आता मी कोणामध्ये खेळू? (बालसाहित्य)
आज गणेशोत्सवाचा पहीला दिवस होता.चिन्मय,आर्या आणि तेजू पार्किंगमध्ये खूप धमाल करीत होते.प्रत्येकजण स्वतःच्या घरी कीती मोठा गणपती आणला आहे याचे वर्णन करीत होते.त्यानंतर चिन्मय आणि तेजू घरात सापशिडी खेळायला बसले.तेजू खेळतांना गोटी चुकीची ठेवत होती.
"अगं ये,उलट्या डोक्याची.तुला चार पडले ना.नीट खाते मोजून गोटी ठेवत जा."
चिन्मयचे उद्धट बोलणे ऐकून तेजूला राग आला आणि ती घरीच पळाली.चिन्मयची आई कीचनमधून सर्व गंमत पाहत होती.दुसऱ्या दिवशी चिन्मयचा मित्र आकाश घरी खेळण्यासाठी आला.तेव्हा पुन्हा चिन्मयने वाद घालून "तू आता सीधा घरी जा"असे म्हणून त्याला हाकलले.चिन्मयच्या बोलण्यात पागल,मुर्ख हे शब्द पुन्हा पुन्हा येत असत.चिन्मय अभ्यासात खूप हुशार होता.परंतू त्याच्या उद्धट बोलण्यामूळे त्याचे सर्व मित्र हळूहळू कमी होत गेले.चिन्मय शाळेतून घरी आला.टिवशनला जाऊन आला.संध्याकाळी पाच वाजले.आता तो खेळण्यासाठी मित्र शोधू लागला. पण सगळ्यांनी त्याच्याशी कट्टी घेतली होती.
"आता मी कोणामध्ये खेळू?तूच सांग",चिन्मय आईला त्रास देऊ लागला. नोकरी करून थकलेले आईबाबा संध्याकाळी चिन्मयला वेळ देऊ शकत नसत.पण चिन्मयच्या उद्धट बोलण्यामूळे कॉलनीत त्याच्यासोबत कोणी खेळत नाही ही गोष्ट आईच्या नजरेतून सुटलेली नव्हती.संध्याकाळची गणपतीची आरती झाली. आईच्या मांडीवर बसून चिन्मय आवडीने आरती करीत असे."हे गणपती बाप्पा, माझ्या चिन्मयला खूप खूप मित्र मिळू दे.तो आता कोणालाच मूर्ख, पागल,उलट्या डोक्याची बोलणार नाही.",अशी प्रार्थना आईने केली.चिन्मयला आनंद झाला. उद्या संध्याकाळी मला खूप खूप मित्र खेळायला भेटतील असे त्याला वाटू लागले. आज गणपतीचा चौथा दिवस होता.संध्याकाळ झाली पण चिन्मयला बोलवायला कोणीच आले नाही. तो आईशी भांडायला लागला.
"आता मी कोणामध्ये खेळू?"
"तू जर तुझ्या मित्रांना उलटसुलट बोलला नसता तर...तू मित्रांशी नीट बोलत नाहीना म्हणून गणपती बाप्पाने शिक्षा केली आहे तुला."
"काही नको मला तो बाप्पा. उद्या बुडवूनच टाकीन मी त्याला.",चिन्मय चिडून चिडून बोलत होता आणि रडतही होता.पुन्हा संध्याकाळी आरती झाली. आईने देवाला विनंती केली,"हे गणपती बाप्पा, प्लीज प्लीज माझ्या चिन्मयला माफ कर.त्याला खूप खूप मित्र मिळू दे."
"आता उद्या येतील का माझे मित्र?"
"बाप्पाने माफ केले तर येतील."
आज गणपतीचा पाचवा दिवस होता.माझ्यासोबत खेळायला कोणीच येणार नाही या विचाराने चिन्मय उदास होता.खिडकीतून बाहेर खेळणाऱ्या मुलांची गंमत पाहत होता.आईने त्याला बरे वाटावे म्हणून त्याच्यासाठी नवीन बॉलपण आणला पण मित्र नाही म्हणून तो नाराज होता.गादीवर शांतपणे तो लोळत पडलेला असे.सातव्या दिवशी त्याचा नवीन बॉल पाहून आकाश त्याला खेळण्यासाठी हाका मारु लागला.आकाशचा आवाज ऐकताच चिन्मय उड्या मारू लागला.
"मम्मी, बाप्पाने मला माफ केले."
"हो पण ,कोणालाही नावे ठेवू नको.सगळ्यांशी नीट बोलत जा.मित्रांशी भांडू नको.नाहीतर गणपती बाप्पा पुन्हा शिक्षा करीन हं तुला."
"हो ,हो समजले मला.मम्मी मी आता सगळ्यांशी नीट बोलेन."चिन्मयला आकाशसोबत खेळतांना पाहून आईही आनंदी झाली.
अर्चना पाटील,
अमळनेर
8208917331