तुम्ही काय निर्माण केलं? शुन्यातून विश्व की विश्वातून शुन्य?
एखाद्या व्यक्तीला स्वतःचं टुमदार घर, बंगला, गाडी, शेती-वाडी, सोनं-नाणं अर्थात काही लाखांचा बँक बॅलन्स इतकं जमवता आलं की आपण म्हणतो की, "त्यानं शुन्यातून विश्व निर्माण केलं!" वास्तविक, गरिबीचे चटके भोगलेल्या माणसानं कष्टानं आपलं आयुष्य भौतिकदृष्ट्या सुखी बनविण्याचा प्रयत्न करण्यात आक्षेपार्ह असं काहीच नाही. पण वर म्हटलेलं सगळं सुविधाजनक विश्व निर्माण झाल्यावरसुद्धा माणूस सुखी झालेला दिसत नाही!
आपल्या अवतीभवती भौतिकदृष्ट्या समृद्धी मिळविलेली अनेक माणसं दिसत असतात. त्यांच्या थोडं जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला तर ती माणसं म्हणतात- "आमच्या लहानपणी खूप मजा यायची. खूप करमायचं! घर कसं अगदी माणसांनी भरलेलं असायचं! दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही! आता ती मजा नाही राहीली"
आपल्याला मग प्रश्न पडू लागतात. आता नेमकं काय झालंय? ती मजा कुठं गेलीय? एकटं एकटं का वाटतंय ? छातीत धडधड का होतेय ? कशामुळे करमत नाही ? काय चुकलंय? एकेक करुन या प्रश्नांची उत्तरं शोधली तर हे सहज लक्षात येतं की, आपली विश्व निर्माण करण्याची व्याख्याच मुळात चुकलेली आहे!
"मी पैसे कमावले नाहीत; पण मी माणसं मात्र खूप कमावलीत" असं सांगणारी माणसं वेडी आहेत असं समजलं जातं. अशा माणसांकडं तुच्छतेनं पाहिलं जातं. सध्या आपल्या सभोवताली पैशालाच सर्वस्व समजून पैशासाठी रात्रंदिवस धावणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. असं धावताना कधीतरी त्यांची चांगलीच दमछाक होते. कधी तनाचं तर कधी मनाचं आरोग्य बिघडतं. अशा वेळी कुणाची तरी सोबत मिळावी असं वाटतं; पण नेमकी ती सोबतच मिळत नाही. मिळवता येत नाही. आपलं मन मोकळं करता येत नाही. मन मोकळं बोलता येत नाही, हसता येत नाही, रडता येत नाही. पैसा कमावण्याच्या नादात व्यक्त होण्यासाठी लागणारी प्रेमाची, विश्वासाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची माणसं जमविण्याचा कधी प्रयत्नच केलेला नसतो. त्यामुळे एकाकीपण वाट्याला येतं. या एकांतात मग स्वतःशीच संवाद सुरु होतो. आपल्या हातून खूप माणसं दुःखावली गेली आहेत, अपमानित झाली आहेत, आपण कुणाच्या मदतीला उभे राहीलो नाहीत, आपण कुणाच्या इच्छेचा कधी आदर केला नाही, कुणाला प्रेमाने वागविले नाही या आणि अशा अनेक प्रमादांची जाणीव हा स्वसंवाद करुन देतो. आपण जीवन जगताना खूप मोठी चूक केली याची जाणीव तीव्र होते आणि या जाणीवेतूनच आपल्या मनाला होणाऱ्या वेदनांचा सल अधिक घट्ट होतो. अशा वेळी आपलंच मन आपल्याला प्रश्न विचारत रहातं- तुम्ही नेमकं काय निर्माण केलं? शुन्यातून विश्व की विश्वातून शुन्य?
आयुष्य आनंदी व यशस्वीपणे जगता यावं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच आहे. हा हक्क बजावण्याचा आपण सगळेजण भरपूर प्रयत्नही करीत असतो. परंतु कितीजण आपले आयुष्य आनंदी व यशस्वीपणे जगु शकतोय ? या प्रश्नाचे उत्तर 'फार थोडे' हेच आहे.
या फार थोड्या लोकांत तुमचा किंवा माझा समावेश आहे का? हा आपल्या चिंतेचा खरा विषय आहे.
याच्या कारणमिमांसेत गेलं की, काही गोष्टी आपल्या लक्षात येऊ लागतात. जसे की, आपले आयुष्य फक्त आपण जगत असतो. त्याला रंग-रुप देतात ती आपल्या आयुष्यात या ना त्या कारणाने येणारी विविध माणसं. ती येतानाच त्यांचे रंग-रुप घेऊन येतात. त्याच्याच सहाय्याने आपल्या आयुष्याला रंग-रुप देतात. आपल्या आयुष्यात कोणी यावे? हे आपण ठरवु शकलो तर हे चित्र आपल्या मनासारखं बदलता येईल. पण काही माणसांचं आपल्या आयुष्यात येणं अटळ असतं. अशा माणसांच्या सहवासात असताना अधिक सजग राहून परिणामांची तीव्रता मात्र कमी करता येईल.
आयुष्यात अनेक चांगल्या - वाईट बाबी सतत घडत असतात. त्या आपण मनात साठवुन ठेवतो. त्यांची गर्दी होते. त्यांचे स्मरण महत्वपूर्ण असतेच पण अनेकदा त्यांचे विस्मरण त्याहूनही अधिक उपयुक्त असते. अर्थात कोणत्या बाबी स्मरणीय आहेत आणि कोणत्या बाबी विसरणे आवश्यक आहे हे आपणास ठरवता यायला हवे! कदाचित हे ठरविता न आल्यामुळं आज सांपत्तिक स्थिती अतिशय चांगली असलेली अनेक माणसं एकाकी झालेली दिसतात.
माणसं आपल्या आई-वडिलांशी, भावंडांशी, सहकाऱ्यांशी, शेजाऱ्यांशी, मित्र मैत्रिणींशी मोकळं बोलू शकत नाहीत. आपली अडचण, आपल्याला होणारा त्रास किंवा दुःख सांगू शकत नाहीत. या सर्वांसोबत आपली स्पर्धा सुरु असते. आम्ही तुमच्यापेक्षा अधिक सुखी आणि आनंदी आहोत हे दाखविण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुखाचे खोटे मुखवटे कायम लागलेले असतात. मग अशा रितीनं खोटे मुखवटे लावून जगताना, नाती जपण्यापेक्षा नात्यांपासून लपवणं अधिक होतं. हसण्यापेक्षा फसणं अधिक होतं. मन मोकळं रडण्यापेक्षा कुढणंच अधिक होतं! मग आपलं जगणं असंच असेल तर विश्वातून शुन्याचीच निर्मिती होत राहते!
आपलं विश्व निर्माण करणं म्हणजे आपल्या गरजा भागविण्याची ताकद निर्माण करणं होय. घर, गाडी बंगला, शेती-वाडी या भौतिक सोई-सुविधा आपले कष्ट कमी करतील, वेळ वाचवतील, आपल्या भौतिक गरजा भागवतील, कदाचित आपल्याला प्रतिष्ठाही मिळवून देतील पण त्यामुळे आपल्या भावनिक आणि मानसिक गरजा भागवता येणार नाहीत. आपल्या भावनिक आणि मानसिक गरजा भागविण्यासाठी लागणारे प्रेम, आस्था, आपुलकी, जिव्हाळा, विश्वास, आदर यातली एकही गोष्ट पैशाचा मोबदला देवून मिळवता येत नाही. आपल्याला ज्यांच्याकडून या गोष्टी हव्या असतात त्यांना या सर्व गोष्टी आधी आपण दिल्या तरच त्यांच्याकडून या गोष्टी आपणास मिळू शकतात! ही देवघेव करणं म्हणजेच माणसं जमवणं आणि माणसं कमावणं आहे!
माणसं जमवावी लागतात. त्यांना जपावं लागतं. त्यांच्या भावनिक व मानसिक गरजा भागविणं ही आपली जबाबदारी आहे असं समजून त्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. मग ही माणसंच आपला आधार बनतात. आपल्या भावनिक व मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी हीच माणसं उपयोगी पडतात. असं झालं तर ही माणसंच खऱ्या अर्थानं 'आपलं विश्व' बनतात! असं विश्व आपणास निर्माण करता येईल तो सुदिन म्हणायचा!
© अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक,
सावेडी, अहमदनगर संपर्क: ९७६६६६८२९५