Get it on Google Play
Download on the App Store

गुरु कृपा

बीए पास झाल्या नंतर मी स्पर्धा परीक्षा देत होतो. एखादी परमनंट सरकारी नोकरी मला असावी अशी माझ्या आईची आधीपासून इच्छा होती. शाळेत असल्यापासून मी खूपच हुशार होतो. त्यामुळे आईने अशी अपेक्षा करणे साहजिकच होते. बाबांच्या कंपनीत झालेल्या अपघातानंतर त्यांना मिळालेला तुटपुंजा मोबदला माझे भविष्य घडवू शकत नव्हता. हे कमी शिक्षित असलेल्या माझ्या आईने जाणले होते. म्हणूनच आईने डोंबिवलीत खानावळ चालवून आमच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह केला.

मेहनत करत असतानाही माणसाला आशीर्वादाची साथ असेल तर आयुष्य सुखकर होते. यश प्राप्तीचा मार्ग सोपा होतो. माझ्या आईचा यावर पूर्ण विश्वास होता. यामुळे तिने आमचे गुरु महेंद्रनाथ सद्गुरू यांच्या पायाशी मला उभे केले.

“गुरुजी, माझ्या मुलाने अभ्यासात खूपच मेहनत केली आहे. आजपर्यंत तो कधीही अपयशी ठरला नाही. आज त्याचा नोकरीचा इंटरव्ह्यू आहे. त्याला आशीर्वाद द्या.”

यावर महेंद्रनाथ म्हणाले, “काळजी करू नकोस. याला यश नक्की मिळेल. सरकारी नोकरी याच्या नशिबात आहे हे याच्या ललाटरेखांवर स्पष्ट दिसते. तो मेहनती आहे आहे आत्मविश्वास याच्या चेहऱ्यावर शोभून दिसतो. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत”

महेंद्रनाथ यांनी दिलेला आशीर्वाद म्हणा किंवा माझी मेहनत म्हणा मला लगेचच माझ्या इच्छेनुसार भारतीय पुरातत्त्व खात्यात चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळाली देखील आणि लवकरच कोकणात सुधागड तालुक्यात एका उत्खननाच्या साईटवर ड्युटी सुरु झाली.