भाग ३
कालच तिचा फोन आला होता. सांगलीहून परतत होतो. गाडी चालूच होती.
"महाराज, मी आई होतेय. आपल्या बाळाची. मी काय करू ?" केतकीचे हुंदक्यात अडकलेले शब्द.
"काय..? आई होतेस…? वेड लागलं काय तुला."
"वेड तर आपल्या दोघांना ही लागलं होतं. पागलं झालो होतो आपण ?"
"असं कसं झालं ? तू काहीच कसं केलं नाही ?"
"सृष्टीनियम कुणाला नाकारता थोडेच येतात ? महाराज काय करू मी?मला फार भिती वाटतेय."
"तू सांगत काय बसलीस ? केतू, त्याचं काही तर कर. विल्हेवाट लाव. लवकर लाव. पैसे सांग. किती ही माग. तुला देतो लगेच. अकाऊंट वर पाठवू का?"
"पैसे देता…? किती देता ? मी वेश्या…?"
"केतू, मी प्रेम केलं तुझ्यावर.. तू अस का बोलतेस ?"
"प्रेम ना माझ्यावर… मग लग्न करू ना आपणं. लग्नाचं स्टिकर चिकटवू आपल्या नात्याला. ते अधिकृत करू."
"काय ? लग्न करू. संसार.. करू… मी? तू काय बोलतेस हे ?"
"तुम्हीच सांगत असतात ना ? संसार क्षुद्र जीवांना अनिवार्य असतो."
"क्षुद्र जीव…?"
"वासनेत गुरफटत गेलेले जीव क्षुद्रच की ! प्रणय तर गटारातल्या आळया पण करतातच की."
"मी संसार करू ? एका मठाधिपतीचं संसार…! कल्पना किती डेंजर…! नाही अक्सेप्ट करणार लोक, केतू तू समजून घे ना. संसार, लेकरं, बाळं मला कसं शक्य ?"
"दूर.. दूर.. जाऊ. जिथं फक्त तू आणि मीच असू. अवघाचि संसार...."
"संसारच दु:खाच मूळ ग. किर्तनकाराचा संसार, लेकरं, बाळ. इटस इम्पॉसिबल."
"व्हाट इम्पॉसिबल.एक नामवंत किर्तनकार प्रेम करू शकतो मग लग्न का नाही ?"
"तू,समजून घे. लग्न हा उद्देश्य कधीचं नव्हता आपला."
"लग्न हा उद्देश्य नव्हताच पण तेच एकमेव उत्तर आता. काय करता येई दुसरं आता ?"
"दुसरा काही पर्याय शोधू आपण."
"दुसरा एक पर्यांय आहे."
"कोणता पर्याय….?"
"हे भ्रष्ट शरींर... हे सोडून जाणं. देह त्यागं करणं किंवा तो निरपराध जीव नष्ट करणं. खुडून टाकणं आपल्या प्रेमाचा अंकुर."
"केतकी, सावर तू स्वत:ला. हृदयापेक्षा मेंदू वापर."
"कसला सल्ला देताय ? महाराज, मी मरेल उद्या. सकाळी सात वाजता."
"हॅलो.. हॅला.. केतकी… मरणाचा कुठं कोणी मुहूर्त पाहत का ?" फोन कट झाला होता. अनेकदा फोन केलां. तिने तो रिसीव्ह नाही केला.महाराज मरेल मी उदया सात वाजता... हे शब्द मनात घोळत राहीले.ती उद्या खरचं मरेल ! ती ब्लॅकमेल तर करत नसेल ना ? का खरच प्रेम असेल तिचं आपल्यावर ? महाराज आठवू लागले कालच तिचा आलेला फोन. आज तिनं आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. ती जगेल का ? तिनं जगावं मी मरावं?आपल्याला काय वाटतं? "कोणी कोणाते न मारी… मीच अवघे विश्वसंहारी." ज्ञानेश्वरीतील ओवी त्यांना आठवली. खरंच मरणं व जगणं माणसाच्या हाती नसतं का ? केतकीची मरणाची इच्छा असून ही ती मरू नाही शकणार ? त्यांना केतकी विसरणं शक्य नव्हतं. कोऱ्या कागदावर एकच रेषा ओढावी तशी ती त्यांच्या काळजावर ओरखडलेली रेषा होती. काळीजरेषा…!!
'अवघे गरजे पंढरपूर' फोन वाजला. आठवणीची शृंखला तुटली. त्यांची गाडी सुसाट सुटली होती. फोन रिसिव्ह केला. कानात कोणी बॉम्ब फोडावं तशी बातमी आदळली त्यांच्या कानावर. "महाराज, केतकी गेली. हे जग सोडून गेली."कंठात दाटलेल्या हुंदका व शब्द प्रा.गार्गीचे होते. त्या पुन्हा नुसत्या रडत राहिल्या. महाराज त्यांना समजावू शकत नव्हते. केतकी विषयी च्या अनेक भावना अन् आठवणीच्या गांधील माश्या त्यांच्या काळजाला चावत होत्या. परमार्थ, त्याग, ब्रम्ह, माया, प्रकृती या शब्दांवर तास तास काथ्याकूट करणाऱ्या अच्युतानंदाकडे कुठं सांत्वनाचे शब्द होते ? शब्दप्रभू दोन शब्द ही उच्चारू शकले नाहीत. त्यांच्या डोळयाच्या कडा ओल्या झाल्या. फोन बंद झाला नव्हता. मॅडम स्फंदु… स्फंदु… रडत होत्या.
मरणं म्हणजे आयुष्याच्या वाढत जाणाऱ्या रेषेचा शेवट. जे आपलं आहे. ते एन्जॉय करा. केतकीचं तिच आपलं तत्वज्ञान. त्यांच्या घशाला कोरड पडली. त्यांनी गाडीतील पाण्याची बाटली तोंडात ओतली अन् गाडी पळवायचा इशारा केला.
"महाराज,मी खरच सुंदर दिसते ना ?" केतकीची लाडात आलेली मुद्रा त्याच्या डोळयासमोर तरळली. खरंच ती सुंदर दिसत होती का ? का मोहक ? छे ! ती मादक होती. सुंदर व मादक, मोहक यात काय फरक ? का पुरूषाना हवं असतं फक्त एक स्त्रीचं शरीर ? फक्त स्त्री असणं ही पुरेस असते का पुरूषांना? माणसाच्या भावनेचा विजय होतो की विचारांचा ?
पुण्यात लाईफ लाईन हॉस्पिटल जवळ गाडी आली. त्याचं चारपाच मैत्रिणी. मोजून पाच मुलं. ते नक्की बॉयफ्रेंड असतील त्यांचे. प्रा.गार्गी, त्यांचे मिस्टर बर्वे. केतकीचे वडील. फाटके कपडे, वाढलेली दाढी… अन् लेकीच्या प्रेतावर पडून फोडलेला हंबरडा. महाराज तिचे शरीर पाहू शकत नव्हते. ज्या ओठातले अमृत बेधूंद होऊन अनेकदा चाखलं होतं. जे शरीर प्राणा पेक्षा ही प्रिय होतं. ते आज प्रेत म्हणून कसं पाहणं शक्य होतं ? ते बॉयफ्रेंड का कोण नुसत्या शेलक्या शिव्या देत होते पण एक बरं होतं. त्यातलं कुणालाच महाराज अन् केतकीचं गुटूरगू माहित नव्हते. अगदी प्रा.गार्गीला पण… अरूंधतीला…? तिला हे माहीती होते पण ती गप्प होती. काहीच बोलत नव्हती. तिच्या मनात काय शिजत होतं ? महाराज पुरे भेदरलं होते. अरूंधती काय करू शकेल याचा अंदाज बांधण इतक सोप थोडं होतं ? केतकीनं आपल्या आयुष्याची रेषा आपणं होऊन अशी खंडीत करून घ्यायला नको होती.
सरणावर तिचा पेटलेला देह… ऊसळलेली आग काही क्षणातच त्या सुंदर अन् प्रिय शरीराची राख होईल. पंचतत्वात विलिन होईल. माणसं शरीराच्या प्रेमात पडतात की जीवाच्या ? गळयातील सोन्याची चैन हिरे बसवलेले आंगठया…. सारं तिच्या सारणावर टाकून द्यावे का ?
स्वत:चा फार राग आला. पवन तोये हलवीले || अन तरगांकर जहाले || काय जन्मले || तेथे || हा माऊलीचा दृष्टांत आठवला. मरण आणि जन्म असं काहीच नसतं ? हे जगच सारं मिथ्य आहे.
तत्वज्ञान किती सुंदर असलं तरी काळजाचं पाणी-पाणी करणाऱ्या आठवणी थोडयाच विसरता येतात ? परमार्थात असून ही महाराज संसाराच्या अंतहीन गर्तेत पडले होते. संसार तर दु:खाच मूळ असत नां ? त्यानी प्रा.गार्गी कड नजर फिरवून जाण्याची परवानगी घेतली. तिच्या वडिलांकड शेवटच पाहिलं…. बिच्चारा…! महाराज बोलले का ? छे ! त तर साक्षात वैराग्य मूर्ती होते. फोन वाजला. तो शशीकांतचा होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसा निमित्त त्यांच कीर्तनासाठी तारीख बूक झाली होती. त्यांना आनंद झाला नाही पण कार्यक्रम नाकारणं ही शक्य नव्हत. एकदा घेतलेले सोंग अन् ढोंग सहजासहजी फेकता नाही येत. इकडं केतकीचं सरण जळत होतं. भरधाव धावणाऱ्या गाडीत महाराज मात्र जीवात्मा अन् परमात्माच्या चिंतनात गढून चालले होते.