२ अविवेक
अंडाकृती संगम तलाव हे गावाचे एक भूषण होते .दोन नद्यांचा संगम तिथे होत असे म्हणून तलावाला संगम नाव पडले असे जुने लोक सांगत असत .हल्ली त्या नद्यांचा मागमूसही नव्हता .तलावातून एक नदी उगम पावत असे परंतु ती जेव्हा तलाव ओव्हरफ्लो होई तेव्हाच दिसे. सकाळ संध्याकाळ फिरायला जाण्याचे सर्वांचे ते आवडते ठिकाण होते .लहानशा भागांमध्ये पन्नास साठ मीटर जागेवर बोटिंग तलाव होता .पर्यावरणावर परिणाम होऊ नये म्हणून केवळ पायडल बोटी तिथे होत्या .विशेषतः सकाळी व संध्याकाळी या पायडल बोटी तलावात स्वैरपणे फिरत असत.आणखी एका कोपऱ्यामध्ये स्विमिंगची ही व्यवस्था होती .तलावाचा विशिष्ट भाग स्विमिंगसाठी राखून ठेवण्यात आला होता.त्या भागांमध्ये पायडल बोटींना येण्यास मज्जाव होता .तलावाच्या सभोवार तीन मीटर रुंदीचा एक जॉगिंग ट्रॅक होता.सकाळ संध्याकाळ त्यावरती पाणी मारून रोलर फिरवून ट्रॅक व्यवस्थित ठेवण्यात येत असे.तलावाला कठडा बांधलेला होता त्यावर आरामशीर बसून गप्पा मारता येत असत.तलावातील किंवा तलावाभोवतीची शोभा पाहण्यात वेळ केव्हा जाई ते कळत नसे .
त्या दिवशीही नेहमीसारखीच एक सकाळ होती .तलावावरून येणारा मंद गार वारा अंगावर शहारा आणीत होता .कुसुम व सुमन दोन मैत्रिणी बोटिंग करीत होत्या .कुसुमला पायडल मारीत असताना दूरवर काहीतरी ओंडक्यासारखे तरंगताना दिसले .कुसुमने सुमनला ते दाखविले परंतु तिलाही ते काय आहे हे ओळखता येईना.दोघींनीही जवळ जाऊन जिज्ञासा तृप्त करून घेण्याचे ठरविले. जवळ गेल्यावर त्यांना ते एक बाईचे प्रेत आहे असे आढळून आले.आपण तसेच निघून जावे असे त्यांच्या मनात आले.एकदा पोलिसांना कळविले की पंचनामा पोलीस चौकीवर खेपा मारणे कोर्टामध्ये साक्षीला जाणे अशा चक्रात आपण अडकू याची त्यांना भीती वाटली .परंतु त्यांची सद्सद्विवेक बुद्धी त्यांना तसे करू देईना .कुसुमने मोबाईल काढला व बोट क्लबच्या मॅनेजरला फोन केला.मॅनेजरने सुचविल्याप्रमाणे त्या तिथेच थांबल्या .थोड्याच वेळात पोलिसांचा सायरन वाजू लागला आणि एक गाडी येऊन बोटक्लब जवळ थांबली .मोटर बोटीला जरी बोटिंगसाठी परवानगी नव्हती तरी इमर्जन्सीसाठी दोन मोटार बोटी क्लबमध्ये तंदुरुस्त स्थितीमध्ये ठेवलेल्या असत .त्या दोन्ही बोटी थोड्याच वेळात आवाज करीत तिथे आल्या .प्रेत घेऊन त्या बोटी क्लबकडे गेल्या. दोघीनी तिथे येऊन पोलिसांना भेटावे असे त्यांनी जाता जाता सांगितले .
पोलिसांच्या फ्लाइंग स्क्वॉडने शामरावांना फोन करून सर्व हकीकत सांगितली .उत्तरादाखल बॉडी पोस्टमॉर्टेमसाठी पाठवा म्हणून शामरावानी सांगितले आणि लगेच कॉम्प्युटर उघडून मिसिंग कम्प्लेंटस् पाहायला सुरुवात केली. गेल्या तीन चार दिवसांमध्ये एकूण सोळा मिसिंग कम्प्लेंट्स होत्या .काही मुले,मध्यमवयीन, वृद्ध,पुरुष, असे करता करता दोन स्त्रिया सापडलेल्या बॉडीच्या वयाशी जुळणाऱ्या होत्या.त्या दोन्ही नंबरवर फोन करता एकाने कंप्लेंट बाई सापडल्यामुळे मागे घेतली असे कळले.शेवटी शिल्लक राहिलेल्या एका व्यक्तीला पोलिस चौकीमध्ये येऊन ओळख पटविण्यास सांगितले .काही वेळाने मनोहर नावाचे एक मध्यमवयीन गृहस्थ पोलिस चौकीमध्ये आले.शामरावांनी फक्त तिच्या चेहऱ्याचा फोटो दाखविला.त्यांनी फोटो पाहून लगेच तिला ओळखले .मृत स्त्री त्यांची बायको होती .रामरावांनी ती मृत आहे हे त्यांना सांगितले नव्हते .किंचित चाचरत सुलभा कुठे आहे असे त्यानी विचारले. शामरावानी ती आता जगात नाही असे सांगितले.त्यावर ती कुठे मिळाली असे त्यांनी विचारले .हे विचारताना थोडे रिलॅक्स भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसले असे रामरावाना वाटले. संगम तलावांमध्ये ती सापडली असे सांगितल्यावर त्यांना रडू कोसळले .जास्त चौकशी करता ती अशीच तापट होती तिने बहुधा आत्महत्या केली असे ते चटकन म्हणून गेले .
शामरावांनी तिने आत्महत्या केली असावी हे कशावरून असे विचारता त्यांनी त्यांचा तसा आपला अंदाज आहे असे सांगितले .जास्त चौकशी करता शनिवारी रात्री त्या दोघांमध्ये भांडण झाले होते असे त्यांनी सांगितले.भांडणाचे कारण विचारता कुठच्या सिनेमाला जावे यावरून भांडण झाल्याचे त्यांनी सांगितले. एवढ्या क्षुल्लक कारणावरून आत्महत्येपर्यंत एखादी व्यक्ती जाईल हे शामरावांना पटेना.पोस्टमार्टेम झाल्यावर बॉडी ताब्यात मिळेल असे सांगून व पोलीस चौकीत बोलवू तेव्हा यावे लागेल असे सांगून त्यांना निरोप दिला .त्या गृहस्थाचे बोलणे वागणे रडणे एकूण अविर्भाव इत्यादी पाहून कुठेतरी पाणी मुरत आहे असे शामरावांना वाटले .
केसमध्ये युवराजांची मदत घ्यावी असे त्यांनी मनोमन ठरविले. मनोहर सरकारी खात्यात वरिष्ठ पदावरती होते.पोलिस खात्यामध्ये व इतरही त्यांचे चांगल्यापैकी वजन होते .त्यांची पोलिसी खाक्या प्रमाणे चौकशी करणे अवघड होते .त्यांनी युवराजांना फोन करून मी येत आहे असे सांगितले .युवराजांनी मी मोकळा आहे अवश्य या म्हणून सांगितले.थोड्याच वेळात शामराव युवराजांच्या ऑफिसमध्ये बसलेले होते.सर्व केस नीट ऐकून घेतल्यावर युवराजांनी काही आडाखे बांधले .त्यांनी त्यांची पी ए विजया हिला संदेशला फोन करून बोलाविण्यास सांगितले.संदेशची डिटेक्टिव एजन्सी होती .अशा प्रकारची कामे तो नेहमी करीत असे.माहिती कशी गोळा करावी चौकशी कशा पद्धतीने हाताळावी यामध्ये त्यांचा हातखंडा होता .शामराव आपल्या ऑफिसमध्ये निघून गेले.थोड्याच वेळात संदेश ऑफिसमध्ये हजर झाला .संदेशला त्यांनी सर्व केस सांगितली .त्यांचे काही आडाखे व अंदाजही सांगितले .मनोहर निर्दोष असेल तर उत्तमच परंतु जर तो दोषी असेल तर फार सावधगिरीने सर्व केस हाताळावी लागणार होती .
संदेशला त्यांनी पुढील चौकशी करण्यास सांगितले १)मनोहर व त्यांची पत्नी यांचे परस्पर संबंध कशा प्रकारचे होते त्याची शेजारी पाजारी व त्यांचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी .२)मनोहर सांगतात त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या व तिच्या नातेवाईकांकडे ती रागावून घरातून निघून गेल्यावर चौकशी केली का व त्याचे स्वरूप काय होते.३)शनिवार संध्याकाळपर्यंत मनोहर यांची पत्नी घरात होती का व असल्यास तेव्हांपासून किंवा त्याच्या अगोदर एक दिवसापासून सोमवार सकाळपर्यंत म्हणजे तलावात त्यांच्या पत्नीची बॉडी सापडेपर्यंत मनोहर काय करत होते त्याचा संपूर्ण तपास .
हा सर्व तपास करून त्याचा रिपोर्ट शक्य तितक्या लवकर परंतु उशिरात उशिरा चोवीस तासांमध्ये देण्यास युवराजांनी संदेशाला सांगितले .दुसऱ्या दिवशी संदेशने एका बंद लखोट्यामध्ये युवराजांनी विचारलेली सर्व माहिती त्यांना आणून दिली .संदेशला त्यांनी थोडावेळ बसण्यास सांगितले .लक्षपूर्वक सर्व माहिती वाचली .त्या संदर्भात दोन चार प्रश्न संदेशला विचारले .व नंतर संदेशला लागल्यास तुला फोन करीन म्हणून निरोप दिला .
युवराजांनी ताबडतोब शामरावांना फोन केला .आपल्याला ताबडतोब मनोहरपंतांच्या घरी जायचे आहे म्हणून सांगितले .शामरावाना ताबडतोब मनोहरांच्या घरी बोलाविले. युवराज मनोहरपंतांच्या सोसायटीमध्ये पोहोचले त्यावेळी शामराव पार्किंगमध्ये मोटारीत त्यांची वाट पाहात होते .दोघे मनोहर पंतांच्या फ्लॅटवर गेले आणि त्यांनी कॉलबेलचे बटण दाबले.मनोहरपंतांनीच दरवाजा उघडला .दोघांनाही दरवाज्यात बघताच मनोहरपंत किंचित दचकलेले युवराजांच्या लक्ष्यात आले.युवराजांनी मनोहर पंताना तुमचे पत्नीशी भांडण कुठे झाले असे विचारले .त्यांनी किचन कम डायनिंग हॉलमध्ये झाल्याचे सांगितले. युवराजांनी ती जागा पाहावयाची आहे असे सांगितले .मनोहरपंत त्यांना डायनिंग हॉलमध्ये घेऊन आले .
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये गुदमरून मृत्यू असे दिले होते .जर बुडून मृत्यू असता तर फुफ्फुसामध्ये पाणी सापडले असते .त्यांची पत्नी मेल्यानंतर तिला तलावात फेकण्यात आले होते .
तिचा मृत्यू एक घरात तरी झाला असावा किंवा बाहेर कुठे तिला मारून नंतर तलावात फेकण्यात आले असावे .अत्याचाराच्या खुणा दिसत नव्हत्या तेव्हा तिचा मृत्यू घरी झाला असावा असा अंदाज करता येत होता .
तलावात प्रेताबरोबर पर्स सापडली नव्हती .पाणबुडय़ांकडून तलाश करूनही पर्स मिळाली नव्हती.कितीही राग आला तरी एखादी बाई पर्स मोबाइल घेतल्याशिवाय घरातून निघून जाईल हे पटत नव्हते .
शामरावांनी युवराजांच्या सांगण्याप्रमाणे सर्च वॉरंट आणले होते.तिची पर्स मोबाइल दागिने घरातच होते .प्रेताच्या अंगावर काहीही सापडले नव्हते .
सर्व प्रश्नांना मनोहरचे एकच उत्तर होते .ती घरातून रागावून निघून गेली .मी नातेवाईकांकडे फोन करून चौकशी केली .कुठेही तपास लागत नाही असे पाहिल्यावर पोलिस चौकीवर येऊन कम्प्लेंट दिली .
त्यांच्या पत्नीच्या कपाळावर खोलवर एक जखम होती .ती कशी झाली असे विचारता मनोहरपंतानी तलावातील दगड वगैरे लागून झाली असावी असा अंदाज सांगितला .तिला आत्महत्या करावयाची असावी म्हणून ती मोबाइल पर्स घेतल्याशिवाय घरातून निघून गेली असावी असा अंदाजही सांगितला .त्यावर श्यामरावांनी तिचा अगोदरच मृत्यू झाल्याचे सांगितले .फुप्फुसात पाण्याचा अंशही नव्हता असेही सांगितले
सर्व घराला नवीन रंग दिलेला होता . डायनिंग हॉलमध्ये भिंतीवर दोन खोल खड्डे व उडालेला रंग दिसत होता.त्याचे कारण विचारता समर्पक उत्तर मनोहरपंतांना देता आली नाही .दोघांचे भांडण झाले असावे व वस्तूंच्या फेकाफेकीमध्ये भिंतीला खड्डे पडले व रंग उडाला असा तर्क युवराजांनी सांगितला. त्यावर काही न बोलता मनोहर पंत गप्प बसले .मनोहरपंतांना युवराजांनी बेडरूम दाखविण्यास सांगितले .बेडरूममध्ये एका उशीला अभ्रा नव्हता उशीवर कसले तरी डागही पडलेले दिसत होते .पलंगाखाली वाकून पाहता एक उशीचा अभ्रा आढळला .त्यावर रक्ताचे डाग दिसत होते .युवराजांनी केसचा उलगडा झालेला आहे अापण हॉलमध्ये बसू म्हणून सांगितले .
हॉलमध्ये स्थानापन्न झाल्यावर युवराजांनी एकूण घटना सांगण्यास सुरुवात केली.मनोहरपंत व त्यांची पत्नी यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत असत .शनिवारी म्हणजे त्यांच्या पत्नीच्या मृत्यूच्या दिवशी जरा जास्तच तीव्र भांडण झाले असावे .वस्तूंच्या फेकाफेकी मध्ये पातेले किंवा तत्सम वस्तू भिंतीवर आदळल्यामुळे खड्डे पडले व रंग उडाला असावा .त्यामध्येच पत्नीच्या डोक्याला तीव्र स्वरूपाची जखम झाली असावी .त्यामुळे ती बेशुद्ध झाली. कदाचित ती मृतही झाली असावी .मनोहर पंतांनी तिला बेडरुममध्ये गादीवर ठेऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला असावा .त्यामध्ये उशीला रक्त लागले असावे .पत्नीच्या मृत्यूमुळे आपल्याला शिक्षा होईल खुनाचा आरोप आपल्यावर येईल अशा भीतीने त्यांनी रात्री सामसूम झाल्यावर वॉचमन झोपला आहे असे पाहून तिला डिकीतून तलावावर नेले असावे .नंतर तलावात तिला फेकण्यात आले .श्यामरावांकडे वळून युवराज म्हणाले जर तुम्ही डिकी तपासली तर तुम्हाला त्यात काही पुरावे सापडतील . जर तुम्ही मनोहरपंतांच्या गाडीची नीट तपासणी केली तर तुम्हाला तलावाच्या काठावरील माती व त्यांच्या टायरला लागलेली माती यामध्ये साम्य आढळेल .जॉगिंग ट्रॅकवर मोटार नेण्याचे कारण काय याचे समाधानकारक उत्तर त्यांना देता येणार नाही .
रागाच्या भरात खुनाचा हेतू नसूनही खून व नंतर घाबरून तो छपविण्याचा प्रयत्न येथे झालेला आहे .तिचा एक प्रकारे अपघाती मृत्यू पाण्यामध्ये फेकण्याअगोदर झाल्यामुळे फुप्फुसामध्ये पाणी सापडले नाही . कदाचित तिचे डोके रागाने भिंतीवर आपटल्यामुळे डोक्याला जखम झाली व भिंतीवरील रंगही उडाला असावा. मनोहरपंतांकडून अपघाती खून झाला आहे .केवळ अविवेक व प्रचंड राग यांचा हा परिणाम आहे .मी आता निघतो पुढील योग्य ती कारवाई तुम्ही करालच असे म्हणून युवराज उठले .मनोहरपंतांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंगच युवराजांचा अंदाज किती बरोबर होता ते दर्शवित होता .
शामरावांनी पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात मनोहर पंताना दिले.मनोहरपंतांच्या गाडीची डिकी तपासता त्यात रक्ताचे डाग व साडीचा फाटलेला तुकडा मिळाला .टायरमधील मातीही तलावाकाठच्या मातीशी बरोबर जुळली.डायनिंग हॉलच्या भिंतीवरील खड्डा डोके आपटल्यामुळे झालेला आहे असे सिद्ध झाले.अहेतुक अपघाती खून सिद्ध होऊन मनोहर पंताना दहा वर्षांची शिक्षा झाली.त्यांची मोठ्या पदावरील सरकारी नोकरी गेली .त्यांचा हॉस्टेलमध्ये असलेला मुलगा पोरका झाला .केवळ प्रचंड राग व अविवेक यामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले.
१८/१२/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com