Get it on Google Play
Download on the App Store

१ आईचे ह्रदय

आज क्लबमध्ये युवराज एका कोपऱ्यातील सोफ्यावर स्वस्थ बसून होते .रूममध्ये एकीकडे रमीचा डाव रंगात आला होता तर दुसरीकडे ब्रिज सुरू होता.टेबल टेनिस लॉन टेनिस बॅडमिंटन यांमध्ये काही मंडळी गुंतली होती .तर काही ठिकाणी कोंडाळी करून गप्पाष्टके रंगली होती.एक दोनदा युवराजांच्या स्नेही मंडळीनी तिकडे काय बसला इकडे या म्हणून त्यांना बोलावले.त्यावर स्मित करीत युवराजांनी चालू द्या तुमचे एवढेच उद्गार काढले . 

युवराज बहुधा एखाद्या केसचा विचार करीत असावेत.तेवढ्यात शामराव क्लबमध्ये आले .त्यांनी आपली नजर सर्वत्र फिरविली .एका कोपऱ्यात युवराज बसलेले पाहून त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे स्मित पसरले.लांब लांब पावले टाकीत ते युवराज यांच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसले.युवराजांची नजर शामरावांवर होती. युवराज क्लबमध्ये आहेत की नाही याचा सर्वत्र नजर फिरवून त्यानी शोध घेतला हे त्यांच्या लक्षात आले  होते.आपण आहोत हे पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले हेही युवराजांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते.ते आपला शोध घेत आहेत त्याअर्थी त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचे असावे हेही त्यांनी ओळखले होते.

शामराव शेजारी येऊन बसल्यावर त्यांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले .गेले दोन दिवस एक विस्मयजनक गोष्ट आम्ही अनुभवत आहोत.कदाचित तुम्हाला काही कल्पना सुचेल कदाचित तुम्हाला काही उपाय सुचेल असे मला वाटते .

त्यावर युवराज प्रस्तावना पुरे पुढे बोला असे म्हणाले.

मी सुरुवातीपासूनच तुम्हाला सर्व काही सांगतो असे शामराव म्हणाले.व त्यांनी बोलण्याला सुरुवात केली.

चार दिवसांपूर्वी मुंबई आग्रा रोडवर भीषण अपघात झाला .एक ट्रक टूरीस्ट बसवर मागून येऊन आदळला.ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला . अपघातानंतर थोड्याच वेळात बसला आग लागली.जे वेळीच उतरू शकले नाहीत असे बसमधील आठ प्रवासी जळून खाक झाले. नऊ जणांना विशेष काही लागले नव्हते मलमपट्टी करून किंवा तसेच ते घरी गेले .तेरा प्रवासी कमी जास्त जखमी झाले होते त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेले आहे.ते सर्व अॅक्सिडेंट वॉर्डमध्ये सध्या आहेत .

गेले तीन दिवस सर्वांना एक विचित्र अनुभव येत आहे .डॉक्टर, नर्सेस, वॉर्डमधील पेशंट,पोलीस, सर्वांनाच एक धूसर धूम्रमय धुक्यासारखी बाई दिसते.ती  स्त्री आहे एवढे कळते.परंतु ती मनुष्य नाही . ती सतत काहीतरी शोधत असते असे वाटते .तिला हवी ती व्यक्ती न सापडल्यामुळे मधून मधून ती रडत असते .ती निरनिराळ्या वॉर्डमध्ये फिरून कुणाला तरी शोधीत असते. ती कोणाशीही बोलत नाही .ती स्पष्ट नीट दिसत नाही .ती धुक्यासारखी दिसते .खोलीचा दरवाजा बंद असला तरी ती दरवाज्यातून आत येते .ती मनुष्य योनीतील नक्की नाही .मॅटर्निटीवॉर्डमध्येही ती काही जणांना दिसली .भास म्हणावा तर तो एकाला होईल ,दोघांना होईल, परंतु सर्वांनाच एकच भास कसा काय होईल.ती बाई पाहून सर्वजण घाबरतात.तिने अजून कुणालाही काहीही इजा केलेली नाही .या भुताचा लवकर बंदोबस्त करा असे सर्व स्टाफने वरिष्ठ डॉक्टरांना सांगितले आहे.विशेषतः रात्रीचे डॉक्टर्स नर्सेस रिसेप्शनिस्ट अटेंडन्टस वॉर्ड बॉइज यांनी या भुताचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही रात्री कामाला येणार नाही असे सांगितले आहे. त्यांनी दोन दिवसांची मुदत दिली आहे .हॉस्पिटलच्या डीननी आम्हाला फोन करून या भुताचा बंदोबस्त करा असे सांगितले आहे.  मी त्या हॉस्पिटलमध्ये रात्रीचा गेलो होतो .मलाही ती बाई दिसली.वर सांगितलेला सर्व अनुभव मी स्वतः घेतला आहे .

मी सुरुवातीला सांगितलेला अपघात होण्याच्या अगोदर ती कुणालाही दिसली नव्हती .त्या दिवसापासून ती सर्वांना हॉस्पिटलमध्ये दिसत आहे.अॅक्सिडेंट व ती बाई यामध्ये काहीतरी निश्चित संबंध आहे .तो संबंध आहे का ?आणि असला तर तो कोणता? हे तुम्ही शोधून काढाल म्हणून मी तुम्हाला शोधत होतो .त्याचबरोबर त्या भुताचा बंदोबस्त कसा करावा याबद्दल तुम्हाला काही कल्पना सुचते का तेही विचारायचे होते. 

यावर युवराजांनी एक मंद स्मित केले .ते म्हणाले आज रात्री मी व संदेश सिटी हॉस्पिटलमध्ये चक्कर मारतो तुम्हीही आमच्याबरोबर या प्रत्यक्ष अनुभवल्यावर मग आपण काय करायचे ते पाहू .त्या रात्री तिघेही हॉस्पिटलमध्ये गेले .ती बाई निश्चितपणे काहीतरी शोधत होती .ती जे शोधीत होती ते तिला न मिळाल्यामुळे ती ओक्साबोक्शी रडत होती .मधून मधून ती लहान मुलांच्या वॉर्डमध्येही जात होती .लहान मुलांकडे बघून ती आणखी जोरात रडत होती .तिच्या अस्तित्वामुळे ड्युटीवरील मंडळी भेदरलेली होती .हा सर्व अनुभव घेऊन मंडळी परत निघाली .वाटेत मोटारीत युवराज म्हणाले ती बाई आपल्या लहान मुलाला बहुधा शोधीत आहे असे मला वाटते.जळलेल्या जोडप्यापैकी ती एक असावी .आपल्याला जळलेल्या सांगाडय़ांमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये  अपघातात अॅडमिट केलेल्यामध्ये लहान मूल मिळालेले नाही .जे मलमपट्टी करून किंवा त्याशिवाय आपल्या घरी गेले त्यामध्येही लहान मूल नाही . आपल्याला न सापडलेल्या एका लहान मुलाचा तपास केला पाहिजे .

उद्या मला हवी असलेली माहिती तुम्ही द्या .त्या माहितीवर सर्वकाही अवलंबून आहे .पुढे युवराज म्हणाले मला त्या टुरिस्ट बसमधील सर्वांची नावासकट यादी हवी आहे.

बस कर्नाटकमधील असल्यामुळे माहिती मिळण्यास थोडा वेळ लागला .यादी पाहिल्यावर युवराज म्हणाले यामध्ये मला तीन जोडपी मेलेल्या माणसांच्या  यादीमध्ये दिसतात .या जोडप्यांबरोबर त्यांची मुले होती का व असल्यास त्यांची नावे यात का नाहीत त्याची चौकशी करा .मुले असल्यास त्यांची नावे व त्यांचे वय हेही मला पाहिजे आहे .हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेल्या तेरा प्रवाशांमध्ये दोन लहान मुले आहेत .ती अज्ञात बाई त्या दोन लहान मुलांजवळ जास्त वेळ उभी राहते .त्यांना निरखते आणि ढसाढसा रडते असे मी स्वतः पाहिले आहे .ती बाई लहान मुलांच्या वॉर्डमध्येही जाते व तिथेही काही तरी शोधत असते.ती तिचे मूल शोधीत आहे असे मला वाटते .

आणखी चौकशी करता काळे नावाच्या जोडप्याला एक वर्षांची लहान मुलगी होती असे कळते .  ती माहिती कळल्यावर युवराज म्हणाले मी काल म्हणत होतो  तशीच वस्तुस्थिती आहे. जळलेल्या माणसांमध्येही लहान मूल नाही .हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेल्या मुलांमध्येही एक वर्षांचे लहान मूल नाही.ते लहान मूल आहे कुठे ?अपघाताच्या जागेवरून ते स्वतःच चालत जाऊ शकत नाही .गेले तरी फार अंतर जाऊ शकणार नाही . त्या मुलाचा तपास लावणे अत्यावश्यक आहे 

सर्वजण जीपमधून अपघाताच्या जागेवर गेले त्याच्या आसपास सर्वांनी शोध घेण्याला सुरुवात केली.  तेथे जवळपास कोठेही  जिवंत वा मृत मुलाचा तपास लागला नाही .त्यावर युवराजांनी जरा वेळ विचार करून आसपासच्या झोपड्यांमध्ये चौकशी करू या असे सुचविले.तपास करता करता त्यांना एका झोपडीत एक वर्षाची लहान मुलगी सापडली.त्या झोपडीतील बाईजवळ चौकशी करता तिने ती मुलगी आपली नाही म्हणून सांगितले .हायवेला लागून त्यांचे शेत आहे .त्या शेतात वैरणीची गंजी रचलेली होती .सकाळी शेतात गेल्यावर आम्हाला त्या गंजीवरून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला .तिथे ही मुलगी रडत होती .आम्ही तिला घेऊन घरी आलो .आम्हाला मुूलबाळ नाही तेव्हा देवानेच आपल्याला मूल दिले असे म्हणून आम्ही तिला सांभाळणार होतो.सकाळी आम्ही शेतावर गेलो तेव्हा तिथे बसचा मोडका जळका सांगाडा पडलेला होता.

ती बस कर्नाटकमधील टूरिस्ट कंपनीची होती.त्या मृत व्यक्तींची नातेवाईक मंडळी अपघाताची बातमी कळल्यावर हॉस्पिटलमध्ये आली.आपली नात आजोबा आजीनी ओळखली. त्यांना नातीला पाहून रडे आवरेना .रात्री त्या मुलीचे आजोबा आजी तिला मांडीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये थांबले होते.ती सतत आक्रंदन करणारी  व सतत कुणाला तरी शोधणारी धूम्र स्वरूप बाई त्या मुलीजवळ आली.आपली मुलगी सुखरूप आहे असे पाहून तिला आनंद झाला .ती तिच्या आजोबा आजीच्या मांडीवर असल्यामुळे सुरक्षित आहे याची तिला खात्री पटली .त्या आजोबा आजींनी आपल्या सुनेला ओळखले .ती धूम्रमय आकृती तिथे काही वेळ उभी होती.हळूहळू विरळ होत ती दिसेनाशी झाली.त्यानंतर कधीही ती आकृती ती बाई हॉस्पिटलमध्ये दिसली नाही . 

युवराज म्हणाले .जोरात टुरिस्ट बस ट्रकवर आदळल्यानंतर जो धमाका उडाला त्यामध्ये ती मुलगी  जी उडाली ती खिडकीतून बाहेर पडून चेंडूसारखी अल्लद त्या गवताच्या गंजीवर जावून आदळली.कदाचित त्या धक्क्याने काही काळ ती बेशुद्ध झाली असावी.त्यामुळे ती रडली नाही .अपघाताच्या जागेवरून सर्वजण निघून गेल्यावर ती शुद्धीत आली असावी.नंतर रडत असताना त्या शेतकरी जोडप्याला सापडली. अपघातात तिची आई जळाली. 

मृत झाल्यानंतरसुद्धा ती आई आपल्या मुलीची काळजी करीत होती.तिला पाहण्यासाठी,ती सुखरूप आहे याची खात्री करून घेण्यासाठी, ती आपल्या घरी जात आहे हे पाहण्यासाठी, ती थांबली होती . हॉस्पिटलमध्ये सैरावेरा फिरत ती तिलाच शोधीत होती .  

मुलगी सुखरूप आहे याची  खात्री पटल्यानंतरच ती पुढच्या गतीला गेली .

आपल्यापैकी बरेच जण अश्या गोष्टींवर विश्वास ठेवीत नाहीत.ठेवणार नाहीत .आपल्याला कळत नाहीत, समजत नाहीत ,दिसत नाहीत, आकलन होत नाहीत, अश्या  बऱ्याच गोष्टी या विश्वात असू शकतील  एवढे कळले तरी खूप झाले .

२९/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com