असल्यामुळेच घटस्फोट झाला हे त्याला कळले .आपण अगोदर चौकशी केली नाही .कुणीही घटस्फोट का झाला त्याकडे विशेष लक्ष दिले नाही .आता लक्षात येऊन काहीही उपयोग नव्हता .दुसरा एखादा असता तर त्याने तिला पुन्हा लगेच घटस्फोट दिला असता .निदान तिला घरातून हाकलून तरी लावले असते .

पण  विनायक विनायक होता.एकदा एखाद्याचा स्वीकार केला की त्याला मध्येच सोडून देण्याची त्याची प्रवृत्ती नव्हती.एकदा आपला म्हटले कि तो आपला तो कसाही असो असा त्याचा स्वभाव होता.न चिडता न रागावता त्याने तिला व्यसनमुक्त करीन  असा निश्चय केला .व्यसनमुक्त तोच होऊ शकतो ज्याला व्यसनमुक्त व्हावे असे आतून कुठेतरी वाटत असते.व्यसन मुक्ती केंद्रे असतात तिथे लोकांना भरतीही केले जाते.पण ज्यांना सक्तीने भरती केले जाते ज्याना व्यसन मुक्त होण्याची इच्छा नसते .ते व्यसन करण्यास न मिळाल्यामुळे तिथून काही ना काही कारण काढून पळून जातात किंवा व्यसन करण्यास न मिळाल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त होतात .किंवा त्यांना वेडही लागते .

अशा लोकांच्या कलाने घेतले पाहिजे.त्यांना व्यसनांमुळे काय काय होते ते समजून सांगितले पाहिजे .त्यांना वेळोवेळी योग्य प्रकारे कौन्सिलिंग केले पाहिजे .मानसोपचार तज्ञाचीही मदत घेतली पाहिजे .वगैरे गोष्टी विनायकने ऐकलेल्या होत्या .त्याने रमाशी प्रेमाने बोलून ती केव्हा यामध्ये अडकली ते विचारले.एका तथाकथित मैत्रिणीबरोबर सहज म्हणून तिने प्रथम नशा केली.मग त्याची चटक लागली .नंतर त्याशिवाय राहावेना .तिच्या पहिल्या नवर्‍याला या सर्व गोष्टी कळल्यावर त्यांची वारंवार भांडणे होऊ लागली .त्यामुळे ती आणखीच नशेमध्ये जास्त जास्त गुंतत गेली .त्यासाठी दागिने विकणे घरातील मूल्यवान वस्तू विकणे वगैरे गोष्टी तिने सुरू केल्या .शेवटी तिच्या पहिल्या नवर्‍याने तिला हाकलून लावले नंतर याच मुद्द्यावर त्यांचा घटस्फोट झाला .एकदा या पकडीमध्ये एखादा सापडला की तो त्यातून सुटू शकत नाही .नशेसाठी वाटेल ते करण्यास तो तयार होतो .

या दुसऱ्या लग्नानंतर काही दिवस तिचे व्यसनाशिवाय गेले .नंतर पुन्हा तिचे ते व्यसन चालू झाले.हे सर्व कळल्यानंतर विनायक तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेला .त्याच्याकडच्या समुपदेशानंतर अनेक वेळा त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जावे लागले.नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तिला त्याने दाखल केले.अशा लोकांना एकदम व्यसन करण्यास जर दिले नाही तर त्याचे अत्यंत वाईट परिणाम होतात .योग्य ते उपचार सहा महिने घेतल्यानंतर रमा व्यसनमुक्त झाली .तिच्या डोळ्यातील ते वेगळेच भाव नाहीसे झाले .कातडीचा रंग  हळूहळू  सुधारला.स्वभावात लक्षणीय फरक पडला .जर विनायकने तिला तिच्या पूर्वीच्या पतीप्रमाणे हिडीसफिडीस केले असते.भांडणे केली असती.तिला घरातून हाकलून लावले असते .तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते .

विनायकने युक्तीने शांतपणे सर्व प्रश्न हाताळल्यामुळे दोघेही सुखी होऊ शकली.

२०/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन