ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड भाग १
ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड..........
प्रकरण एक
आपल्या ऑफिस चे दार उघडून पाणिनी पटवर्धन आत आला त्याच क्षणी त्याच्या हाताखाली ज्युनियर म्हणून काम करणारा सुकृतधाडकन दार उघडून आत आला. “ कुक्कुटपाल कंपनी चा ट्रक कोंबड्या वाहून नेत असताना अचानक थांबला आणि आपल्या अशिलाच्या गाडीला धडक बसली.!” एका दमात त्याने सांगून टाकले.
सुकृतहा एक अत्यंत धसमुसळ्या स्वभावाचा, पुस्तकी किडा पण व्यवहार शून्य असा माणूस होता.पटवर्धनच्या ऑफिस चा किरकोळ कार्यभार तो
सांभाळायचा.म्हणजे कायद्याच्या पुस्तकातला एखादा संदर्भ काढून देणे,लहान सहान प्रकरणी कोर्टात जाऊन पुढच्या तारखा घेणे,अॅफिडेव्हिट करणे वगैरे.
त्याला पाणिनी पटवर्धन लहान मोठ्या प्रकरणात स्वतंत्र पणे वकील म्हणून काम करायची संधी देत असे.अत्ता आग लागल्या सारखा आत येऊन धावत सांगत असलेल्या प्रकरणात ज्या अशिलाच्या गाडीला धडक बसल्याचे तो पाणिनीला सांगत होता त्याची वकिली सुकृतने स्वतंत्र पणे घेतलेली दिसत होती.
“ तुझं अशील कोण आहे आणि नेमके काय झालंय ? ” पाणिनीने विचारले.
“ आर्चिस भानू हा आपला अशील आहे.तो आणि त्याची बायको त्यांच्या गाडीने जात होते.त्या कंपनीचा ट्रक अचानक थांबला. काहीही सिग्नल न देता. आपल्या अशीलाची गाडी ट्रक च्या मागे घुसली आणि मोठेच नुकसान झाले त्याचे.” सुकृत म्हणाला.
“ गाडीत आर्चिस भानू एकटाच होता ? ” पाणिनीने विचारले.
“ त्याची बायको सारा होती.
पटवर्धनहसला. “ ....आणि ट्रक चा ड्रायव्हर आता असे म्हणत असेल की त्याने व्यवस्थित सिग्नल दिला होता ट्रक थांबत असल्याचा.त्याने आरशातून त्या गाडीला जवळ येताना पहिले होते, गाडी चालवणारा शेजारी बसलेल्या बाईशी बोलण्यात एवढा गुंतला होता की त्याचे सिग्नल कडे लक्षच गेले नाही. ट्रक वाला आणखी हे ही सांगेल की त्याने जोरजोरात हॉर्न वाजवून गाडी वाल्याचे लक्ष वेधले , ट्रक मागचे लाल दिवे सुद्धा उघड झाप केले.पण काही उपयोग झाला नाही.”
“ अगदी असेच झाले.” सुकृतम्हणाला. “ त्या नंतर ट्रक ड्रायव्हर खाली उतरला.आर्चिसभानू त्याच्या गाडीतून उतरला , दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. खरी मजा पुढेच घडली.आर्चिसभानू ने त्याच्या वहीत ट्रक वर लिहिलेले नाव टिपून घेतले. “ कुक्कुटपाल कंपनी.तो पर्यंत ट्रक वाला काही बोलला नाही, पण भानू ने नंतर ट्रक चा नंबर टिपून घेतल्या बरोबर ट्रक ड्रायव्हर ने त्याच्या हातातील वाही आणि पेन खेचून घेतले आणि आपल्या खिशात टाकले आणि ट्रक मधे बसून निघून गेला. ”
“ कोणाला काही शारीरिक इजा झाली आहे? ” पाणिनीने विचारले.
“ आर्चिस भानू ला मानसिक धक्का बसलाय. डोक्याला जरा लागलंय.”
“कुक्कुटपाल कंपनी चे काही फोन नंबर वगैरे? ”
“ नाही कोणताही तपशील नाही.”सुकृतम्हणाला.
“ ठीक आहे, आपण कनक ला सांगू त्या कंपनीची माहिती काढायला. एवढा मोठा ट्रक कुठून निघाला आणि कुठे गेला हे शोधणे फार अवघड नाही. त्यात कोंबड्या भरलेल्या होत्या म्हणजे तो कुठे गेला असेल याचा अंदाज येऊ शकतो. ”
“ आपल्याला बहुदा या प्रकरणात यश मिळायची शक्यता वाटत नाही ”
“ वकिली करणाऱ्याने कधी निराश होऊन चालत नाही.एखादा तरी आशेचा किरण दिसत असेल तरी त्या दृष्टीने हालचाल करायची असे करावे लागते.” पाणिनीम्हणाला.
“ पण त्यासाठी तपास करवून घ्यावा लागेल, बाहेरच्या एजन्सी कडून.म्हणजे खर्चाचा प्रश्न आला.त्यासाठी तुमची परवानगी............”
“ दिली परवानगी तुला ” पाणिनीत्याला अर्धवट तोडत म्हणाला.
सुकृततिथून निघून गेल्या नंतर थोड्या वेळात फोन वाजला.सौम्या ने उचलला.
“ ऑपरेटर विचारते आहे की अमर्त्य-दक्ष-ध्रुव या वकिलांच्या फर्म मधून मिस्टर अमर्त्य यांना तुमच्याशी बोलायचंय, ते लाईन वर आहेत.फोन जोडून देऊ का?” सौम्याने पाणिनीला विचारले. त्याने मानेने हो म्हटले.सौम्या ने त्याच्या कडे फोन दिल्यावर अमर्त्य चा आवाज आला.त्याने थेट विषयालाच हात घातला. “ तुम्ही आर्चिसभानू याला गाडीच्या अपघाताच्या प्रकरणात वकील म्हणून राहताय असे कळले.तुमच्या अशिलाला तडजोड म्हणून किती रक्कम अपेक्षित आहे ? ”
“ तुमचे अशील किती देऊ शकतो? ” पाणिनीने प्रती प्रश्न टाकला.
“ सर्व प्रकारच्या तक्रारी मागे घेणार असेल तुमचे अशील तर आम्ही जास्तीत जास्त पाच हजार रक्कम देऊ.”
“ तुम्ही कुक्कुटपाल कंपनी चे वकील आहात? ” पाणिनीने विचारले.
“ हो.”
“ मी माझ्या अशीलाशी बोलून कळवतो.”
“ जरा लौकर कळवा.आमच्या अशिलांना पटकन संपवून टाकायचा आहे हा विषय. तसा किरकोळच आहे.” अमर्त्य म्हणालात्याने फोन ठेवल्यावर पाणिनीसौम्याला म्हणाला, “ घटना पटापट घडायला लागल्यात ! सुकृतला बोलाव आत.”
सुकृतआत आला. “ तुझ्या समोरआर्चिसभानू बसलाय अजून की गेला ?”
“ आहे.बसलाय अजून.”
“ त्याला विचार गाडीच्या भरपाई पोटी त्याला किती रक्कम अपेक्षित आहे.”
“ त्याचे म्हणणे आहे चार हजार पर्यंत नुकसान झालंय ,तेवढे मिळाले तरी बास आहेत.”
“ आणि मिसेस भानू ला जो मानसिक धक्का बसलाय त्या बद्दल काय?” पाणिनीने विचारले.
“ त्याचा विचार करता तिला सर्व मिळून आठ हजार अपेक्षित आहेत.”
“ बारा हजारात सर्व काही मिटवतील ? ”
“ प्रश्नच नाही.आठ हजारातही मिटवतील.” सुकृतआश्चर्याने म्हणाला.
“ जा विचारून ये त्यांना.आठ हजारात नक्की ना म्हणून ” पाणिनीम्हणाला.
त्याने ऑपरेटर ला अमर्त्य ला फोन लावायला सांगितला.तो फोन वर आल्यावर पाणिनी म्हणाला “ मला वाटलं होत त्यापेक्षा परिस्थिती जरा गंभीर आहे.मिसेस भानू ला मानसिक धक्का बसलाय.... आणि .... ”
“ किती हवे आहेत त्यांना ? ” अमर्त्य ने मुद्द्याला हात घातला.
“ या शिवाय झालेली चोरी, अशीलाचा अपमान ....” पाणिनी ने आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न केला.
“ रक्कम किती ? ”
“ चाळीस हजार.” पाणिनीम्हणाला.
“ का sss य ”अमर्त्यकिंचाळला नाही तर घोड्या सारखा खिंकाळला.
“ मी स्पष्टच बोललोय आणि तुम्ही नीट ऐकलंय.या पुढे माझ्या कडे माझे अशील बसलेले असताना,मला त्रास देऊ नका. ” पाणिनीने एवढे बोलून फोन ठेऊन दिला.
फोन वरचे संवाद ऐकून सुकृतचे डोळे बाहेर यायचेच बाकी होते.
“ काय डोक्यात आहे तुमच्या सर ? ”
“ घड्याळ लाऊन पाच मिनिटे मोज. मला पुन्हा त्याचा फोन येतो की नाही बघ.” पाणिनीम्हणाला. “ तो त्याच्या अशीलाशी बोलून आपल्याला पुन्हा नवीन प्रस्ताव देईल.”
“ पण या वकिलांना कळलेच कसे की आपण त्यांचे प्रकरण हाताळतोय म्हणून?”सुकृतम्हणाला.
“ त्यांनी कदाचित भानू ला फोन केला असेल. मला तरी काय माहीत त्यांच्या माहितीचा स्त्रोत काय आहे.? ” पाणिनीम्हणाला.
फोन वाजला.पाणिनीने सुकृतला घड्याळ दाखवले. बरोबर साडे तीन मिनिटे झाली होती.
“” मी माझ्या अशीलाशी बोललो.त्यांचे मत आहे की तुमची मागणी पूर्ण पणे अवाजवी आणि विचारात न घेण्याजोगी आहे.” अमर्त्य म्हणाला.
“ वा,वा. हे मस्तच झालं.” पाणिनीउत्साहाने म्हणाला. “ आता आम्ही सरळ कोर्टात दावा लाऊ , नुकसान भरपाई साठी आणि बघू न्यायाधीश किती मंजूर करतात ते.”
“ नाही,नाही, तसे नाही, माझे अशील वीस हजारात सर्व काही मिटवायला तयार आहेत.” घाईघाईत अमर्त्य म्हणाला.
“ फालतू पणा बस्स झाला.” पाणिनीम्हणाला.
“ ऐका मी जबाबदारी घेतो, वैयक्तिक, आणि आणखी चार हजार वाढवून देतो. चोवीस हजारात सर्व मिटवा.”अमर्त्य म्हणाला.
“ मिसेस भानू ला प्रचंड मानसिक धक्का बसलाय आणि आणि तुम्ही सांगताय तो आकडा म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे.” पाणिनीने आणखी ताणून धरले.
अमर्त्य विचारात पडला. “ मी सर्व प्रयत्न केलेत.तुटेल एवढे नका ना ताणू.”
“ अमर्त्य मी आता शेवटचे सांगतो,पुढच्या एका तासात तुमच्या अशिलाने बत्तीस हजार आणून दिले तर आम्ही सर्व तक्रारी मागे घेऊ,” पाणिनीम्हणाला.
“ थांबा जरा पटवर्धन, फोन चालू ठेवा.” अमर्त्य म्हणाला. पाणिनीला तो दुसऱ्या फोन वर बोलत असल्याचे आवाज येत होते पण शब्द कळत नव्हते.
“ मिस्टर पटवर्धन, सर्व काही जमलय आता.माझा माणूस तुमच्या ऑफिसात पुढच्या काही मिनिटात बत्तीस हजाराचा चेक घेऊन येईल.दोन्ही बाजूचे पक्ष करार करतील नोटरी समोर, की बत्तीस हजार स्वीकारून भानू सर्व तक्रारी मागे घेत आहे ”अमर्त्य म्हणाला.
सुकृत च्या कपाळावर घर्म बिंदू जमा झाले. “ बापरे ! तुम्ही एवढे कसे काय ताणू शकता ? मी तर आठ हजारातच मिटवल असते. त्या साडेतीन मिनिटाच्या काळात मी मरायचाच बाकी होतो.”
“ अरे, सुकृत त्या भागातले कोणतेतरी एक प्रकरण आपल्याकडे एवढ्यात आले होते ना? नाव परिचित वाटतंय. ? ”पाणिनीने विचारले.
“ अहो त्या मिसेस राजे ने आपल्याला पत्र लिहिले होते.तिची मिळकत त्या भागात होती.जवळ जवळ ऐंशी एकर.पालेकरनावाच्या एका माणसाशी तिने करार केला होता ती जागा विकायचा.जी काही किंमत ठरली होती ती त्याने दिली नाही आणि त्याने अशी भूमिका घेतली की मिसेस राजे ने काही गोष्टी पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे आता ती मिळकत मी माझ्याकडेच ठेवणार.उलट पक्षी त्यावरच कर वगैरे खर्च ही मला करावा लागलाय. ”सुकृत म्हणाला.
“ त्या राजेबाईनी नंतर दावा नाही लावला त्याच्यावर ?” पाणिनीने विचारले.
“ त्या बाई आता पासष्ट वर्षांच्या आहेत , विधवा आहेत.त्या सध्या एका इस्पितळात उपचार घेतायत ,पाय मोडलाय त्यांचा.त्यांना रस नाही आणि पैसा ही नाही हे सर्व करायला.” सुकृत म्हणाला
“ सुकृतबस जरा दोन मिनिटे.” पाणिनीम्हणाला. “ थोडा वेळ शांतपणे विचार करू आपण.या कुक्कुटपाल कंपनी ने या पद्धतीची तडजोड का केली असेल? खास करून ज्या कालावधीत हे घडले त्यात तोच कालावधी का निवडला असेल त्यांनी तडजोड करायला?”
“ ट्रक ड्रायव्हर ने बळजबरी करून भानू ची वही आणि पेन हिसकावले, अपघातात त्याचीच चूक होती असे सिद्ध झाले तर ? म्हणून ते कोर्टात जायला घाबरत असावेत. ”सुकृतम्हणाला.
पाणिनीने मानेने नकार दिला. “ माझं म्हणणे असे आहे की अपघात आधी झाला पण सकाळी दहा वाजल्या नंतर सर्व हालचालीला सुरुवात झाली.याचे कारण एक तर कंपनीचे सर्व एक्झिक्युटिव्ह हे ऑफिस मधे दहा वाजता येतात. त्यांना अपघाताचा अहवाल गेल्यावर त्यांची तारांबळ उडाली असावी.आणि काहीही झाले तरी त्यांना हे प्रकरण मिटवायचेच असावे. दुसरे म्हणजे बँका सुद्धा दहा ला च उघडतात त्यामुळे आर्थिक व्यवहार सुद्धा दहा नंतर च होणार.सौम्या, कनक ला फोन करून कुक्कुटपाल कंपनी ची सर्व माहिती काढायला सांग. खास करून त्या ट्रक चा नंबर शोधायला सांग त्याला. माझ्या मते ट्रक चा नंबर या प्रकरणात मोठी भूमिका बजावणार.”पाणिनीम्हणाला.
सुकृतकाहीतरी बोलायला गेला पण पाणिनी च्या चेहेऱ्यावरील हावभाव पाहून थांबला.
“ सुकृतत्या राजे बाई ना संपर्क करून सांग की कोणाशीही कसलाही करार करू नका.कोणी काही बोलले तर आम्हाला संपर्क करा.तिला आपण इस्पितळातल्या खास खोलीत हलवू आणि शहरातल्या उत्कृष्ट डॉक्टरांशी बोलून चांगले उपचार करू.तो खर्च तिला करायची गरज नाही असे सांग तिला.”
“ कोणी करायचा खर्च तिचा ? ” सुकृतने विचारले.
“ सध्या आपण , नंतर तो, ती सोडून कोणाकडून तरी वसूल करू.” पाणिनीम्हणाला.
( प्रकरण एक समाप्त.)