भाग १
"अवघे गरजे पंढरपूर." अलार्म वाजला. ते मंजुळ स्वर त्या शांत खोलीत पसरले. महाराज गाढ झोपेतच होते.रात्री जागरण झाले होते.रात्री कीर्तन संपवून ते अहमदनगर वरून रात्री उशिरा आले होते. झोपायला रात्रीचे तीन वाजले होते. अलार्म वाजला. त्यांना जाग आली.. अलार्म् चा राग आला. उठावसं वाटल नाही. झोप डोळयात तशीच तरळली. झोपेला असं अंगातून झटकून नाही टाकता येत ? झोपेची मिठ्ठी असते की नशा ? झोप माणसाला सोडत नाही की माणूस झोपेला सोडत नाही ? अजगाराची मिठ्ठी हळूहळू सैल होत जावी तसी झोपेची मिठ्ठी सैल होत जातं असावी. त्यांच्या नजरेचं पाखरू हळूहळू भिरभिरू लागलं.
चकाचक भिंती … मखमली मऊ बिछाना… उश्या.. खिडक्यांची मलमली पडदे… भिंतीवर टांगलेली फ्रेम
अर्जुनाला गीता सांगताना.. कुरुक्षेत्र अन् दोन्ही बाजूचे विराट सैन्य… रथ, घोडे, हत्ती..
शेवटी बंद खोलीत नजर जाऊन-जाऊन जाणार कुठं ? ती त्यांच्या अंगभर रेंगाळली.. हळूहळू ते आपलच अंग न्याहाळत बसले. स्वत:च मग्न झाले. आपण किती सुंदर आहोत याचा अंदाज बांधण्यातच ते गुंगून गेले. गोर अंग, काळेभोर केस, स्वच्छ डोळे, लालचुटूक ओठ, पीळदार शरीर, देह नाशिवंत असतो. देह व प्रेम क्षणभंगूर असतं. जीव देहातच अडकून पडतात. क्षूद्र.. बिच्चारे..! सदैव देह लुब्धच राहतात. असचं काही आठवत राहिलं असलं तरी त्याना तुलना करण्याचा मोह आवरता आला नाही. अनेक नट, महाराज , पुराणातील पुरूष व शेवटी कृष्णाशी त्यांच मन तुलना करतच राहिलं... वृंदावनातील क्रिडा.. गवळणी.. अन त्यांच्या वर्णनांची काव्यं आठवू लागली. रासलिलाचे चित्रं डोळया समोर तरळू लागली. मधूर प्रणयरस त्यांच्या मनात पाझरू लागला.
कल्पनेचे पंख माणसाला काल, वेग, स्थळ या परिमाणाच्या पलीकडे घेवून जातात. नाहीतर त्यांना मधूर भक्ती रसांन ओथंबलेल्या काव्याचे असं रसग्रहण करता नसत आलं. सुखद कल्पना ही किती आनंदी अन भान हरवून बसणाऱ्या असतात, नाही ? त्यांचं काल्याचं कीर्तन फार रंगे… चरित्र आणि मधुर भक्ती रस असतो त्या कीर्तनात ! कल्पना विश्वात रममाण झाले असतानाच त्यांचा मोबाईल वाजला, 'अवघे गरजे पंढरपूर' त्यांनी फोन उचलला व कानाला लावला. फोन अनोळखीच होता.
"हॅलो, अच्यूतानंदजी महाराज… ना ?"
"हो.. मीच बोलतोय. हॅलो.. कोण..? कोण बोलतोय ?"
"मी अरूंधती. केतकी राणेची मैत्रीण. केतकीनं सूअसाइड केलयं,महाराज,शी इज सिरीअस.."
"केतकी नि सूअसाइड…? असंभव.."
"महाराज, रिअली. शी इज क्रिटिकल.."
"पण का..? भ्याड स्वभाव नाही तिचा. कशीय ती आता ? बरी ना..?" महाराज थोडे घाबरले होते. भीती लपवून राहत नाही.आवाज थोडा थरथरला.
"महाराज, आता बरी.. तिच्या उपचारासाठी मोठा खर्च. इतके पैसे अर्जंट तिच्यासाठी कोण देऊ शकेल ? तिला कुणी नाही हो, महाराज ….! तुम्ही देऊ शकाल ना ?"एकदम घाबरा आवाज.अरुंधती अशी एक केतकीचं मैत्रीण…. तिलाच फक्त महाराज व केतकीचं नाजूक संबंध माहीती होते.
"केतूला मदत. अवश्य.. !! का नाही ? मी येतोय. केतूची काळजी घे."
"थँक्स,महाराज.कम फास्ट.गार्गी मॅडम पण निघाल्यात. येतीलच आता."अरुधंतीने फोन कट केला. ती घाईत असावी. महाराजांच्या डोळयासमोर केतकीच चित्र उभ राहिलं. अरूंधती एकटीच केतकी जवळ असेल. तिचे वडील…? तो प्राणी असेल ही कदाचित जवळ पण तो तिच्यासाठी काय करू शकेल ? नाहीतर असेल पंग होऊन पडलेला कुठं. बिच्चारी केतकी..!!
त्यांच डोक घरघरू लागलं होतं. केतकी राणे.. केतकी राणे.. केतकी राणेच. मनात घोळत राहिली. ते मोबाईल ट्राय करत होते. अरुधंतीचा मोबाईल लागतचं नव्हता. त्यांनी टेबलावरील पाण्याची बाटली उचलली. ए.सी. चालू होता तरी त्यांच्या कपाळावर घाम जमा झाला होता व घशाला कोरड पडली. त्यांनी घोटभर पाणी तोंडात घेतलं.घसा ओला केला तोंडावर पाण्याचे शिपके मारले. सपा… सपा.. पाणी चेहऱ्यावरून ओघळताना.. थेंब-थेंबात त्यांना केतकी दिसू लागली. काळजात काही तरी डेटा सेव्ह होत असावा. डोळयासमोरुन केतकीचे चित्र अतिशय वेगाने फिरू लागले. डोकंच फुटेल असं त्यांना वाटलं. तिथं कुठं केतकी अन् तिचे फोटो होते ? असतात का काही माणसं वहीच्या पानावार अलगद मोरपिसं छापून घ्यावीत तशी काळजावर छापलेली… काळजात खोलवर गोंदलेली.. केतकी. लाजरी, बुजरी... हासरी…. बडबडी…. एक नाही. तिच्या नाना तऱ्हेच्या… नाना भावमुद्रा…. त्यांना आठवत राहिल्या. अश्या पद्धतीनं ती आठवणं. त्यांना यावेळी तरी नको होतं. पण आठवणीचा ही आवेग असेल ! जशी उलटी टाळता येत नाही. तश्याच…. आठवणी ही…. टाळता येत नसतील का ? प्रत्येकाच्या आयुष्यात मर्यादीतच क्षण असतात. तेच फक्त आपले आयुष्य असतं. प्रत्येक क्षणाला आनंदाचा स्पर्श व्हायला हवं.. आयुष्यातील क्षण अन् क्षण आनंदानं भिजून जावा. हे तिचं तत्वज्ञान. ती आपली आयुष्याची रेषा आपण होऊन खंडीत कशी करेल ? प्रचंड सकारात्मक दृष्टीकोन असलेली केतकी अन् आत्महत्या ? असंभव…. केतकी आत्महत्या करू शकेल ही कल्पना त्यांना आवडली नाही. आवडली नाही म्हंजे पटलीच नाही.फोनचं कुणी तरी मुद्दाम केला असेल. कुणी आल्याला ब्लॅकमेल तर करत नाही. ना ? मग तो फोन आता का लागत नाही ? तत्वज्ञान वांझोटचं असते का ? माणस बोलतात एक. तत्वज्ञान पाजळतात एक आणि जगतात वेगळचं ! फक्त अक्कलेचे दिवे.व्यवहार्य तत्वज्ञान प्रत्येकानं आपलं आणि आपलचं तयार केलेलं असतं. प्रा.गार्गो देसाईला फोन करावं का ? का डायरेक्ट केतकीलाच. मोबाईलच्या स्क्रीनवर तिचा नंबर ही आणला होता. पणं तिला फोन करण्याचं धाडस ते करू नाही शकले.
प्रयत्न केला म्हणजे ती नक्की जगली असली पाहिजे. का गंभीर असेल ? जगणं आणि मरणं या दोन्हीच्या सीमेवर…. ती कोणत्या हॉस्पीटल मध्ये असेल ? तिने औषध घेतलं असेल की, गळफास… स्वत:ला रॉकेल टाकून पेटून तर घेतलं नसेल ना ? का उडी मारली असेल गच्चीवरून….? मरणाकडं घेऊन जाणाऱ्या हजार वाटा असतात. कदाचित तिनं आपली नस कापली असेल.. रक्ताचा पाट अन त्यात भिजलेली चिठ्ठी असेल… त्या चिठ्ठीवर लिहिलं असेल का ? अच्यूतानंदजी… ती बेशुद्ध होत गेली असेल का… हळूहळू. मृत्यूच्या कुशीत शिरत गेली असेल. त्यांना मोठयानं नाही .. नाही…असे ओरडाव वाटलं पण ते नाही ओरडू शकले. घसा कोरडा पडला असेल नाहीतर भीती वाटली असेल. बाहेर त्यांचा पी.ए. शशीकांत होता. पी.ए.मोठे बदमाश असतात. त्यांना अशा गोष्टी माहित होऊन नाही चालत. ते त्याचं भांडवल करून धंदा पण करु शकतात. उपारणे घेतलं. चांगलं रगडून तोंड पुसून घेतलं. पुसून कसलं ? घासूनच घेतलं.
टाळ,मृदंग, हार्मोनिअमचा मंजूळ आवाज त्यांच्या कानात घूटमुळू लागला. ते उठले खिडकी जवळ आले. खिडकीचा पडदा मागे सारला. खिडकी उघडली. आवाज अधिकच मोठयान येऊ लागला.पाऊस.. रिमझिम… झिमझिम… झडत होता. गारं वारं… थंड जलतुषार.. अंगावर येतं होते. दूर धूक्यात.. पावसात… हरवलेला डोंगर.. भिजलेली झाडं.. पानं…. फुलं… निथळणारं थेंब.. भिजलेली पाऊलवाट…. ते उंच आकाशाच्या पोटात खुपसलेले मंदिराचे शिखर.. ते कळस… त्यावरील भिजलेल्या भगव्या पताका.. पाऊस.. नभ आणि धरतीचा धूंद प्रणयच असतो ना ? एकानं मनसोक्त बरसत राहयचं. दुसऱ्यानं फक्त चिंब भिजत राहयचं… वेगात धावणारे आभाळं… त्याचे बदलणारे आकार.. ते सूक्ष्म नजरेन ते सारं पहात राहिेले. पाऊस आठवणीना चेतवीत असेल काय ? आठवणींन त्यांच मन ढगाळूनं गेलं. त्या डोंगराच्या वर आकाशात अक्राळ-विक्राळ केतकी हासत असल्याचा भास झाला. त्या शांत खोलीत ही त्यांना दोन्ही हात काना भोवती घट्ट आवळले. केतकी मेली असावी नि तिनं हे रूप घेतलं असावं. माणसं मेल्यावर कुठलं ही रूप घेऊ शकतात ? भाकडकथा… कसल्या कसल्या भय कथा त्यांना आठवत राहिल्या. भास ही किती खरे वाटतात ! मन तर वैरीच असतं. कल्पनेला आपण कुठं कोंडून थोडचं ठेवू शकतो ? ती खिडकीच्या तोंडाशी आलेली वेल.. निशीगंधावर नजर खिळली. ती चिंब वेल.. टपटप.. थेंब निथळत होती. भिजलेली वेल आणि स्त्री सारख्याच.. चिंब भिजल्यावर अधिकच खुलून दिसतात.
"महाराज, खरचं मी सुंदर दिसते ?" अवाज आला. ते दचकलेय. "केतकी..?" शब्द बाहेर पडले मग वळून पाहिलं. कुणीच नव्हत. ती ओली चिंब वेल वाऱ्यावर डूलत होती. हासत होती. भास.. पुन्हा एकदा भास झाला. केतकी वेल झाली की काय ? ते सूक्ष्मपणे हासले. त्यांचे त्यांनाच नवल वाटलं. एकटक वेलीकड पाहू लागले. केतकी आणि ती चिंब वेल… आठवणीच्या पैठणीचं पदर उलगडण्यात ते गर्क झाले.
श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं तसंच तर केतकी आपल्याला… रूप दाखवित नाही ना ! केतकी जीवात्मा.. कृष्ण परमात्मा... परमात्मा म्हणजेच हे विश्व. तेच विकसीत होत गेलं. जीवात्म्याला कसे शक्य हे ? पण जीव व परमात्मा एकच ना ! असे तर्क-वितर्क त्याच्या मनात उभे ठाकले. टिप-टिप पडणारा पाऊस… उतावीळ झालेली केतकी…. काळीकुट्टी रात्र.. अंधार अन विवस्त्र शरीर… असले विचित्र भास त्यांना झाले. वासनेचे रसायन त्यांच्या शरीराच्या कणा-कणात झिरपत गेलं असाव. वासनेला असंख्य अदृश्य पाय असतात का ? ती माणसाच्या शरीरात प्रवेश करते का ? का अंगात भरलेली असते ? काडी पडली की पेट्रोल सारखा भडका उडत असेल तिचा ! त्यांचा कण-कण रोमांचित झाला. माणसं ढोंगी असतात. ब्रम्हचर्य,सभ्यता, धर्म, संस्कृती वगैरेचे बेगडी वस्त्र लपेटून घेतात. ते गळून गेले की, फक्त उरतो. एक प्राणी... पशुत्व झाकण्याचा माणसं फारच केवीलवाणी प्रयत्न करतात. गटारीतले किडे..., आळया.. ही आपआपल्या पटीने जीवन जगत असतातच की... जीवनात आनंदाचा झरा शोधत असतात. ब्रम्ह-माया, परमात्मा-प्रकृती, शिव-पार्वती असे पुराणातले तर धन-ऋणप्रभार विज्ञानातले संदर्भ उगीच त्याच्या मनात गर्दी करू लागले. असले विकृत विचार अन् मनात साचलेले विकार त्यांना छिलून काढायाचे होते पण मनं कुठ छिलता येऊ शकते ? यमदूत रेडा.. आसलंच काही-काही त्यांना आठवत राहिले.
फोन वाजला. ते भानावर आले. केतकीचा तर तो फोन नसेल ना ? ती गेली असेल का हे जग सोडून ? आपलं नाव घेतलं असेल का ? ते भेदरून गेले पण फोन होता वाघोली वरून. त्यांना महाराजोची तारीख हवी होती. त्यांनी पी.ए.शशीकांत कुलकर्णी कडे फोन करायला सांगितले. त्यांना फार राग आला होता. ट्रस्टीचा की स्वत:चा ? त्यांना आता आवरण अवश्यक होत. मंगलस्नान.. पूजा.. पारायण.. त्यांच्या हालचालींना कमालीचा वेग आला. मंगल स्नान करून ते मंदिरात आले. महाराज दिसले की एकच गलका झाला. नुसती झुंबड उडाली. मंदिरात भजन चालू होतं.टाळ मृदंगाचे स्वर वातावरणात भक्ती रसाचा शिडकाव करत होते. वराट मामा देवपूजा, आरत्या, भजन सारं करी. त्याला महाराज पगार देत होते. महाराज आले की आरती सूरू झाली. शब्दस्वरांनी मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. हजारो हात टाळया वाजत होते. तब्बल दहा मिनिटे आरती चालली. वराट मामानं आरतीचं ताट मंडपात आणलं. कापूर... उदबत्तीच्या सुगंधान मनं प्रसन्न झाली. महाराजांनी मोठयानं भजन केलं. 'पुंड लिकवर दे…' अन् त्या पुढचे सारे शब्द सभा मंडपातील हजारो मुखांनी पुर्ण केले. महाराज उठले 'जयहरी…' म्हणत हात जोडले. सभा मंडपातून बाहेर पडू लागले. लोक दर्शनासाठी मागे धावू लागले. पामर...?.. एकजण आलॉसिंग करत होता. आजचा दर्शन सोहळा रद्द झालेला आहे. मुखदर्शनासाठी झुबंड उडाली. नुसती चेंगराचेंगरी…. बिच्चारे… भक्त..
डायनिंग हॉल मध्ये नास्ता तयार होता. केशरयुक्त दूध, ताजी-ताजी फळं, ड्रायफूड, गरम गरम कोबी, पराठे… लोणी त्यांनी फक्त दूध घेतलं. भूक तर नव्हती पण इच्छा ही नव्हती. ते गाडी जवळ आले. लोक तिथं गर्दी करून उभे होते. भोळया भाबळया भक्तांना फक्त त्यांच मुखदर्शन हवं असतं. पॅजेरो गाडी. आता आताच घेतली होती. अजून आ.पठाडे कडे ती गाडी नाही. ऐश्वर्य, किर्ती माणसांना देवच देतो ना!अच्यूतानंद महाराजानां देव प्रसन्न होता का ? महाराजांची गाडी भरधाव वेगात निघाली. विचारचक्र जोरात सूरू झाले. केतकीचं आणि त्यांची पहिली भेट… तो प्रसंग… भूतकाळ त्यांच्या छाताडावर अक्षरश: तांडव करू लागला.
तो प्रकाशन समारंभ…दोन वर्षापूर्वीचा. पुण्यातलं नटराज सभागृह ठासून भरलेलं. अनेक विद्वान… धनवान… मुलं, मुली.. अन् एकच चर्चा. लोक तिथं गर्दी करून उभे होते.चर्चा पुस्तक 'जाऊ देवाचिया गावा' त्याची प्रस्तावना आपलीच अन् प्रकाशन ही आपल्याच हस्ते. स्वागत समारंभ. प्रा.गार्गीच्या बाजुला दोन मुली होत्या. स्टेजवर वावर होता त्यांचा. स्वागताच ताट घेऊन येतं. एकीच्या डोळयात पाहिलं बापरे ! काय डेंजर होती तिची नजर ! 'क्ष' किरणासारखे काहीतरी अदृश्य किरण त्यातून बाहेर फेकले जात असावेत ! तो कटाक्ष जीवघेणा होता. त्या मुलींनं मनात अनेक विकार उत्पन्न केले. प्रा.गार्गीचं प्रस्ताविक झालं. नको तितका नामोल्लेख झाला. अशा स्त्रीया गुळा सारख्या नुसत्या पघळत राहतात. ती मुळी प्रस्तावनाचं नव्हती ! तो आपला स्तुती पाठचं होता. चार वेदानंतर स्तुतीवेद का नसेल तयार झाला ? त्याची आता केवढी गरज आहे ! आपल्या भाषणात ही स्तुती… ती आपली गरज होती. प्रा. गार्गीची स्तुती-गौरव व कौतुक त्या पुस्तकाची समीक्षा कुठली ? फक्त तोंडपूजे पणा. स्तुती माणसाला अहंकाराचे पंख देते. माणसं त्या पंखावर नुसते हवेतच तरंगत राहतात. काही माणसं हवेतच ठेवावी लागतात नेहमी !
कार्यक्रमानंतर प्रा.गार्गीच्या घरी जेवणं आग्रह अन् यथेष्ट बेत… त्याच मुली पुन्हा दिमतीला. त्या मॅडमच्या विद्यार्थीनी असतील. त्यांच्या डोळयात पाहणं शक्य नव्हत. नाही तसं धाडस ही नव्हतं आपल्या कडं पण चुकून नजरा नजर होई. आपण न पाहयाचं ठरवलं की डोळे मुद्दाम तिकडचं वळणार… नक्की त्यांच्या मनात काय असेल ? मन अथांग असते. त्याचा ठाव थोडाच घेता येतो ? एकदाची जेवणं झाली. पुन्हा तत्वज्ञानावर चर्चेच गुऱ्हाळ रंगलं. ती मुलगी धीट होती. डायरी घेऊन समोर आली. डायरी आपल्या हातात दिली. तिची नजर… कुठं होती ? पाहण्याचं धाडस नव्हत. "ऑटग्रैफ..प्लीज.." तिनं तोंड उचकल. "ऑटग्रैफ..."ओठातली ओठातच आपला शब्द रेंगाळला. ती पुढ आल्या बरोबर अनेक मुली गोळा झाल्या. आपण वही हातात घेतली अन् त्यावर लिहिल, "असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे." वही हातात घेतली अन जाग्यावर उडी मारली. ते हासणं नव्हत ते आतून उमलणं होतं. आपण बराच वेळ तिच्याकडं पहात होतो. हे तिच्या लक्षात आलं अन् ती कमालीची लाजली.ओढणीत तोंड लपवून भुर्रकन पळाली.फुलपाखरासारखी... आपलं ही असं भान का हरपावे ? चूक तर झाली पण सावरायला कुठं पर्याय होता ? ऊठून गाडी पर्यंत आलां. सर्वांनी नमस्कार केला. हात हालत होते. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार वेदांताचार्य. मठाधिपती पाहण्यासाठी अख्खी गल्ली उसळली होती. त्या गर्दीत ती नव्हती. कुठं होती ती ? आपले डोळे शोध घेत होते. ती मागे कोपऱ्यात सार चोरूनं पहात हाती. तिचं चोरून पाहणं मी पाहिलं. ती एकदम चाकाटून गेली. आपल्या मनाच्या कडे भोवती कुठल्याशा अनोख्या सुखाचे कण विरघळू लागले होते ? एखांद आवडणं म्हणजे तरी नक्की काय असतं ? काळजात घर करणं असेल का ? का काळजाला प्रेमाचा पाझर फुटणं असेल ? ती प्रियेशी व आपण प्रियकर. छे ! छे ! असे अभद्र विचार आपल्या मनात का यावेत ? आपण पचा-पचा थुंकलो. थुंकून थोडेच मनात उत्पन्न झालेले विकार बाहेर पडत असतात ? स्वत:चा फारच राग आला आणि आपण आपल्याच गालात ताडकन मारून घेतलं.ड्रायव्हर ही अचंबित झाला होता. यांच्या मनात आठवणींच मोहोळ जागं झालंच होतं. ते थोडचं खाली बसत असतं ?
एका रम्य सकाळी सभा मंडपात गर्दी जमा झालेली होती. तो दिवस एकादशीचा आसावा भाविक भक्त अजून ही येतच होते. दर्शन सोहळा चालू होता. लोक येत-जात. पायावर काही काही टाकत.ढीग जमा झाला होता. त्याचा आकार वाढतच चालला होता. कुणी काही ही म्हणो ! लोक महाराज लोकांच्या पायावर पैसे टाकतातचं. ते का महाराजाच्या पायावर पैसे टाकतात ? त्यांना काय हवं असतं ? प्रा.गार्गी लांब सभा मंडपात दिसल्या. त्या नेहमी प्रमाणे हसतमुख व आकर्षक दिसत होत्या. त्यांच्या सोबत ती मुलगी पण होती. दुसरी कुठं ? तिचा शोध घेतला पण ती नव्हती आली. जी आली होती. तिनं जीन्स व शॉर्ट टॉप घातलेला होता. काळी जीन्स अन पांढरा शुभ्र टॉप. कमालीची लक्ष वेधक. सारा सभा मंडप तिच्याकडे पहात राहिला. प्रा.गार्गी सुंदर असेल की ती ? तीच सुंदर होती. अनेक स्त्रियांशी तिची तुलना करून पाहिली. शेवटी सोनं ते सोनं. स्त्रियांकडे आशा भावनेने कधी आपण पहात नाही. असं काय होतं त्या मुलीकडे की, जे आपलं मन खेचून घेत होते. स्त्रियांच्या शरीरात जादू असते की काय ? पुरूषाला वेडं करणारी…. मन विकारानं असं भरून गेलं की विषयाची चटक लागते.
त्या आल्या. गर्दीत वाट करीत आल्या. दोघींनी विनम्र होऊन पायावर डोंक ठेवली. दर्शन घेतली. मनं थोड संकोचलं. तिच्या चेहऱ्यावर लज्जेचं रंग थिजून गेले होते. प्रा.गार्गी ओळख करून दिली. "ही, केतकी राणे… तुकोबाच्या गाथेवर प्रबंध लिहीते आहे." तिनं पुन्हा हळूच स्मित केलं. मोती ओघळल्यागत… असं बारिक हसण्याची काही भाषा असते का ? नक्कीच काही संकेत असतील. त्या हासण्यात मला आत्मविश्वास अन् तिची शालीनंता दिसली. दर्शनं संपत आलीच होती. आल्याला दूर म्हणजे नांदेड जिल्हयात किर्तनाला जायचे होते. त्यांच्याशी संवाद वाढविण्यासाठी बहाणा ही हवाच हाता. बैठकीच्या खोलीमध्ये आलोत. नास्ता तयार होता. ड्रायफूड, बदाम, काजू बेदाणे, काही फळं. ताजी केळी, सफरचंद...त्यांना आग्रह केला पण त्या दोघी नास्त्याला तयार होत नव्हत्या.
"चहा घ्याल का कॉफी…?" आपलं मन त्याचं आदरातिथ्य करण्यात थोडा ही कसूर करू शकत नव्हतं.
"तशी गरज नाहीये. तुमचा आग्रह मोडवत नाही. चहाच घेऊ आम्ही. केतूला हवा असतो सारखा.." मी तिच्याकडे पाहिलं.
"केतकी नाव हिच पण आम्ही लाडाने तिला केतू म्हणतो." प्रा.गार्गीने स्पष्टीकरणं दिलं. त्याची काही गरज नव्हती. ती अजून लाजली.
"अस्सं…! छान नाव. केतू.." मला तिचा नाव उच्चारण्याचा मोह आवरला नाही. ती फक्त लाजर हासली. निमित्त चहाच होतं. आपल्याला त्यांच्या बरोबरचा संवाद वाढवायचा होता. गप्पा सुरू झाल्या. तत्वज्ञानाचं चऱ्हाटा पुन्हा सुरू झालं. महाराष्ट्रातील अघाडीच्या तत्वज्ञाबरोबर त्या चर्चा करीत होत्या. बहुतेक याची जाणिव त्यांना असावी. त्या फार सावध अन विनम्र बोलत होत्या.केतकी सुरवातीला थोडीशी संकोचलेली होती पण नंतर ती उलगडत गेली. तुकोबाच्या एका-एका अभंगावर ती किती सुक्ष्मपणे विवेचन करत होती ! तिच्याकडं नुसत पाहतच राहिलो. अगदी बावीस तेवीस वर्षाची पोट्टी. इतकं अभ्यासू बोलू कशी शकते ? विश्वासच बसत नव्हता. इतकं मॉडर्न असून ती संत वाङमयाचा इतका सखोल अभ्यास का करत असेल ? अगदी पॅन्टं व शर्ट घातलेली मुलगी इतक सात्विक बोलताना मी प्रथमच पहात होतो. कुतूहल माणसाला चैन नाही पडू देत. मी तिला विचारलं,"तू अशी…. मॉडर्न अन् प्रबंधाच विषय… असा का आहे तुझा ?" तिच्या अंगाकड हात करीत मी म्हटलं. ती थोडी अडखळली. सावध झाली. सावरून बसली.
"मी कॉलेजला जाते अजून. तिथं तर असच जाव लागेल ना ? साडी चोळी घालून कॉलेजला थोडच जाता येत. मला वाटत माणसाचा वेष बदलून त्याचे विचार बदलत नाही."
"वेष बदलल्याने विचार नाही बदलत पण विचार बदलल्याने वेष तर बदलत असेल !"
"नक्कीच…! विचारवंत गबाळे असतात. असं वाचलं मी." प्रा.गार्गी ने मध्येच कॉमेन्टस् केलं.
"हे खर कसे असेल ?"केतकी
"का..?"
"मॅडम, तुम्ही कुठं गबाळया आहात ?" सारेच खळखळून हासलो.
"पण मी कुठं.... ?" मॅडमने शब्द गिळले. काय करतील ? मी विचारवंत आहे किंवा गबाळी आहे असं कसं म्हणतील. मान्य तरी कशा करतील ?
"मॅडम, केतकीच खरं…"
"कसं…?"
"तिचं विचार ही सुंदर अन् ती ही…" तिची स्तुती करण्याची संधी मी कशी सोडू ? ती वरमली. आपल्या सौंदर्याची स्तुती कुणाला नको थोडीच असते. लज्जेच चांदणं शिंपीत ती खिडकीकडं पळाली. चहा आला. गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. केतकी अधिक धीटपणे बोलायला लागली होती.चर्चेत ही माणसं आपलं सारं कौशल्य पणाला लावतात.ती मधूर व अभ्यासपूर्ण बोलत होती. ती माझ्यावर इंम्प्रेस झाली की नाही ? काय माहित ? मी तर भुरळून गेलो होतो. आकर्षण माणसाला लंपट आणि मूर्ख बनवत असेल? तुकोबाच्या गाथेतील स्त्री विषयक विचार सांगत होती. अप्रतिम विवेचन.. अचूक संदर्भ… मार्मिक दाखले देत होती.
"तू, हे सारं तुझं पुस्तक रूपात का देत नाहीस ?" माझा केतकीला प्रश्न. ती थांबली. प्रा.गार्गी तिच्याकडे पाहू लागल्या. माझ्याकडे पाहत हासल्या. आश्चर्य व हर्षाच्या रेषा गडद झाल्या तिच्या चेहऱ्यावर.
"पुस्तक…? माझं पुस्तक…!!" तिच्या चेहऱ्यावर भलं मोठ प्रश्न चिन्ह उमटलं होतं. विस्मय बराच आनंद खाऊन टाकत असेल? हर्षोल्लासानं तिनं नाचायला हवं होतं.
"पुस्तक एक असे माध्यम आहे. आपले विचार लाखो लोकासमोर घेऊन जातं. तुला नाही वाटतं ?" तिच्या प्रश्नार्थक मुद्रेला आपल उत्तर.
"पुस्तक… कोण वाचेल माझं ? कोणं ही केतकी राणे ? कोण छापेल माझं पुस्तक ? माझी काय ओळख ? व्हाटस माय आइडेन्टिटी…?" तिचा एक नाही अनेक प्रश्न. हातातल्या रुमालला पीळ देत ती म्हणाली. तिनं जितकं प्रश्न विचारले तितके पीळ घातले असतील.
"मी छापेल. मी देईल नाव तुला. मी देईल ओळख अख्ख्या महाराष्ट्राला. केतकी राणे काय चीज. हू इज शी…?" माझं तिच्या दहा प्रश्नाला एकच उत्तर.तिच्या मनात उठलेले अजून ही काही प्रश्न असतील पण त्याचे ही उत्तर तिला मिळाले असावेत. आनंदाच्या लहरी तिच्या मनात उठल्या असाव्यात व त्याचे तरंग तिच्या चेहऱ्यावर झाकले गेले नाहीत.प्रा.गार्गी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागल्या. साध्या प्रस्तावनेसाठी त्यांना आपल्या कडे अनेक चकरा माराव्या लागल्या होत्या. त्या विद्वान बाईची केतकी एक साधी विद्यार्थीनी होती. एवढी आपली कृपा केतकीवर का व्हावी ? प्रा.गार्गी काही दूधखुळया नव्हत्या. स्त्रीच्या सौंदर्य व तारूण्या पुढं पौरूषत्वं विरघळून जातच ना ?
"महाराज, एवढी कृपा…!! धन्य… होईल केतू, किती भाग्य थोर !" केतकीच्या मऊ केसावरून हात फिरवत लाडीक पण लपंट स्वरात त्या म्हणाल्या.
"भाग्य नाही. हा योग. भगवंताची इच्छा. आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चालेना."गप्पा रंगल्या होत्या. पी.ए.शशीकांत कुलकर्णी आत आला.त्यांनी घडयाळ दाखवत इशारा केला. आता जावं लागणार होत. त्या दर्शनासाठी माझ्या चरणी लीन झाल्या. शूभाशिर्वाद.. दिला. प्रणाम करून मी त्यांचा निरोप घेतला. त्या हव्या असलेल्या गप्पा सोडून उठाव लागलं. माणसं आपण होऊनचं घडयाळाच्या काटयाला आपलं आयुष्य बांधून घेतात व त्याच्या बरोबर पळत राहतात.
त्या नंतर प्रत्यक्ष भेट नाही पण फोन चालू झाले. फोन वर चर्चा… पुस्तकांच्या… अभ्यासाच्या अनेक प्रकरणावर…. चर्चा. तिचे कॉल ही येऊ लागले. आपण फोन वर बोलत असू. कधी तिचा फोन आला नाही तर बैचेन होई. ओढ लागे. हुरहूर.. लागे. प्रेम-बिम नसेल ही कदाचीत. आयुष्याला कसली तरी अनोखी किनार गुंफली जात होती. हे खर होतं ! स्त्रीच्या तारूण्याचा व सौंदर्याचा भोवरा असतो का ? पुरूष त्यात सापडले की स्वत:ची दिशा अन गती गमावून बसतात. आपल्या मनात केतकी विषयी सारखे विचार का येतात ? विशेषत: रात्र तर खायाला उठे. वासनेच्या आगीत होरपळून निघणारी अनेक पुराण पुरूष आपल्याला आठवत राहिले. हे सुख क्षणिक असतं. विषयचं मुळी दु:खाच कारण असतं. विषय न उपभोगता कसं जगायचं…? आनंदाचे कण विषयात गुंडाळून विखरून दिलेले असतात त्या परमात्म्याने. विषयाच्या शेंगा सोलून आनंद चाखत बसतो जीव. तो चिरंतन आनंदाचा झरा कुठं असतो ? तो हृदयातून पाझरणाऱ्या भक्तीत असतो ना ? मग आपल्याला का अजून भेटत नाहीत ? ईश्वरानं पैसा, ऐश्वर्य, मान व सन्मान सारं दिलं पण तो आनंदाचा स्पर्श का नाही दिला. कसा असेल तो आनंदाचा स्पर्श ? केतकीचं पुस्तक तयार होत आलं होत. ती एक दोन वेळेस मठावरही आली. याव लागलं. पुण्याला कधी जाणं झालं तर ती भेटे.. कधी गार्गी मॅडम सोबत.कधी अरूधंती बरोबर असे. मनमनात गुंफली गेली नकळत. प्रेम म्हंजे.. नक्की काय असेल ? मनामनाची गुंफणंच असेल ना ! का मनाचं संतृप्तद्रावणं…?
ती एक दुदैवी रात्र…