वृत्ती, प्रवृत्ती आणि दृष्टीकोन
'वृत्ती', 'प्रवृत्ती' आणि 'दृष्टीकोन' हे तीनही शब्द आपत्या नेहमीच्या वापरातले आणि पुरेशा ओळखीचे आहेत. असं आपण खरंच म्हणू शकतो का? कदाचित बहुतेक जण या प्रश्नाचं उत्तर "होय" असं देतील. असं ''होय" उत्तर देणाऱ्या लोकांना या प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ काय? असं विचारलं, तर बरेच जण आपल्या तोंडाचा चंबू करुन बुचकळ्यात पडतील!
'वृत्ती', 'प्रवृत्ती' आणि 'दृष्टीकोन' या तीनही स्वतंत्र परंतु एकमेकांशी खूप जवळचा संबंध असलेल्या संकल्पना आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा वापर आपण इतका सढळपणे आणि सहजपणे करीत असलो तरी या संकल्पनांचे आपणास नीट आकलन झाले आहे असे ठामपणे म्हणता येत नाही. लेखाच्या सुरुवातीलाच विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर यावरुन ही बाब आपणास पुरेशी स्पष्ट झाली असेल. असो.
या लेखामधून आपण 'वृत्ती', 'प्रवृत्ती' आणि 'दृष्टीकोन' या तीनही संकल्पना नीट समजून घेणार आहोत.
वृत्ती:
'वृत्ती' म्हणजे काय? असं विचारलं की आपण तात्काळ गुगलवर सर्च करतो किंवा डिक्शनरी पाहतो. दोन्हीकडे 'वृत्ती' म्हणजे 'Attitude' असा अर्थ सांगीतला जातो. गंमत म्हणजे याच 'Attitude' शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा अर्थ 'दृष्टीकोन' असा सांगीतला जातो. आणि हे पाहून आपल्याला अगदीच कन्फ्युज्ड व्हायला होतं. मला असं वाटतं की, एकदा 'वृत्ती' म्हणजे काय कळलं की बाकीच्या संकल्पना समजून घेणं सोपं जाईल.
"आपला विचार, आपली इच्छा, आपलं मत, आपली कल्पना, आपली आवड, आपली निवड पुन्हा पुन्हा त्याच त्या विशिष्ठ पद्धतीने कृतीत आणण्याची आपली सवय म्हणजे 'वृत्ती' होय." या वृत्तीवरुनच आपला स्वभाव ठरत असतो. आपली ही सवय आपल्याइतकीच इतरांसाठीही उपयुक्त व फायदेशीर ठरणारी असेल तर आपला स्वभाव सर्वांना हवाहवासा वाटतो.
थोडी अधिक स्पष्टता यावी म्हणून एक उदाहरण सांगतो. एखादी व्यक्ती आपला विचार, आपली इच्छा, आपलं मत, आपली कल्पना, आपली आवड, आपली निवड व्यक्त करताना किंवा कृतीत आणताना प्रत्येक वेळी त्या गोष्टीच्या बऱ्या-वाईट परिणामांचा नीट विचार करते. इतरांचे मन त्यामुळे दु:खावणार नाही, त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची पुरेशी काळजी घेते. अशा पध्दतीने पुन्हा पुन्हा त्याच त्या विशिष्ठ पद्धतीने व्यक्त होणे किंवा कृती करणे हे त्या व्यक्तीची वृत्ती चांगली असल्याचे द्योतक आहे. ही व्यक्ती चांगल्या वृत्तीची आहे असं समजलं जातं.
याउलट, एखादी व्यक्ती आपला विचार, आपली इच्छा, आपलं मत, आपली कल्पना, आपली आवड, आपली निवड व्यक्त करताना किंवा कृतीत आणताना प्रत्येक वेळी त्या गोष्टीच्या बऱ्या-वाईट परिणामांचा विचार न करता, इतरांचे मन त्यामुळे दु:खावणार नाही, त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची पुरेशी काळजी न घेता पुन्हा पुन्हा त्याच त्या विशिष्ठ पद्धतीने व्यक्त होते किंवा कृती करते. हे त्या व्यक्तीची वृत्ती चांगली नसल्याचे द्योतक आहे. ही व्यक्ती वाईट किंवा नीच वृत्तीची आहे असं समजलं जातं.
प्रवृत्ती:
एखाद्या माणसाची प्रवृत्ती चांगली किंवा वाईट आहे असं म्हणताना आपणास नेमकं काय सांगायचं असतं? हे कळण्यासाठी आपणास 'प्रवृत्ती' ही संकल्पना नीट समजायला हवी.
आपला विचार, आपली इच्छा, आपलं मत, आपली कल्पना, आपली आवड, आपली निवड पुन्हा पुन्हा त्याच त्या विशिष्ठ पद्धतीने कृतीत आणण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करणारी गोष्ट म्हणजे आपली 'प्रवृत्ती' होय.
वेगळया शब्दांत सांगायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की, आपल्या वृत्तीला पुढे घेवून जाणारी, प्रोत्साहन देणारी विशिष्ठ गोष्ट म्हणजे 'प्रवृत्ती' होय.
प्रवृत्तीची ही व्याख्या समजून घेण्यासाठी आपणास हे पहावे लागेल की, असं काय आहे, जे आपल्या प्रवृत्तीला पुढे येवून जातं? आपल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देतं? आपला विचार, आपली इच्छा, आपलं मत, आपली कल्पना, आपली आवड, आपली निवड पुन्हा पुन्हा त्याच त्या विशिष्ठ पद्धतीने कृतीत आणण्यासाठी आपल्याला कुठून प्रेरणा मिळते? आपल्या एखाद्या कृतीमागचा हेतू नेमका काय आहे? या प्रश्नांची जी उत्तरं आपणास मिळू शकतात त्यांनाच आपण 'प्रवृत्ती' असं म्हणू शकतो.
एखादी व्यक्ती स्वार्थी असते. तिच्या प्रत्येक कृतीसाठी हा स्वार्थच तिचे प्रेरणास्थान ठरत असतो. प्रत्येक वेळी स्वार्थी विचार, स्वार्थी कल्पना, स्वार्थी मत, स्वार्थी आवड, स्वार्थी निवड आणि त्यातून निर्माण होणारी तिची प्रत्येक वेळची स्वार्थी कृती आपल्या अनुभवास येते. तेव्हा ही व्यक्ती स्वार्थी प्रवृत्तीची आहे असं आपण म्हणतो.
प्रेम, आनंद, सुख, समाधान, चीड, राग, द्वेष, मत्सर, मोह, लोभ, हव्यास या वृत्तीदेखील अनेकदा आपली प्रवृत्ती बनू शकतात.
दृष्टीकोन:
दृष्टीकोनाविषयी आपण बरंच ऐकतो, वाचतो आणि बोलतोही. सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीकोन हे त्याचे दोन मुख्य प्रकार मोठ्या प्रमाणात चर्चिले जातात.
"शाळेमध्ये सर्व प्रकारचे कोन शिकवले जातात, परंतू हा 'दृष्टीकोन' मात्र कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही." हे हमखास टाळ्या देणारं वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेलच. 'दृष्टीकोन' शाळेत शिकवला जात नाही हे खरंच आहे. तो शाळेबाहेरच्या जीवनातून आपला आपण शिकायचा असतो ! अर्थातच त्यासाठी दृष्टीकोन म्हणजे नेमकं काय? हे आपणास कळायला हवं.
आपल्याला सर्वानाच निसर्गाने 'अंतःदृष्टी' दिली आहे. अगदी डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या व्यक्तींना देखील ही अंतःदृष्टी मिळालेली असते. ही अंत:दृष्टी एका विशिष्ठ कोनातून वापरली तरच आपण पाहात असलेले दृष्य आपणास अधिक स्पष्ट दिसते.
या आपल्या अंतःदृष्टीच्या विशिष्ठ कोनालाच 'दृष्टीकोन' असं म्हटलं जातं. इंग्रजीत त्याला 'Attitude' असं म्हणतात.
या दृष्टीकोनाचे 'सकारात्मक दृष्टीकोन' आणि 'नकारात्मक दृष्टीकोन' असे दोन मुख्य प्रकार सांगीतले जातात. या दोन्ही प्रकारच्या दृष्टीकोनांतील नेमका फरक लक्षात न आल्याने भल्या-भल्या रथी, महारथी आणि अतिरथींचीही गल्लत होते. तिथे सामान्य माणसाचा काय पाड लागणार? त्यासाठीच आपण या लेखामधून सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीकोनांतील नेमका फरक समजून घेणार आहोत.
सकारात्मक दृष्टीकोन:
अंतःदृष्टीच्या ज्या कोनामधून आपल्याला नेमके जे दिसायला हवे तेच आणि जसे दिसायला हवे तसेच दिसते त्याला 'सकारात्मक दृष्टीकोन' असं म्हणतात.
उदाहरणादाखल असं समजा की, १२ वीच्या वर्गातील एक विद्यार्थी आहे. त्याला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. अशा वेळी त्या विद्यार्थ्याला त्याने त्याच्या अंतःदृष्टीच्या कोनातून पाहिल्यावर - "आपला अभ्यास चांगला होत आहे. आपण केलेला अभ्यास चांगला लक्षात राहात आहे. मला परिक्षेच्या वेळी सर्व प्रश्नांची उत्तरे चांगल्या पद्धतीने लिहीता आली. मी परिक्षेत चांगल्या गुणांनी उतीर्ण झालो." असं त्याला हवं असणारं चित्र स्पष्ट दिसत असेल, तर त्याचा दृष्टीकोन 'सकारात्मक' आहे असं म्हणता येईल.
नकारात्मक दृष्टीकोन:
अंतःदृष्टीच्या ज्या कोनामधून आपल्याला नेमके जे दिसायला हवे ते आणि जसे दिसायला हवे तसे न दिसता वेगळेच काहीतरी दिसते त्याला 'नकारात्मक दृष्टीकोन' असं म्हणतात.
उदाहरणादाखल असं समजा की, १२ वीच्या वर्गातील एक विद्यार्थी आहे. त्याला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. अशा वेळी त्या विद्यार्थ्याला त्याने त्याच्या अंतःदृष्टीच्या कोनातून पाहिल्यावर - "आपला अभ्यास चांगला होत नाही. आपण केलेला अभ्यास चांगला लक्षात राहात नाही. मला परिक्षेच्या वेळी सर्व प्रश्नांची उत्तरे चांगल्या पद्धतीने लिहीता आली नाहीत. मी परिक्षेत चांगल्या गुणांनी उतीर्ण झालो नाही." असं त्याला नकोसं असणारं चित्र स्पष्ट दिसत असेल, तर त्याचा दृष्टीकोन 'नकारात्मक' आहे असं म्हणता येईल.
आपण नेहमी 'सकारात्मक विचार' करावा. त्यामुळे आपला 'सकारात्मक दृष्टीकोन' विकसित व्हायला मदत होईल, असं आपणास सांगीतलं जातं.
आपण सकारात्मक विचार करतो आणि आपला सकारात्मक दृष्टीकोनही वाढीस लागतो. परंतु सकारात्मक विचार करताना आपल्यापैकी बऱ्याच जणांची नेहमीच एक गल्लत होते. सकारात्मक विचार आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या नादात आपल्या मार्गातल्या संभाव्य अडचणी किंवा धोक्यांकडे आपले कळत -नकळत दुर्लक्ष होते. आपल्या मार्गातल्या संभाव्य अडचणी किंवा धोक्यांचा विचार करण्यालाही आपण नकारात्मकतेचं लेबल लावून टाकतो. ही आपल्या हातून होणारी फार मोठी आणि अक्षम्य अशी चूक असते! अनेकांना या गोष्टीचे गांभीर्यच नसते. यापुढे आपल्या हातून ही गंभीर चूक होणार नाही याची आपण जाणीवपूर्वक काळजी घेवूया.
चला... सकारात्मक होवूया!
© श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५